पनवेल – नागोठणे (जिल्हा रायगड) येथील ८३ वर्षांचे श्री. अनंत (तात्या) पाटील गुरुपौर्णिमेच्या दिवशी संतपदी विराजमान झाले, ही शुभवार्ता पेण येथील एका अनौपचारिक कार्यक्रमात घोषित करण्यात आली. सनातनचे संत पू. रमेश गडकरी यांच्या शुभहस्ते श्री. अनंत (तात्या) पाटील यांचा सन्मान करण्यात आला. पू. पाटीलतात्या सनातनच्या संतांच्या मांदियाळीतील ६१ वे व्यष्टी संतरत्न ठरले आहेत.
पेण येथील श्री रामेश्वर मंदिरात पार पडलेल्या या सोहळ्यात पू. रमेश गडकरी यांनी पू. तात्या पाटील यांच्या संदर्भातील परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांनी काढलेले गौरवोद्गार या वेळी वाचून दाखवले. त्या वेळी उपस्थित साधकांची भावजागृती झाली. पू. गडकरीकाकांनी पू. तात्यांचा आध्यात्मिक स्तर घोषित केल्यावर उभय संतांनी एकमेकांना आलिंगन दिले. हा भावसोहळा पाहून उपस्थित साधकांच्या डोळ्यांमध्ये भावाश्रू तरळले. पू. तात्या हे वृद्ध वयातही पायपीट करून दैनिकाचे वितरण करत असत. अत्यंत कठीण परिस्थितीत पू. तात्यांनी अखंड नामजप करून अनेक अडचणींवर मात केली.
परात्पर गुरु डॉक्टरांचे सतत स्मरण करून आध्यात्मिक उन्नतीसाठी कसे प्रयत्न केले, याविषयी पू. तात्या पाटील यांनी या वेळी सांगितले. पू. गडकरीकाका या वेळी म्हणाले, आरंभीपासून तात्यांची सेवेची पुष्कळ तळमळ होती. सेवा परिपूर्ण होण्यासाठी केलेले प्रयत्न आणि त्यांच्या मनाची स्थिरता यांमुळे त्यांची प्रगती झाली आहे.
या वेळी उपस्थित साधकांनी पू. तात्यांची तळमळ आणि सेवा करण्याची पद्धत यांविषयीचे अनुभव सांगितले.
भगवंतावरील दृढ श्रद्धेमुळे कठीण प्रसंगांतही आनंदावस्थेत रहाणारे
नागोठणे, रायगड येथील श्री. अनंत (तात्या) पाटील संतपदी विराजमान !
नागोठणे येथील ८३ वर्षांचे श्री. अनंत (तात्या) पाटील यांचा उत्साह तरुणांनाही लाजवेल, असा आहे. या वयातही ते दैनिक सनातन प्रभातचे वितरण करतात. काही वर्षांपूर्वी ते रामनाथी आश्रमात आले असता मी त्यांना समष्टीसाठी नामजप करायला सांगितला होता. इतक्या वर्षांनंतरही ते प्रतिदिन तो नामजप तळमळीने पूर्ण करतात. तात्या मायेपासून पूर्ण अलिप्त झाले असून भगवंतावरील दृढ श्रद्धेमुळे कठीण प्रसंगांतही ते स्थिर रहातात. निरपेक्षपणाने प्रत्येक कृती करणे, हा तात्यांचा स्थायीभाव असून त्यामुळे वृद्धापकाळीही ते सतत आनंदी राहू शकतात.
अशा विविध गुणांमुळे ७१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून त्यांनी जनलोकी स्थान मिळवले आहे. ते सनातनच्या संतांच्या मांदियाळीतील ६१ वे व्यष्टी संतरत्न झाले आहेत.
पू. तात्यांची पुढील प्रगती जलद गतीने होवो, ही भगवान श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले