अनुक्रमणिका
- १. सहज, उत्साही आणि आनंदावस्थेत रहाणे
- २. साधकाची विचारपूस करून त्याच्या अडचणी सोडवणे
- ३. लहान-लहान गोष्टींतही साधकांची आईप्रमाणे काळजी घेणे आणि प्रेमभावामुळे सर्वांची मने जिंकणे
- ४. लॉजमध्ये काम करणार्या मुलांशी प्रेमाने वागणे
- ५. साधकांच्या त्रासांवर त्यांना सोपे उपाय करण्यास सांगणे
- ६. पू. काकू म्हणजे सर्वांची माऊलीच !
- ७. साधकांना आनंद देण्यासाठी प्रयत्नशील असणे
- ८. सर्वांशी समानतेने आणि पारदर्शकपणे वागणे अन् साधकांचे सुख-दुःख आत्मीयतेने ऐकून घेऊन त्यांना त्यातून बाहेर काढण्यास साहाय्य करणे
- ९. प्रत्येक प्रसंगाकडे आध्यात्मिक दृष्टीकोनातून पहाणे
- १०. अखंड कार्यरत रहाणे
- ११. अल्प देहबुद्धी आणि अनासक्त वृत्ती
- १२. पू. काकूंच्या तोंडवळ्यावर तेज असल्याचे संतांनी सांगणे
- १३. साधकांप्रतीचा कृतज्ञताभाव !
- १४. मुलीच्या लग्नाच्या संदर्भात पू. काकूंचा भाव !
- १५. पू. (सौ.) गाडगीळ यांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती
- १६. पू. (सौ.) गाडगीळकाकू यांनी केलेले अमूल्य मार्गदर्शन
- १७. ‘गुरुकार्यातील वेळ वाचावा’, यासाठी प्रयत्नरत असणे
- १८. ‘स्वतःमुळे इतरांचा वेळ वाया जाऊ नये’, याची काळजी घेणे
- १९. विश्रामालयातही (हॉटेलमध्येही) आश्रमाप्रमाणे रहाणे आणि साधकांनाही तसे शिकवणे
- अ. विश्रामालयात रहायला जाण्याआधी त्या विश्रामालयाची स्पंदने पाहून ‘आत जायचे कि नाही ?’, ते सांगणे
- आ. विश्रामालयात काम करणार्यांशीही प्रेमाने बोलणे आणि त्यांना साधना सांगणे
- इ. आश्रमाप्रमाणेच विश्रामालयातही ‘वीज, पाणी, मनुष्यबळ इत्यादींचा अनावश्यक वापर होऊ नये’, याची काळजी घेणे
- ई. विश्रामालय सोडण्याच्या वेळी साधकांना खोली व्यवस्थित आवरून ठेवायला सांगणे आणि वास्तूप्रती कृतज्ञता व्यक्त करणे
- २०. साधकांच्या घरी गेल्यावर स्वतःचे वेगळेपण न जपता सहजतेने वागून गुरुदेवांच्या शिकवणीचे आज्ञापालन करणे
१. सहज, उत्साही आणि आनंदावस्थेत रहाणे
पू. (सौ.) अंजली गाडगीळ यांची मुलगी सायली हिच्या विवाहाच्या दिवशी पहाटेपासून पू. (सौ.) गाडगीळकाकूंना सलग पाच वेळा जुलाब झाले, तरी त्यांना त्रास होत असल्याचे जाणवत नव्हते. त्या परिस्थितीतही त्या स्थिर, सहज आणि आनंदी होत्या. पू. काकूंच्या सेवेत असतांना त्यांच्या मनाची स्थिती एकसारखीच असल्याचे माझ्या लक्षात आले. सकाळी १० वाजता काकू उत्साही, आनंदी आणि चैतन्यमय स्थितीत असतात, तशाच दुपारी, सायंकाळी अन् मध्यरात्री बारा-एक वाजताही असतात. कोणत्याही वेळी त्यांना काही विचारले, तर त्या आनंदाने भगवंताच्या अनुसंधानात राहून बोलतात. कोणत्याही परिस्थितीत कसलाही थकवा त्यांच्या मुखावर जाणवत नाही. सतत वर्तमान आणि आनंदावस्था जाणवते. पू. डॉ. गाडगीळकाका आणि काकू पहाटे ४ वाजता उठतात आणि रात्री दोन-अडीच वाजेपर्यंत अखंड सेवारत असतात. ते रात्री केवळ २ – ३ घंटेच झोपतात. त्या स्वतः सतत प्रत्येक क्षणी वर्तमानात आणि आनंदात रहातात अन् सहसाधकांनाही वर्तमानात, आनंदात रहाण्यासाठी साहाय्य करतात.
२. साधकाची विचारपूस करून त्याच्या अडचणी सोडवणे
आम्ही किंवा इतर कुणीही सेवेसाठी अथवा इतर कोणत्याही कारणासाठी पू. (सौ.) गाडगीळकाकूंकडे गेल्यास त्या येणार्याची प्रथम विचारपूस करतात. जेवण केले का ? झोप लागते ना ?, असे विचारूनच त्या पुढचे बोलतात. याविषयी कुणाला काही अडचण असेल, तर लगेच त्यावरील उपाययोजना सांगून त्या साधकांच्या अडचणी सोडवतात.
३. लहान-लहान गोष्टींतही साधकांची आईप्रमाणे
काळजी घेणे आणि प्रेमभावामुळे सर्वांची मने जिंकणे
लहान-लहान गोष्टींतही सहसाधकांना आनंद आणि प्रेम देऊन त्या त्यांची आईप्रमाणे काळजी घेतात. सायलीच्या विवाहाच्या वेळी इतक्या घाई-गडबडीतही त्यांनी सर्व सहसाधक जेवले का ?, हे विचारून घेतले आणि नंतर स्वतः जेवायला बसल्या. त्या वेळी त्यांनी सहसाधकांना बोलावून स्वतःच्या ताटातील गोड पदार्थ त्यांना खाण्यास दिला. त्यांच्यातील प्रेमभावामुळे त्यांनी आतापर्यंत देवी-देवता,
संत-महंत आणि गुरुमाऊली यांचे मन जिंकले आहे.
४. लॉजमध्ये काम करणार्या मुलांशी प्रेमाने वागणे
पू. काकू दौर्यावर असतांना लॉजमध्ये उतरल्यावर तिथे काम करणार्या मुलांशीही (वेटरशीही) प्रेमाने वागतात, बोलतात आणि त्यांची विचारपूस करतात. स्वतःसाठी आणलेला खाऊ आणि चहा स्वतः न घेता त्या मुलांना देतात. त्यामुळे ती मुलेही पू. काकूंशी प्रेमाने वागतात आणि बोलतात. काकूंमधील प्रेमभाव आणि चैतन्य यांमुळे सर्व जण काकूंकडे आपोआप आकर्षिले जातात.
५. साधकांच्या त्रासांवर त्यांना सोपे उपाय करण्यास सांगणे
अ. मला जेवण जात नाही आणि जेवणाची इच्छाही होत नाही, असे एकदा एका साधकाने पू. काकूंना सांगितले. काकूंनी त्याला उपाय म्हणून एक चमचा साखर हातात घेऊन श्रीकृष्णाला प्रार्थना करण्यास सांगितली, हे श्रीकृष्णा, मला साखरेतून तुझे माधुर्य आणि चैतन्य मिळू दे अन् ते माधुर्य, चैतन्य माझ्या देहातील पेशीपेशीत जाऊन तृप्ती होऊन प्राणशक्ती वाढू दे. त्यानंतर साखर प्रसाद म्हणून खाण्यास सांगितले.
आ. एका साधिकेला तीव्र त्रासामुळे काहीच करता येत नव्हते. तिचा नामजपही होत नव्हता. पू. काकूंनी तिला श्रीकृष्णाची प्रतिमा हातात घेऊन त्याच्या तोंडवळ्यावरील प्रत्येक अवयवावर तर्जनी फिरवण्यास सांगितले. त्यानंतर केवळ एवढेच कर. बाकी काही केले नाहीस, तरी चालेल, असे पू. काकूंनी तिला सांगितले. त्या साधिकेने तसे करून पाहिल्यावर तिला पुष्कळ बरे वाटून होणारा त्रास उणावला. त्याविषयीचे शास्त्र सांगतांना काकू म्हणाल्या, तर्जनीच्या माध्यमातून प्रतिमेतील श्रीकृष्णाच्या स्पर्शाने चैतन्य शरिरात जाते आणि श्रीकृष्णाला पाहून मन एकाग्र होते. त्यामुळे देह आणि मन यांवरील काळ्या शक्तीचे आवरण न्यून होऊन देहातील चैतन्य वाढते. अशी प्रक्रिया होत असल्याने त्रास आपोआप उणावू लागतो.
६. पू. काकू म्हणजे सर्वांची माऊलीच !
एकदा पू. काकूंनी बाजारातून फळे विकत आणली होती. त्या वेळी पू. (कु.) रेखाताईंनी पू. काकूंना निरोप दिला, आपण संत आणि आजारी साधक यांच्यासाठी आश्रमात फळे विकत आणतो. त्यातली फळे घेऊ शकता. फळे विकत आणायला नकोत. हा निरोप पू. काकूंना दिल्यावर त्या म्हणाल्या, आश्रमात पुष्कळ साधकांना फळांची आवश्यकता असते. साधक पूर्णवेळ आहेत. त्यांच्याकडे पैसे असतीलच, असे नाही. त्यांना ती फळे मिळू दे. त्यांच्या नावाचा वाटा त्यांना मिळू दे. त्या वेळी साधकांविषयी प्रेम वाटून त्यांच्या डोळ्यांत पाणी आले होते. पू. काकू सर्वांच्या माऊलीच झाल्या आहेत, असे वाटत होते.
७. साधकांना आनंद देण्यासाठी प्रयत्नशील असणे
पू. काकू छोट्या छोेट्या प्रसंगातही सहसाधकांना प्रोत्साहन देतात. त्यांना मानसिक स्तरावर न हाताळता, लगेच योग्य-अयोग्य प्रेमाने सांगून आधार देतात आणि साधनेत पुढच्या पुढच्या टप्प्याला जलद गतीने घेऊन जातात. पू. काकू साधकांकडून त्यांच्या प्रकृतीनुसार सेवा आणि साधना करवून घेतात.
८. सर्वांशी समानतेने आणि पारदर्शकपणे वागणे अन् साधकांचे सुख-दुःख
आत्मीयतेने ऐकून घेऊन त्यांना त्यातून बाहेर काढण्यास साहाय्य करणे
नातेवाइक, संत, साधक, बालसाधक किंवा आश्रमातील कामगार यांच्याशी त्या एकसारख्याच प्रेमाने बोलतात. त्यामुळे सर्व साधक लगेच त्यांच्याजवळ येतात. त्यांचे नातेवाइकही काकूंना म्हणत होते, अंजू, तुझ्या प्रेमामुळेच आम्ही तुझ्याशी जोडले गेलो आहोत. पू. काकूंमधील प्रेमभावामुळे त्या सर्वच वयोगटांतील साधकांना आपल्याशी जोडतात. त्यामुळे त्यांच्याशी बोलतांना कुणालाही परकेपणा जाणवत नाही किंवा ताण येत नाही. सर्व जण त्यांच्याशी मनमोकळेपणाने बोलून आनंदी होतात. सर्वांनाच त्यांचा आधार वाटतो.
पू. (सौ.) काकू पारदर्शक आहेत. सर्वांवर त्या समान प्रेम करतात. कधीच भेदभाव करत नाहीत. प्रत्येकात त्यांना भगवंत दिसतो. साधकांचे सुख-दुःख आत्मियतेने ऐकून त्या त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होतात. साधकांना त्यातून बाहेर काढण्यास साहाय्य करतात.
९. प्रत्येक प्रसंगाकडे आध्यात्मिक दृष्टीकोनातून पहाणे
पू. काकू स्वतःचा विचार न करता गुरु, संत आणि देवता यांना अपेक्षित असे प्रयत्न तीव्र तळमळीने करतात. प्रत्येक प्रसंगाकडे त्या आध्यात्मिक दृष्टीने पहातात. त्यानुसार श्रद्धा ठेवून प्रयत्न करतात. त्यामुळे पू. काकूंवर देवाचीही कृपा होत असल्याचे अनुभवता येते. त्या आश्रमात उपस्थित असूनही सायलीच्या केळवणाला गेल्या नाहीत. समष्टीला प्राधान्य देऊन त्यांनी ज्ञानाच्या धारिकांचे टंकलेखन केले. केळवणाची छायाचित्रे पाहून सायलीच्या आनंदात सहभागीही झाल्या.
१०. अखंड कार्यरत रहाणे
पू. काकू पहाटे ४ ते रात्री २ वाजेपर्यंत अविरत सेवा करतात. जो दुसर्यावरी विसंबला, त्याचा कार्यभाग बुडाला या वचनानुसार त्या प्रत्येक कृती स्वतः करत होत्या. कोणतीही कृती त्यांनी इतरांवर सोडून दिली, असे होत नाही. प्रत्येक गोष्ट स्वतः पडताळतात आणि मगच पुढची कृती करतात. सायलीच्या लग्नाची घाई असो किंवा १४ – १४ घंटे दौर्यातील प्रवास असो, त्या अखंड कार्यरत असतात.
११. अल्प देहबुद्धी आणि अनासक्त वृत्ती
पू. काकूंना मर्दन करण्याची सेवा होती. त्या वेळी त्यांना देहबुद्धी पुष्कळ अल्प असल्याचे जाणवले. पू. काकूंना कोणत्याही गोष्टीची आसक्ती नाही. केवळ गुरुकार्यासाठी त्या स्वतःचा देह, मन, धन, बुद्धी आणि सर्वस्व पणाला लावून झिजत असतात. पू. काकू देहशुद्धीसाठी काही दिवस काहीही न खाता केवळ दोन पेले ताक पित असत. त्या वेळी त्यांना कधीच थकवा आल्याचे जाणवले नाही. त्या तेवढ्याच ताकावर तृप्त असायच्या. त्यांना कुणी काही खाऊ दिला, तरी त्यांनी तो त्या काळात कधीच खाल्ला नाही.
१२. पू. काकूंच्या तोंडवळ्यावर तेज असल्याचे संतांनी सांगणे
एकदा तिरुपती येथे संत मेळावा होता. तिथे विविध संप्रदायाचे संत-महंत आले होते. एका संतांना साधक भेटले. त्या वेळी ते म्हणाले, तुमच्या त्या संत पू. गाडगीळ यांच्या तोंडवळ्यावर वेगळेच तेज आणि चैतन्य आहे. त्यांच्या तोंडवळ्यावरून दृष्टी हटत नाही. त्याच्या तोंडवळ्याभोवती पुष्कळ पांढराशुभ्र प्रकाश जाणवतो. त्या प्रकाशाने डोळे दिपून जातात. त्यांच्याकडे पहातच रहावेसे वाटते. आम्हालाही पू. काकूंसमवेत सेवा करतांना ही अनुभूती पुष्कळ वेळा आली आहे.
१३. साधकांप्रतीचा कृतज्ञताभाव !
पू. काकूंना कुणी एक पेलाभर पाणी जरी आणून दिले, तरी त्यांना लगेच तो साधक आणि गुरुदेव यांच्याप्रती कृतज्ञता वाटून अश्रू येतात. पू. काकू साधकाला लगेच सांगतात, तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळेच मी समष्टी कार्य करू शकते. त्यामुळे साधनेसाठी प्रोत्साहन मिळते.
१४. मुलीच्या लग्नाच्या संदर्भात पू. काकूंचा भाव !
अ. चि.सौ.कां. सायली आणि चि. सिद्धेश यांच्या विवाहाच्या वेळी विष्णु आणि लक्ष्मी यांचाच विवाह आहे, असा भाव ठेवून त्या सेवा करत होत्या. त्यांनी त्या दोघांच्या चरणांवर डोके ठेवून नमस्कार केला.
आ. सायलीच्या विवाहाच्या वेळी बोलतांना पू. काकू म्हणाल्या, आपण म्हटले, तर ती माया नाही तर ब्रह्मच आहे. आपल्यावरच साधना अवलंबून आहे.
इ. पू. काकूंनी सांगितले, राष्ट्र ही स्त्री आहे आणि धर्म हा पुरुष आहे. आता मी यांचे लग्न लावायला जाणार आहे. यांचे लग्न लागले की, त्यांना होणारे अपत्य म्हणजे हिंदु राष्ट्र !
१५. पू. (सौ.) गाडगीळ यांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती
१५ अ. पू. काकांनी कानातील यंत्र बंद पडल्याचे
पू. काकूंना सांगितल्यानंतर ५ मिनिटांतच ते आपोआप चालू होणे
सायलीच्या विवाहातील विधी चालू असतांना पू. गाडगीळकाकांच्या कानातील यंत्रावर पाण्याचा थेंब उडाल्याने यंत्र बंद पडले. पू. काकांना काहीच ऐकू येत नव्हते. पू. काकांनी ४ – ५ वेळा यंत्र चालू-बंद करून पाहिले; पण यंत्र चालू झाले नाही. त्याविषयी पू. काकांनी पू. काकूंना सांगितले. त्यावर पू. काकू म्हणाल्या, थोड्या वेळाने चालू होईल. त्यानंतर ५ मिनिटांनी यंत्र आपोआप चालू झाले.
१५ आ. पू. काकूंच्या पायावर उमटलेले ॐ रात्री अपुर्या प्रकाशातही स्पष्टपणे दिसणे
देव त्यांच्यासमवेत सतत असल्याचे छोट्या-मोठ्या प्रसंगांतून अनुभवण्यास मिळते. त्यांना मर्दन करतांना त्यांच्या पायावर आपोआप उमटलेले ॐ दिसले. रात्री मर्दन करण्याची सेवा करतांना खोलीतील केवळ लहान दिवा चालू होता. त्यातही पू. काकूंच्या पायावर उमटलेले ॐ स्पष्टपणे दिसत होते. ही देवाचीच लीला आहे, असे वाटले.
१५ इ. पू. काकूंना मर्दन करतांना, त्यांच्याशी बोलतांना आणि त्यांच्यासमवेत असतांना मनामध्ये आनंदाचे आणि चैतन्याचे कारंजे उडत आहे, असे मला जाणवायचे.
१६. पू. (सौ.) गाडगीळकाकू यांनी केलेले अमूल्य मार्गदर्शन
अ. स्वतःचे, दोष, अहं, निराशा म्हणजे माया, जी सतत दुःखात ठेवते आणि प्रत्येक प्रसंगातून आनंद घेणे, अनुसंधान साधून देवाला अपेक्षित असे वागून प्रयत्न करणे, म्हणजे आनंदप्राप्तीसाठीचे अध्यात्म !
आ. स्वतःच्या आवडी-निवडी, मनावर आणि इंद्रियांवर नियंत्रण ठेवून आंतरिक समाधानाने वागणार्या माणसाला अन्न-पाण्याची आवश्यकता असते. देवाच्या भक्तीची गोडी लागली की मग कशाचीच आवश्यकता लागत नाही. तो देवाच्या चैतन्यावरच जगू शकतो.
देवा (प.पू. डॉक्टर), तुमच्या कृपेमुळे आम्हाला ही अमूल्य आणि चैतन्यमय संतसेवेची संधी मिळाली. आमच्याकडून ही सेवा, साधना करवून घेतली. याविषयी आपल्या, तसेच पू. गाडगीळकाका आणि पू. गाडगीळकाकू यांच्या चरणी अनन्यभावे कोटी कोटी कृतज्ञ आहे.
– कु. माधवी पोतदार, रामनाथी आश्रम, गोवा. (४.५.२०१६)
१७. ‘गुरुकार्यातील वेळ वाचावा’, यासाठी प्रयत्नरत असणे
‘आम्ही करणार असलेला प्रवास ६-७ किंवा त्यांहूनही अधिक घंट्यांचा असेल, तर वेळ वाचावा; म्हणून श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळकाकू जेवणासाठी गाडी न थांबवता चालू गाडीत जेवतात. खरेतर त्यांना झाडाखाली बसून जेवायला आवडते; पण गुरुकार्यातील वेळ वाचावा; म्हणून त्या सतत प्रयत्नरत असतात.
१८. ‘स्वतःमुळे इतरांचा वेळ
वाया जाऊ नये’, याची काळजी घेणे
कधी सकाळी थकव्यामुळे श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळकाकू यांना उठायला विलंब झाला असेल आणि आम्हा सर्वांचा अल्पाहार झाला असेल अन् निघण्याची वेळ झाली असेल, तर त्या आम्हाला सांगतात, ‘‘माझा अल्पाहार समवेत घ्या. मी गाडीत बसून अल्पाहार करीन.’’ या वेळी ‘माझ्यामुळे बाकीच्या ४ साधकांचा वेळ वाया जाऊ नये’, असा त्यांचा विचार असतो.
१९. विश्रामालयातही (हॉटेलमध्येही) आश्रमाप्रमाणे रहाणे आणि साधकांनाही तसे शिकवणे
अ. विश्रामालयात रहायला जाण्याआधी त्या विश्रामालयाची स्पंदने पाहून ‘आत जायचे कि नाही ?’, ते सांगणे
सप्तर्षी जीवनाडीपट्टीत सांगितल्याप्रमाणे आम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी देवदर्शनाला जावे लागते. काही ठिकाणी रहाण्यासाठी साधकांचे घर नसते. तेव्हा आम्हाला विश्रामालयात (हॉटेलमध्ये) मुक्काम करावा लागतो. श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळकाकू विश्रामालयात रहायला जाण्याआधी त्या विश्रामालयाची स्पंदने पाहून ‘आत जायचे कि नाही ?’, ते सांगतात.
आ. विश्रामालयात काम करणार्यांशीही प्रेमाने बोलणे आणि त्यांना साधना सांगणे
श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळकाकू विश्रामालयात रहात असतांना तेथे कामाला असणार्या लोकांशीही पुष्कळ प्रेमाने बोलतात आणि ‘तुमचे जेवण, अल्पाहार झाला का ?’, अशी त्यांची विचारपूस करतात. ‘तुम्ही खोली किती छान आवरून ठेवता !’, असे म्हणून त्या त्यांचे कौतुकही करतात. त्या त्यांच्या वैयक्तिक जीवनातील अडचणी समजून घेऊन त्यांना साधना सांगतात. ‘सर्वांनी आहे त्या ठिकाणी राहून साधना करावी’, असे त्यांना वाटते.
इ. आश्रमाप्रमाणेच विश्रामालयातही ‘वीज, पाणी, मनुष्यबळ
इत्यादींचा अनावश्यक वापर होऊ नये’, याची काळजी घेणे
श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळकाकू विश्रामालयातील अनावश्यक चालू असलेले दिवे बंद करतात. त्या म्हणतात, ‘‘राष्ट्राची संपत्ती वाया जाते.’’ ‘इतका बारकाईने विचार कसा करायचा ?’, ते त्या मला शिकवतात. त्या म्हणतात, ‘‘आपण साधना करत आहोत, तर आपल्याला आश्रम आणि विश्रामालय एकसमान वाटायला हवेत. जेव्हा असे वाटते आणि तशी कृती होते, त्या वेळी आपली आपोआप आध्यात्मिक प्रगती होते.’’
ई. विश्रामालय सोडण्याच्या वेळी साधकांना खोली व्यवस्थित
आवरून ठेवायला सांगणे आणि वास्तूप्रती कृतज्ञता व्यक्त करणे
विश्रामालय सोडण्याच्या वेळी श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळकाकू आम्हाला सांगतात, ‘‘आपण विश्रामालयात आल्यावर ही खोली जशी नीटनेटकी होती, तशी ती आवरून ठेवून जायला पाहिजे. खोलीतील ‘रिमोट’ आणि इतर साहित्य ‘कर्मचार्यांना दिसेल’, असे ठेवायला पाहिजे, म्हणजे साहित्य शोधण्यात त्यांचा वेळ जाणार नाही.’’ (‘रिमोट’ म्हणजे विद्युत् उपकरणे काही अंतरावरून चालू आणि बंद करण्याचे साधन) श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळकाकू स्वतः तशी कृती करतात. त्या खोलीतून निघतांना वास्तूप्रती कृतज्ञता व्यक्त करतात.
२०. साधकांच्या घरी गेल्यावर स्वतःचे वेगळेपण
न जपता सहजतेने वागून गुरुदेवांच्या शिकवणीचे आज्ञापालन करणे
‘श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ घरी येणार’, असे कळवल्यावर साधकांना पुष्कळ आनंद होतो. तो मी शब्दांत सांगू शकत नाही. साधकांच्या घरी गेल्यावर श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळकाकू त्या घरातील लहान-मोठ्या, अशा सर्वांशी पुष्कळ सहजपणे आणि प्रेमाने बोलतात अन् वागतात. त्या त्यांचे वेगळेपण कुठेच दाखवत नाहीत. ‘बाहेरचे संत त्यांचे वेगळेपण किती दाखवतात !’, हे आपण पहातो. श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळकाकू साधकांना सांगतात, ‘‘तुम्ही जो स्वयंपाक केला असेल, तोच मी जेवणार आहे. माझ्यासाठी वेगळे काही करायला नको.’’ साधकांच्या घरी जे बनवले असेल, तेच त्या जेवतात. त्या म्हणतात, ‘‘पुढे आपत्काळात जे मिळेल, ते खावे लागेल. त्यामुळे आतापासून सिद्धता करावी लागेल.’’
यावरून ‘आपले गुरुदेव किती महान आहेत !’, याची कल्पना येते. ‘श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळकाकू गुरुदेवांच्या शिकवणीचे आज्ञापालन करतात’, हेही मला शिकायला मिळाले.