१. मोरगाव क्षेत्र अविनाशी असल्याचे वेद आणि पुराणात वर्णन असणे
ब्रह्मदेवाच्या कमंडलूतील पाणी खाली पृथ्वीवर पडून कर्हा नावाची नदी उदयास आली. या नदीच्या तीरावर मयुरेश्वर हे आद्य क्षेत्र फार पुरातन काळापासून वसले आहे. मोरगावचा गणपति म्हणून विख्यात क्षेत्र पुणे जिल्ह्यात येते. हे क्षेत्र अविनाशी आहे. कैलास, स्वर्ग, काशी आणि इतर क्षेत्रे ब्रह्मांडाच्या शेवटच्या प्रलयकाली नष्ट होतात; परंतु हे क्षेत्र नष्ट होत नाही, सर्व वेद आणि पुराण यांत या क्षेत्राचे वर्णन आहे.
२. सूर्य, विष्णु, शक्ती आणि शिव या चार
देवतांनी चार दिशांना उभ्या राहून श्री गणेशाची स्तुती करणे
आणि मयुरेश्वर हे क्षेत्र ब्रह्माची प्राप्ती करून देणारे ठिकाण असणे
मोरगाव पृथ्वीलोकात असूनही स्वर्गापेक्षा अधिक पवित्र आणि शक्तीशाली आहे. ब्रह्मदेवापेक्षाही श्रेष्ठ असे हे मोरगाव क्षेत्र आहे. यालाच स्वानंदलोक (भूस्वानंद क्षेत्र) असेही म्हणतात. भूलोकावरील सर्वांत जास्त आनंद देणारी आणि सृष्टीवर नियंत्रण ठेवणारी जागा म्हणजे मोरगावचा मयुरेश्वर होय. वेदांमध्ये वर्णित सूर्य, विष्णु, शक्ती आणि शिव या चार उपासना करणार्या देवतांचा निवास भूस्वानंद क्षेत्राच्या दाराजवळ आहे. या चार देवता चार दिशांना उभ्या राहून गणेशाची स्तुती मोरगावी करीत आहेत. पूर्व द्वाराजवळ विष्णु, पश्चिम द्वाराजवळ शक्ती, उत्तर द्वाराजवळ सूर्य आणि दक्षिण द्वाराजवळ शिव आहे. ऋग्वेदात या क्षेत्राची महती वर्णिलेली आहे. मयुरेश्वर क्षेत्र ब्रह्माची प्राप्ती करून देणारे ठिकाण आहे. पृथ्वीवरील सर्व क्षेत्रांचे मूळ, सर्व अधिष्ठानांचे मूळ स्थान हेच आहे. येथील श्री गणेशाची शक्ती फलदायी आहे. आजही येथे सर्व देवता सूक्ष्मरूपाने वास करीत आहेत. या क्षेत्राची केवळ द्वारयात्रा केली, तरी सर्व क्षेत्रांच्या यात्रांचे परिपूर्ण फळ आणि चारही पुरुषार्थांची सिद्धी भक्तांना होऊ शकते.
३. मोरगाव क्षेत्र म्हणजे गणेश संप्रदायाची काशी !
मोरगाव क्षेत्राचे फळ अक्षय असे आहे आणि ते मिळाल्याविना रहात नाही. येथे ज्याला मृत्यू येईल, तो साक्षात् पूर्ण कैवल्यसिद्धीला प्राप्त होतो. श्री गणेशाने स्वेच्छेने स्वतःच्या विलासासाठीच हे क्षेत्र निर्माण केले असल्याने ते पूर्णरूप असे सर्व शक्तीमान आणि मूलभूत असे आहे. केवळ दर्शन घेतल्याने किंवा येथे बसून नामस्मरण केल्याने कैवल्यमुक्ती मिळते, असे सामर्थ्य या मयुरेश क्षेत्रामध्ये आहे. हे क्षेत्र म्हणजे गणेश संप्रदायाची (गाणपत्य संप्रदाय) काशी समजले जाते.
