सनातन अल्पावधीत व्यापक होण्यामागचे रहस्य !

bhushan_kerkar_col2014
श्री. भूषण केरकर

कोणतीही संस्था मोठी होण्यामागे काही वैशिष्ट्ये असतात. बहुतांश वेळा ही वैशिष्ट्ये मानसिक आणि व्यावहारिक स्तरावरची असतात. सनातन संस्था अल्पावधीत विश्‍वव्यापी होण्यामागेही काही वैशिष्ट्ये आहेत; मात्र ही वैशिष्ट्ये आध्यात्मिक स्तरावरची आहेत. प्रीती (सर्वांप्रती निरपेक्ष प्रेम), निरपेक्षपणे सतत कार्यरत रहाणे, स्वत:च्या गुण-दोषांविषयी आत्मपरीक्षण करणे, कोणत्याही संकटांना न डगमगण्याइतकी ईश्‍वरावरील श्रद्धा आणि व्यापकता ही काही निवडक वैशिष्ट्ये आहेत. सनातनची विचारधारा पूर्णत: मानणार्‍या सहस्रो साधकांमध्ये ही वैशिष्ट्ये काही प्रमाणात तरी अनुभवता येतील. अध्यात्मात पिंडी ते ब्रह्मांडी हे तत्त्व आहे. सनातनच्या साधकांमध्ये ही दैवी वैशिष्ट्ये आहेत, याचे कारण सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी त्याची शिकवण आरंभीपासून साधकांना दिली आहे. आज परात्पर गुरु डॉ. आठवले हे सार्वजनिक जीवनातून निवृत्त झाले आहेत; मात्र त्यांनी २० ते २५ वर्षांपूर्वी दिलेली ही शिकवण उगमाकडून संगमाकडे वहाणार्‍या सरितेप्रमाणे अखंड झुळूझुळू वहात आहे. सनातन अवघ्या २५ वर्षांत विश्‍वव्यापी होण्यामागे हेच गुपित आहे. ही शिकवण परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांमध्ये कशी रुजवली, याचे मर्म शोधण्याचा हा अल्पसा प्रयत्न…

१. प्रीती (सर्वांप्रती निरपेक्ष प्रेम)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी त्यांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तीवर मग ती साधक असो किंवा नसो निरपेक्षपणे प्रेम केले. आतापर्यंत त्यांनी सहस्रो जिज्ञासूंना साधना सांगितली; मात्र त्या व्यक्तीने साधना करावी, याविषयी कधी आग्रही भूमिका घेतली नाही. एखादी व्यक्ती साधना करत नाही, म्हणून तिच्याविषयीचे प्रेमही कधी कमी झाले नाही. दोन प्रसंगांतून ही निरपेक्ष प्रीती कशी कार्य करते, हे पाहू.

१ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या निरपेक्ष प्रीतीमुळे डॉ. जोशी यांनी अनेक वर्षांनंतरही सनातनच्या ग्रंथाचे गुजराती भाषेत भाषांतर करून देणे : जामनगर, गुजरात येथील आयुर्वेदिक वैद्याचार्य डॉ. प्रकाश जोशी सुमारे १५ – १६ वर्षांपूर्वी स्वसंमोहन उपचारपद्धत शिकण्यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकडे आले होते. त्या वेळी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी त्यांना या विषयावर लिहिलेल्या ग्रंथाचे गुजराती भाषांतर करण्याची विनंती केली होती. त्यानंतर अचानक डॉ. जोशी यांचा या वर्षी (२०१६ मध्ये) भ्रमणभाष आला आणि त्यांनी सांगितले १५ – १६ वर्षांपूर्वी डॉ. आठवले यांनी मला या ग्रंथाचे भाषांतर करण्यास सांगितले होते आणि आता या ग्रंथाचे भाषांतर अन् त्याचे टंकलेखन पूर्ण झाले आहे. आता हा ग्रंथ मी तुमच्याकडे छपाईसाठी पाठवतो. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सहवासामुळे त्या व्यक्तीच्या मनावर बीजरूपात झालेल्या संस्कारांचे फळ पुढे कधीतरी मिळते, याची अशी प्रचीती वारंवार येते.     साधकही परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या या गुणाचे अनुकरण करतात. त्याचे फळ कसे मिळते, याविषयीचा एक प्रसंग बोलका आहे.

१ आ. पाच-सहा वर्षांपूर्वी लाभलेल्या सनातनच्या साधकांच्या सहवासामुळे नगर जिल्ह्यातील युवकांनी अद्यापपर्यंत साधना चालू ठेवणे : महाराष्ट्रातील नगर जिल्ह्यात सनातनचे कार्य फारसे नाही. अलीकडेच काही उपक्रमांच्या निमित्ताने सनातनचे साधक नगर जिल्ह्यातील काही गावांमध्ये गेले. त्या वेळी तेथील काही तरुणांनी सांगितले, आम्ही सनातनचे साधकच आहोत. पाच-सहा वर्षांपूर्वी आमच्या गावात सनातनचे काही साधक येऊन साधना शिकवून गेले. त्यानंतर आम्ही साधना करत आहोत. तुम्ही आम्हाला धर्मकार्याविषयी मार्गदर्शन करा, आम्ही धर्मकार्य करण्यास तयार आहोत.    पाच-सहा वर्षांपूर्वी सनातनच्या साधकांनी काही तरुणांना निरपेक्षपणे सांगितलेल्या साधनेचा परिणाम दीर्घकाळानंतरही टिकून राहिला आहे, त्याची ही प्रचीती !

१ इ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकडून मिळालेला प्रीतीचा वसा परिसासारखा कार्य करत असणे : निरपेक्ष प्रेम करण्याचे सनातनच्या साधकांचे हे वैशिष्ट्य समाजाला जाणवते आणि कोणत्या ना कोणत्या माध्यमातून ते समाजाच्या धर्मकार्यात सहभागी होतात. आरंभीच्या काळात अर्पण किंवा विज्ञापन मागण्यासाठी गेल्यावर सनातनच्या कित्येक साधकांना ते न मिळाल्यामुळे रिकाम्या हाताने परतावे लागते. त्याविषयी कोणतीही कटूता साधकांच्या वागण्या-बोलण्यात नसते. त्याचा परिणाम म्हणजे साधक अर्पण किंवा विज्ञापन मागण्यासाठी काही कारणाने पोचले नाहीत, तर अर्पणदाते स्वत:हून त्यांना त्याविषयी विचारतात. त्या वेळी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकडून मिळालेला प्रीतीचा वसा परिसासारखा कसा कार्य करत आहे, याची प्रचीती येते.

२. फळाची अपेक्षा न करता सतत कार्यरत रहाणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांना गेल्या कित्येक वर्षांत रुग्णावस्थेच्या व्यतिरिक्त अन्य कधी विश्रांती घेतांना किंवा विरंगुळा म्हणून मनोरंजन करतांना कोणी पाहिले नाही. हाच गुण सनातनच्या साधकांमध्येही झिरपला आहे. सनातनचे सहस्रो साधकही संसार, नोकरी-व्यवसाय सांभाळून धर्मकार्यासाठी सतत कार्यरत असतात. कित्येक साधकांच्या दिवसाचा आरंभ पहाटे आणि शेवट मध्यरात्री होतो. त्यामुळे कित्येक जण सांगतात की, सामाजिक कार्य करणार्‍या कोणत्याही कार्यकर्त्यापेक्षा सनातनचा साधक पाचपट कार्यक्षम आहे. विशेष म्हणजे या साधकांना कार्यरत करण्यासाठी कोणी प्रेरणा देण्याची आवश्यकता नसते, तर धर्मकार्य हे गुरुसेवा आहे, हा विचार बिंबल्यामुळे साधक भावाच्या स्तरावर प्रेरित होऊन देहभान विसरून कार्य करतात. त्यामुळे जे कार्य होण्यासाठी एरवी महिना लागेल, तेच कार्य सनातनचे साधक ७-८ दिवसांत परिपूर्ण करतात. आतापर्यंत गावोगावी झालेल्या १ सहस्रहून अधिक हिंदु धर्मजागृती सभा, प्रत्येक वर्षी २०० ते २५० ठिकाणी होणारे गुरुपौर्णिमा महोत्सव, हिंदूसंघटन मेळावे हे त्याचे प्रत्यक्ष प्रमाण आहे.

३. स्वत:च्या गुण-दोषांविषयी आत्मपरीक्षण करणे

समाजात विज्ञाननिष्ठा जशी रूजत गेली, तसे व्यक्तीमधील स्वभावदोष आणि अहं यांचेही प्रमाण वाढत गेले. व्यक्तीमधील स्वभावदोष आणि अहं यांमुळे कार्याची गुणवत्ता न्यून होते आणि त्याची फलनिष्पत्तीही न्यून होते. त्यामुळे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी स्वभावदोष आणि अहंनिर्मूलन प्रक्रिया साधकांना शिकवली अन् साधक ती नीट राबवतील, अशी पद्धतही घालून दिली. त्यामुळे साधकांचे स्वभावदोष आणि अहं अल्प होऊन त्यांच्या कार्याची गुणवत्ता वाढली. याचे प्रमाण म्हणजे अनेक संत आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे नेतेही सनातनच्या साधकांच्या बिनचूक कार्य करण्याच्या पद्धतीचे कौतुक करतात. काही संघटना आता त्यांच्या संघटनेचे कार्य करतांना ते कसे करावे, याविषयी साधकांचे आवर्जून मार्गदर्शन घेतात. आज परात्पर गुरु डॉ. आठवले स्वत: कुणाला मार्गदर्शन करू शकत नसले, तरी त्यांनी घालून दिलेल्या मार्गाचे आचरण करून त्यांना अपेक्षित असे कार्य करण्याची किंवा त्याविषयी इतरांना मार्गदर्शन करण्याची क्षमता ईश्‍वरकृपेने सनातनच्या साधकांमध्ये निर्माण झाली आहे.

४. व्यापकता

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी कधीही कोणत्याही विषयात संकुचित विचार केला नाही. त्यांनी हिंदूंना संघटित करण्यासाठी स्वत:ची संस्था, स्वत:चे साधक हा विचार कधी केला नाही. हिंदुत्वासाठी कार्य करणारी प्रत्येक व्यक्ती, मग ती कोणत्याही क्षेत्रात कार्य करणारी असो, तिला परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आपले समजले. पुढे हाच संस्कार साधकांवरही झाला. त्यामुळेच साधकांमध्ये प्रत्येक हिंदुत्वनिष्ठाविषयी धर्मबंधुत्व निर्माण झाले आहे. त्यातूनच कोणतेही कार्य करतांना साधक सहजतेने हिंदुत्वनिष्ठांना एकत्रित करतात आणि कार्य सिद्धीस जाते.

सनातनचे कार्य २५ वर्षांत वाढले, म्हणजे संघटना मोठी झाली, असा नव्हे, तर हिंदुत्वनिष्ठांच्या साहाय्याने धर्मकार्याची व्याप्ती वाढली. साधक ही व्यापकता परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकडून शिकले.

५. कोणत्याही संकटांना न घाबरण्याइतकी ईश्‍वरावरील श्रद्धा

संकट कितीही मोठे असो, ईश्‍वर भक्ताचे रक्षण करतो, याची अनुभूती परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वेळोवेळी घेतली आहे. हीच श्रद्धा त्यांनी साधकांमध्ये निर्माण केली आहे. गेल्या ७ – ८ वर्षांत सनातनवर अनेक संकटे येऊनही साधक डगमगले नाहीत. पोलिसांनी ७०० – ८०० साधकांची जाचक चौकशी केली. तीनदा सनातनवर बंदी लादण्याचे प्रयत्न झाले; पण साधकांची ईश्‍वरावरील श्रद्धा अढळ होती; म्हणूनच त्यांनी धर्मकार्य थांबवण्याचा विचारही केला नाही. पूर्णवेळ धर्मकार्य करणार्‍या साधकांच्या मनाला सनातनवर बंदी आल्यास आमचे काय होईल, असा प्रश्‍नही शिवला नाही. संकटकाळातही सनातनचे कार्य ऐरावताप्रमाणे चालू राहिले, याचे श्रेय परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांमध्ये ईश्‍वराप्रती श्रद्धा निर्माण करण्यासाठी दिलेल्या शिकवणीला जाते.

– श्री. भूषण केरकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (५.८.२०१६)

६. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या
मार्गदर्शनाखाली अनेक साधक साधनेला लागण्याची कारणे

 

६ अ. चैतन्याचा प्रभाव

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केलेल्या मार्गदर्शनात चैतन्य असल्याने ते साधकाच्या अंतर्मनापर्यंत पोचून त्याला साधनेची प्रेरणा मिळते.

६ आ. प्रीतीचा वर्षाव

साधकांच्या साधनेच्या संदर्भातील शंकांचे निरसन करणे, प्रसंगानुरूप साधकाचे कौतुक करणे, त्याला प्रसाद देणे, साधनेत साहाय्य होण्याच्या दृष्टीने त्याला त्याच्या चुका सांगणे, अडचणीत साधकाला सर्वतोपरी साहाय्य करणे, अशा विविध प्रकारे परात्पर गुरु डॉ. आठवले साधकांवर स्वत:चे प्रेम व्यक्त करतात. हे प्रेम ईश्‍वरीय असल्याने त्याचा परिणाम साधकांवर दीर्घकाळ टिकून रहातो आणि साधक त्यांच्या प्रेमाच्या बंधनात बांधला जातो.

६ इ. ईश्‍वरी ज्ञानाचा प्रभाव

अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी अध्यात्मशास्त्राचा कठीण विषय सुलभ करून समाजाला सांगितला. त्यामुळे जिज्ञासू साधना करू लागला.

आ. साधकांनी विचारलेले प्रश्‍न आणि मांडलेल्या अडचणी यांची उत्तरे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ईश्‍वरी ज्ञानातून दिली. ही उत्तरे ईश्‍वरीय असल्याने ती अचूक आणि परिपूर्ण आहेत. साधकांनी त्यानुसार कृती केल्याने त्यांच्या साधनेतील अडचणी न्यून होण्यास साहाय्य झाले. परिणामी साधकांची श्रद्धा बसून ते परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी कायमचे जोडले गेले.

वरील आध्यात्मिक पैलूंचे ज्ञान नास्तिक आणि धर्मद्रोही यांना नसल्याने ते सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर साधकांना संमोहित केल्याचा आरोप करतात.’

– श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

वाढता वाढता वाढे… भेदिले सूर्यमंडळा !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी १९९१ मध्ये सनातनचे बिजारोपण केले, त्या वेळी संस्थेचा एकच आश्रम होता, तो म्हणजे त्यांची शिव, मुंबई येथील प.पू. डॉक्टरांची सदनिका. त्या वेळी एका संगणकावर एक साधक ग्रंथसंकलनाची सेवा करत असे. तो झोपला की, दुसरा साधक त्या संगणकावर टंकलेखन करायचा. आज ही संख्या कित्येक पटींनी वाढली, तसेच ध्वनीचित्रीकरण, कला, नियतकालिक अशा धर्मशिक्षण आणि धर्मरक्षण यांसाठी चालू केलेल्या कार्याच्या प्रत्येक अंगाने आज व्यापक रूप धारण केले आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी प्रारंभी अध्यात्माचा सर्वांगस्पर्श करणारा एक सायक्लोस्टाईल ग्रंथ प्रसिद्ध केला होता. त्या ग्रंथातील प्रत्येक प्रकरणाचा एक खंड बनून त्या खंडात अनेक ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. सनातनच्या विचारधारेवर आधारित ६ संकेतस्थळे लोकप्रिय झाली आहेत. सनातनच्या विचारांशी एकरूप होऊन ४ आश्रम देशभरात चालू आहेत. सनातनच्या कार्याच्या प्रगतीचा हा संक्षिप्त परिचय केवळ प्रातिनिधीक आहे. त्यातून सनातनच्या कार्याच्या चढत्या आलेखाचा परिचय आपल्याला होईल. हे सांगण्याचे तात्पर्य इतकेच की, परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी दिलेल्या शिकवणीमुळे साधकांमध्ये हे दैवी गुण निर्माण होत गेले आणि हे दैवी कार्य पहाता पहाता उभे राहिले आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात