जोधपूर (राजस्थान) येथील गुरुपौर्णिमा महोत्सवात प्रकटले सनातनचे ६३ वे समष्टी संतरत्न !
जोधपूर, २० जुलै (वार्ता.) – गुरुपौर्णिमेच्या या शुभदिनी, कशी अर्पण करू मी कृतज्ञता । तुझ्यातच एकरूप करून घ्यावे, हीच प्रार्थना ।
गुरुपौर्णिमा, म्हणजे गुरूंच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस ! शिष्याने आपल्यासारखे व्हावे, हा गुरूंचा संकल्प तळमळीने साधना करून प्रत्यक्षात आणणार्या जोधपूर येथील सौ. सुशीला मोदी या
शुभदिनी संतपदी विराजमान झाल्या. माया आणि अध्यात्म यांचा सुरेख संगम साधून झपाट्याने आध्यात्मिक उन्नती करणार्या पू. (सौ.) सुशीला मोदी (वय ६५ वर्षे) यांना सनातनच्या ६३ व्या समष्टी संत म्हणून घोषित करण्यात आले. येथील लायन्स क्लब वेस्टच्या सभागृहात झालेल्या गुरुपौर्णिमा महोत्सवात हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी हे गुपित उघड केले आणि सर्वांचा आनंद द्विगुणित केला. या वेळी जयपूर येथील सनातन संस्थेच्या साधिका सौ. सीतादेवी नोगीया यांनी पुष्पहार अर्पण करून, तर पू. डॉ. पिंगळे यांनी भेटवस्तू देऊन पू. (सौ.) सुशीला मोदी यांचा सन्मान केला.
प.पू. डॉक्टरांच्या कृपेमुळेच हे शक्य झाले ! – पू. (सौ.) सुशीला मोदी
मला काही येत नाही. साधकांमुळेच हे सगळे झाले. मी काही करत नाही. सेवा करतांना प.पू. डॉक्टरच सर्व काही करत आहेत, असा भाव ठेवला. प.पू. डॉक्टरांनी जसे सुचवले, तसे मी करत गेले.
क्षणचित्रे
१. कार्यक्रमानंतर पू. (सौ.) सुशीला मोदी यांच्या आध्यात्मिक प्रगतीची वैशिष्ट्ये उलगडणारे एक चलचित्र सर्वांना दाखवण्यात आले.
२. या वेळी गुरूका शिष्यको सिखाना, या हिंदी ग्रंथाचे हिंदुत्ववादी अधिवक्ता मोतीसिंह राजपुरोहित यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
सौ. सुशीला मोदी संत होण्याच्या संदर्भात मिळालेली पूर्वसूचना
सौ. सुशीला मोदी यांना पहाताक्षणीच यांना संत म्हणून घोषित करणार, असे वाटणे : ४.७.२०१६ या दिवशी सोजत, राजस्थान येथील साधिका सौ. सुशीलाभाभी मोदी यांची रामनाथी आश्रमात भेट झाली. त्यांना पहाताक्षणीच या आता संत म्हणून घोषित होणार, असे मला वाटले. – आधुनिक वैद्य दुर्गेश सामंत, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१४.७.२०१६)
मायेतील कर्तव्यपूर्ती करता करता अध्यात्मातील संतपद गाठणार्या
राजस्थानच्या सुशीला मोदीभाभी संतपदी विराजमान !
जोधपूर, राजस्थान येथील सौ. सुशीला मोदी (६५ वर्षे) यांचे सारे कुटुंबच सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करते. त्यांनी मुलांवर उत्तम संस्कार केले असून कु. अनन्या, वेदिका आणि साक्षी या त्यांच्या नाती उच्च लोकांतून पृथ्वीवर जन्माला आल्या आहेत.
मोदीभाभींचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी तन, मन आणि धन यांचा, म्हणजेच सर्वस्वाचा त्याग केला आहे. त्यांच्यात साधकांप्रती अतीव प्रेमभाव असून घरी येणार्या साधकांची त्या आईच्या वात्सल्याने काळजी घेतात. त्यांचे घर म्हणजे जणूकाही सनातनचा आश्रमच !
या वयातही त्या अखंड सेवारत असतात. प्रत्येक सेवेचा परिपूर्णरित्या अभ्यास करून तत्परतेने ती पूर्ण करण्याची त्यांना तळमळ आहे. संपूर्ण भार भगवंतावर सोपवून कठीण प्रसंगातही स्थिर रहाणार्या भाभी अखंड भावावस्थेत असतात. मायेतील कर्तव्यपूर्ती करता करता अध्यात्मातही भरारी घेणार्या मोदीभाभींनी माया आणि अध्यात्म यांचा सुरेख संगम साधून आध्यात्मिक उन्नती कशी करून घेता येईल, याचा आदर्श साधकांसमोर ठेवला आहे.
आजच्या या शुभदिनी त्यांनी ७१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली असून त्या सनातनच्या संतांच्या मांदियाळीतील ६३ व्या समष्टी संतरत्न झाल्या आहेत.
कुटुंबियांना आणि साधकांना मोदीभाभींचा आध्यात्मिक स्तरावर अधिकाधिक लाभ करून घेता येऊ दे, ही भगवान श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना !
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले