ढगांतून जमिनीवर बरसती धुंद पाऊसधारा ।
भिजे चिंब आसमंत सारा ।
व्याकुळ मनांना हर्षिल टपटप थेंबांचं येणं ।
भूमाता गाईल मग पावसाचं गाणं ॥
देवाने निर्माण केलेल्या या सृष्टीमध्ये ऋतूंना अनन्यसाधारण महत्त्व आहे. या ऋतूंपैकी वर्षाऋतू हा भूतलावरील सर्व प्राणीमात्रांना सुखावणारा असतो. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आनंद देणारा क्षण म्हणजे पहिला पाऊस ! पाऊस पडल्यामुळे जो आनंद आणि आल्हाद आपल्याला होतो, तो काही वेगळाच असतो; पण आपण याचा कधी विचार केला आहे का की, या पावसाकडे पाहून आपल्या मनाला एक वेगळा आनंद का मिळतो ? या संदर्भात लक्षात आलेली काही आध्यात्मिक कारणे पुढीलप्रमाणे आहेत.
१. पृथ्वी, आप आणि वायु या तत्त्वांच्या संयोगामुळे
पाऊस पडतांना त्यांच्या थेंबांकडे पाहून आनंद जाणवणे
पावसाचे थेंब भूमीवर पडतात, त्या वेळी पृथ्वीतत्त्वाचा आपतत्त्वाशी संयोग होतो. असे थेंब ज्या वेळी भूमीवर आदळून पुन्हा उसळतात, त्या वेळी उसळण्याच्या या प्रक्रियेमध्ये वायुतत्त्व कार्यरत होते. त्यामुळे पृथ्वी, आप आणि वायु तत्त्व कार्यरत असल्यामुळे हे दृश्य पहातांना मनाला आनंद मिळतो.
२. साचलेल्या पाण्यापेक्षा वहात्या पाण्याच्या प्रवाहाकडे पाहून चांगले वाटणे
पावसाचे पाणी थेंबांच्या स्वरूपात ढगातून भूमीवर पडते, त्या वेळी ते एका ठिकाणी साचून राहिल्यास आपल्याला तितकासा आनंद मिळत नाही. त्याऐवजी ते पाणी वहाते असल्यास आपल्याला अधिक आनंद मिळतो. वहाणारा पाण्याचा प्रवाह आपल्याला जीवनामध्ये कायम कार्यरत आणि प्रवाही रहाण्यास शिकवतो. सृष्टीतील जिवांच्या जीवनात आनंद निर्माण करून निसर्ग स्वतःच्या प्रत्यक्ष कृतीतून करुणा शिकवतो.
– कु. प्रियांका लोटलीकर, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय (१४.७.२०१६)