१. स्वतः वेशभूषेत न अडकणे आणि साधकांनाही त्यात न अडकवणे
अन्य संप्रदाय किंवा संत यांच्याकडे वेशभूषेच्या संदर्भात काही नियमावली असते. काही ठिकाणी भगवे वस्त्र धारण करणे आवश्यक असते, काही ठिकाणी धोतर अनिवार्य असते. प.पू. डॉक्टर मात्र कुठल्याही वेशभूषेत अडकले नाहीत आणि त्यांनी साधकांनाही अडकवले नाही. हिंदु संस्कृतीनुसार वेशभूषा करावी, अशी त्यांनी शिकवण दिली; मात्र त्याचा आग्रह धरला नाही. सहजावस्थेतसुद्धा अध्यात्म जगता येते, हे त्यांनी दाखवून दिले.
२. आहार, निद्रा, यम, नियम
यांच्या पलीकडे नेऊन पोचवणारे प.पू. डॉक्टर !
अन्यत्र आहार, निद्रा, यम, नियम यांसंदर्भात काहीतरी नियम असतातच; परंतु प.पू. डॉक्टरांनी साधकांना या नियमांच्या पलीकडे नेऊन पोचवले. कुठल्याही साधकाला त्यांनी मांसाहार सोडा, लवकर झोपा, लवकर उठा, असा काही आग्रह केला नाही. प्रत्येकाने आपल्या प्रकृतीनुसार साधना करून आनंद घ्यावा, असे ते म्हणत, तरीही जवळपास सर्वच साधक साधनेत स्थिरावल्यावर त्यांची मांसाहार करण्याची वासनाच नष्ट झाली. आज ज्यांना रात्री उशिरापर्यंत जागून सेवा करता येते, ते रात्री जागून, तर जे पहाटे उठून सेवा करू शकतात, ते पहाटे उठून सेवा करत आहेत.
३. साधकांना गुरुमंत्राची आवश्यकता भासू न देणे
काही संत साधक संपर्कात आल्यावर लगेचच किंवा काही काळाने त्याला गुरुमंत्र देतात आणि तीच साधना पुढे सातत्याने करायला सांगतात. प.पू. डॉक्टरांनी मात्र साधकांना गुरुकृपायोगानुसार साधना सांगून गुरुमंत्राची आवश्यकताच भासू दिली नाही. त्यांनी काळानुसार पुढच्या पुढच्या टप्प्याची साधना साधकांना करायला शिकवली.
४. स्वतःचे दर्शनसोहळे आयोजित न करणे
अन्य संतांचे दर्शन भक्तांना होणे, तितके सहजसुलभ नसते. काही संतांचे दर्शनसोहळे आयोजित केले जातात. प.पू. डॉक्टर मात्र तसे करू देत नाहीत; कारण ते म्हणायचे, दर्शनाला येणारे दर्शनार्थी आणि भक्त स्वार्थी असतात. त्यांना साधनेची गोडी असेलच, असे नाही. त्यामुळे तेथे आपला वेळ जाऊ नये. जे खरे साधक असतात, ते बरोबर आपल्याला कोठून ना कोठून जोडले जातीलच. आज प्रत्यक्षातही तसेच होत आहे. जे खरे तळमळीचे साधक आहे, ते आपसूकच सनातनशी जोडले जात आहेत.
५. कुठल्याच मान-सन्मानाची अपेक्षा न ठेवणे
प.पू. डॉक्टरांनी साधकांना शिकवले, जेव्हा तुम्ही हार-तुर्यांच्या मागे लागाल, तेव्हा तुमच्यातील साधकत्वाचा र्हास चालू झाला आहे, असे समजा. तेथूनच अध्यात्मात घसरण चालू होते. ते स्वतःही कुठल्याच मान-सन्मानाची अपेक्षा न ठेवता एका साधकाप्रमाणे जीवन जगतात. अन्य संप्रदायात मात्र असे आढळत नाही. तेथे बर्याचदा मान-सन्मानाच्या सूत्रावरून भांडणे होतात.
