संतपदप्राप्तीनंतर अवघ्या तीनच
वर्षांत ८१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून सद्गुरुपदी आरुढ !

सनातन आश्रम, रामनाथी (गोवा) : भगवंताची दोन सगुण रूपे ! एक अविरत धर्मप्रसार करतात, तर एक आश्रमात राहून साधकांना घडवतात ! एक भारतभर भ्रमण करून संतांना जोडतात, तर एक स्वतःच्या मार्गदर्शनाद्वारे साक्षात् संतच घडवतात ! उत्साह, आनंद, पारदर्शकता, अहोरात्र सेवारत रहाण्याची तळमळ, श्रीगुरूंचे कार्य विश्वभर नेण्याची धडपड, संतद्वयी आहेत अजोड ! त्यांच्या केवळ स्मरणानेही निराशा दूर पळते, श्रवणाने भावजागृती होते आणि केवळ अस्तित्वानेही कार्य होते. साधक, हिंदुत्वनिष्ठ अन् समाज यांनाही त्यांचा संतसंग अनुभवावासा वाटतो. श्रीगुरु अन् साक्षात् महर्षीही ज्यांचे अखंड कौतुक करतात. भगवान श्रीविष्णूच्या मुकुटातील सोनेरी रत्न असलेल्या सनातनच्या संतद्वयी पू. (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि पू. (सौ.) अंजली गाडगीळ २४ जुलै २०१६ ला ८१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून सद्गुरुपदी विराजमान झाल्या. साक्षात् भूवैकुंठ म्हणून महर्षींनी गौरवलेल्या, पू. (सौ.) बिंदारूपी वृंदाने अथक परिश्रम घेऊन ज्याला वृंदावनच बनवले आहे. अशा रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात एका दैवी सोहळ्यात ही घोषणा झाली अन् साधकांच्या भावाश्रूंचा बांध फुटला. सनईच्या सुरात अन् साधकांच्या भावसागरात हा अद्वितीय सोहळा संपन्न झाला. दोन देवीच असलेल्या त्या संतद्वयीच्या उपस्थितीमुळे साधकांना हा अनमोल सोहळा पहायला मिळाला अन् खरोखरच डोळ्यांचे पारणे फिटल्याची अनुभूती आली.
पू. (सौ.) बिंदाताई आणि पू. (सौ.) गाडगीळकाकू या संतद्वयी यंदाच्या गुरुपौर्णिमेला सद्गुरुपदी विराजमान होतील, असे अनेक साधकांना वाटत होते. प्रत्यक्ष गुरुपौर्णिमेच्या दिनी ती घोषणा झाली नाही, तेव्हा काहीतरी राहून गेल्याची चूटपूट लागली होती. ही आनंदवार्ता मिळाल्यानंतर वाटले, १९ जुलै या दिवशी आरंभ झालेली गुरुपौर्णिमा आज संपन्न झाली. पू. (सौ.) अंजली गाडगीळ अन् पू. (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी एकमेकांचा सन्मान केला. साधकांनी हा अमूल्य क्षण मनमंदिरात साठवून ठेवला.
पू. (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि
पू. (सौ.) अंजली गाडगीळ यांची अनोखी आध्यात्मिक मैत्री !
एकाच दिवशी सद्गुरुपद प्राप्त केलेल्या या दोघींचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी एकाच वर्षात, म्हणजे वर्ष २०१० मध्ये ६० प्रतिशतचा टप्पा पार केला. त्यानंतर अवघ्या ३ च वर्षांत, म्हणजे वर्ष २०१३ मध्ये दोघीही संतपदी आरूढ झाल्या आणि २०१६ मध्ये, म्हणजे पुढील ३ वर्षांत त्या एकाच दिवशी सद्गुरुपदावरही विराजमान झाल्या. दोघींची प्रकृती, तसेच सेवा भिन्न भिन्न आहेत, तरी एकसमान गतीने आध्यात्मिक उन्नतीची शिखरे पादाक्रांत करणार्या या दोघींची आध्यात्मिक मैत्री मात्र विलक्षणच म्हणावी लागेल. या आध्यात्मिक मैत्रीने सर्वांसमोरच एक आदर्श निर्माण केला आहे. त्यांची ही मैत्री अशीच अखंड टिकून राहो आणि पुढील उन्नतीही अशीच शीघ्र गतीने होवो, अशी भगवान श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘सापडलो एकामेका; जन्मोजन्मी नोहे सुटका !’
अशा भावबंधनात बांधल्या गेलेल्या
पू. (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि पू. (सौ.) अंजली गाडगीळ !
पू. (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि पू. (सौ.) अंजली गाडगीळ यांचे कार्य एकमेकांना पूरक आहे. पू. (सौ.) बिंदा सिंगबाळ साधकांच्या साधनेचे दायित्व सांभाळतात, तर पू. (सौ.) अंजली गाडगीळ सनातनचे सूक्ष्मातील कार्य उदा. संतांचे आशीर्वाद घेणे, साधकांच्या रक्षणासाठी महर्षींच्या आज्ञेने यज्ञयाग करणे, देवदर्शन करणे आदी सेवा करतात. त्या सतत एकमेकांच्या सतत संपर्कात राहून श्रीगुरूंना अपेक्षित अशी सेवा करण्याचा प्रयत्न करतात. श्रीविष्णूच्या अवतारी कार्याच्या संदर्भात होणार्या नाडीवाचनांत सातत्याने उल्लेख येणार्या अन् स्वतःतील समर्पित वृत्तीने महर्षींची कृपा अन् विश्वास संपादन केलेल्या उत्तरापुत्री पू. (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि कार्तिकपुत्री पू. (सौ.) अंजली गाडगीळ या एकमेकींना पूरक आहेत. यासंदर्भात बोलतांना पू. (सौ.) बिंदाताई म्हणाल्या, आम्ही दोघीही आतून एकमेकांशी जोडलेल्या आहोत.
पू. (सौ.) गाडगीळकाकू आश्रमात नसल्या, तरी त्या समवेत आहेत, असेच वाटते. आम्ही जगाच्या पाठीवर कुठेही असलो, तरी एकमेकांशी जोडलेल्या राहू. पू. (सौ.) गाडगीळकाकू यांनी अत्यंत प्रेमाने सांगितले, त्यांचा मला नेहमी आधार वाटतो. बाहेर कुठेही असल्या, तरी एक भ्रमणभाष केला, तरी त्या सेवा पूर्ण करतात. दोघीही एकमेकींचे गुणवर्णन करतांना देहभान विसरून जातात. महर्षीही त्यांच्याविषयी म्हणतात, या दोघी देवी दोन नाहीत, तर एकच आहेत. दिसायला दोन वेगवेगळ्या असल्या, तरी त्या आतून एकच आहेत.
प्रतिदिन सकाळी उठल्यानंतर पू. (सौ.) काकू सर्वांत प्रथम पू. (सौ.) बिंदाताई यांना नमस्कार करतात; कारण ईश्वराला अपेक्षित अशी प्रत्येक गोष्ट पू. बिंदाताई करतात.
प.पू. भक्तराज महाराज यांच्या भजनातील एका पंक्तीप्रमाणे सापडलो एकामेका, जन्मोजन्मी नोहे सुटका, अशा भावबंधनात बांधल्या गेलेल्या या संतद्वयीच्या चरणी सनातनच्या प्रत्येक साधकाकडून अनंत कोटी कृतज्ञता !
समर्पित भावाने समष्टी साधना करून
विहंगम गतीने प्रगती करणार्या सनातनच्या संत
पू. (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि पू. (सौ.) अंजली गाडगीळ सद्गुरुपदी विराजमान !


सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांची मार्गदर्शनपर वाक्ये
अ. दोन चांगल्या गोष्टींमधील अधिक चांगली गोष्ट कोणती ? हे पाहून निर्णय घ्यावा.
आ. ज्ञान रुक्ष असते. भक्तीची भाषा रडवते (भाव निर्माण करते); म्हणून चांगली असते.
इ. स्वार्थ संपला की, परमार्थ चालू होतो.
ई. आनंद घेणे ही साधना.
उ. तळमळीने प्रार्थना करून पहिल्याच प्रयत्नात ध्येय साध्य करावे. पुनःपुन्हा प्रार्थना आणि प्रयत्न करायला लागू नयेत.
ऊ. यांत्रिकपणा काढून टाकायला पाहिजे, आनंदानेच सर्व होते.
ए. पारदर्शकतेमुळे आपण शिकू शकतो.
ऐ. एखादे चित्र दाखवायचे असल्यास ते वरपासून खालपर्यंत सलग दाखवावे. त्याचे छोटे छोटे तुकडे दाखवल्यास त्याची भव्यता लक्षात येत नाही आणि तसे दाखवण्यात सात्त्विकताही अधिक असते.
ओ. व्यापकता आल्याविना प्रगती नाही !
औ. सेवा परिपूर्ण केल्यावरच जलद प्रगती होणार !
अं. संघर्षाविना फळ नाही. संघर्ष करूनच फळ खेचून आणावे लागते.
क. कार्यपद्धतींचा गाभा ओळखावा.
ख. तत्त्वाशी एकनिष्ठ रहाणे महत्त्वाचे !
ग. चुका विलंबाने सांगितल्यास तेवढ्या काळापर्यंत पाप रहाते; म्हणून त्या लगेच सांगाव्यात.
– सर्वश्री. विनित देसाई, हृषिकेश नाईक, चेतन एम्.एन्., आणि दिवाकर आगावणे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.