आपले सर्व उत्सव धुमधडाक्यात साजरे होतात; तथापि उल्हास आणि उन्माद यांतील सीमा आपण सुबुद्ध म्हणविणार्या नागरिकांनी ओळखायला हवी. हिंदु श्रद्धा निर्मूलनवाले आपल्या प्रत्येक गोष्टीत नाक खुपसायला टपून बसले आहेतच. ते अन्य धर्मियांच्या चमत्कार आणि तत्सम गोष्टींविषयी मूग गिळून गप्प बसतील; पण हिंदूंच्या गोष्टींना मात्र नाक मुरडायला तयार असतात.
अशा फेक्युलर्सना (खोटारड्यांना) आपण संधी का द्यायची ? म्हणून काही गोष्टी आपणच पाळायला हव्यात.
१. तरुणांच्या उत्साहाला सनदशीर रूप हवे !
उत्सवात तरुणांची तरुणाई अधिक उत्साही होते; पण या उत्साहाला सनदशीर रूप मिळाले, तर उत्तम होईल, असे वाटत नाही का ? आपल्या उत्सवात कर्णकर्कश्श गाणी लावून कोणते आणि कोणाचे हित साधले जाणार आहे ? पप्पी दे पप्पी दे पारुला, झिंग झिंग झिंगाट, पोरी जरा जपून दांडा धर, वगैरे गाणी डीजेवर मोठ्या आवाजात लावून बुद्धीदेवता प्रसन्न होणार आहे का, याचा विचार आपणच करायला हवा ना ! भजने, गीतरामायण, कीर्तने अथवा व्याख्याने यांच्या सी.डी. योग्य आवाजात लावता येणे कठीण आहे का ? शास्त्र जेव्हा अनधिकारी लोकांच्या हातात जाते तेव्हा समाजाचा र्हास होऊ लागतो. त्यातही राजकारणी लोकांनी प्रायोजित केलेले उत्सव असले की, आपले कोण आणि काय वाकडे करणार आहे, हा माज वाढतो. तोच उन्मादात बदलतो. मग कोणी हिताचे चार बोल सांगू लागले, तरी त्या जन्मादी झिंगाटात तिकडे दुर्लक्ष केले जाते.
२. गणेशोत्सवात समाजहिताचे आणि प्रबोधनात्मक कार्यक्रम व्हावेत !
अन्य धर्मातील लोकांचा आदर्श घेणे आपल्याला कठीण आहे का ? मुसलमान अथवा ख्रिस्त्यांच्या सण-उत्सवांत डॉल्बीवर हिंदी वा मराठी गाणी किंचाळत आहेत आणि त्या तालावर ते तरुण नाचत आहेत, असे दृश्य दिसते का ? उत्कट भव्य तेचि घ्यावे, मिळमिळीत अवघेची टाकावे, असे समर्थांनी सांगितले आहे. खरे तर बुद्धीदात्याचा हा उत्सव तशाच पद्धतीने साजरा व्हायला हवा. पूर्वी मेळे, पोवाडे, भजने, प्रवचने, कीर्तने आणि व्याख्याने होत असत. अनेक ठिकाणच्या गणेशोत्सवात शास्त्रीय संगीताला एक महत्त्वाचे स्थान होते. आजकाल तर ते संगीत उत्सवांतून जणू सीमापार झाले आहे. जे कलाकार जीवापाड प्रेम घेऊन आपल्या मातीतील असलेली ही विद्या मिळविण्याचा आणि टिकविण्याचा आटोकाट प्रयत्न करतात, त्यांना आपण सन्मानाने बोलावून त्यांचे कार्यक्रम करायला हवेत. फालतू तथाकथित मनोरंजनपर कार्यक्रमांसाठी लाखो रुपये उधळणारे लोक अशा कार्यक्रमांसाठी हात आखडता घेतात. काहींनी अशा गाण्यांच्या वा व्याख्यानांच्या कार्यक्रमांना लोक येत नाहीत हो, असे सांगतात. त्यांना आम्ही इतकेच सांगतो की, गेली ३५ वर्षे आम्ही व्याख्यान आणि प्रवचनाच्या क्षेत्रात आहोत; पण लोक नाही, असा अनुभव नाही. लोकांना जे हवे ते द्यायचे नसते, तर जे समाजाच्या हिताचे असते ते द्यायचे असते. आरंभी कमी लोक येतील; पण नंतर नक्कीच येतील. केवळ गर्दी हाच निकष असेल, तर चित्रपट अथवा मालिका यांमधील तारे-तारिका यांनाच बोलवा. तथापि यातून आलेल्या गर्दीचे नेमके काय आणि कसे प्रबोधन होणार आहे ? त्यांना तर स्क्रिप्टची सवय असते. कुणी लिहून दिले, तर ते वाचून दाखवतील वा तसेच म्हणून दाखवतील.
३. स्वयंघोषित पुरोगाम्यांचा बुद्धीभेद
करणार्या आवाहनांपासून सावध रहावे !
