१. सेवेविषयीची सूत्रे
अ. जेव्हा आपण स्वतःला श्रेष्ठ समजतो, तेव्हा सेवेत कोणी काही सुचवल्यावर आपल्याला प्रतिक्रिया येतात आणि आपण ते मनापासून स्वीकारत नाही. हाही आपला सूक्ष्म अहं असून तो आपल्या लक्षात येत नाही.
आ. एका साधकाने एक प्रसंग सांगितला. एकदा त्याला स्वयंपाकघरात नैवेद्य बनवण्याची सेवा मिळाली. तेव्हा आपल्यामध्ये भाव असल्यामुळेच आपल्याला ही सेवा मिळाली आहे, असा अहं त्याच्या मनात निर्माण झाला.
हा आपल्या मनाचा खेळ आहे. आपण स्वतःविषयी मनात ग्रह करून घेतो. सेवेकडे पहाण्याचा आपला हा दृष्टीकोनच चुकीचा आहे. आपल्याला मिळणार्या प्रत्येक सेवेतून ईश्वराला आपल्याला काहीतरी शिकवायचे असते.
इ. काही वेळा मला निकृष्ट सेवा मिळाली आहे, असे आपल्याला वाटते; पण ही सेवा देऊन ईश्वराने आपल्यावर केवढी कृपा केली आहे, याचा आपण विचार करत नाही. प्रत्येक सेवा विधिलिखित असल्यामुळे तिचा स्वीकार केलाच पाहिजे. ईश्वर आपल्याला शिकण्यासाठीच सेवा देतो, हा भाव ठेवून आपण ती सेवा केली पाहिजे.
ई. सेवेत चुका होतात, याचे कारण म्हणजे आपण ती सेवा मनाने पूर्णतः स्वीकारलेली नसते. त्यामुळे तिचे आपण दायित्व घेत नाही. काही वेळा सेवेच्या व्याप्तीविषयी पूर्ण चिंतन होत नसल्यामुळे चुका होतात. यासाठी सेवा मिळाल्यावर ही सेवा माझ्या कल्याणासाठीच मिळाली आहे, असा भाव ठेवावा आणि सेवेची व्याप्ती समजून घेऊन ती सेवा करावी.
उ. एखाद्या सेवेविषयी काही चांगले सुचल्यावर तेथेच थांबायचे नाही आणि कर्तेपणाचा अहंही मनात आणायचा नाही. सुचलेला आपला विचार इतरांना विचारून घ्यावा. त्या वेळी सेवा परिपूर्ण होण्यासाठी मी आणखी काय केले पाहिजे ?, असा विचार करावा. त्यामुळे अंतर्मुखता वाढेल.
२. संघर्षाचे महत्त्व
संघर्ष हा आपला मोठा मित्र आहे. मनाच्या विरुद्ध जाणे, म्हणजेच संघर्ष करणे. संघर्षामुळे आपल्या अहंच्या कवचाचा भेद होतो. त्यामुळे संघर्षाला शत्रू समजू नये.
३. कौतुकामुळे अल्पसंतुष्ट न रहाता पुढील प्रयत्नांचा विचार करावा
व्यष्टी आढाव्यात कधीकधी साधक सांगतात की, संतांशी झालेल्या भेटीत त्यांनी माझे साधनेचे प्रयत्न चांगले असल्याचे आणि भाव असल्याचे सांगितले. त्यावर आढावा सेवकांनी सांगितले, त्यामुळे आपण अल्पसंतुष्ट रहाता कामा नये. संतांनी आधीच्या स्थितीच्या तुलनेत साधकाची सध्याची स्थिती सांगितलेली असते. त्याचा अर्थ आता आपल्याला प्रयत्न करण्याची आवश्यकता नाही, असा होत नाही.
व्यष्टी आढाव्यात आढावासेवकाच्या माध्यमातून श्रीगुरुच आपल्याला वर्तमान स्थितीनुसार आपल्यातील स्वभावदोष-अहं यांची जाणीव करून देत असतात.
४. शिकण्याची वृत्ती वाढवणे
अहंमुळे आपण लहान-लहान गोष्टींतून मिळणारा आनंद घेऊ शकत नाही, उदा. आश्रमातील भोजनकक्षात विविध विभागांतील साधकांनी सिद्ध केलेल्या काही वस्तू पहाण्यासाठी ठेवलेल्या असतात. आपल्यातील अहंमुळे आपल्याला वाटते, यात विशेष काय आहे ? हे तर मला ठाऊकच आहे. त्या वेळी ईश्वर आपली शिकण्याची वृत्ती वाढवून अशा लहान-लहान गोष्टींतून आनंद घेण्यास शिकवत असतो, हे आपल्या लक्षात येत नाही. शिकण्याची वृत्ती न्यून झाल्याने ताण येतो. मला हे ठाऊक आहे या अहंमुळे आपण शिकत नाही.
