कोणतीही कृती करण्यापूर्वी ती करण्यामागील शास्त्र बुद्धीने समजून घेतल्यास तिचे महत्त्व मनाला प्रभावीपणे समजते आणि केलेली कृती अधिक मनापासून झाल्याने परिणामकारक होते. स्वभावदोषांमुळे होणारी अपरिमित हानी, तसेच त्यांचे निर्मूलन आणि गुण-संवर्धन यांमुळे विविध स्तरांवर होणारे लाभ जाणून घेतल्यास त्यांचे महत्त्व मनावर प्रभावीपणे बिंबवता येईल. या लेखात आपण स्वभावदोष निर्मूलनाचे महत्त्व आणि लाभ जाणून घेऊ.
१. स्वभावदोष-निर्मूलनाने शारीरिक स्तरावर होणारे लाभ
स्वभावदोषांमुळे आहार-विहाराच्या अयोग्य सवयी लागून व्यक्तीचे आरोग्य बिघडते. स्वभावदोष-निर्मूलनामुळे या अयोग्य सवयी बदलून निरामय आयुष्य जगता येते, तसेच मानसिक तणावास कारणीभूत असणारे स्वभावदोष, उदा. काळजी, भीती, राग वगैरे दूर झाल्यामुळे आम्लपित्त, उच्च रक्तदाब, दमा, हृदयविकार वगैरे मनोकायिक विकार होण्याची शक्यता कमी होते.
२. स्वभावदोष-निर्मूलनाने मानसिक स्तरावर होणारे लाभ
अ. मनोविकार दूर होणे : स्वभावदोष दूर झाल्यामुळे मनावरील ताण दूर होतो. त्यामुळे विविध मनोविकार दूर होण्यास मदत होते. मनावरील ताण कमी झाल्यामुळे स्वभावदोषांशी लढून टिकून रहाण्यासाठी अनावश्यक खर्च होणारी मनाची ऊर्जा वाचवता येते. त्यामुळे मनाचा उत्साह दीर्घकाळ टिकतो.
आ. व्यसनाधीनता कमी होणे : मनाचा कमकुवतपणा कमी झाल्यामुळे व्यसनाधीनता कमी होण्यास मदत होते.
इ. अंतर्मुखता आणि अंतर्निरीक्षण यांत वाढ होणे : स्वभावदोष-निर्मूलन करतांना स्वतःची प्रत्येक कृती, भावना, विचार आणि प्रतिक्रिया यांकडे बारकाईने लक्ष द्यावे लागते. त्यामुळे अंतर्निरीक्षण वाढते. अंतर्मुख झाल्यावाचून दोष शोधणे अशक्य आहे. स्वभावदोष शोधण्याच्या प्रक्रियेत अंतर्मुखता वाढते. त्यामुळे चूक स्वीकारण्याची वृत्ती वाढते.
ई. मनाचा उत्साह वाढणे : निरर्थक आणि नकारात्मक विचारांचे प्रमाण कमी होते. त्यामुळे सकारात्मक विचारांत वाढ होऊन मनाचा उत्साह वाढतो.
उ. मनाची एकाग्रता वाढणे : चित्तातील केंद्रांमधील संस्कार जेवढे कमी, तेवढ्या चित्ताकडून बाह्यमनाकडे येणाऱ्या संवेदना कमी होतात. स्वभावदोषनिर्मूलनामुळे अंतर्मनातील विविध केंद्रांमधील अयोग्य संस्कार कमी होतात. तसेच नवे अयोग्य संस्कार निर्माण होत नाहीत. त्यामुळे मनाची एकाग्रता वाढते.
ऊ. मनोबल वाढणे : कठीण प्रसंगांना धैर्याने सामोरे जाता येते. दैनंदिन जीवनातील कौटुंबिक, आर्थिक आणि सामाजिक समस्या सोडवतांना तणाव टाळून मानसिकदृष्ट्या स्थिर रहाता येते.
ए. व्यक्तीमत्त्व विकास : ज्या व्यक्तीमत्त्वात स्वभावदोष नाहीत आणि कोणत्याही प्रकारचा तणाव सहन करण्याची क्षमता उत्तम असते, त्या व्यक्तीमत्त्वाला ‘आदर्श व्यक्तीमत्त्व’ असे म्हणतात. स्वभावदोष-निर्मूलनाने अयोग्य वर्तनास कारणीभूत असलेले स्वभावदोष दूर होतात आणि स्वभावदोषांच्या जागी गुणांचा संस्कार होतो आणि व्यक्तीच्या वृत्तीत सकारात्मक बदल होतो. त्यामुळे ‘आदर्श व्यक्तीमत्त्व’ विकसित होण्यास मदत होते.
३. स्वभावदोष-निर्मूलनाने बौद्धिक स्तरावर होणारे लाभ
अ. स्वभावदोषांमुळे मनात येणारे निरर्थक आणि नकारात्मक विचार कमी होऊन एकाग्रता वाढल्याने आकलन आणि ग्रहण शक्ती यांत वाढ होते.
आ. कोणत्याही प्रसंगात अधिक योग्य कृती निश्चित करणे, हे व्यक्तीच्या निर्णयक्षमतेवर अवलंबून असते. स्वभावदोष दूर केल्यामुळे व्यक्तीची निर्णयक्षमता विकसित होते.
इ. कोणत्याही समस्येने त्रस्त होण्याऐवजी तिच्यावर स्वतःच तोडगा काढण्याची सवय होऊन व्यक्तीचा आत्मविश्वास वाढतो. त्यामुळे तिची स्वयंपूर्णतेकडे वाटचाल होते.
ई. स्वभावदोष स्वीकारण्याची सवय झाल्यामुळे अंतर्निरीक्षण वाढते. स्वतःच्या प्रत्येक कृतीचा आणि मनातील प्रत्येक विचाराचा त्रयस्थाच्या भूमिकेतून अभ्यास करण्याची अंतर्दृष्टी निर्माण होते. त्यामुळे अंतर्मुखता आणि चिंतनशीलता यांत वाढ होते.
उ. स्वतःच्या व्यक्तीमत्त्वातील एकेक पैलूंचा अभ्यास करता येतो. त्यामुळे वैचारिक प्रगल्भता वाढते.
४. स्वभावदोष-निर्मूलनाने कौटुंबिक,
कार्यालयीन आणि सामाजिक स्तरावर होणारे लाभ
अ. कौटुंबिक
अयोग्य पद्धतीने बोलण्याने बरेच प्रापंचिक प्रश्न निर्माण होतात. स्वभावदोष-निर्मूलनामुळे रागीटपणा, भांडखोरपणा, उद्धटपणा वगैरे स्वभावदोष, तसेच वाचिक प्रतिक्रिया कमी होतात. त्यामुळे कुटुंबियांच्या मनावर ताण येत नाही. कुटुंबातील व्यक्तींच्या प्रकृतीशी जुळवून घेता आल्यामुळे कुटुंबियांमध्ये परस्पर सामंजस्य वाढून कौटुंबिक सौख्यात वृद्धी होते.
आ. कार्यालयीन
अ. कार्यक्षमतेत वाढ होणे : दिवसभरात मनात येणाऱ्या प्रतिक्रिया आणि विचार यांचा अभ्यास केल्यास ७० ते ८० टक्के विचार निरर्थक असल्याचे लक्षात येते. या विचारांवर मनाची शक्ती अनावश्यक खर्च होते. काम आणि क्रोध या दोन षड्रिपूंवर ६० टक्क्यांहून अधिक प्रमाणात शक्ती खर्च होते. स्वभावदोष-निर्मूलनामुळे ही अनावश्यक खर्च होणारी शक्ती वाचून आपली कार्यक्षमता वाढते, उदा. एखादी व्यक्ती आळशीपणामुळे सकाळी उशिरा उठल्यामुळे तिला कार्यालयात वेळेवर पोहोचण्यासाठी खूप धावपळ करावी लागते. त्यामुळे दररोज तिच्या मनावर ताण येतो आणि तिच्या मनाची खूप शक्ती ताण कमी करण्यासाठी खर्च होते. स्वभावदोष-निर्मूलनासाठी प्रयत्न केल्याने ‘आळशीपणा’ हा स्वभावदोष दूर झाल्यास तिच्यात ‘तत्परता’ वाढते आणि तिच्या मनावरील ताण कमी होतो. त्यामुळे व्यक्तीची कार्यक्षमता ३० टक्क्यांनी वाढते.
आ. सहकाऱ्यांशी सुसंवाद साधण्यास मदत होणे : स्वभावदोषनिर्मूलनाने सहकाऱ्यांशी जुळवून घेता येते. त्यामुळे आत्मविश्वास वाढतो. परस्पर सामंजस्य आणि विश्वासार्हता यांत वाढ होते.
इ. नेतृत्वगुणामुळे कार्यालयीन आणि व्यावसायिक क्षेत्रात यश मिळणे : योग्य निर्णयक्षमता आणि संघटनकौशल्य विकसित झाल्यामुळे व्यक्तीत नेतृत्वगुण निर्माण होतो. त्यामुळे ती कार्यालयीन क्षेत्रात यशस्वी होते. अयोग्य प्रतिक्रियांशी संबंधित स्वभावदोष दूर झाल्यामुळे व्यक्तीत संभाषणकौशल्य विकसित होऊन तिला व्यावसायिक क्षेत्रात यश मिळते.
इ. सामाजिक
व्यक्तीतील स्वभावदोषांमुळे तिचे मनोबल कमी होते. सामाजिक समस्यांना सामोरे जाऊन त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी त्यांपासून पळ काढण्याचा ती प्रयत्न करते किंवा तटस्थपणाची भूमिका घेते, उदा. डोळ्यांसमोर गुन्हा घडत असल्याचे दिसत असतांना त्याचा प्रतिकार न करणे किंवा सरकारी कार्यालयात एखाद्या कर्मचाऱ्याने लाच मागितल्यास त्याला विरोध न करणे किंवा त्याच्या वरिष्ठांकडे अथवा पोलिसांकडे तक्रार न करणे वगैरे. स्वभावदोष-निर्मूलनामुळे व्यक्तीचे मनोबल वाढून तिच्यात अन्यायाचा प्रतिकार करण्याची क्षमता निर्माण होतेच, तसेच तिला समाजावर होणाऱ्या अन्यायाचीही चीड येते आणि सामाजिक दुःस्थिती बदलण्याचा विचार करावासा वाटतो. संकुचितपणा, आत्मकेंद्रितपणा, सहानुभूती नसणे, इतरांना मदत न करणे, भ्याडपणा वगैरे स्वभावदोषांचे निर्मूलन झाल्यामुळे व्यक्तीत सामाजिक जाणिवा विकसित होतात.
५. स्वभावदोष-निर्मूलनाने आध्यात्मिक स्तरावर होणारे लाभ
अ. श्रद्धा दृढ होऊन साधनेत सातत्य रहाणे : ईश्वराशी एकरूप होण्याचे ध्येय साध्य करण्यास योगमार्गात सातत्य आवश्यक असते. श्रद्धा असल्यासच हे शक्य होते. स्वभावदोष-निर्मूलनाने विकल्प दूर होऊन श्रद्धा दृढ होण्यास मदत होते.
आ. वासनाविषयक विचार कमी होणे : वासनाविषयक विचार मनात आल्यामुळे साधनेत अडथळे निर्माण होतात. स्वभावदोष-निर्मूलनाने या विचारांची तीव्रता कमी होते.
इ. साधकत्व निर्माण होऊन ते वृद्धींगत होणे : ईश्वरप्राप्ती जलदगतीने होण्यास ‘गुरुकृपा होणे’ आणि ‘गुरुकृपेचा ओघ सातत्याने टिकून रहाणे’ आवश्यक असते. त्यासाठी ‘साधकत्व’ असणे आवश्यक असते. स्वभावदोष-निर्मूलनामुळे वाईट शक्तींचे स्वभावदोषरूपी स्थान नष्ट करणे आणि गुरुकृपेचे स्थान, म्हणजेच साधकत्व निर्माण करून ते वृद्धींगत करणे ही दोन्ही उद्धिष्टे साध्य होतात.
ई. साधनेत गुणात्मक वृद्धी होणे : स्वभावदोष दूर झाल्यामुळे मनात येणारे निरर्थक आणि नकारात्मक विचार कमी झाल्यामुळे नामजप आणि ध्यान यांमधील अडथळे दूर होतात. विविध योगमार्गांत बाधक ठरणारे स्वभावदोष दूर होऊन साधनेत गुणात्मक वृद्धी होण्यास मदत होते. मनावरील ताण दूर झाल्यामुळे सेवेतील एकाग्रता वाढते आणि त्यामुळे चुका कमी होतात. योग्य निर्णयक्षमता, वक्तशीरपणा, नियोजनबद्धता यांमुळे सेवेची गुणवत्ता वाढून सेवा परिपूर्ण होण्यास मदत होते.
उ. सात्विकतेत वृद्धी होणे : व्यक्तीतील स्वभावदोष हे रज-तमाचे निदर्शक आहेत. त्यांच्या निर्मूलनाने साधनेतील अडथळे दूर होतात, तसेच सत्त्वगुण वाढवण्यास मदत होते. स्वभावदोष-निर्मूलनाने रज-तमात्मक दोष दूर होऊन सात्विक गुणांचे संस्कार होत असल्यामुळे साधकाची तमोगुणाकडून सत्त्वगुणाकडे, म्हणजेच आनंदाकडे वाटचाल होते.
ऊ. क्षात्रवृत्ती निर्माण होणे : मनावर विजय मिळवून सातत्याने साधनेला पोषक कृती करण्यासाठी आणि साधनेतील अडचणींवर मात करण्यासाठी आवश्यक अशी मानसिक क्षमता आणि चिकाटी निर्माण व्हावी लागते. तिलाच ‘क्षात्रवृत्ती’ म्हणतात. गुणांचे संवर्धन केल्यास क्षात्रवृत्ती अंगी बाणवण्यास मदत होते. त्यामुळे साधनेत सातत्य रहाते.
ए. षड्रिपूंवर नियंत्रण मिळणे : काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर हे षड्रिपू कोणत्याही योगमार्गात बाधक ठरतात. स्वभावदोष हे रज-तमात्मक षड्रिपूंचे निदर्शक आहेत. स्वभावदोष-निर्मूलनाने षड्रिपूंवर नियंत्रण मिळण्यास मदत होते.
ऐ. चित्तशुद्धी होणे : साधनेला स्वभावदोष-निर्मूलनाची जोड दिल्यास चित्तास मलीन करणारे स्वभावदोष दूर होतात. त्यामुळे चित्तशुद्धी होण्यास मदत होते.
ओ. अहं-निर्मूलनास मदत होणे : ‘अहं’ हा ईश्वरप्राप्तीतील मोठा अडथळा आहे. ‘अहं’चे निर्मूलन होईपर्यंत ‘आत्मानुभूती’ येत नाही. व्यक्तीतील स्वभावदोष, हे अहंचे प्रकटीकरण असते, उदा. रागीटपणा, उद्धटपणा, गर्विष्ठपणा वगैरे. स्वभावदोषांच्या निर्मूलनाने अहंचे पापुद्रे दूर होऊन अहंचे निर्मूलन होण्यासही मदत होते.