श्री गणेशाची सात्त्विक मूर्ती बनवून ईश्‍वरप्राप्तीसाठी कला समर्पित करणारे सनातनचे मूर्तीकार-साधक श्री. गुरुदास खंडेपारकर यांना प.पू. डॉक्टरांनी दिलेले मूर्तीज्ञान आणि त्यांच्या चैतन्यानुभूती !

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे अमृत महोत्सवी वर्ष आणि
गणेशोत्सव यानिमित्त गणेशभक्तांना भावभक्तीची भेट !

Ganeshmurti

Gurudas_dada_2011
श्री. गुरुदास खंडेपारकर

सनातनचे मूर्तीकार-साधक श्री. गुरुदास खंडेपारकर यांनी अभिनव कला महाविद्यालय, पुणे येथे डी.एम्.सी., ए.टी.डी. आणि जी.डी. आर्ट (पेंटींग) चे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर वर्ष १९९६ ते २००० या कालावधीत मुंबईच्या एका प्रसिद्ध चित्रकारासमवेत ज्युनिअर आर्टिस्ट म्हणून काम केले. मूर्तीकला हा त्यांचा विषय नव्हता; पण त्यांच्या नोेकरीच्या ठिकाणी जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्समधून शिल्पकलेचे शिक्षण घेतलेले दोघे जण होते. त्यांना मूर्ती बनवत असतांना श्री. गुरुदास यांनी पाहिले होते. अजंठा, खजुराहो येथील शिल्पकलाही जवळून पाहिली होती. त्यांच्या मामांकडे पारंपरिक पद्धतीने गणेशमूर्ती बनवल्या जातात. पुण्याला घरी असतांना त्यांनी सनातन संस्थेने प्रकाशित केलेल्या श्री गणेशाच्या चित्रावरून एक मूर्ती सिद्ध केली आणि प.पू. डॉक्टरांना दाखवण्यासाठी ती गोव्याला पाठवली. त्यानंतर गुरुदासदादा स्वतःच गोव्याला आले आणि ईश्‍वरप्राप्तीसाठी कला या विषयाच्या अभ्यासाला त्यांचा आरंभ झाला. संतांनी त्यांना श्री गणेशाची मूर्ती सिद्ध करण्यास सांगितली आणि येथे त्यांच्या मूर्तीकलेच्या सेवेचा श्रीगणेशा झाला.

सात्त्विक गणेशमूर्ती कशी असावी, हे समाजाला समजावे, यासाठी सनातनने अधिकाधिक गणेशतत्त्व आकर्षित करणारी गणेशमूर्ती सिद्ध करण्यासाठी संशोधन चालू केले. प.पू. डॉक्टरांच्या मार्गदर्शनानुसार वर्ष २००४ मध्ये विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर सनातनचे मूर्तीकार-साधक श्री. गुरुदास खंडेपारकर यांनी श्री गणेशाची सात्त्विक मूर्ती बनवण्यास आरंभ केला.

प.पू. डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली वर्षभर केलेल्या प्रयत्नांतून ही सात्त्विक गणेशमूर्ती साकारत असतांना मूर्तीकार श्री. गुरुदास यांना प.पू. डॉक्टरांकडून मूर्तीकलेतील अनेक बारकावे शिकायला मिळाले. त्यांना मिळालेला प.पू. डॉक्टरांचा सत्संग आणि त्यांनी शिकवलेली नवनवीन सूत्रे यांविषयी श्री. गुरुदास यांनी सांगितलेली पुढील माहिती आज वाचूया.

 

१. श्री गणेशाची सात्त्विक मूर्ती सिद्ध करतांना अनुभवलेला प.पू. डॉक्टरांचा भावसत्संग !

 

अ. श्री गणेशमूर्ती सिद्ध करतांना आलेल्या अनुभूती

१. फुले टवटवीत रहाणे : प.पू. भक्तराज महाराज यांच्या छायाचित्राला मी प्रतिदिन सदाफुलीची फुले वहात असे. बरेचदा ती फुले प.पू. डॉक्टरांच्या कृपेमुळे ४ – ५ दिवसांपर्यंत टवटवीत रहात.