५. ताण न घेणे
एका साधकाने त्याला पाठदुखी असल्याचे सांगितले. त्यामुळे आढावा देतांना मनाची प्रक्रिया सांगतांना त्यांना ताण येत होता. संतांनी सांगितले, पाठदुखी ही शरिराशी संबंधित आहे आणि तणाव हा मानसिक आहे. आपण जेवढे निराश होतो, तेवढा आपला शारीरिक त्रास वाढतो.
६. अंतर्मुखता वाढवणे
स्वतःला सतत अंतर्मुख ठेवण्यासाठी प्रत्येक क्षणी आपण कुठे अल्प पडत आहोत, हे पहाणे हा सर्वोत्तम मार्ग आहे. मनाचा फसवेपणा लक्षात येण्यासाठी अंतर्मुखता आवश्यक आहे. अंतर्मुखता असल्यामुळे अडचणींवर केवळ चर्चा न होता त्यांवर उपाय सापडतो. भावनाशीलता असल्यामुळे अंतर्मुखता न्यून होते आणि तेव्हा आपल्याला मानसिक आधाराची आवश्यकता भासते. आपल्याला केवळ ईश्वराचाच आधार वाटला पाहिजे.
७. अंतर्मुखता येण्यासाठी दैनंदिनी लिहिण्याचे महत्त्व
दैनंदिनी ही अंतर्मुखतेची पहिली पायरी असते. आपण कसे आहोत, हे दर्शवणारा तो आरसा आहेे. त्यामध्ये आपल्याला आपल्या मनाची प्रक्रिया दिसते. दैनंदिनीमुळे आपल्याला चिंतन करण्यास साहाय्य होते, उदा. १० मिनिटांचा कालावधी लागणार्या सेवेसाठी आपल्याला जर २० मिनिटे लागली, तर त्या वेळी आपल्या मनाची विचारप्रक्रिया काय होती ?, याचा आपण अभ्यास करू शकतो. दैनंदिनीमुळे आपण वेळेचा सदुपयोग करतो. माझी साधना नीट होत आहे किंवा माझा वेळ सार्थकी लागत आहे, हा आपला भ्रम दैनंदिनीमुळे नष्ट होतो.
८. बहिर्मुखता टाळणे
अनेकदा एखादा साधक आपली चूक सांगत असतांना आपण त्याच्या चूक सांगण्याच्या पद्धतीकडे पहातो. तेव्हा ती आपली बहिर्मुखता असते. त्या साधकातील हा दोष पाहून आपण आणखी चुका करू लागतो. अशा वेळी मी ही चूक स्वीकारलीच पाहिजे, यावरच आपले मन केंद्रित असायला हवे.
८ अ. साधकातील बहिर्मुखतेचे सर्वसाधारण टप्पे
१. पहिला टप्पा : आरंभी आपण अपरिचित साधकांशी सांभाळून बोलतो. तेव्हा आपल्याकडून कोणतीही चूक होऊ नये, असा आपल्या मनात विचार असतो.
२. दुसरा टप्पा : ओळख झाल्यानंतर हळूहळू आपल्याला एकमेकातील स्वभावदोष-अहं दिसू लागतात. त्या वेळी मनमोकळेपणाने न बोलण्यामुळे पूर्वग्रह निर्माण होतात.
३. तिसरा टप्पा : मनात पूर्वग्रह असल्यामुळे आपण आपल्या लक्षात आलेले त्याचे स्वभावदोष प्रत्येक वेळी अप्रत्यक्षपणे दाखवतो.
४. चौथा टप्पा : यानंतर आपण यावरून थट्टामस्करी करून त्या साधकाला दुःख पोहोचवतो. यातून बहिर्मुखता कशी वाढते, हे आपल्या लक्षात येते.
९. प्रतिमा जोपासणे
प्रतिमा जोपासणे किंवा आपल्या मनाप्रमाणे करणे, हेे विचारून न घेण्याचे कारण असते.
१०. चिंतनाचे महत्त्व
आपल्या चहूबाजूंनी स्वभावदोष आणि अहं यांचे आवरण आहे, याची आपल्याला जाणीव असायला हवी. त्या आवरणाचा चिंतनाद्वारेच भेद होऊ शकतो. त्यामुळे चिंतन करणे महत्त्वाचे आहे. प्रक्रियेच्या माध्यमातून केल्या जाणार्या साहाय्यातूनच हे चिंतन होऊ शकते.
११. चुकांविषयी दृष्टीकोन
११ अ. चुकांची जाणीव होणे
आपल्याकडून चुका होत असतांनाच ईश्वर आपल्याला त्याची जाणीव करून देतो; पण आपल्यातील स्वभावदोषांमुळे आपण त्याकडे दुर्लक्ष करतो, उदा. नामजप पूर्ण झाला नाही, तरी त्याकडे दुर्लक्ष करणे, एखादी कार्यपद्धत टाळणे, वेळेवर लिखाण न करणे इत्यादी. जर आपण त्याच वेळी जागरूक राहून ती सुधारण्याचा प्रयत्न केला, तर त्याविषयीचे गांभीर्य वाढून साधनेची होणारी हानी टळते.
११ आ. कौतुकाकडे अधिक लक्ष दिल्याने चुकांकडे दुर्लक्ष होणे
काही वेळा आपल्याला आपल्या चुका न्यून झाल्या आहेत, असे वाटू लागते. त्या वेळी आपले लक्ष कौतुकाकडे अधिक जाते. अशा वेळी आपण कुठे चुकत आहोत, याचे भान असेल, तर कोणी कितीही कौतुक केले, तरीही माझ्याकडून किती चुका होतात, हे मला ठाऊक आहे, असा विचार मनात येऊन कौतुकाने वहावत न जाता वस्तुस्थितीला धरून प्रयत्न होतात.
११ इ. चुका स्वीकारणे
१. जोपर्यंत आपण चुका स्वीकारत नाही, तोपर्यंत आपल्या पापांचे क्षालन होत नाही.
२. आपल्याकडून होणार्या प्रत्येक चुकीपासून आपण शिकले पाहिजे, त्यांविषयी चिंतन केले पाहिजे. त्यामुळे पुढे होणार्या १० चुका आपण सुधारू शकू.
३. एका साधिकेला कोणी मला माझी चूक सांगण्याआधीच मी माझी चूक सांगते, असे वाटत होते. तेथे प्रतिमा जपण्याचा अहं असतो. इतर साधक आपल्या चुका सांगतात. त्या वेळी आपले अधिक प्रमाणात अहंनिर्मूलन होते; म्हणून आपण स्वतःच इतरांना आपल्या चुका विचाराव्यात.
११ ई. प्रक्रियेपेक्षा भावजागृतीचे प्रयत्न करणे
आवडत असल्यास प्रक्रियेला प्राधान्य देऊन आनंद मिळवणे
एका साधकाचे भावजागृतीचे प्रयत्न चांगले होत होते; पण स्वभावदोष-अहं यांचे निरीक्षण करण्यात तो अल्प पडत होता. भावजागृतीचे प्रयत्न करणे मनाला चांगले वाटते; पण स्वभावदोष आणि अहं यांचे निरीक्षण करणे, त्यासाठी स्वयंसूचना देणे आणि लिखाण करणे यांची मनाला आवड नसते. त्यामुळे आपले त्याकडे दुर्लक्ष होते. त्यावर उपाय म्हणून प्रार्थना करून ही प्रक्रिया स्वीकारली पाहिजे. शरणागतीतून या प्रक्रियेतील आनंद घेतला पाहिजे.
११ उ. अडचणी किंवा प्रसंगांत अडकणे
अडचणी आल्यावर आपण त्यांमध्येच अडकलो किंवा आपले लक्ष अडचणींवरच अधिक गेले, तर त्यामुळे अस्थिरता येते आणि समस्या आणखी वाढते. समस्या आल्यावर स्थिर राहून ती साधना म्हणून स्वीकारली किंवा या अडचणीत ईश्वरच मला साहाय्य करील, असा भाव ठेवला, तर आपण उपाययोजना काढण्याच्या दिशेने जातो, इतरांचे साहाय्य घेतो. आपल्यातील कर्तेपणामुळे आपण उपाययोजना न काढता ती आपल्याच पातळीवर सोडवण्याचा प्रयत्न करतो. जेव्हा आपल्या मनाप्रमाणे होत नाही, तेव्हा प्रसंगात अडकण्याचा भाग येतो. विचारून करणे हे अहं न वाढण्यासाठीचे शस्त्र आहे. मनाविरुद्ध प्रसंग घडल्यामुळेच त्यामध्ये अडकणे होते आणि त्यामुळे उत्साह न्यून होतो. जर आपण प्रसंगांकडे शिकण्याच्या दृष्टीने पाहिले, तर त्यात अडकायला होत नाही.
११ ऊ. विचारांतील सकारात्मकता
विचार करणे, हे मनाचे कार्यच आहे. आपण या विचारांचे स्वागत न करता त्यांकडे दुर्लक्ष करायचेे. त्या वेळी नामजप करायचा. नेहमी सकारात्मक विचार करायचा. अनेक नकारात्मक विचारांच्या तुलनेत एका सकारात्मक विचारात पुष्कळ शक्ती आहे.
आपल्याच मतावर ठाम राहिल्याने आपण नकारात्मक विचारांतून बाहेर येऊ शकत नाही आणि तेव्हा आपली इतरांचे ऐकण्याची स्थितीही नसते. नकारात्मक विचारांमुळे काळ्या शक्तीचे आवरण निर्माण होते आणि कुणी आपल्याला साहाय्य करत असल्यास त्याचे आकलन होत नाही. सतत शिकण्याच्या, ऐकण्याच्या आणि विचारण्याच्या स्थितीत असल्यास त्रास होत नाहीत, आवरण येत नाही आणि अल्पसंतुष्टता न्यून होते. ईश्वराला शरण गेल्यानेच याचे आकलन होते.
११ ए. चुकीचे दृष्टीकोन टाळणे महत्त्वाचे
१. आपण आपले साधनेविषयीचे दृष्टीकोन योग्य आहेत का ?, हे विचारून घेतले पाहिजेत. तसेच आपल्या विचारांची दिशा योग्य आहे का ?, हेसुद्धा विचारून घेतले पाहिजे. असे न केल्याने चुकीच्या दृष्टीकोनांमुळे दोषांची तीव्रता वाढू शकते. सकारात्मक विचार आणि योग्य दृष्टीकोन मन स्वच्छ करतात.
२. एका साधिकेने इतरांशी जवळीक वाढवण्यासाठी तिचा लिखाणाचा वेळ इतरांशी बोलण्यासाठी दिला. येथे लक्षात घेतले पाहिजे की, जवळीक वाढवण्याच्या प्रयत्नांचा परिणाम आपल्या व्यष्टी साधनेवर होऊ नये. जवळीक वाढवतांना आपण भावनेत वहावत जात आहोत का, हे पाहिले पाहिजे. आपण आपल्या चुका प्रामाणिकपणाने आणि सहसाधकांच्या चुका मनमोकळेपणाने सांगणे, हीच खरी जवळीक आहे. यामुळेच अंतर्मुखता येते.
११ ऐ. अन्य सूत्रे
१. प्रक्रिया राबवतांना मनात येणारे अहंयुक्त विचार सांगतांना जर आपल्यामध्ये अपराधी भाव नसेल, तर ते घातक असते. आपण मनातील लहानसा विचारसुद्धा सांगू शकतो, असा मनात कर्तेपणाचा विचार येतो. त्यासाठी जागरूक राहिले पाहिजे.
२. दिखाऊपणा हा अहंचा पैलू असल्यामुळे सेवेची फलनिष्पत्ती शून्य होते. मी आढाव्यात अहंचे प्रसंग अगदी मनमोकळेपणाने सांगितले, हा घातक अहं येण्याची शक्यता असते आणि त्यामुळे प्रक्रियेत दिशाभूल होऊ शकते.
३. आपण जितका आपला अहं जोपासू, तितकी आपली अधोगती होते आणि अहंचे विचार सर्वांना सांगितल्याने आपली प्रगती होते.
४. मन शुद्ध असेल, तर आवरण न्यून होते आणि त्यामुळे वाईट शक्तींची आक्रमणेसुद्धा न्यून होतात.
५. जर आपण भावनाशील होऊन एखाद्याला साहाय्य केले, तर त्यानेही मला वेळ पडल्यास साहाय्य केले पाहिजे, अशी अपेक्षा निर्माण होते. भावनेत तत्त्वनिष्ठता नसते. त्यामुळे भावनाशील होऊन कृती केल्यानेे भाव वाढत नाही.
६. सवलत घेणे, म्हणजे परिस्थितीपासून पळून जाणे होय.
७. आढावा देणे महत्त्वाचे आहे. आढावा न दिल्यामुळे मनाप्रमाणे करण्याचा भाग वाढतो.
– सौ. सुप्रिया माथुर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
या प्रक्रिया घरीच राबवून आपण साधनेत जलद प्रगती करू शकाल. रामनाथी आश्रमात प्रक्रिया राबवणारे स्वभावदोष निर्मूलन आणि अहं निर्मूलन जलद कसे करतात, याची मला जिज्ञासा होती. ती सौ. सुप्रिया माथुर यांच्या या लेखाने पूर्ण झाली. मला सांगता येणार नाही इतक्या सुलभ भाषेत सौ. सुप्रिया माथुर यांनी प्रक्रिया सांगितली आहे. सौ. सुप्रिया माथुर यांचे अभिनंदन ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले