प.पू. दास महाराज यांच्या पत्नी पू. (सौ.) लक्ष्मी नाईक (पू. माई) यांचा नारळी पौर्णिमा (१७.८.२०१६) या दिवशी वाढदिवस आहे. त्यानिमित्त साधकांना त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे देत आहोत.
पू. (सौ.) लक्ष्मी नाईक (पू. माई) यांना सनातन परिवाराकडून
वाढदिवसानिमित्त कृतज्ञतापूर्वक नमस्कार !
१. प्रेमभाव
१ अ. आजारपणात साधिकेची काळजी घेणे
१ अ १. साधिकेला औषधे घेण्याची वेळोवेळी आठवण करून देणे आणि प्रकृतीकडे लक्ष द्यायला सांगणे : गौतमारण्यात जाण्यापूर्वी मला कांजिण्या आल्या होत्या. त्यामुळे मला अशक्तपणा जाणवत होता; म्हणून मी चिकित्सालयात जाऊन आले. तिथून आल्यावर त्यांनी आधुनिक वैद्य काय म्हणाले ?, हे विचारून घेतले, तसेच औषधे घेण्यासाठी त्या वेळोवेळी मला स्मरण करून द्यायच्या. त्या म्हणायच्या, एक-दोन सेवा राहिल्या, तरी चालतील. तू तुझ्या प्रकृतीकडे लक्ष दे. मी तुम्हाला साहाय्य करू शकत नाही, असे मी त्यांना म्हणायचे, तेव्हा त्या मला म्हणायच्या, तुला जेवढे जमते, तेवढे तू करतेच ना ? त्या नेहमी मला अशाच समजून घेतात.
१ अ २. आवश्यक असल्यास विश्रांती घेण्यास सांगणे : तेेथील पुष्कळ सेवा शारीरिक असल्याने मला काही वेळा ती झेपत नसे. त्या वेळी पू. माई स्वतःहून मला थोडा वेळ विश्रांती घेेण्यास सांगायच्या.
१ अ ३. प्रकृती ठीक नसतांना सेवेपेक्षा स्वतःच्या प्रकृतीकडे लक्ष द्यायला सांगणे : गुरुपौर्णिमेच्या कालावधीत माझी प्रकृती ठीक नसल्याने मी ४ – ५ दिवस झोपूनच होते. त्यामुळे मला पू. माईंना काहीच साहाय्य करता आले नाही. तेव्हा त्या मला म्हणाल्या, तुझा जीव बरा होऊ दे आणि नंतर सेवा कर. तुला काही करायला जमत नाही; म्हणून काही वाटून घेऊ नकोस. मध्ये मध्ये त्या मी काय करते ?, मला किती ताप आहे ?, मला काही हवे आहे का ?, हे येऊन पहात असत.
१ अ ४. साधिकेवर आध्यात्मिक उपाय करणे : एक दिवस मला पुष्कळ अशक्तपणा जाणवत होता. तेव्हा पू. माईंनी माझ्या हाता-पायांना आणि तोंडवळ्याला कापूर लावला.
– सौ. स्वराली आेंकार पाध्ये, गौतमारण्य, पानवळ, बांदा, जि. सिंधुदुर्ग.
१ आ. साधक-दांपत्य थकलेले दिसले, तर सेवा न करता विश्रांती घ्यायला सांगणे
आम्ही प्रत्येक रात्री पू. माईंच्या पायांना तेलाचे मर्दन करतो. काही वेळा आम्ही दोघे थकलेलो दिसलो, तर त्या म्हणतात, आज तेल लावू नका. तुम्ही थकला आहात. जाऊन विश्रांती घ्या.
१ इ. बाहेरगावी असतांनाही साधकांना
स्वतःच्या प्रकृतीची काळजी घ्यायला सांगणे
एकदा पू. माई प.पू. बाबा (प.पू. दास महाराज) यांच्यासह काही दिवसांसाठी वरदपूर येथे गेल्या होत्या. तेव्हा पू. माईंचा मध्ये मध्येे आम्हाला भ्रमणभाष यायचा. त्या वेळी त्या आम्हाला प्रेमाने सांगायच्या, तुम्हाला जे हवे असेल, ते दुकानातून घेऊन या. जेवढी सेवा जमेल, तेवढीच करा. अधिक काही करू नका. स्वतःच्या प्रकृतीकडे लक्ष द्या !
१ ई. पू. माई गावाला जातांना तुमच्यासाठी
काय आणू ?, हे आम्हाला आवर्जून विचारतात.
१ उ. साधकांशी बोलण्याला प्राधान्य देणे
पू. माईंना पुष्कळ साधकांचे भ्रमणभाष येतात. कधी कधी त्यांच्या जेवणाच्या किंवा विश्रांतीच्या वेळेतही येतात. तेव्हा त्या साधकांशी बोलण्याला प्राधान्य देतात.
१ ऊ. शेजारी रहाणार्या गरोदर असणार्या काकूंना चिकित्सालयात
भरती केल्यावर एका साधिकेला पाठवून त्यांना साहाय्य करण्यास सांगणे
पू. माईंच्या घराशेजारी एका कुटुंबातील एक काकू गरोदर होत्या. पू. माई आणि प.पू. बाबा रामनाथी आश्रमात गेले असतांना त्या काकूंना चिकित्सालयात भरती केले. हे मी पू. माईंना सांगितले. तेव्हा त्या म्हणाल्या, मी तिकडे असते, तर त्यांच्यासमवेत जाणार होते. पू. माईंनी आमच्यासमवेत असलेल्या एका साधिकेला चिकित्सालयात जाऊन त्यांना साहाय्य करायला सांगितले. पू. माईंच्या अनुपस्थितीत त्या काकू म्हणाल्या, काकू (पू. माई) नसल्यामुळे एकदम शांत शांत वाटते. त्यांच्या मुलाच्या बारशाला पू. माई नसल्याने त्यांची त्यांना उणीव भासत होती.
– श्री. आेंकार आणि सौ. स्वराली पाध्ये
१ ए. साधक सुखरूप घरी पोचल्याची निश्चिती करणे
काही वेळा मी बांद्यातून कुडाळला सेवाकेंद्रात गेल्यावर पोचल्याचे कळवायला विसरतो. तेव्हा पू. माई स्वतः भ्रमणभाष करून मी सुखरूप पोचलो ना ?, याची आस्थेने विचारपूस करतात.
१ ऐ. गौतमारण्यात गेल्यावर कुडाळ सेवाकेंद्र
आणि जिल्ह्यातील साधकांची आस्थेने विचारपूस करणे
मी गौतमारण्य येथे गेल्यावर पू. माई कुडाळ सेवाकेंद्रातील सर्व साधक आणि जिल्ह्यातील साधक यांची नावे घेऊन विचारपूस करतात. मध्यंतरी प.पू. बाबा आणि पू. माई यांच्या अनुपस्थितीत गौतमारण्य येथे श्री. आेंकार, सौ. स्वराली आणि एक साधक असेे तिघेच होते. त्या वेळी पू. माईंनी मला भ्रमणभाष करून बांद्याला जाऊन यायला सांगितले.
१ ओ. साधक किंवा हितचिंतक यांच्या
विवाहाला जाणे शक्य नसल्यास त्यांच्यासाठी अहेर पाठवणे
पू. माईंना साधक किंवा हितचिंतक यांच्या विवाहाला जाणे शक्य नसल्यास, जो साधक विवाहाला जाणार आहे, त्याच्यासमवेत वधू-वरासाठी अहेर पाठवतात. कुडाळ येथील एका साधिकेच्या विवाहप्रसंगी पू. माईंनी माझ्यासमवेत त्यांच्यासाठी अहेर पाठवला आणि त्यांना श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी या, असा निरोप दिला.
– श्री. राजेंद्र (राजू) परब, सनातन आश्रम, कुडाळ.
१ औ. जिल्ह्यातील साधकांच्या सुख-दुःखात सहभागी होणे
जिल्ह्यात कुणी साधक रुग्णाईत असेल, कुणाचा अपघात झाला असेल, कुणाच्या घरी मृत्यू झाला असेल, तर पू. माई स्वतः त्यांना भेटायला जातात. जेव्हा जाणे शक्य होत नाही, तेव्हा त्या त्यांना भ्रमणभाष तरी करतात.
१ अं. परिसरातील सर्वांची आस्थेने विचारपूस करणे
रस्त्यावरून येणारे-जाणारे लोक, आजूबाजूच्या घरात कामाला येणार्या व्यक्ती, बकर्या घेऊन जाणारे धनगर या सर्वांची अन् त्यांच्या घरच्यांची पू. माई आस्थेने विचारपूस करतात.
१ क. समस्या घेऊन येणार्या सर्वांना मायेचा आधार देणे
समाजातील अनेक लोक, नातेवाईक, ओळखीच्या व्यक्ती, काही साधक पू. माईंकडे येतात. त्यांपैकी कुणाला आर्थिक अडचण असते, कुणाची व्यवसायात हानी झाली असते, कुणाच्या घरी कुणीतरी रुग्णाईत असते, कुणाला मूल होत नाही, तर काहींना मूल होते; पण त्याला जन्मतः काहीतरी विकार असतो. पू. माई या सर्वांच्या समस्या शांतपणे ऐकून घेतात आणि त्यांना सकारात्मक आणि स्थिर रहा, देव कुणावर कधीच अन्याय करत नाही, आपल्या वाट्याचे भोग आपल्यालाच भोगावे लागतात, अशा प्रसंगात डगमगायचे नाही. आहे त्यात समाधान मानायचे, असे सांगून त्या सर्वांना मायेचा आधार देतात.
– श्री. आेंकार केरकर, शेर्ले, बांदा, श्री. राजेंद्र परब, श्री. आेंकार आणि सौ. स्वराली पाध्ये
२. आश्रमात येणार्या साधकांचे प्रेमाने आदरातिथ्य करणे
२ अ. प्रथम भेटायला येणार्या व्यक्तीचे भेटवस्तू देऊन स्वागत करणे
पू. माईंना कुणी प्रथमच भेटायला आले किंवा कुणी नवविवाहित दांपत्य आले, तर त्या प्रत्येकाला भेटवस्तू किंवा वस्त्र देतात आणि त्यांच्या पुढील आयुष्यासाठी आशीर्वाद अन् शुभेच्छा देतात.
२ आ. भेटायला आलेल्या साधकांना खाऊ देऊन त्यांचे आदरातिथ्य करणे
पू. माईंना भेटायला अनेक व्यक्ती किंवा साधक आश्रमात येतात. त्या कधी सोवळ्यात स्वयंपाक करत असतात, विश्रांती घेत असतात किंवा त्यांना कधीतरी बाहेर जायचे असते, तरीही त्या आलेल्यांचे आदरातिथ्य उत्साहाने आणि प्रेमाने करतात. त्या प्रत्येकाला चहा, कॉफी किंवा सरबत यांपैकी काय हवे आहे, ते करून देतात, तसेच त्या साधकाला घरच्यासाठी आठवणीने खाऊ देतात.
– श्री. आेंकार आणि सौ. स्वराली पाध्ये
२ इ. आश्रमात येणार्या प्रत्येकाला प्रसाद देणे
साधक, आजूबाजूचे रहिवासी, ओळखीच्या व्यक्ती, नातेवाइक असे कुणीही आश्रमात आले, तर पू. माई त्यांना खाऊ-पिऊ घातल्याविना कधीच पाठवत नाहीत. त्याला पेढा, लाडू किंवा साखर तरी प्रसाद म्हणून देतात. – श्री. आेंकार केरकर, श्री. राजेंद्र परब, श्री. आेंकार आणि सौ. स्वराली पाध्ये
३. खाद्यपदार्थ बनवण्यात काही न्यूनता असल्यास त्याची
जाणीव करून देणे आणि तो चांगला झाल्यावर कौतुक करणे
आश्रमात प्रथम खोबर्याची चटणी करतांना त्यात गूळ, चिंच आणि मीठ किती घालायचे ?, हे मी पू. माईंना विचारायचे. त्यानंतर काही दिवसांनी त्यांनी शिकवल्याप्रमाणे मी चटणी करायला शिकले. चटणीत काही न्यूनता आढळली, तर त्या मला जाणीव करून द्यायच्या आणि चटणी चांगली केली, तर त्या माझे कौतुकही करायच्या. काही वेळा मी सकाळचा अल्पाहार बनवते, तेव्हाही पू. माई तो कसा झाला ?, हे सांगतात.
पू. माई स्वयंपाक करण्यात निपुण आहेत, तरी आमटी किंवा अन्य पदार्थ यांची चव कशी आहे ?, हे त्या आम्हाला विचारतात.
– सौ. स्वराली आेंकार पाध्ये
४. सेवेचा पाठपुरावा घेणे
श्रीराम मंदिरात कधी कधी सलग १० दिवस वीज नसते. त्यासाठी तेथे सोलरचे दिवे बसवायचे का ?, याचा अभ्यास करण्यासाठी मी बांद्याला गेलो होतो. तेथून मी आणि एक साधक दुसर्या ठिकाणी चौकशी करण्यासाठी गेलो. मी पू. माईंना भ्रमणभाष करून सेवेविषयी सांगणे अपेक्षित होते; पण मी ते करायला विसरलो. त्यानंतर पू. माईंचाच मला भ्रमणभाष आला आणि त्यांनी त्यासंबंधी चौकशी केली.
५. प.पू. दास महाराजांचे मौनव्रत चालू
असतांना त्यांच्या सर्व सेवा समर्थपणे सांभाळणे
प.पू. बाबांचे (प.पू. दास महाराज यांचे) मौनव्रत चालू होण्यापूर्वी (प.पू. दास महाराज सध्या मौनव्रत करत आहेत.) आश्रमाची सर्व देखभाल पहाणे, परिसरात काही नवीन करायचे असल्यास संबंधित साधकाला सांगणे, आश्रमात वीज नसतांना साधकांचे साहाय्य घेऊन वायरमनला बोलावणे इत्यादी गोष्टी ते करायचे. प.पू. बाबांच्या मौनव्रतापासून या सर्व गोष्टी पू. माई समर्थपणे करतात.
– श्री. राजेंद्र (राजू) परब
६. श्रीराम मंदिराचे बांधकाम चालू असतांना
सेवेसाठी आलेल्या साधकांच्या खाण्यापिण्याचे
नियोजन सांभाळणे आणि बांधकामाचा व्यय लिहून ठेवणे
श्रीराम मंदिराचे बांधकाम चालू होते. तेव्हा पू. माई ३० ते ३५ साधकांचा स्वयंपाक करायच्या. सर्व साधकांना सकाळी अन् संध्याकाळी चहा करून देणे, त्यासमवेत काहीतरी सुका खाऊ देणे, हे सर्व त्या कुणाच्याही साहाय्याविना आनंदाने करायच्या. इतके सर्व करून श्रीराम मंदिराच्या बांधकामाचा प्रत्येक दिवशीचा व्यय त्या लिहून ठेवत असत.
७. प.पू. डॉक्टरांवरील दृढ श्रद्धा
७ अ. केवळ प.पू. डॉक्टरांच्या कृपेने जिवंत असल्याचे पू. माईंनी सांगणे
पू. माईंचा जन्म त्यांच्या आईच्या गर्भारपणाच्या सातव्या मासात झाला. त्याविषयी बोलतांना पू. माई म्हणाल्या, जन्मानंतर मी केवळ मांसाचा गोळा होते. मला केस, नाक, डोळे, कान काहीच नव्हते. माझ्या आईने मला पुष्कळ जपले. तीन मास (महिने) तिने माझ्या अंगाला पाणी लागू दिले नाही. तीन मासांनंतर जेव्हा मला प्रथम अंघोळ घातली, तेव्हा मी पहिल्यांदा रडले. माझी आई मला कापसाच्या बोळ्याने दूध पाजायची. आज मी केवळ प.पू. डॉक्टरांच्या कृपेनेच जिवंत आहे !
७ आ. ईश्वरच सेवा करण्यासाठी शक्ती देत असल्याचे सांगणे
दिवसभर विविध सेवा करून त्या पुष्कळ थकतात; पण त्या थकल्या आहेत, असे कधीच जाणवत नाही. त्यांच्या तोंडवळ्यावर नेहमीच उत्साह आणि आनंद असतो. त्या म्हणतात, मला आता काही होत नाही. माझ्या अंगात त्राण नसेल, तेव्हा ईश्वर मला शक्ती देतो.
८. प्रत्येक कृती भावपूर्ण करणे
आम्ही नेहमी सायंकाळी आरती करतो. तेव्हा पू. माई आरती एकाग्रतेने आणि भावपूर्ण म्हणतात. त्या प्रत्येक कृती भावपूर्ण करून आम्हा साधकांना आनंद अनुभवायला देतात.
– श्री. आेंकार आणि सौ. स्वराली पाध्ये, गौतमारण्य, पानवळ, बांदा, जि. सिंधुदुर्ग.