संत जनाबाईच्या गोवर्यांतून आणि संत चोखा मेळा यांच्या हाडांतून नामजप ऐकू यायचा.
१. संत जनाबाई
संत जनाबाई ही नामयाची दासी म्हणून संत नामदेव परिवारातच आध्यात्मिक जीवन जगत होती. कामे करतांना ती मुखाने विठ्ठलाचे नाम गात होती. तिचे प्रत्येक कर्म ब्रह्मरूप झालेले होते. एकदा जनाबाईचे आणि तिच्या शेजारच्या बाईचे शेणाच्या गोवर्यांवरून कडाक्याचे भांडण झाले; कारण दोघींनी जवळजवळच गोवर्या उन्हात सुकण्यासाठी घातल्या होत्या. त्यांचा हा वाद मिटवण्यासाठी त्याच गावातील पंच तेथे आले. त्यांनी तुमच्या गोवर्या कशा ओळखायच्या ?, असे त्या दोघींना विचारले. तेव्हा जनाबाईने सांगितले, ज्या गोवरीतून विठ्ठल नामध्वनी ऐकू येईल, ती माझी ! त्याप्रमाणे पंचांनी गोवर्या कानाला लावून पहाताच ज्या गोवरीतून विठ्ठल नामध्वनी ऐकू येईल, ती गोवरी जनीच्या नावाने जमा करून त्यांनी उरलेल्या गोवर्या त्या दुसर्या बाईला दिल्या. (संदर्भ : सकल संत चरित्र गाथा)
२. संत चोखामेळा
सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढे येथील गावकोटाचे काम चालू असतांना कोट ढासळला आणि त्याखाली संत चोखामेळा गाडले जाऊन त्यातच त्यांनी देह ठेवला. त्यानंतर संत नामदेवांनी संत चोखामेळा यांच्या अस्थी शोधण्यासाठी तेथील प्रत्येक अस्थी कानाला लावून पाहिली. संत चोखोबांच्या अस्थींतून विठ्ठल विठ्ठल असा नामजप ऐकू येत होता. त्या अस्थी गोळा करून संत नामदेवांनी त्या पंढरपूरच्या विठोबाच्या देवळासमोर नेऊन त्या पुरल्या आणि त्यावर संत चोखोबांची समाधी बांधली.
(संदर्भ : संकेतस्थळ)