काही स्वयंघोषित पुरोगाम्यांना उत्सव आले, की अंगात संचारते. मग ते नव्या नव्या युक्त्या लढवतात. सध्या सामाजिक संकेतस्थळावरून अशीच एक पोस्ट फिरत आहे. वरवर पहाता भाषा मस्त आणि योग्य वाटते; पण सुप्त संदेश कसा असतो, त्याचा हा उत्तम नमुना आहे. प्रिय लोकहो, ज्यांच्या घरी गणपती येतो त्या सगळ्यांनी गणेशदर्शनासाठी येणार्या लोकांना विनंती करावी की, फुलं, फळं आणि मिठाई आणण्याऐवजी एक वही आणि एक पेन आणावं. अशा प्रकारे जमलेल्या वह्या आणि पेन नंतर महानगरपालिकेच्या शाळेत किंवा झोपडपट्टीत दान करावं. गणपती बाप्पा मोरया. हा तो संदेश होय. देवाला जातांना फुले आणि फळे अर्पण करणे, ही सुंदर परंपरा आहेे. गणपतीला अर्पण केली जाणारी मिठाई आणि फळे पुन्हा प्रसादाच्या रुपात वाटली जातात. त्यासाठी बुद्धीभेद करणारे असले आवाहन कशासाठी ? प्रत्येक जण आपापल्या कुवतीनुसार दान-धर्म कर असतो. त्या नावाखाली उत्सवातील ही सुंदर परंपरा बंद पाडण्याचा धंदा कशासाठी ? अशा छुप्या आक्रमणांना सबव्हर्जन म्हणतात. अशा संदेशांच्या जाळ्यात फसू नका.
४. धान्य, फळे अथवा चॉकलेटचे गणपती बनवणे, हा मूर्खपणा !
धान्य, फळे अथवा चॉकलेटचे गणपती बनवणे, हा मूर्खपणा आहे. देवाचे पावित्र्य मूर्तीत आहे, अशा बनावट गोष्टींत नाही. देवाला अगदी खेळणे बनवू नका, हे सांगायला लागणे दुर्दैवाचे आहे. तसेच गणपतीला वेगवेगळ्या देव, राष्ट्रपुरुष अथवा संत या रुपातही नटवू नका. यांपैकी कोणाचेही विसर्जन केले जात नाही. केवळ गणपती ही देवात विसर्जित केली जाते. त्यामागे काही संदेश आहे. मुळात त्रेतायुगापासून श्री गणेशाची पार्थिव मृत्तिकामूर्ती करून पुजली जात होती. मृत्तिकाच का, तर सगळ्या भौतिक निर्मितीमधील सगळ्यांत अंतिम घटक आहे माती. त्या कणाकणात भगवान पहाणे, ही पार्थिव पूजा आहे. कालवर पायदळी तुडवली जात असलेली माती मोरयाच्या रुपाचा स्पर्श होताच डोक्यावर घेतली जाते. बाप्पाच्या सेवेने हा देह, तसेच नामाने अन् उपासनेने हे मन मंगलमय करावेे. मंगलमूर्तीची पूजा, विसर्जन का ? तर मूर्तीच्या रुपाकर्षणात अडकणेही साधकासाठी अयोग्यच आहे. मूर्ती हे त्या अमूर्तापाशी जाण्याचे माध्यम आहे. त्यामुळे अमूर्तासाठी मूर्त सोडणे, हे विसर्जन. वाहत्या जलातच का ? तर पृथ्वी तत्त्वाच्या वरचे तत्त्व आहे जल. पार्थिवाचे जलात, जलाचे वायूत, वायूचे तेजात अशा रूपात अखेरीस आत्मरूपाचे परमात्मरूपात विलीनीकरण करण्याच्या दिव्य साधनेचा आरंभ आहे. ज्ञानसाधना करा, हाच गणेशोत्सवाचा संदेश आहे.
५. श्रीगणेशमूर्तीचे वहात्या जलात विसर्जन करणेच योग्य !
श्रीगणेशमूर्तीचे वहात्या जलात विसर्जन करणे, हेच योग्य आहे, कृत्रिम तलावात नव्हे. मूर्तीविसर्जनाने प्रदूषण वाढते, ही विज्ञानानंध लोकांची अंधश्रद्धा आहे. नद्यांमध्ये प्रतिदिन कारखान्यांचे, दारू निर्मात्यांचे लक्षावधी गॅलन सांडपाणी सोडले जाते. तेव्हा प्रदूषण होत नाही का ? खोटे सतत बोला आणि बुद्धभेद करा, इतकेच या फेक्युलर्सचे (खोटारड्यांचे) तंत्र आहे. विसर्जनही पारंपरिक पद्धतीने ढोल-ताशा अथवा भजनी मंडळांच्या तालाच्या साक्षीने आणि शिस्तबद्ध होणे अपेक्षित आहे. अनेक ठिकाणी तसे होते; तथापि सर्वत्र हे लोण पसरायला हवे. अन्यांनी टीका करण्यापूर्वी सावध व्हा, आपल्या उत्सवाला उल्हासी रूप द्यायचे का उन्मादी बनवायचे, याचा विचार करा !
– डॉ. सच्चिदानंद शेवडे (संदर्भ : दैनिक तरुण भारत, ११.९.२०१६)
देवतांची विडंबनात्मक गीते लावून बालमनावर कुसंस्कार करणारे जन्महिंदू !
श्री गणेशचतुर्थीच्या काळात अनेक घरांमध्ये मारुती नाही, सेंट्रो नाही… मूषक कंपनीची पमपम छान, उंदीरमामा…. भाग्यवान !, अशा गीतांना बालगीते म्हणून वाजवणारे पालक लहान मुलांना धार्मिकतेचे बाळकडू काय पाजणार ?