मनुष्याच्या मनाचे कार्य, संस्कारांची निर्मिती, स्वभाव, स्वभावदोषांची उत्पत्ती आणि प्रकटीकरण त्यांमागील कारणे आदी सूत्र या लेखात सविस्तरपणे दिले आहेत. मानवी स्वभावाचा संबंध मनाशी असल्यामुळे स्वभावदोषांचा विचार करण्यापूर्वी मनाचे कार्य जाणून घेणे आवश्यक आहे.
१. अध्यात्मशास्त्राप्रमाणे मन
अध्यात्मशास्त्राप्रमाणे मनुष्यजीव हा स्थूलदेह आणि लिंगदेह यांनी बनला आहे.
- स्थूलदेह : स्थूलदेह म्हणजे आपण नेहमी म्हणतो, ते शरीर.
- लिंगदेह : लिंगदेह हा जीवात्मा (आत्मा) आणि अविद्या (आत्म्याच्या भोवतालचे मायेचे आवरण) यांनी मिळून बनला आहे. अविद्येचे पंचसूक्ष्मज्ञानेंद्रिये, पंचसूक्ष्मकर्मेंद्रिये, पंचप्राण, मन (बाह्यमन), चित्त (अंतर्मन), बुद्धी आणि अहं असे एकोणीस घटक आहेत. पंचप्राण या सर्वांच्या कार्याला शक्ती पुरवतात.
मन, चित्त, बुद्धी आणि आणि अहं यांना ‘अंतःकरण चतुष्टय’, असे म्हणतात. त्यांची कार्ये खालीलप्रमाणे
- मन : ‘संकल्प विकल्पकात्मकं मनः ।’, म्हणजे विचार करणे, हे मनाचे स्वरूप आहे. त्यात चांगले विचार, वाईट विचार, इच्छा, वासना आणि भावना अंतर्भूत होतात. मन चंचल असते. ‘हे करू का ते करू’, असे विचार सतत चालू असतात; पण त्याला निर्णय घेता येत नाही.
- चित्त : शरीर, इंद्रिये, मन, बुद्धी आणि अहं यांच्या सर्व वृत्ती आणि कृती यांचा साठा करणे, यालाच ‘स्मृती’, असे म्हणतात. या स्मृती चित्तात साठवलेल्या असतात.
- बुद्धी : ‘निश्चयात्मिक बुद्धि: ।’, यानुसार निश्चय करणे म्हणजेच योग्य आणि अयोग्य काय, याचा विचार करून निर्णय घेणे, हे बुद्धीचे कार्य आहे. मनातील विचारांनुरूप कृती होणे अथवा न होणे, हे बुद्धीवर अवलंबून असते. मनातील विचारांच्या संवेदनांच्या तीव्रतेनुसार व्यक्तीची बुद्धी विशिष्ट कृती करण्याबद्दल अथवा न करण्याबद्दल निर्णय घेते.
- अहं : स्थूलदेह, इंद्रिये, मन आणि बुद्धी यांची प्रत्येक वृत्ती आणि कृती यांच्याशी समरस होऊन कर्तेपणाची भावना, म्हणजेच ‘मी’पणा निर्माण करणारी अंतःकरण वृत्ती म्हणजेच अहं.
२. आधुनिक मानसशास्त्राप्रमाणे मन
अ. आधुनिक मानसशास्त्राप्रमाणे मनाचे दोन भाग
‘मन’, असा आपण नेहमी ज्याचा उल्लेख करतो, ते बाह्यमन आणि दुसरा भाग जो अप्रकट असतो, तो म्हणजे अंतर्मन, म्हणजेच चित्त होय. मनाच्या रचनेत आणि कार्यात बाह्यमनाचा फक्त १० टक्के, तर अंतर्मनाचा (चित्ताचा ) ९० टक्के वाटा असतो
- बाह्यमन (Conscious mind) : बाह्यमन म्हणजेच जागृत मन उर्फ जागृतावस्थेतील मन. नेहमीचे विचार आणि भावना यांचा संबंध बाह्यमनाशी येतो.
- अंतर्मन (Unconscious mind) : यालाच आध्यात्मिक परिभाषेत ‘चित्त’ अशी संज्ञा आहे. अंतर्मन म्हणजे सर्व भावभावनांचे, विचारविकारांचे एक गोदामच असते ! या गोदामात सर्व प्रकारचे अनुभव, भावना, विचार, इच्छा-आकांक्षा वगैरे सर्वकाही साठवलेले असते.
आ. अंतर्मनाचेही दोन विभाग
- अंतर्मनाचा वरचा थर (Subconscious mind) : यात देह, इंद्रिये, मन, बुद्धी आणि अहं यांच्या वृत्ती आणि कृती यांच्या निरनिराळ्या आठवणी निरनिराळ्या संस्कार केंद्रांत साठवलेल्या असतात आणि त्या विचाररूपाने सतत प्रगट होत असतात. तसेच आपल्या इच्छेप्रमाणे बाह्यमनात आणता येतात.
- अंतर्मनाचा खोलवरचा थर (Unconscious mind) : यात सर्व आठवणींचा साठा असतो; पण तो खोलवर साठवलेला असल्यामुळे आपल्याला त्याची आठवणही नसते आणि आपल्या इच्छेप्रमाणे त्यांना बाह्यमनात आणता येत नाही; परंतु विशिष्ट प्रसंगामुळे किंवा घटनेमुळे अंतर्मनातील खोलवर रुजलेली आठवण परत बाह्यमनात येऊ शकते.
इ. अंतर्मनातील संस्कार केंद्रे
अंतर्मनातील संस्कार केंद्रांची माहिती आता आपण पाहूया
- वासना केंद्र : वासना, इच्छा, आकांक्षा, अपेक्षा, जिवंत रहाण्याची इच्छा यांचे संस्कार या केंद्रात असतात.
- आवड-नावड केंद्र : आवडी-नावडीच्या संदर्भातील संस्कार या केंद्रात साठवलेले असतात.
- स्वभाव केंद्र : या केंद्रात स्वभावातील गुण आणि दोष यांचे संस्कार साठवलेले असतात. हे केंद्र स्वभावदोष निर्मूलन प्रक्रियेत महत्त्वाचे आहे.
- वैशिष्ट्य केंद्र : कला, खेळ इत्यादींतील प्राविण्याच्या संदर्भातील संस्कार या केंद्रात असतात.
- देवाण-घेवाण हिशोब केंद्र : यात संचित आणि प्रारब्ध कर्मांची नोंद असते.
३. संस्कार
अ. व्युत्पत्ती
संस्कार · सम् (सम्यक) ± कार. सम् म्हणजे चांगले आणि कार म्हणजे कार्य किंवा कृती.
आ. व्याख्या
व्यवहारात ‘संस्कार’ या शब्दाचा अर्थ सम्यक कृती, म्हणजेच चांगले आचार, विचार आणि कृती असा होतो. आध्यात्मिकदृष्ट्या ‘संस्कार’ या शब्दाचा अर्थ शरीर, पंचज्ञानेंद्रिये, पंचकर्मेंद्रिये, मन, बुद्धी आणि अहं यांच्या वृत्तींचे आणि कृतींचे अंतर्मनात किंवा चित्तात उमटलेले ठसे.
इ. निर्मिती
चांगल्या गोष्टींचे संस्कार होतात, तसेच वाईट गोष्टींचेही संस्कार होतात, उदा. देवाचा नामजप करण्याचा संस्कार होतो, तसाच शिव्या देण्याचाही संस्कार होतो. देह, ज्ञानेंद्रिये, कर्मेंद्रिये, मन, बुद्धी आणि अहं यांच्या पुनःपुन्हा होणाऱ्या कृतींचे आणि वृत्तींचेही रूपांतर संस्कारांमध्ये होते. ही साखळी सतत चालूच रहाते. हे संस्कार चित्तात, म्हणजेच अंतर्मनातील वरच्या थरात (subconscious mind) किंवा खोलवर असलेल्या थरांत (unconscious mind) साठवले जातात. हे संस्कार म्हणजेच पूर्वीच्या सुख, दुःख, राग, द्वेष, निरनिराळ्या मनोवृत्तींशी निगडित असलेल्या आणि चित्तात, म्हणजेच अंतर्मनात साठवलेल्या आठवणी.
ई. संस्कारांचे स्थान आणि व्यक्तीमत्त्वाची जडण-घडण
सुरुवातीला चित्तातील वरच्या थरात हे ठसे उमटतात, म्हणजेच संस्कार होतात आणि ते विचाररूपाने सहज बाह्यमनात येऊ शकतात. एखादी वृत्ती किंवा कृती पुनःपुन्हा होत गेल्यास हे संस्कार अधिकाधिक दृढ होतात आणि चित्तात स्थिर होतात. देह, इंद्रिये, मन, बुद्धी आणि अहं यांची एखादी वृत्ती किंवा कृती बरेच महिने किंवा वर्षे परत केली गेली नाही किंवा काही कारणांनी झाली नाही, तर ती अंतर्मनाच्या म्हणजेच चित्ताच्या खोलवरच्या थरांत साठवली जाते आणि अशा वृत्तींची किंवा कृतींची आपल्याला आठवणही होत नाही; पण हे संस्कार सुप्तावस्थेत म्हणजेच अव्यक्त स्थितीत मनात रुजलेले असतात. या जन्मातीलच नव्हे, तर पूर्वीच्या सर्व जन्मांचे संस्कार अंतर्मनाच्या खोलवरच्या थरांत रुजलेले असतात.
उ. चित्तातील संस्कारांस कारणीभूत वृत्तींचे
आणि कृतींचे तीन मूलभूत प्रकार आणि त्यांचे फळ
- चांगल्या वृत्ती आणि कृती : दुसऱ्यांबद्दल सहानुभूती आणि प्रेम वाटणे, दुसऱ्यांना मदत करणे यांसारख्या चांगल्या वृत्ती आणि कृती यांमुळे व्यक्तीचे आणि समाजाचे जीवन सुखी होते. या कृती सकाम भावनेने केल्यास पुण्य मिळते, तर निष्काम भावनेने केल्यास आध्यात्मिक उन्नती होते.
- वाईट वृत्ती आणि कृती : द्वेष वाटणे, लोभीपणा, चोरी करणे, लाच देणे आणि घेणे वगैरे वाईट वृत्ती आणि कृती यांमुळे व्यक्ती गुन्हेगार होते आणि तिला कायद्याने शिक्षा होऊन तुरुंगवास भोगावा लागतो . त्यामुळे पापकर्मे घडून व्यक्तीचे आध्यात्मिक दृष्ट्या नुकसान होते.
- चांगल्याही नाहीत आणि वाईटही नाहीत, अशा कृती : बसल्यावर पाय हालवणे, क्रिकेटचा सामना बघणे, चहा पिणे इत्यादी कृतींमुळे पुण्य मिळत नाही किंवा पाप लागत नाही; परंतु तसे करण्याची सवय लागल्यामुळे त्यांचे चित्तावर संस्कार होतात आणि त्या संस्कारांमुळे दुःख भोगावे लागते, उदा. ठरलेल्या वेळी चहा न मिळाल्यास किंवा क्रिकेटचा सामना पहावयास न मिळाल्यास दुःख होते.
वरील तिन्ही प्रकारच्या वृत्ती आणि कृती यांचे संस्कार बनतात आणि प्रत्येक संस्कार व्यक्तीला जन्म-मृत्यूच्या बंधनात टाकतो.
४. स्वभाव
जेव्हा प्रत्येक कृतीतून आपल्या अंतर्मनातील तेच तेच संस्कार प्रकट होतात, तेव्हा त्यांना ‘स्वभाव’ ही संज्ञा प्राप्त होते. थोडक्यात सांगावयाचे झाल्यास स्वभाव म्हणजे व्यक्तीची प्रकृती. काही व्यक्तींच्या बाबतीत वर्तनाची ही गोष्ट इतकी वारंवार होत असते की, ती व्यक्ती म्हणजे तो गुण किंवा दोष असे समीकरणच होते.
अ. स्वभावातील गुण-दोष
सर्वसाधारणपणे चांगल्या संस्कारांना गुण आणि वाईट संस्कारांना स्वभावदोष म्हटले जाते. एखाद्या
स्वभाववैशिष्ट्यामुळे व्यक्तीच्या कृतीतून तिचे आणि / किंवा संबंधित दुसऱ्या व्यक्तीचे नुकसान होत असेल, तर तो त्या व्यक्तीचा ‘स्वभावदोष’ होय.
आ. स्वभावदोषांची उत्पत्ती
‘सत्यम् शिवम् सुंदरम् ।’ या उक्तीप्रमाणे ईश्वराने संपूर्ण सृष्टीची निर्मिती करतांना प्रत्येक गोष्टीत सौंदर्य निर्माण केले. सत्ययुगात, मानवाच्या सर्वांत प्रथम जन्मात त्याच्या मनातील संस्कारांमध्ये गुणांचा आविष्कार होता. त्या वेळी मनुष्य ‘सोऽहं’भावात होता, म्हणजे ‘मी ईश्वर आहे’, अशी अनुभूती प्रत्येक व्यक्ती घेत होती. त्या युगात तत्परता, गुणग्राहकता, नम्रता, आज्ञाधारकपणा वगैरे गुण मानवात उपजतच होते. काळाच्या ओघात समाजाची सात्विकता जशी कमी होऊ लागली, तशी व्यक्ती धर्माचरणापासून दूर गेली आणि त्याचा परिणाम म्हणून या गुणांवर रज-तमाचे काळे आवरण येऊ लागले. कलीयुगात या गुणांची जागा अनुक्रमे आळशीपणा, टीका करणे, अव्यवस्थितपणा, उद्धटपणा, आज्ञापालन न करणे वगैरे दुर्गुणांनी घेतली. ‘सोऽहं’भावाची जागा ‘अहं’ने घेतली. अशा प्रकारे स्वभावदोषांची उत्पत्ती झाली.
ई. स्वभावदोषांचे प्रकटीकरण
आपल्याकडून होणाऱ्या क्रिया किंवा कृती आणि व्यक्त होणाऱ्या अथवा मनात उमटणाऱ्या प्रतिक्रिया या आपल्या संस्कारांवर अवलंबून असतात. सर्वसाधारणपणे आपल्या जीवनातील एकूण क्रिया किंवा कृती आणि प्रतिक्रिया यांपैकी ५० टक्के योग्य असतात, तर ५० टक्के अयोग्य असतात. योग्य क्रिया किंवा कृती आणि प्रतिक्रिया या स्वभावातील गुणांशी, तर अयोग्य क्रिया किंवा कृती आणि प्रतिक्रिया या स्वभावदोषांशी निगडित असतात. अयोग्य क्रिया किंवा कृती आणि प्रतिक्रिया यांमुळे एकतर आपल्याला त्रास होतो किंवा त्यांच्याशी संबंधित इतरांना त्रास होतो. त्यामुळे इतरांच्या मनात प्रतिक्रिया उमटतात आणि तणाव वाढवण्यास कारणीभूत ठरतात. अयोग्य क्रिया किंवा कृती आणि प्रतिक्रिया यांच्या माध्यमातून स्वभावदोषांचे प्रकटीकरण होत असते.