४. श्री गणेश प्रसन्न झाल्यावर मोरावर
बसल्याने मूर्तीला मयुरेश्वर गणपति, असे म्हटले जाणे
या क्षेत्री सोमवारी सर्व देवतांना श्रीगणेशाने दर्शन दिले. भाद्रपद शुक्ल चतुर्थीला येथील गणेशाच्या मूर्तीची स्थापना देवालयात झाली. माघ शुक्ल चतुर्थीला श्री गणेश प्रसन्न झाला. त्या वेळी तो मोरावर (मयुरवाहनावर) बसलेला होता; म्हणून येथील मूर्तीला मयुरेश्वर गणपति असे म्हणतात. या क्षेत्रात पूर्वी मोरांचे वास्तव्यही पुष्कळ होेते; म्हणूनही हे क्षेत्र मयुरेश्वर म्हणून प्रसिद्ध झाले. श्री गणेशाने वरील चार देवतांना सृष्टीरचना करण्याची शक्ती आणि सत्ता येथे प्रदान केली.
५. श्री गणेशाचा पहारेकरी श्री नग्नराज भैरव असणे आणि
स्कंदपुराणात या क्षेत्रात पुष्कळ शक्ती असल्याचा उल्लेख असणे
याच क्षेत्रातील श्री नग्नराज भैरव येथे सतत संरक्षण करीत असून या क्षेत्राचे पुण्यफळ भक्ताला द्यायचे किंवा नाही त्याचा निर्णय हा नग्नराज भैरव ठरवत असतो. या गजाननाच्या जवळ येण्यास कोण योग्य वा अयोग्य आहे, हे त्याला ओळखता येते. येथे यमराजाचा अधिकार चालत नाही. या क्षेत्री येऊन भक्तांकडून काही चुका झाल्यास त्याला काही वर्षे यातना भोगाव्याच लागतात. या क्षेत्रात पुष्कळ शक्ती असल्याचा उल्लेख स्कंदपुराणात आहे.
६. प.पू. योगिंद्रमहाराजलिखित श्रीगणेशविजय
नामक ग्रंथात मयुरेशक्षेत्राचा इतिहास, आध्यात्मिक महत्त्व
वर्णन केलेले असणे आणि मुद्गल पुराणात या क्षेत्राचा उल्लेख असणे
आपल्या हातून इतर क्षेत्रांत झालेली पापकर्मे या गणेशाच्या केवळ दर्शनाने नष्ट होतात. मयुरेश क्षेत्री गेल्यावर शरिरातील पापे नाश पावतात. कितीही भयंकर पाप घडले असेल, तरी येथे येऊन मयुरेशाच्या आराधनेला आरंभ करताच त्या पापांचा प्रभाव नष्ट होत जातो. प.पू. योगिंद्रमहाराजलिखित श्रीगणेशविजय नामक ग्रंथात मयुरेशक्षेत्राचा इतिहास आणि आध्यात्मिक महत्त्व वर्णिलेले आहे. मुद्गल पुराणातही या क्षेत्राचा उल्लेख आहे. सूर्यग्रहणकाळात येथील कर्हा नदीच्या काठी बसून गणेशमंत्राचा जप केल्यास ते मंत्र सिद्ध होतात. येथील मंदिरात बसून गणेश अथर्वशीर्षाची आवर्तने केल्यास संपूर्ण अथर्वशीर्षच सिद्ध करून घेता येते. आपण पृथ्वीवर असणार्या या स्वयंभू स्वानंदलोकी जाऊन दर्शन घ्यावे. तेथे मिळणार्या आनंदाची अनुभूती घ्यावी. पृथ्वीतलावर धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष मिळवून देणारे हे एकमेव क्षेत्र आहे.
७. श्री गणेशतत्वाचा लाभ होण्यासाठी अध्यात्मशास्त्रानुसार पूजा करावी !
पूजा करतांना गणेशमूर्तीला अनामिकेने गंध लावावे. देवालयात चंदन, केवडा किंवा चमेली या सुगंधी उदबत्त्यांनी ओवाळावे. श्री गणेशाला हीना अत्तर लावावे. दुर्वा आणि जास्वंदीची फुले अर्पण करावीत. मंदिराभोवती आठ किंवा आठच्या पटीत प्रदक्षिणा घालाव्यात. श्री गणेशाय नमः या मंत्राचा नामजप करावा. श्री गणेशाची कृपा संपादून आपल्यात साधनेचे बळ निर्माण होण्यासाठी श्रीगणेशाला भावपूर्ण साकडे घालावे, असे सांगितले जाते.
– प्रा. श्रीकांत भट, अकोला (११.९.२०१५)