६. सर्व साधकांना
अन्य संतांकडे शिकायला पाठवणे
प.पू. डॉक्टरांनी प्रारंभी साधकांना सर्व संतांकडे शिकायला पाठवले. यातून त्यांनी गुरुतत्त्व एकच आहे, हे साधकांच्या मनावर बिंबवून इतर संतांचा यथायोग्य सन्मान करायला शिकवले. त्यांनी साधकांना कुठेही आम्ही सनातनचे, अशा संकुचित विचारांत अडकू दिले नाही. त्यामुळे साधकांनीही अनेक संतांची मने जिंकली. त्यामुळे त्या संतांचे शुभाशीर्वाद साधकांना मिळाले.
७. व्यावहारिक समस्यांकडे
आध्यात्मिक दृष्टीने पहायला शिकवणारे प.पू. डॉक्टर !
सर्वसाधारणतः सर्व संतांमध्ये प्रीती हा आध्यात्मिक गुण असल्याने त्यांना भक्तांचा कळवळा असतोच. त्या कळवळ्यापोटी ते आईच्या मायेने आपल्या भक्तांच्या समस्या सोडवत असतात. भक्तांच्या जीवनातील अडचणी दूर होऊन त्यांचा साधनेचा मार्ग सुकर व्हावा, ही त्यांची अपेक्षा असते; मात्र हे करत असतांना संबंधित भक्त साधना करतो कि नाही, याकडे ते पहात नाहीत. त्यामुळे ते स्वतःचे तपोबल वापरून म्हणा किंवा संकल्पाने म्हणा, भक्तांच्या व्यावहारिक अडचणी सोडवत रहातात. यामध्ये मग एखाद्याचे लग्न जुळत नसेल, तर जुळवून दे, नोकरीला लाव, मुलंबाळ होत नसेल, तर त्यासाठी अनुष्ठान कर, एखाद्याचा मृत्यूयोग टाळ इत्यादी गोष्टी काही संत करत असतात. प.पू. डॉक्टर मात्र साधकांना या सगळ्या गोष्टींकडे आध्यात्मिक दृष्टीने पहायला शिकवतात. जन्म, विवाह आणि मृत्यू या तीनही गोष्टी प्रारब्धानुसारच होतात, हे शास्त्र त्यांनी साधकांना सांगून ठेवले आहे. त्यामुळे ते यासंबंधीच्या साधकांच्या अडचणी, समस्या कधीच सोडवत नाहीत किंवा साधकाच्या आंतरिक तळमळीमुळे प.पू. डॉक्टरांची कृपा होऊन किंवा त्यांच्या अस्तित्वाने सुटल्या, तरी त्याचे कर्तेपण प.पू. डॉक्टर स्वतःकडे कधीच घेत नाहीत. त्यांनी साधकांना सर्व समस्यांवर साधना हाच नामी उपाय सांगून ठेवला आहे.
८. राष्ट्र आणि धर्म रक्षण करणे
हीच काळानुसार साधना आहे, असे शिकवणे
काही संत आपल्या संप्रदायापुरता विचार करतात. त्यामुळे त्यांना राष्ट्र आणि धर्म यांविषयी काहीच घेणे-देणे नसते, तर काही संत याविषयी सीमित विचार करतात. प.पू. डॉक्टरांनी मात्र साधकांना शिकवले, राष्ट्र आणि धर्म टिकले, तरच पुढे आपण साधना करू शकू. त्यामुळे त्यांचे रक्षण आधी व्हायला हवे. तीच आपली काळानुसार साधना आहे.
वरील काही सूत्रे ही प्रातिनिधीक स्वरूपाची आहेत. प.पू. डॉक्टरांचे निराळेपण दर्शवणारी अशी अनेक सूत्रे साधकांनी अनुभवली आहेत.
– अधिवक्ता योगेश जलतारे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (९.४.२०१६)