राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील
त्रिनेत्र श्री गणेश मंदिराची वैशिष्ट्ये आणि श्री गणेशाला
संकटनिरसनासाठी प्रार्थना करण्यास जातांना झालेला त्रास अन् आलेल्या अनुभूती
१. रणथंभोर येथील त्रिनेत्र गणेश मंदिराची वैशिष्ट्ये
१ अ. रणथंभोरच्या जंगलातील डोंगराच्या कड्यातून स्वयंभू गणेश प्रकट होणे
समुद्र सपाटीपासून २ सहस्र फूट उंचावर असलेल्या रणथंभोरच्या जंगलातील एका डोंगराच्या कड्यातून हा स्वयंभू गणपति प्रकट झाला आहे. श्री गणेशाची मूर्ती पूर्ण नसून डोंगरातून बाहेर आलेल्या भागात श्री गणेशाच्या केवळ मुखाचा आणि सोंडेचा भाग आपल्याला दिसतो. श्री गणेशाच्या दोन्ही बाजूंना त्याचे पुत्र शुभ-लाभ आणि त्यांच्या शेजारी पत्नी रिद्धी-सिद्धी आहेत. अशा प्रकारे गणेश पंचायतन आहे. त्रिनेत्री गणेशाचा तिसरा नेत्र म्हणजे बुद्धी असल्याचे तेथील पुरोहितांनी सांगितले. श्री गणेशाच्या समोर श्रीविष्णूची मूर्ती आहे. त्या मूर्तीमध्ये जिवंतपणा आणि तारक-मारक भाव जाणवतो.
१ आ. पंचक्रोशीतील भक्तांनी कोणत्याही कार्याचे पहिले निमंत्रण श्री गणेशाला देणे
द्वापरयुगात भगवान श्रीकृष्णाचा अवतार झाला होता. तेव्हा त्रिनेत्र गणेश प्रथम प्रकट झाल्याचे तेथील पुरोहित सांगतात. त्रिनेत्र गणपतीचे हे पहिले मंदिर आहे. पंचक्रोशीतील भक्त कोणत्याही कार्याचे पहिले निमंत्रण श्री गणेशाला देतात.
२. आख्यायिका
२ अ. अल्लाउद्दीन खिलजीने मंदिर तोडण्यासाठी
हत्तीला पाठवणे आणि हत्तीने मंदिरासमोर बसून रहाणे
अन् मंदिरात महान शक्तीचा वास असल्याची त्याला जाणीव होणे
अल्लाउद्दीन खिलजीने हे मंदिर तोडण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्याने हत्ती मागवले. पहिला हत्ती आला, तो खाली बसला. दुसरा आणि तिसराही खाली बसला. तेव्हा त्याला लक्षात आले, येथे एक महान शक्तीचा वास आहे. तो गणेशाला शरण गेला आणि त्याने या मंदिराचे गर्भगृह सुशोभित केले. त्याने याला गणेश-पीर असे संबोधले होते. तेव्हापासून या देवालयात मुसलमान लोक श्रीगणेशाच्या दर्शनाला येेतात. ते त्यांच्या परिवारातील विवाह आदींचे प्रथम निमंत्रण देवाला देतात. तेथे मुसलमानांच्या परंपरेनुसार काचेच्या आरास केलेल्या भिंती आणि छते आजही पहायला मिळतात. रणथंभोरच्या या किल्ल्यावर गुप्त गंगेचेही स्थान आहे.
– श्री. प्रणव मणेरीकर
३. द्वापरयुगात श्रीकृष्णाच्या साहाय्याला धावून आलेला त्रिनेत्र गणेश !
द्वापरयुगात भगवान श्रीकृष्णाच्या काळात हा त्रिनेत्र गणेश प्रथम प्रकट झाल्याचे तेथील पुरोहित सांगतात. त्रिनेत्र गणपतीचे हे पहिले मंदिर आहे. पंचक्रोशीतील भक्त कोणत्याही कार्याचे पहिले निमंत्रण श्री गणेशाला देतात. असे म्हटले जाते की, भगवान श्रीकृष्णाने त्याच्या विवाहाचे पहिले निमंत्रण याच गणपतीला दिले होते. त्यानंतरच विवाहादी मंगलकार्यांमध्ये श्री गणेशाला निमंत्रण देण्याची परंपरा चालू झाली.