१. वाल्मीकि रामायणातील मारुतीच्या जन्माची कथा
वाल्मीकि रामायणातील किष्किंधा कांड, सर्ग ६६ मध्ये मारुतीच्या जन्माची वर्णन केलेली कथा पुढे दिली आहे.
१ अ. मरुत् दैवतेच्या आशीर्वादाने अंजनाला
वीर्यवान्, बुद्धीसंपन्न आणि महातेजस्वी असा पुत्र होणे
पूर्वी पुंजिकस्थला नावाची एक अप्सरा होती. काही शापामुळे ती वानरी रूपाला पावली होती. तिचे नाव अंजना असे होते. ती एकदा मनुष्यरूप धारण करून उत्तम वस्त्रे आणि अलंकार धारण करून पर्वताग्रावर फिरत होती. त्या वेळी मरुत् दैवताने तिचे वस्त्र उडवले. तिचे सुंदर अवयव त्याच्या दृष्टीस पडले. तो मोहित झाला आणि त्याने तिला आलिंगन दिले. ती घाबरून म्हणाली, एकपत्नीव्रतम् इदं को नाशयितुम् इच्छति । म्हणजे माझे हे पातीव्रत्य कोण नष्ट करत आहे ? – (संदर्भ : वाल्मीकी रामायण, कांड ४, सर्ग ६५, श्लोक १६) त्यावर मरुत् म्हणतो, मी तुझे पातिव्रत्य भंग करत नाही. भिऊ नकोस ! मी मनानेच तुला आलिंगन दिले आहे. मरुत् दैवताने सांगितले, तुला वीर्यवान्, बुद्धीसंपन्न, महातेजस्वी, महाबली, महापराक्रमी असा पुत्र होईल. पुढे अंजनीस तसाच पुत्र झाला.
१ आ. फळ समजून सूर्याला खाण्यासाठी गेल्यावर इंद्राने
रागावून वज्र फेकणे, इंद्राच्या वज्राला मान देण्यासाठी मारुतीने
वज्रप्रहार हनुवटीवर झेलणे आणि तेव्हापासून हनुमान हे नाव धारण करणे
त्या वेळी सूर्योदय नुकताच होऊ लागला होता. उगवत्या सूर्याचा लाल गोळा पाहून ते पिकलेले फळ समजून ते खाण्यासाठी मारुतीने आकाशात सूर्याच्या दिशेने उड्डाण केले. त्या वेळी इंद्राने रागावून त्याच्यावर वज्र फेकले. प्रचंड पर्वतांचे चूर्ण करणार्या त्या वज्राचा प्रहार सामर्थ्यवान मारुतिरायांनी केवळ इंद्राच्या वज्राला मान देण्यासाठी आपल्या हनुवटीवर झेलला आणि खोटीच मूर्च्छा पत्करली. तेव्हापासून त्यांनी हनुमान हे नाव धारण केले. हनुमान शब्दाची व्युत्पत्ती आहे हनुः अस्य अस्ति इति । म्हणजे ज्याची हनुवटी वैशिष्ट्यपूर्ण आहे, असा. त्यांना वज्रांग (वज्रासारखे अंग आहे, असा) असेही म्हणू लागले. त्याचाच अपभ्रंश होऊन बजरंग नाव पडले.
मारुतीने जन्मतःच सूर्यबिंबाकडे केलेल्या उड्डाणाने कुंडलिनी शक्ती जागृत होतात. ब्रह्मरंध्राकडे केलेले उड्डाण यावरून मारुतीची जन्मकथा म्हणजे कुंडलिनीच्या जागृतीचे रूपक कथानक आहे, हे लक्षात येते.
२. अंजनीमातेसारख्या तेजस्वी वीरमातेच्या पोटी जन्मलेला तेजस्वी पुत्र हनुमान !
२ अ. मारुतिरायांच्या विनंतीवरून श्रीराम अंजनीमातेस भेटण्यास
जाणे आणि त्याने श्रीरामाला मातेजवळ माझी स्तुती करू नका, असे सांगणे
रावणवध आणि सीताशुद्धी केल्यानंतर प्रभु रामचंद्र अयोध्येस परत निघाले असता वाटेत ऋष्यमूक पर्वतावर काही काळ विश्रांतीसाठी थांबले. या पर्वतावर मारुतिरायांची पूज्य माता तपश्चर्या करत होती. आपल्या मातेस दर्शन द्यावे, अशी मारुतिरायांनी प्रभु रामचंद्रांना विनंती केली. त्यानंतर प्रभु रामचंद्र लक्ष्मण आणि सीतेसह अंजनीमातेस भेटण्यास निघाले. त्या वेळी मारुतीने श्रीराम, लक्ष्मण आणि सीता यांना माझी मातेजवळ थोडीसुद्धा स्तुती करू नका, असे विनवून सांगितले.
२ आ. मारुतीने रावणवध स्वतः न करता
श्रीरामप्रभूंना कष्टवले, याचे दुःख होऊन अंजनीमाता क्रोधायमान होणे
अंजनीमातेसमोर जाताच श्रीराम, लक्ष्मण, सीता आणि मारुति यांनी तिला नमस्कार केला आणि रावणवधाचे अन् युद्धसमयीचे समग्र वर्णन तिला थोडक्यात सांगितले. बोलण्याच्या ओघात मारुतीने सांगितलेल्या गोष्टीचे विस्मरण होऊन त्यांनी मारुतीची अंजनीमातेजवळ पुष्कळ स्तुती केली. एरवी कोणत्याही मातेला आपल्या पुत्राची स्तुती ऐकून अतिशय आनंद झाला असता; परंतु आपल्या पुत्राने रावणवध स्वतः न करता श्रीरामप्रभूंना कष्टवले, याचे तिला अतिशय दुःख झाले. ती अत्यंत क्रोधायमान झाली. ती म्हणाली,
हा कां माझ्या उदरी आला । गर्भीहुनी का नाहे गळाला ।
आपण असतां कष्टवीला । स्वामी कां राम ॥
माझी ये दुग्धाची हे प्रौढी । कळिकाळाची नरडी मुरडी ।
रावणादिक बापुडी । घुंगुर्डी काय ? ॥
क्षणामधे रावण वधुनी । जरि कां आणिता राघवपत्नी ।
तरि पुत्राचा माझे मनी । उल्हास होता ॥ – समर्थ रामदास (संदर्भ : अंजनी गीत, ओवी ८ ते १०)
अर्थ : हा हनुमान का बरे माझ्या उदरी जन्माला आला ? तो गर्भात असतांनाच का नाही गळाला ? स्वतः हा एवढा शूर असतांना त्याने का बरे भगवान रामाला रावणवधाचे कष्ट दिले ? माझ्या दुधामध्ये कलीकाळालाही नष्ट करण्याचे सामर्थ्य असतांना रावणासारख्या खुळखुळ्याची ती काय कथा ? हनुमानाने क्षणात रावणाचा वध करून सीतामातेला सोडवून आणले असते, तर मला माझ्या पुत्राचा अभिमान वाटला असता.
२ इ. श्रीरामप्रभूंची आज्ञा नसल्यामुळे मारुतिरायांनी
रावणाचा वध न केल्याचे सीतामाईने क्रोधायमान अंजनीमातेला सांगणे
अंजनीमातेने गर्जना करून आपल्या स्तनातील दुधाची धार सोडली, त्या वेळी समोरील शिळांची (दगडांची) भिंत भेदून ती त्रिखंडात गेली. आपल्या वेणीने लंकेला वेढा देऊन लंका उचलून दाखवली. तेव्हा प्रभु रामचंद्रांसह सर्वांना आश्चर्य वाटले. त्यांनी अंजनीमातेची स्तुती केली आणि श्री रामप्रभूंची आज्ञा नसल्यामुळे मारुतीने एकट्याने रावणाचा वध करून माझी मुक्तता केली नाही, असे सांगून सीतामाईने अंजनीमातेचे समाधान केले. अंजनीमातेसारख्या तेजस्वी वीरमातेच्या पोटी मारुतिरायांसारखा, हनुमंतासारखा, बजरंगासारखा बलशाली, महापराक्रमी पुत्र जन्म घेईल, यात नवल कसले !