 

आ . गणेशमूर्ती अधिकाधिक चैतन्यमय होण्यासाठी प.पू. डॉक्टरांच्या
कृपेमुळे केलेले अन्य प्रयत्न आणि शिकायला मिळालेली सूत्रे

१. मूर्तीमध्ये अधिकाधिक गणेशतत्त्व येण्याचे उद्दीष्ट ठेवून त्यासाठी संगणकाचा वापर करणे : गणेशाची मूर्ती बनवतांना ती किती चांगली दिसते एवढेच नव्हे, तर त्या मूर्तीमध्ये देवतेचे तत्त्व किती प्रमाणात आले आहे, याला महत्त्व आहे. आपण बनवत असलेल्या छोट्या मूर्तीमध्ये अधिकाधिक गणेशतत्त्व आणणे, हे उदिष्ट मी माझ्यासमोर ठेवले. अध्यात्मशास्त्रानुसार मूर्तीच्या आकारामध्ये थोडा जरी पालट झाला, तरी त्यात देवतेचे तत्त्व येत नाही, हे मला संस्थेत आल्यावर शिकायला मिळाले. त्यामुळे मूर्तीमध्ये अचूकता आणण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचाही वापर केला. मूर्ती करतांना प्रत्येक टप्प्याला मूर्तीचे छायाचित्र काढले आणि नंतर त्यातील त्रुटी टिपण्यासाठी संगणकाचा वापर केला.

२. प्रार्थना करण्याचे आणि शरणागत भाव असण्याचे महत्त्व उमगणे : सतत प्रार्थना करण्याचे महत्त्व उमगून श्री गणेशाशी बोलणे, त्याचे विचार मनामध्ये आणणे, सतत कृतज्ञतेचा भाव ठेवणे आणि नामजप करणे इत्यादी कृती वाढल्या. मूर्ती बनवण्याच्या जागेचे पावित्र्य टिकून रहाण्यासाठी मी तेथे गोमूत्र शिंपडत असे आणि वास्तूदेवतेला प्रार्थना करत असे. मूर्तीमधील बारकावे टिपणे आदी गोष्टी आवश्यक असल्या, तरी तिच्यामध्ये चैतन्य येण्यासाठी सातत्याने शरणागत भाव असणे आवश्यक आहे, हेही लक्षात आले.

 

२. विविध उपक्रमांसाठी लागणारी चित्रे संगणकावर सिद्ध करतांना शिकायला मिळालेली सूत्रे

 

अ. प.पू. डॉक्टरांनी संगणकावर सात्त्विक चित्रे सिद्ध करण्यास शिकायला सांगणे

आश्रमात येण्यापूर्वी मी कधीही संगणक हाताळला नव्हता. श्री गणेशाची पहिली मूर्ती सिद्ध केल्यानंतर मूर्तीशी संबंधित पुढील सेवा करण्यास अवकाश होता. तेव्हा प.पू. डॉक्टरांनी मला संगणकावर सात्त्विक चित्रे कशी सिद्ध करायची, हे शिकण्यास सांगितले. मी प्राथमिक टप्प्याचे शिकत असतांना एक दिवस विभागातील साधिकेसमवेत त्यांनी निरोप पाठवला, थोडेफार संगणक शिक्षण झाले असेल, तर त्याला पुढची सेवा द्या. तेव्हापासून चित्रे सिद्ध करण्याची सेवा त्यांच्या कृपेमुळे करता येईल, असा आत्मविश्‍वास निर्माण झाला.

आ. श्री गणेशाला, तसेच संगणकालाही देवता समजून प्रार्थना केल्यामुळे

नवनवीन सुविधा समजू लागणे आणि प्रार्थनेचे महत्त्व ध्यानी येणे

मूर्तीशी संबंधित सेवा करतांना मी श्री गणेशाला प्रार्थना करत असे. संगणकावर चित्रांच्या निर्मितीची सेवा करतांना मी श्री गणेशासह (श्री गणेश ही कलेची अधिष्ठात्री देवता आहे) ज्या संगणकावर चित्रांची निर्मिती करत असे, त्या संगणकालाही देवता समजून प्रार्थना करायचो. त्यामुळे तो संगणकच मला संगणकीय प्रणालीतील नवनवीन सुविधा शिकवू लागला. त्यामुळे प्रत्येक चित्र देवाला अपेक्षित असे सिद्ध करणे जमू लागले. यामुळे मूर्तीसाठी लागणारी माती, चित्रांसाठी लागणारा संगणक, असे कोणतेही माध्यम असले, तरी प्रार्थना करणे महत्त्वाचे आहे. ती प्रार्थनाच माझ्याकडून सेवा करवून घेत असल्याचे मला शिकायला मिळाले.

इ. संचित, प्रारब्ध आणि क्रियमाण कर्म या ग्रंथाचे मुखपृष्ठ सिद्ध करतांना
संत तुकाराम महाराजांप्रमाणे प.पू. डॉक्टरांनी साधकांसाठी मोक्ष जवळ आणला, असे वाटणे

संचित, प्रारब्ध आणि क्रियमाण कर्म या ग्रंथाचे मुखपृष्ठ सिद्ध करतांना भूलोकापासून मोक्षाकडे जाणारी उर्ध्वगामी आणि सप्तपाताळांकडे जाणारी अधोगामी वाट दाखवायची होती. त्यातील मोक्षाकडे जाणार्‍या वाटेवर मोक्षाचा बिंदू पुष्कळ दूर असल्याचे दर्शवले होते. चित्राच्या शेवटच्या टप्प्यात प.पू. डॉक्टरांनी मोक्षाचा बिंदू अलीकडे घेण्यास सांगितला. तेव्हा तुकाराम महाराजांनी लिहिलेला अभंग ऐकतांना तुका म्हणे सोपी केली पायवाट । उतरावया भवसागर रे ॥ – तुकारामगाथा, अभंग १८९, ओवी ५ ,ही ओळ मला ऐकायला मिळाली आणि प.पू. डॉक्टरांनी साधकांसाठी मोक्ष जवळ आणला, असे वाटले.

 

ई. सनातन पंचांगाच्या मुखचित्रावर मोक्षाकडे जाणारी वाट दाखवतांना
प.पू. डॉक्टरांनी सांगितलेले मोक्षपथावरील अडथळे आणि चांगली साधना करण्याचे महत्त्व !

सनातनने एक वर्ष प्रकाशित केलेल्या पंचांगासाठी लागणारी चित्रे सिद्ध करतांना एका मुखचित्रात साधक मोक्षाकडे वाटचाल करत असलेले दाखवायचे होते. तेव्हा मोक्षाकडे जाणारी वाट मी एक-दोन वळणांची असल्याचे दर्शवले होते. ती वाट पाहून प.पू. डॉक्टरांनी सांगितले, वाट एवढी सोपी नसून वाटेत पुष्कळ खाचखळगे असतात. चढ-उतार असतात. तसे दाखव. त्याप्रमाणे ती वाट करून दाखवल्यावर ते म्हणाले, आता गंमत करूया. यात मार्गावर दगड-धोंडेही दाखव. तसे केल्यावर ते म्हणाले, दगड-धोंडे दाखवतांना कसेही न दाखवता मोठे दगड आरंभी आणि जवळ जवळ, तर पुढे छोटे दगड अन् लांब लांब अंतरावर दाखव ! साधना करतांना असे विविध अडथळे येतात. साधना चांगली होऊ लागली की, अडथळे न्यून होत जातात. पुढे जेव्हा माझ्या साधनेत अडथळे येऊ लागले, तेव्हा प.पू. डॉक्टरांचे हे वाक्य आठवून मला संघर्ष करण्यासाठी बळ मिळू लागले. अजूनही त्यातून प्रोत्साहन मिळते.

 

प्रार्थना

प.पू. डॉक्टर, या दगडाला तुम्हीच आकार द्या आणि यापुढील सेवा आपणच माझ्याकडून आपल्याला अपेक्षित अशी करवून घेऊन गुरुदास बनवून घ्या, अशी आपल्या चरणी प्रार्थना !

 

आपली भक्ती अशी असायला हवी की, प्रत्यक्ष भगवंत मॉडेल म्हणून चित्र
काढण्यासाठी समोर बसला पाहिजे, याची श्री. गुरुदास यांनी घेतलेली प्रचीती !

मारुतीचे सात्त्विक चित्र सिद्ध करतांना प.पू. डॉक्टरांनी स्वतः
वीरासनात बसून दाखवल्यावर त्यांच्या वाक्याचे स्मरण होऊन कृतज्ञता वाटणे

वर्ष २०१० मध्ये मारुतीचे सात्त्विक चित्र सिद्ध करतांना मला मारुतीची उजवी मांडी काढणे जमत नव्हते. तेव्हा प.पू. डॉक्टरांनी स्वतः मारुतीप्रमाणे वीरासनात बसून मांडी कशी हवी, हे दाखवले. तेव्हा मला प.पू. डॉक्टरांच्या वाक्याचे स्मरण झाले, आपली भक्ती अशी असायला हवी की, प्रत्यक्ष भगवंत मॉडेल म्हणून चित्र काढण्यासाठी समोर बसला पाहिजे ! माझी एवढी भक्ती नसतांनाही प.पू. डॉक्टरांनी स्वतः आसन करून दाखवले आणि चित्र काढून घेतले; म्हणून कृतज्ञता वाटली.

वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा शिकवून प.पू. डॉक्टरांनी मला आनंद मिळवण्यास शिकवले, यासाठी त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करावी, ती थोडीच आहे !

– श्री. गुरुदास सदानंद खंडेपारकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१७.४.२०१६)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात