निस्सीम सेवेने भगवान दत्तात्रयांचे दर्शन झालेले संत एकनाथ महाराज !

Eknthmrj
संत एकनाथ महाराज

१. जन्म

श्री एकनाथ महाराज यांचा जन्म पैठण येथे झाला. संत एकनाथ महाराज यांचा जन्म संत भानुदास यांच्या कुळात देशस्थ ऋग्वेदी आश्‍वलायन ब्राह्मण कुटुंबात झाला. जन्मकाळी त्यांचे मूळ नक्षत्र होते. त्यांच्या जन्मानंतर थोड्याच दिवसांत त्यांच्या माता-पित्यांचे निधन झाल्याने त्यांचे संगोपन त्यांच्या आजी-आजोबांनी केले. आजी त्यांना ‘एक्या’ या नावाने संबोधत असे. जन्मतःच त्यांना श्रद्धा आणि मेधा (कुशाग्र बुद्धीमत्ता) प्राप्त झाल्या होत्या.

 

२. लहानपणापासून देवाची आवड असणे

नाथांना बालपणापासूनच भगवद्भक्तीचे वेड होते. लहानपणापासून त्यांना ‘स्नान-संध्या, हरिभजन, पुराणश्रवण आणि देवीदेवतांची पूजा करणे’, यांची आवड होती. नाथांना त्यांच्या मुंजीनंतर ‘वैश्वदेव, रुद्र आणि पवमान सूक्त’, हे सर्व मुखोद्गत झाले.

 

३. गुरुभेट आणि अनुग्रह

त्यांचे चरित्र बालपणापासूनच असामान्य कोटीतील होते. ‘संत एकनाथ महाराजांनी लहानपणी एका कीर्तनात गुरुचरित्राचे महत्त्व ऐकले. त्यांच्या मनात ते रुजले आणि त्यांनी ‘गुरु कसा भेटणार ?’, असा प्रश्‍न विचारला. कीर्तनकारांना त्या प्रश्‍नाचे उत्तर देता न आल्याने त्यांनी ‘गोदावरीमातेलाच हा प्रश्‍न विचार’, असे सांंगितले. त्याप्रमाणे दुसर्‍या दिवशी एकनाथ महाराजांनी गंगारूपी आईला तळमळीने, कळवळून आणि रडकुंडीला येऊन विचारले. तेव्हा रात्री ते शिवालयात (शिवमंदिरात) हरीचे गुणगान गात असतांना देवगडावरील जनार्दनस्वामी यांच्याकडे जाण्याची आकाशवाणी झाली. तेव्हा नाथ घराची आठवण न ठेवता जनार्दनस्वामींच्या दर्शनासाठी गेले आणि त्यांना सद्गुरु मानून त्यांची मनोभावे सेवा केली. नाथांची सेवा पाहून स्वामींनी त्यांचा शिष्य म्हणून स्वीकार केला. स्वामी प्रत्येक गुरुवारी किल्ल्याच्या शिखरातील गुहेत बसून दत्ताचे ध्यान करत असत. ‘मनोभावे गुरुसेवा करणे’, हीच परमेश्वराची सेवा मानून ६ वर्षे सेवा केल्यानंतर नाथांना अनुग्रह मिळाला. नाथांनी केलेल्या निस्सीम सेवेने ते दत्तात्रय दर्शनास पात्र झाले. दत्तात्रयाचे दर्शन घडल्याने नाथांना परमानंद झाला. स्वामींनी नाथांना शुलिभंजन पर्वतावर प्रथम दत्तदर्शन घडविले. नाथ पुढे तीर्थयात्रा करत पैठण येथे पोचले.

 

४. साधना

ते शूलभंजन पर्वतावर कर्तव्याचा बोध होण्यासाठी, तसेच श्रीकृष्णाची उपासना आणि अनुष्ठान करण्यासाठी गेले. त्यांना काही दिवसांतच भगवान श्रीकृष्णाचे दर्शन घडले. ते तीर्थयात्रा करत असतांना त्यांना आळंदी येथे संत ज्ञानेश्वरांचेही दर्शन घडले.

 

५. समाधी

ते तीर्थयात्रा करून पैठणला परतले. त्यानंतर त्यांनी सर्व आयुष्य परोपकार करण्यात व्यतीत केले. त्यांनी ‘एकनाथी भागवत, भावार्थ रामायण, चतुःश्लोकी भागवत’ इत्यादी अनेक ग्रंथांचे लेखन केले. ते श्रीकृष्णस्वरूपाचे ध्यान करत परमानंदात निमग्न होऊन पैठण येथेच समाधीस्त झाले.

अशा संतश्रेष्ठ एकनाथ महाराज यांना माझे शतशः वंदन !

– श्री. गीतेश शिंदे

(साभार : मासिक ‘आध्यात्मिक ॐ चैतन्य’, मे २००३)

६. निरहंकारपणाने गुरुकार्य करणारे संत एकनाथ महाराज

अ. जनजागृतीसाठी कुलस्वामिनी जगदंबेला प्रार्थना

‘त्या काळी देवगिरी गड निजामशाही राजवटीत होता. संत एकनाथांचे वास्तव्य तेथेच असल्यामुळे या राजवटीचे अत्याचारी स्वरूप जवळून पहाता येत होते. महाराष्ट्र परकीय सत्तेच्या हाती हतबल होऊन राहिला होता. लोक होईल तो अत्याचार मुकाट्याने सहन करत दिवस ढकलत होते. महाराष्ट्राची अवस्था ‘लोक मेले नाहीत; म्हणून जिवंत आहेत’, अशी होती. संत एकनाथांना ही भयाण परिस्थिती पालटण्यासाठी ‘समाज जागृती चळवळ उभी करावी’, असे वाटू लागले. त्यांनी महाराष्ट्राच्या कुलस्वामिनी जगदंबेला ‘बया दार उघड’, असे आवाहन करून या जनजागरणाच्या गोंधळात सहभागी होण्याची प्रार्थना केली.’ (विश्‍वपंढरी, वर्ष १ ले, अंक २ रा, पृष्ठ १३)

आ. संत एकनाथ महाराजांनी केलेला क्षात्रधर्म !

एकदा जनार्दनस्वामी समाधीत निमग्न असतांना देवगडावर परचक्र आल्याची वार्ता आली. संत एकनाथ महाराजांनी जनार्दनस्वामींचा लढाईच्या वेळचा पोषाख अंगावर चढवला आणि शस्त्रे घेऊन कमरेला तलवार लटकवून ते अश्‍वारूढ होऊन बाहेर पडले. स्वामींचा समाधीभंग होऊ न देता ४ घटका घनघोर युद्ध केले. शत्रूसैन्य नामोहरम होऊन पळाले. जनार्दन वेशधारी संत एकनाथांच्या शौर्याची सर्वांनी स्तुती केली. गुरु-शिष्यांचा अंतर्बाह्य पूर्ण अभेद असतो, हे कृतीने संत एकनाथांनी दाखवले. गुरूंचा पोषाख जेथल्या तेथे ठेवून संत एकनाथ महाराज कामाला लागले. जनार्दन महाराजांना एका शब्दानेही काही सांगितले नाही. स्वामींना ही गोष्ट कळल्यावर या थोर शिष्याची धन्यता वाटली. वेगळेपणाचा अभिमान लोपवून निरहंकारपणाने गुरुकार्य करणारे असे संत एकनाथ महाराजांसारखे शिष्य दुर्मिळ आहेत. (एकनाथ महाराज चरित्र, लक्ष्मण रामचंद्र पांगारकर, रम्यकथा प्रकाशन, पुणे २, पृष्ठ ६२)

इ. लोकजागृतीसाठी केलेल्या रचना

नाथांना मायबोलीचा एवढा अभिमान की, त्यांनी पंडितांना बाणेदारपणे विचारले, ‘संस्कृतभाषा देवे केली । मराठी काय चोरापासून झाली ?’ लोकजागृतीसाठी त्यांनी भारूडे, गोंधळ, जोगवा, गवळणी, कोल्हाटी यांच्या रचना केल्या. तसेच आदर्श रामराज्याची संकल्पना स्पष्ट करण्यासाठी भावार्थ रामायणाची रचना केली.

संदर्भ : भारतीय संस्कृतिकोश, खंड ६, पृष्ठ ५०६

 

७. संत एकनाथ महाराजांनी वडिलांच्या
श्राद्धाचे जेवण ब्राह्मणांच्या आधी हीन जातीच्या व्यक्तींना जेवायला
दिल्यामुळे त्यांना महान पुण्य मिळणे आणि त्यामुळे कुष्ठरोगी बरा होणे

संत एकनाथ महाराज पैठणला रहात होते. एकदा त्यांच्या घरी त्यांच्या वडिलांचे श्राद्ध होते. श्राद्धाच्या भोजनासाठी त्यांनी गावातील ब्राह्मणांना भोजनाचे आमंत्रण दिले. त्यांच्या घरी श्राद्धासाठी स्वयंपाक करणे चालू होते. तळणाचा सुगंध त्यांच्या घराभोवती पसरला होता. रस्त्याने एक हीन जातीचा मनुष्य आपल्या लहान मुलांना घेऊन जात होता. त्या लहान मुलांना ते पक्वान्न खावेसे वाटले; म्हणून त्यांनी वडिलांजवळ ते पक्वान्न खाण्याचा हट्ट धरला. मुलांच्या वडिलांनी त्यांना सांगितले “आपण गरीब आहोत. हीन जातीचे आहोत. त्यामुळे असे पक्वान्न खाण्यास मिळणे कठीण आहे.”

संत एकनाथांनी त्या गृहस्थाचे म्हणणे ऐकले. संत एकनाथांना त्यांची दया आली. त्यांनी त्या गृहस्थाला आणि त्याच्या मुलांना घरात बोलाविले अन् त्यांना जेवायला बसविले. त्यांना पोटभर पक्वान्न खाऊ घातले. नंतर स्वयंपाकगृह आणि स्वयंपाकाची भांडी गोदावरीच्या पवित्र पाण्याने धुतली आणि पुन्हा दुसरा स्वयंपाक केला.

संत एकनाथांनी आपल्या भोजनापूर्वी हीन जातीच्या लोकांना भोजन दिले, ही गोष्ट ब्राह्माणांना समजली. त्यांना संत एकनाथांचा राग आला. एकनाथ त्यांना भोजनासाठी बोलावण्यास गेले; पण त्यांनी भोजन करण्यास नकार दिला आणि संत एकनाथांना जाती बाहेर टाकले. ब्राह्मण म्हणाले, “तुम्ही हीन जातीच्या लोकांना ब्राह्मणांच्या आधी भोजन दिले, हे पाप कृत्य केले आहे. या पापाविषयी तुम्हाला प्रायश्‍चित घ्यावे लागेल.”

संत एकनाथ प्रायश्‍चित घेण्यास सिद्ध झाले. ते गोदावरी नदीत उभे राहिले. ब्राह्मणांनी मंत्रोच्चार प्रारंभ केला. इतक्यात त्र्यंबकेश्‍वराहून एक ब्राह्मण आला. त्याने संत एकनाथांविषयी चौकशी केली. त्याला कुष्ठरोग झाला होता. त्याने पैठणच्या ब्राह्मणांना सांगितले, “मला कुष्ठरोग झाला आहे. मी त्र्यंबकेश्‍वर येथे कठोर अनुष्ठान केले. मला महादेव प्रसन्न झाले. त्यांनी मला आदेश दिला, ‘तू पैठणला जा. संत एकनाथांनी पित्याच्या श्राद्धाचे भोजन हीन जातीच्या लोकांना दिले. त्यामुळे त्यांना महान पुण्य प्राप्त झाले आहे. जर ते त्यातील थोडे पुण्य तुला देतील, तर तुझे कुष्ठ नष्ट होईल.’

त्या ब्राह्मणाचे म्हणणे ऐकून संत एकनाथांनी हाती पाणी घेतले आणि आपल्या पुण्यातील थोडे पुण्य ब्राह्मणाला देण्यासाठी ते पाणी त्या ब्राह्मणाच्या अंगावर टाकले. तेव्हा चमत्कार झाला. ब्राह्मणाचा कुष्ठरोग त्वरीत नष्ट झाला. पैठणातील ब्राह्मण लोकांनी हे पाहिले आणि ते एकनाथांना शरण गेले. त्यांनी एकनाथांची क्षमा मागितली आणि ते एकनाथांच्या घरी भोजन करण्यास गेले.’

– श्रीराम विश्‍वनाथ गुजर (मासिक शक्तीब्रह्माश्रम समाचार,(एप्रिल २०११)