संस्कृत भाषेच्या पुनरुज्जीवनासाठी केंद्रसरकारने ख्रिस्ताब्द १९५० मध्ये संस्कृत आयोग स्थापन केला होता. या आयोगाने केलेल्या शिफारसींवर तत्कालीन काँग्रेस सरकारने अंमलबजावणी केली असती, तर आज संस्कृतची स्थिती वेगळी दिसली असती. ती भारतातील एक प्रमुख, तसेच आपल्या धर्माप्रमाणेच सनातन भाषा झाली असती. संस्कृत भाषेची प्रथमपासून चालत आलेली हेळसांड श्री. राजेश सिंह यांनी द पायोनिअर या वृत्तपत्रात काही मासांपूर्वी प्रकाशित झालेल्या एका लेखात नमूद केली आहे. आमच्या वाचकांसाठी ती येथे देत आहोत.
१. संस्कृत भाषेचे पुनरुज्जीवन करण्याच्या प्रयत्नांवर टीका करणारे संस्कृतद्वेष्टे !
जेव्हा संस्कृत भाषेचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न होतो, तेव्हा त्याला राजकीय रंग दिला जातो. अशा प्रयत्नांना भगवेकरण करणे, देशावर हिंदुत्व थोपवणे, जातीयवाद पसरवणे अशा शब्दांत संबोधले जाते. या शिवाय शेल्डन पोलॉक यांच्यासारखे हिंदुद्वेषी इतिहासतज्ञ (!) संस्कृतचे पुनरुज्जीवन करणे म्हणजे वेळेचा आणि पैशांचा अपव्यय करणे आहे, असे समजतात. संस्कृत ही एक सामाजिक एकाधिकारशाही, ब्राह्मणवाद आणि रूढी परंपरा यांच्या ओझ्याखाली दाबून गेलेली एक मृत भाषा आहे, असे या महाभागांचे मत आहे. तिचा सामान्य जनतेच्या नित्य व्यवहारात वापर नव्हता आणि ती केवळ राजदरबारी आणि उच्चवर्णीय ब्राह्मणांपुरतीच मर्यादित आहे, अशी गरळओक संस्कृतद्वेष्टे करतात. नित्य व्यवहारात संस्कृत भाषेची जागा हिंदी आणि इतर प्रादेशिक भाषांनी घेतली आहे, हे एका अर्थाने सत्य असले, तरी काही भागांत संस्कृतविषयी असलेली जिज्ञासा लक्षात घेता तिला मृत भाषा म्हणणे सयुक्तिक होणार नाही.
२. संस्कृत भाषेच्या अधोगतीला मुघल आणि ब्रिटीश
उत्तरदायी असतांना त्या विषयी काहीही न बोलणारे तथाकथित साम्यवादी !
शेल्डन पोलॉक यांनी म्हणे त्यांचे आयुष्य संस्कृत आणि संस्कृती यांचा सखोल अभ्यास करण्यात घालवले आहे. तरी त्यांचे वरील विधान हे त्यांच्या साम्यवादी विचारसरणीला अनुसरूनच होते. त्यामुळे त्यांची मते हिंदूंसाठी अत्यंत वेदनादायी ठरली. त्यांनी वेद आणि रामायण यांसारख्या ग्रंथांवर भाष्य करतांना हिंदु समाजात काही प्रमाणात अस्तित्वात असलेला जातीयवाद आणि लिंगभेद यांचा चष्मा वापरून लिखाण केले आहे. त्यामुळेच पोलॉक संस्कृत भाषेला श्रद्धांजली वहाण्यास अधीर झाले आहेत. या दूषित दृष्टीकोनामुळेच शेल्डन पोलॉक संस्कृत भाषेच्या अधोगतीला मुघल आणि ब्रिटिशांना विशेषत: मॅकॉले सारख्यांना उत्तरदायी ठरवत नाहीत. तसे केले असते, तर त्यामुळे पोलॉक यांच्या प्रत्येक गोष्टीत हिंदूंना उत्तरदायी ठरवण्याच्या साम्यवादी विचारांना तडा गेला असता !
३. तथाकथित धर्मनिरपेक्षतावाद्यांच्या हातात शिक्षणाची दोर असणे घातक !
गेल्या ६९ वर्षांत या दृष्टीकोनातून संपूर्ण प्रगती झाली नाही अथवा समाधानकारकही झाली नाही, त्याचा दोष तथाकथित धर्मनिरपेक्षतावाद्यांनाच जातो; कारण त्यांनी आजपावेतो केंद्र आणि राज्यस्तरावर शिक्षण क्षेत्रावरची घट्ट पकड स्वत:च्या हातात ठेवली आहे. मग ते सत्तेत असोत व नसोत. त्याचबरोबर नावाजलेल्या शिक्षणसंस्थाही त्यांच्याच हातात आहेत.
४. काँग्रेस सरकारच्या अकर्तृत्वामुळे
संस्कृत आयोगाच्या शिफारसी बासनात !
भारतीय संस्कृतीशी अतूट नाते असलेली संस्कृत भाषा ही जरी नित्य वापरातील नसली, तरी ती लॅटिन अथवा ग्रीक भाषांप्रमाणे मृत झाली आहे का, हा एका तात्त्विक चर्चेचा विषय होऊ शकतो. तथापि अद्यापही संस्कृतची पाळेमुळे खोलवर रुजली आहेत, हे मान्य करावेच लागेल. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही संस्कृत तेजस्वी होती आणि ख्रिस्ताब्द १९५० मध्ये स्थापित संस्कृत आयोगाचा अहवाल वाचला, तर संस्कृतचे जीवंतपण स्पष्ट होईल; मात्र त्यानंतर काँग्रेस सरकारच्या निष्क्रीयतेमुळे आणि धर्मनिरपेक्षतावाद्यांच्या सततच्या विरोधामुळे आयोगाच्या शिफारसी थंड बस्त्यात पडून राहिल्या.
५. संस्कृत भाषा : प्रादेशिक भाषांच्या वादावर बिनतोड उपाय !
त्यानंतर ख्रिस्ताब्द १९५६-५७ मध्ये तत्कालीन शिक्षण आणि सांस्कृतिकमंत्री मौलाना अब्दुल कलाम आझाद यांनी आणखी एक संस्कृत आयोग नेमला. त्याचा अहवाल वाचून मंत्र्यांनाही आश्चर्य वाटले की, अद्यापही संस्कृतचे अनुयायी आणि तिच्या पुनरुज्जीवनासाठी उत्सुक असलेल्यांची संख्या कितीतरी पटीने अधिक होती. आयोगाच्या एका विभागाच्या अध्यक्षा श्रीमती सुनीती कुमार चटर्जी यांनी आयोगाचे अध्यक्ष मौलाना अब्दुल कलाम आझाद यांना पत्र लिहून कळवले, भाषाशास्त्र आणि समाजशास्त्र या विषयांतील तज्ञ म्हणून माझ्या ४० वर्षांच्या अनुभवानुसार मला असे व्यक्त करायचे आहे की, संस्कृत भाषा ही भारताच्या सांस्कृतिक आणि राजकीय एकतेची पायाभूत भाषा आहे. संस्कृतचे शैक्षणिक क्षेत्रात, जनसंपर्काच्या वापरासाठी, तसेच सांस्कृतिक क्षेत्रात पुनरुज्जीवन केले, तर केवळ देशाची एकसंधता अन् एकात्मता अबाधित राहील असे नाही, तर त्यामुळे प्रादेशिक भाषांतील फुटीरतावादी प्रवृत्तींना आळाही बसेल. ज्या अर्थी शेल्डन पोलॉकसारख्या प्रवृत्तींचा संस्कृतच्या पुनरुज्जीवनास विरोध आहे, म्हणजेच हा विरोध केवळ संस्कृत भाषेपुरताच मर्यादित नसून तो भारताची एकसंधता आणि एकात्मता यांनाही आहे. प्रादेशिक भाषांतील फुटीरतावादी प्रवृत्तींना खतपाणी घालण्याच्या प्रयत्नांचा हा एक भाग आहे. त्यांच्या मते संस्कृत भाषा भेदभाव आणि सामाजिक दुही पसरवते. मोदी सरकारने संस्कृतचे पुनरुज्जीवन करण्याचे प्रयत्न केले, तर तो देशावर भगवेकरण थोपवण्याचा प्रयत्न असेल, असा धर्मनिरपेक्षवाद्यांचा प्रसार चालू आहे.
६. संस्कृतमुळे चारित्र्यवान विद्यार्थी घडतील !
संस्कृत आयोगाने शाळांच्या स्तरावर संस्कृत भाषेचा अभ्यास चालू करण्यावर भर दिला आहे. असा प्रयत्न केंद्रीय शाळांत जर्मन भाषेऐवजी संस्कृत शिकवण्याचा निर्णय घेतल्यावर धर्मनिरपेक्षतावाद्यांनी जी आरडाओरड केली तिचे स्मरण होते. आयोगाने सरकारला सादर केलेल्या त्यांच्या अहवालात म्हटले आहे, सामान्य शिक्षणाचा मूळ हेतू ज्ञानप्रदान करणे, हा आहे. त्यामुळे माध्यमिक शाळांच्या स्तरावर संस्कृतचे शिक्षण विशेष विषय म्हणून स्वीकारणे अनिवार्य आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये देशाच्या प्राचीन संस्कृतीविषयी, आपल्या पूर्वजांच्या साहित्याविषयी जिज्ञासा निर्माण होईल. त्यांच्या मनावर आणि चारित्र्यावर सकारात्मक परिणाम होऊन त्यांना शुद्ध ज्ञानाबद्दल आदर निर्माण होईल. त्यांना पंडित करणे, हा जरी उद्देश नसला, तरी भावी पिढी संस्कारजन्य होईल. संस्कृत भाषा अनिवार्य केल्याने ती नावडती बनेल, असा समज चुकीचा आहे. काही गोष्टी अनिवार्य करणे आवश्यकच असते. विद्यार्थ्यांच्या अपरिपक्व निर्णयक्षमतेवर विषयांची निवड ठरू शकत नाही. माजी राष्ट्रपती डॉ. राधाकृष्णन् म्हणत की, विद्यार्थ्यांना जे पाहिजे ते शिकवणे, हा शिक्षणाचा उद्देश असू शकत नाही, तर त्यांना जे शिकवले जाते ते त्यांच्यासाठी आवश्यक आहे, अशी त्यांची मनोवृत्ती सिद्ध करणे, हा उद्देश आहे.
संस्कृतमधील आघातजन्य उच्चारांमुळे देवतातत्त्व जागृत करणारे श्लोक
आणि मंत्र अन् त्यांना मानसिक स्तरावर चाल लावून चैतन्यशून्य करणारे सध्याचे गायक !
१. संस्कृत ही देवभाषा असण्याचे कारण म्हणजे त्या भाषेत
ब्रह्मांडातील देवतातत्त्वाला जागृती देण्याची असलेली क्षमता !
‘महर्षींनी सांगितल्याप्रमाणे श्रीविष्णुसहस्रनामाचे पठण करतांना लक्षात आले की, वेदपाठशाळेतील विद्यार्थी त्या त्या मंत्राचे पठण करतांना त्या मंत्रातील शब्दांवर योग्य तो आघात देऊनच स्वरउच्चारण करतात आणि मंत्रातील स्वरांवरील योग्य आघातामुळेच देवता जागृत होतात. संस्कृत भाषेतील शब्दांच्या योग्य आघातजन्य उच्चारामुळे ब्रह्मांडातील देवतांचे तत्त्व जागृत होते. देवतेच्या तत्त्वाला जागृत करण्याचे सामर्थ्य संस्कृत भाषेत असल्याने तिला ‘देवभाषा’, असे म्हणतात; म्हणून सर्व वेदही संस्कृत भाषेतच स्रवलेले आहेत.
२. मानसिक स्तरावर चाल लावून मंत्र
म्हटल्याने आध्यात्मिक स्तरावर लाभ न होण्याचे कारण
आजकाल बरेच गायक स्वत:च्या आवाजात अशा संस्कृत स्तोत्रांचे पठण करून स्वत:च्याच लावलेल्या चालीत त्याच्या ध्वनीचकत्या काढतात; परंतु त्यांमध्ये तेवढे चैतन्य नसते; कारण त्यांत योग्य उच्चार आणि आघात यांना महत्त्व दिलेले नसते. शिवाय हे मंत्र ऋषीमुनींनी स्वरांत जसे बसवलेत, तसेही म्हटलेले नसतात. त्यामुळे अशा लोकरंजनासाठी म्हटलेल्या स्तोत्रांचा मानवाला लाभ होत नाही. मंत्र योग्य उच्चारासहितच म्हटले पाहिजेत. यांसाठीही लोकजागृती करावी लागेल !’
– (सद्गुरु) सौ. अंजली गाडगीळ, तिरुवण्णामलई, तमिळनाडू.
देववाणी संस्कृतचे अलौकिक सौंदर्य
संस्कृत भाषेतील प्रत्येक शब्दाचा गर्भितार्थ असतो. हा अर्थ समजला, तर त्यासारखे अन्य शब्द व्यवहारात तसेच का वापरले जातात? हे आपल्याला समजू शकते. उदाहरणासाठी पुढील २ शब्द पाहू.
१. दक्षिण
दक्षिण : सामान्यतः या शब्दाचा अर्थ दक्षिण दिशा किंवा उजवा असा केला जातो. दक्षिण हा शब्द दक्ष या धातूपासून (क्रियापदाच्या मूळ रूपापासून) बनला आहे. दक्ष म्हणजे वाढणे किंवा वृद्धी होणे.१ अ. दक्ष या मूळ शब्दापासून बनणारे अन्य शब्द आणि त्यांचे अर्थ
१ अ. दक्ष : प्रजापती – सृष्टीची वृद्धी करणारा.
१ आ. दक्षिण : उजवा – साधारणपणे सर्व कामे उजव्या हाताने केली जातात. यामुळे वृद्धी होते.
१ इ. दक्षिण : दिशा – उजवी दिशा. येथे वृद्धी या शब्दाचा प्रत्यक्ष संबंध नसला, तरी सूर्याकडे तोंड करून उभे राहिल्यावर उजवी बाजू या अर्थाने दक्षिण दिशा, हा शब्द बनला आहे.
१ ई. दक्षिणा : दान – दिल्याने वाढते, म्हणून दक्षिणा.
१ उ. प्रदक्षिणा : देवाला उजवीकडे ठेवून चालणे किंवा उजवीकडे गोल फिरणे
२. वाम
वाम : सामान्यतः डावा किंवा न्यून प्रतीचा असा याचा अर्थ केला जातो. वा हा यातील मूळ धातू आहे. वा म्हणजे गती (जाणे) किंवा गंध प्रदान करणे किंवा प्रेरणा देणे. वा या मूळ शब्दापासून बनणारे अन्य शब्द आणि त्यांचे अर्थ
२ अ. वाम : डावी बाजू – उजव्या बाजूने कार्य घडते, तर डावी बाजू प्रेरणा देते. सूर्य नाडी ही कार्य करवून घेणारी आहे, तर चंद्र नाडी ही कार्याला प्रेरणा देणारी आहे. जगात बहुसंख्य माणसे उजव्या हाताने कार्य करतात. यांना त्यांच्या मेंदूचा डावा भाग प्रेरणा देत असतो. हा भाग प्रेरक असल्याने डाव्या बाजूला वाम असे म्हणतात.
२ आ. वाम : उत्तर दिशा – दक्षिण दिशेच्या तुलनेत तिच्या विरुद्ध दिशेला असलेली दुसरी दिशा. दक्षिणेच्या विरुद्ध दिशेला जाणे, म्हणजे उत्तर दिशेला जाणे.
२ इ. वामा : स्त्री – पुरुषाच्या डावीकडे असणारी. चंद्र नाडीप्रमाणे शांत असलेली.
२ ई. वायु किंवा वात : वारा – गती देणारा किंवा गंध सर्वत्र पसरवणारा.
– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२०.६.२०१७)
संस्कृत भाषेचा तिरस्कार करणार्या हिंदूंचे घोर अधःपतन !
भारतियांचे प्राचीन वाङ्मय, म्हणजे वेद, उपनिषदे, ब्राह्मण ग्रंथ, पुराणे; कालिदास अन् भवभूती, आदींची संस्कृत नाटके, काव्ये, रामायण, महाभारतादी वाङ्मय आणि कला यांचा ध्यास जर्मनीला लागतो; पण भारताचे नेते, समाजकल्याणकर्ते, सुधारक अशा कुणालाही संस्कृतचा गंधही येत नाही. Sanskrit is dead language म्हणजे संस्कृत ही मृत भाषा आहे, असे म्हणून ते संस्कृत भाषेचा तिरस्कार करतात. केवढे घोर पतन !
– गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी
संदर्भ : मासिक घनगर्जित, मार्च २०१३
अमृतवाणी संस्कृतचे महत्त्व जाणून हिंदूंनी
त्याचा लाभ करून घ्यावा, हे सांगणारा सनातनचा ग्रंथ !
देववाणी संस्कृतची वैशिष्ट्ये अन् संस्कृतला वाचवण्यासाठीचे उपाय
- संस्कृतला होणारा विरोध त्यामागील कारणे
- संस्कृत भाषेमुळे होणारे विविध लाभ
- जगातील सर्व भाषांना लाजवणारे संस्कृतचे सौंदर्य
- संस्कृतला हद्दपार करणारे देशी राज्यकर्ते
- संस्कृतच्या उपासनेचे मार्ग