शिवाच्या जटेतून जशी गंगानदी पृथ्वीला पावन करण्यासाठी अवतरित झाली, तसे सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या प्रेरणेतून अखिल मानवजातीचा उद्धार करण्यासाठी सनातनच्या ग्रंथांच्या माध्यमातून ज्ञानगंगा अवतरित झाली आहे ! अध्यात्मशास्त्र, साधना, आचारधर्म, धर्मजागृती, राष्ट्ररक्षण, बालसंस्कार, आयुर्वेद, स्वभाषा, भावी आपत्काळात संजीवनी ठरणार्या बिंदूदाबनादी उपचारपद्धती आदी विषयांवरील २९३ ग्रंथांच्या १५ भाषांत ६६ लाख २१ सहस्र प्रती जुलै २०१६ पर्यंत प्रकाशित झाल्या आहेत. सनातनच्या रौप्यमहोत्सवाच्या निमित्ताने सनातनच्या ग्रंथसंपदेचे अद्वितीयत्व दर्शवणारा हा लेख…
शब्दांकन : सनातनचे ११वे संत (पू.) श्री. संदीप आळशी, सनातनच्या ग्रंथांचे प्रमुख संकलक
माझी वंशवेल !
माझी वंशपरंपरा प्राचीन आहे. माझ्या पूर्वजांचा जन्म अखिल मानवजातीच्या कल्याणासाठीच झाला होता. तपस्वी ऋषिमुनींना आत्मसाक्षात्कार झाला आणि धर्मज्ञान देणार्या वेदांचा प्रथम जन्म झाला. पुढे युगे सरकत गेली, तसतशी दर्शने, रामायण, महाभारत, श्रीमद्भागवत, पुराणे अशी आमची वंशवेल वाढत गेली. त्या त्या काळाला आवश्यक असे ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज यांनी युक्त अशा धर्मग्रंथांची निर्मिती भारतवर्षात होत राहिली.
माझे ग्रंथ : ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज यांचा समन्वय असलेली आधुनिक काळातील गीता !
श्रीमद्भगवद्गीता या ग्रंथाचे वैशिष्ट्य काय ? सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज ।, म्हणजे सर्व प्रकृतीधर्मांचा, षड्रिपूंचा अन् अहंचा त्याग करून एकट्या मला शरण ये, असा उपदेश करणारा गुरु श्रीकृष्ण शिष्य अर्जुनाला भगवंताच्या प्राप्तीचे रहस्य आणि मार्ग दर्शवतो. भगवंताची ही गीता म्हणजे ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज यांचा आदर्श समन्वयच आहे.
समाज अध्यात्ममार्गी, धर्माचरणी बनला, तर नीतीमत्ता, चारित्र्यशीलता, बंधूभाव, कर्तव्यदक्षता आदी गुणांचा त्याच्यात विकास होऊन सामाजिक स्थैर्य लाभते. त्याचसह अन्याय, अधर्म आदींच्या विरुद्ध वैध मार्गाने आवाज उठवला, तरच राष्ट्रीय जीवनात भ्रष्टाचार, गुंडगिरी, सामाजिक विषमता यांसारख्या दुर्गुणांवर चाप बसून राष्ट्र सुरक्षित आणि सुव्यवस्थित रहाते. यासाठीच ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज यांचा सुयोग्य समन्वय असणे आवश्यकच असते.
गीतेप्रमाणेच माझे ग्रंथ चैतन्यमय आणि प्रासादिक !
आज गीता हा कित्येक जणांचा उपासना-ग्रंथ आहे. कित्येकांचा तो ध्येयमंत्र आहे. कित्येकांचा तो जीवन-आदर्श आहे. युगे लोटली, तरी गीतेचे स्थान हिंदुमनात अढळ आहे. याचे एकमेव कारण म्हणजे गीता ही चैतन्याचे मूर्तीमंत स्वरूप आणि प्रासादिक आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले हे सध्याच्या कलियुगात श्रीकृष्णाचे साक्षात् अवतारच आहेत. हे आजवर अनेक संतांनी सांगितले आहे आणि सनातनच्या शेकडो साधकांना याची अनुभूतीही आहे ! सनातनचे ग्रंथ परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चैतन्यमय लेखणीतून सिद्ध होत आहेत. समाजाला अध्यात्माचा मार्ग दाखवणारे अन् साधकांना मोक्षाप्रत नेणारे हे ग्रंथ म्हणजे आधुनिक गीतेतील विविध श्लोकच आहेत.
क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे !, असे एक वचन आहे. स्वतः आदर्शवत् कृती न करता केवळ फुकाची बडबड करणार्याच्या शब्दांना मूल्य (किंमत) नसते आणि म्हणूनच त्या उपदेशामध्ये शब्दशक्ती आणि चैतन्यशक्तीच न उरल्याने त्या उपदेशाचा जनमानसावर प्रभाव पडत नाही. यासाठीच म्हटले आहे, बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले ! माझ्या ग्रंथांचेही तसेच आहे. साधकांना काळानुसार योग्य साधना शिकवणारे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आधी स्वतः ते आचरणात आणले आहे. त्यामुळेच त्यांचा उपदेश मनावर दृढ संस्कार करून जातो आणि वाचक कृतीला उद्युक्त होतो. सत्याच्या मार्गावर घेऊन जाणारी सनातन संस्था ही ईश्वराचे स्थूल रूपातील शरीर असून माझे सर्व ग्रंथ त्या शरिरातील चैतन्यमय परमेश्वरी शक्तीच आहे !
ग्रंथांची मांडणी काळानुसार वैज्ञानिक परिभाषेत !
संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ, समर्थ रामदासस्वामी आदी संतांनी अभंग, भजने, श्लोक इत्यादींची निर्मिती करून समाजाला ईश्वरप्राप्तीविषयी बहुमोल मार्गदर्शन केले. त्या काळी आताच्या तुलनेत समाजाची सात्त्विकता अधिक होती. त्यामुळे अल्प (कमी) शब्दांतूनही समाजाला अध्यात्म समजत असे. आज समाजाची सात्त्विकता न्यूनतम स्तरावर पोहोचली असल्याने अध्यात्म समजून घेण्याची समाजाची क्षमताही अल्प झाली आहे. त्यामुळे समाजाला अध्यात्माच्या सर्व अंगांचे विश्लेषण करून सांगावे लागते. त्याचे एक उदाहरण पुढे दिले आहे.
संत तुकाराम महाराजांनी एका अभंगात म्हटले आहे, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल । करावा विठ्ठल जीवभावे । हेच आताच्या समाजाला कळण्यासाठी पुढीलप्रमाणे विश्लेषण करून सांगावे लागते –
१. बोलावा विठ्ठल : नामजप कोणता करावा ?, तो करण्याची योग्य पद्धत कोणती ? इत्यादी.
२. पहावा विठ्ठल : दुसर्यामध्ये देव पहाता येण्यासाठी स्वतःमध्ये भाव कसा निर्माण करावा ? त्याकरता स्वतःमधील स्वभावदोष आणि अहं घालवण्यासाठी नेमके कसे प्रयत्न करायचे ? इत्यादी.
३. करावा विठ्ठल जीवभावे : स्वतःमध्ये देवपण येण्यासाठी साधना टप्प्याटप्प्यानुसार कशी करावी ? इत्यादी.
माझे ग्रंथ वैज्ञानिक परिभाषेत अध्यात्म शिकवत असल्याने या दृष्टीनेही ते सध्याच्या समाजाला उत्कृष्ट मार्गदर्शन करतात.
आतापर्यंत पृथ्वीवर कोठेही उपलब्ध नसलेले एकमेवाद्वितीय ज्ञान !
ज्ञान हे अनादि आणि अनंत आहे. प्रत्येक युगात ते काळाच्या आवश्यकतेप्रमाणे ब्रह्मांडात अवतीर्ण होत असते. मानवजातीच्या कल्याणासाठी द्रष्टे अन् ऋषिमुनी ते ग्रहण करून ते ग्रंथरूपात संकलित करतात. सध्याच्या कलियुगातील आधुनिक ऋषि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे सनातनच्या साधकांना नाविन्यपूर्ण ज्ञान स्फुरत असून ते ग्रंथरूपात संकलित होत आहेत. सनातनच्या बर्याच ग्रंथांतील ३० ते ८० टक्के ज्ञान हे आतापर्यंत पृथ्वीवर कोठेही उपलब्ध नसलेले, असे एकमेवाद्वितीय ज्ञान आहे. शब्दजन्य ज्ञान, आकृत्या, सारण्या, सूक्ष्म-ज्ञानविषयक चित्रे, सूक्ष्म-परीक्षण, सूक्ष्मसंबंधीचे प्रयोग आदी विविध रूपांत हे ज्ञान ग्रंथांमध्ये साकार झाले आहे.
आगामी भीषण आपत्काळाचाही विचार !
सर्व संत आणि ज्योतिषी यांच्या मताप्रमाणे आपत्काळाला प्रारंभ झालेला आहे आणि त्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे. भूकंप, वादळ, त्सुनामी इत्यादी नैसर्गिक आपत्ती आणि अराजक, अणूयुद्ध अशा आपत्ती यांना आता तोंड द्यावे लागणार आहे. अशा भीषण आपत्काळात भावी आपत्काळातील संजीवनी या ग्रंथमालिकेतील माझे ग्रंथ, हे विकारग्रस्तांसाठी, पीडितांसाठी संजीवनीच ठरतील. आगामी काळाची पावले ओळखून मानवजातीच्या कल्याणासाठी एवढा दूरदृष्टीचा विचार सर्वज्ञ आणि द्रष्टे प.पू. डॉक्टरच करू शकतात !
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे मूलाधार असलेले ग्रंथ !
वसिष्ठऋषींकडून श्रेष्ठ नीतीमूल्यांचे शिक्षण घेऊन प्रभु श्रीरामचंद्र घडले आणि त्यांनी आदर्श रामराज्य स्थापिले. असेच शिक्षण देण्यासाठी भावी काळात महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाची स्थापना केली जाणार आहे. माझे ग्रंथ हे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे मूलाधार ग्रंथ आहेत. यासाठी धर्मशास्त्राच्या जोडीलाच राजनीतीशास्त्र, अर्थशास्त्र, न्यायशास्त्र अशा सर्वच अंगांचा विचार करणारे ग्रंथ सिद्ध करणे, हे सनातनचे ध्येय आहे. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयातून शिक्षण घेऊन बाहेर पडणारे विद्यार्थी केवळ संत नसतील, तर राष्ट्रसंत असतील. हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) निष्कंटक राखण्यासह त्याचे तेज आणि अस्मिता वाढवणारे ते महापुरुष असतील !
माझ्या ग्रंथांचा प्रसार करून तुम्हीही ईश्वरी कृपेस पात्र व्हा !
माझे ग्रंथ घरोघरी, शाळाशाळांत आणि वाचनालयांत पोहोचवणे, ते इतरांना भेटस्वरूपात देणे; त्यांच्यासाठी प्रायोजक बनणे वा विज्ञापने (जाहिरात) देणे यांसारख्या विविध मार्गांनी तुम्हीही ग्रंथांचा प्रसार करू शकता. याद्वारे तुम्ही राष्ट्र आणि धर्म यांच्या पवित्र कार्यात सहभागी व्हाल अन् त्यामुळे ईश्वरी कृपेचे फळ तुम्हाला मिळेल, याची निश्चिती बाळगा !
– (पू.) श्री. संदीप आळशी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१.८.२०१६)