संभाजीनगर येथील संत एकनाथ महाराजांचे १२ वे वंशज प.पू. गणेश गोसावी महाराज यांचा रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला चरणस्पर्श !

1
प.पू. गणेश गोसावी महाराज यांना ओवाळतांना सौ. कल्याणी शहाणे आणि वेदमूर्ती केतन शहाणेगुरुजी, त्यांच्या मागे (उजवीकडे) पू. (सौ.) बिंदा सिंगबाळ, पू. (सौ.) अंजली गाडगीळ आणि अन्य साधक

 सनातन आश्रम, रामनाथी : येथे संभाजीनगर येथील संत एकनाथांचे १२ वे वंशज प.पू. गणेश गोसावी महाराज (वय ८२ वर्षे) यांचा २६ जुलैला रामनाथी, गोवा येथील सनातन आश्रमाला चरणस्पर्श झाला. साक्षात् महर्षींनी भूलोकीचा वैकुंठ अशा शब्दांत गौरवलेल्या रामनाथी आश्रमात प.पू. गणेश गोसावी महाराज यांच्या रूपाने संत एकनाथ महाराजांचे चैतन्यच अवतरले. या वेळी सनातनच्या संत पू. (सौ.) बिंदा सिंगबाळ, पू. (सौ.) अंजली गाडगीळ आणि पू. डॉ. मुकुल गाडगीळ हे उपस्थित होते. मंगलमय शंखनादासह वेदमंत्रांच्या घोषात प.पू. गणेश गोसावी महाराज यांची पाद्यपूजा करण्यात आली. सनातन साधक-पुरोहित पाठशाळेचे अध्यापक वेदमूर्ती केतन शहाणेगुरुजी आणि त्यांची धर्मपत्नी सौ. कल्याणी शहाणे यांनी त्यांची पाद्यपूजा केली. वेदमूर्ती केतन शहाणेगुरुजी यांनी पुष्पहार घालून त्यांचा सन्मान केला, तर सौ. कल्याणी शहाणे यांनी औक्षण केले. प.पू. गणेश गोसावी महाराज यांच्या स्वागतासाठी ठेवलेल्या फलकाच्या माध्यमातून आश्रमातील सर्व साधकांनी त्यांच्या चरणी शब्दरूपी शरणागत पुष्पांजली अर्पण केली. या वेळी उपस्थित सर्व संत आणि साधक यांचा भाव जागृत झाला.

 

वैशिष्ट्यपूर्ण

१. या वेळी उपस्थित असलेल्या सनातनच्या संतांनी प.पू. गणेश गोसावी महाराज यांच्या चरणांवर डोके ठेवून नमस्कार केला आणि हिंदु राष्ट्राच्या (सनातन धर्म राज्याच्या) स्थापनेसाठी त्यांचे आशीर्वाद घेतले.

२. या वेळी प.पू. गणेश गोसावी महाराज हे अध्यात्मप्रसारासाठी सर्वत्र भ्रमण करणार्‍या पू. (सौ.) अंजली गाडगीळ यांना कौतुकाने, फिरण्याच्या बाबतीत तुम्ही प्रसिद्ध आहात, असे म्हणाले.

 

प.पू. गणेश गोसावी महाराज रहात असलेल्या
पैठण येथील वाड्याची आध्यात्मिक वैशिष्ट्ये !

प.पू. गणेश गोसावी महाराज रहात असलेल्या पैठण येथील वाड्यात संत एकनाथांच्या भक्तीमुळे साक्षात् श्रीकृष्ण श्रीखंड्याच्या रूपात प्रत्यक्ष राबला. तसेच या वाड्याबाहेर ३६ वर्षे दत्तगुरूंनी पहारेकरी म्हणून सेवा केली. अशा आध्यात्मिकदृष्ट्या वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या वाड्यातील चैतन्य अनुभवण्याचे परमभाग्य रामनाथी येथील सनातन आश्रमातील साधकांना लाभले.

 

अनुभूती

प.पू. गोसावी महाराज यांचे आश्रमात आगमन झाल्यानंतर त्यांच्या खोलीत मला पंढरपूरच्या श्री विठ्ठल मंदिरात येतो, त्याप्रमाणे तुळस आणि बुक्का यांचा मिश्र सुगंध आला. तो सुगंध त्यांच्या खोलीबाहेरही जाणवत होता.  – श्री. केदार नाईक, रामनाथी, गोवा.

 

हा सर्व परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेचा आविष्कार होय !

आश्रमातील कार्य पाहून प.पू. गोसावी महाराज यांनी काढलेले उद्गार 

2
आश्रमातील ध्यानमंदिरात श्री भवानीमातेच्या मूर्तीचे दर्शन घेतांना सर्वांत डावीकडे प.पू. गोसावी महाराज अन् सर्वांत उजवीकडे डॉ. (सौ.) नंदिनी सामंत

प.पू. गणेश गोसावी महाराज यांनी सनातनचा आश्रम अत्यंत उत्साहाने पाहिला. या वेळी त्यांचे कुटुंबीयही उपस्थित होते. सनातनच्या साधिका डॉ. (सौ.) नंदिनी सामंत यांनी आश्रमात चालू असलेल्या राष्ट्र आणि धर्म यांविषयीच्या कार्याची माहिती करून दिली.

सनातन संस्था आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी प्रशंसोद्गार काढतांना प.पू. गोसावी महाराज म्हणाले, प.पू. डॉक्टर म्हणजे अवतारी पुरुषच आहेत. (एका नाडीवाचनात महर्षींनी परात्पर गुरु डॉ. आठवले हे विष्णूचा अवतार आहेत, असे म्हटले आहे. – संपादक, दैनिक सनातन प्रभात) या सर्वांतून त्यांचे दिव्यत्व सिद्ध होते. हा सर्व त्यांच्या कृपेचा आविष्कार आहे. आश्रम पहातांना ते सारखे म्हणत होते, मी दमलेलो नाही, जेवढे आहे, तेवढे सगळे दाखवा. सूक्ष्म-जगताविषयी सनातनने केलेल्या संशोधनाचे प्रदर्शनही त्यांनी पुष्कळ जिज्ञासेने पाहिले.

 

आता वय झाले, नाहीतर मीही झोकून देऊन कार्य केले असते !
– प.पू. गणेश गोसावी महाराज

 प.पू. गणेश गोसावी महाराज यांचा रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात सन्मान

3
प.पू. गणेश गोसावी महाराज (उजवीकडे) यांचा सन्मान करतांना पू. डॉ. मुकुल गाडगीळ

धन्य आज दिन संतदर्शनाचा । अनंत जन्मीचा शीण गेला ॥ १ ॥
मज वाटे त्यांसी आलिंगन द्यावे । कदा न सोडावे चरण त्यांचे ॥ २ ॥
एका जनार्दनी घडो त्यांचा संग । न व्हावा वियोग जन्मो जन्मी ॥ ३ ॥

हा भावपूर्ण अभंग म्हणून प.पू. गणेश गोसावी महाराज यांनी परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्याशी झालेल्या भेटीची भावना त्यांच्या ओघवत्या वाणीत व्यक्त केली. त्यानंतर त्यांनी सनातनशी माझा उशिरा परिचय झाला. आज माझे वयही झाले आहे. नाही तर मीही झोकून देऊन कार्य केले असते, अशा शब्दांत धर्मकार्याविषयी तळमळ प्रकट केली.

प.पू. गोसावी महाराज यांनी २६ जुलै या दिवशी त्यांच्या काही आप्तस्वकियांसह रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिली. या वेळी परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्याशी चर्चा करतांना ते पुढे म्हणाले, सनातनचे कार्य अनेक वर्षांपासून चालू आहे. तीव्र तळमळीने कार्य करणारी अनेक माणसे तुम्ही निर्माण केली आहेत. तुमचे कार्य लवकरात लवकर पूर्णत्वास जाण्यासाठी आशीर्वाद द्यावा, अशी प्रार्थना मी संत एकनाथ महाराजांना केली आहे.

तुमच्या भेटीमुळे मला माझ्या गुरूंची स्थिती अनुभवायला मिळाली, असे या वेळी परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले प.पू. गोसावी महाराज यांना म्हणाले.

 

क्षणचित्रे

१. संत एकनाथ महाराज यांच्या आज्ञेने मी येथे (रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात) आलो आहे. असे प.पू. गणेश गोसावी महाराज म्हणाले.

२. प.पू. गणेश गोसावी महाराजांनी संत एकनाथ महाराज आणि त्यांचे गुरु जनार्दन स्वामी यांच्या काळातील प्रसंग वर्णन केले. त्यामुळे त्या काळच्या पैठणचे चित्र डोळ्यांसमोर उभे राहिले.

३. महाराजांनी त्यांच्या स्वहस्ते परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचा शाल, सार्थ श्री एकनाथ भागवत आणि श्री केशवकृत ओवीबद्ध श्री एकनाथ चरित्र देऊन सन्मान केला.

४. प.पू. महाराज यांनी सनातनचे पू. डॉ. मुकुल गाडगीळ आणि पू. (सौ.) अंजली गाडगीळ यांचाही सन्मान केला.

 

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले भगवंताचे अवतार आहेत !
– सौ. रोहिणी रमेश देशपांडे

आज भ्रष्टाचार, अत्याचार खूप वाढला आहे. त्यामुळे हे कुठेतरी थांबले पाहिजे आणि त्यासाठी भगवंताने अवतार घ्यावा, असे मला मनोमन वाटत होते. मी आश्रमात चालणारे कार्य पाहिले, तेव्हा मला तो अवतार परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यात दिसला, असे प.पू. महाराजांसह आलेल्या सौ. रोहिणी रमेश देशपांडे यांनी सांगितले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात