सर्वश्रेष्ठ राष्ट्र निर्माण करणारी वैदिक शिक्षणपद्धत !

valmikirishi_guru_shishyaपूर्वीच्या काळी वैदिक शिक्षणपद्धत होती. त्यामुळे भारत सर्वश्रेष्ठ असे राष्ट्र होते. ते इतके समृद्ध होते की, त्या वेळी भारतामध्ये सोन्याचा धूर निघत होता, असे म्हटले जाते. या वैदिक शिक्षण पद्धतीचा पाया आध्यात्मिक होता. तसेच हे वैदिक शिक्षण कालातीत आणि हितकारी असल्यामुळेच त्या शिक्षणप्रणालीतून सिद्ध झालेले विद्यार्थी राष्ट्राला उच्च स्थानावर नेऊन पोचवत होते. अशा श्रेष्ठपदाला पोचलेली गुरुसंस्था भारतात होती; म्हणूनच सहस्रावधी वर्षे उलटली, तरी तिचे स्थान ध्रुवासारखे अढळच आहे. ही वैदिक शिक्षणपद्धत नेमकी कशी होती, याचा परामर्श घेणारा श्री. प्र.दी. कुलकर्णी यांचा लेख केसरी गर्जने या नियतकालिकामध्ये प्रसिद्ध झाला होता. तो आमच्या वाचकांसाठी येथे देत आहोत.

 

१. श्रीगुरूंचे महत्त्वाचे स्थान

वैदिक शिक्षणपद्धतीत श्रीगुरूंचे स्थान अतिशय महत्त्वाचे आहे. अथर्ववेदामध्ये श्रीगुरूंना शिष्याचा आध्यात्मिक पिता म्हटले आहे. परमेश्‍वरी तत्त्वांचे आकलन व्हावे, अशी इच्छा असेल, तर त्यासाठी श्रोत्रीय आणि ब्रह्मनिष्ठ गुरूंकडेच गेले पाहिजे, असे भारतीय संस्कृती सांगते.

 

२. बुद्धी आणि मन यांचा प्रांजळपणा
अन् प्रामाणिकपणा असणारे गुरु !

वैदिक काळातील गुरूंचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची बुद्धी आणि मन यांचा प्रांजळपणा अन् प्रामाणिकपणा होय. ज्ञानाचा खोटा दंभ त्या आचार्यांच्या ठायी तीळमात्र नव्हता. गोपथ ब्राह्मण या ग्रंथामध्ये अतिशय रोचक अशी कथा आहे. मौद्गल्य आणि मैत्रेय नावाचे दोन आचार्य होते. त्यांच्यात एकदा वादविवाद झाला असता मैत्रेय आचार्य वादात हरले; पण हरल्यावर त्यांनी त्यांची पाठशाळा बंद करून मौद्गल्य यांचे शिष्यत्व स्वीकारले. प्रख्यात मीमांसक मंडनमिश्र आणि श्री आद्य शंकराचार्य यांच्या वादविवादाच्या प्रसंगी मंडनमिश्रांची धर्मपत्नी न्यायासनावर होती. आपला पती वादात हरला, हे सांगतांना भारतीने (पत्नी) मुळीच न्यूनपणा मानला नाही. एवढेच नव्हे, तर मंडनमिश्रांनी संन्यासदीक्षा घेऊन शंकाराचार्यांचे शिष्यत्व स्वीकारले. ही घटना काय सुचवते ? शहाजहानच्या काळात दक्षिण हिंदुस्थानात अप्पय्या दीक्षित नावाचे प्रतिभावंत पंडित होते. ते द्वैतवादाचे अनुयायी होते. शृंगेरी मठाच्या अद्वैतवादी पंडितांशी झालेल्या वादात दीक्षित हरले. त्वरित त्यांनी संन्यास स्वीकारून आयुष्यभर अद्वैतवादाचा प्रचार केला. या आणि यांसारख्या अनेक उदाहरणांनी हेच सिद्ध केले आहे की, विद्या आणि बुद्धीच्या क्षेत्रातील प्रामाणिकपणाची परंपरा वेदकाळापासून यावनी काळापर्यंत अखंडितपणे चालू होती.

 

३. समर्थ शिष्यालाच गुरूंचे आशीर्वाद !

प्रामाणिकपणासह विद्यादान करतांना गुरु शिष्याला सर्वस्व अर्पण करत; म्हणूनच शिष्य गुरूंचे वाक्य प्रमाण मानीत. त्या काळी सध्यासारखे शिक्षक थोडे आणि विद्यार्थी असंख्य अशी स्थिती नव्हती. विद्यार्थ्यांना विद्याध्ययन संपेपर्यंत गुरुगृहीच रहावे लागत असल्याने प्रत्येक विद्यार्थ्यावर गुरूंना लक्ष ठेवणे सुलभ होत होते. सर्वांचे रहाणे एकत्र असल्यामुळे चिंतनिकेतील चर्चा विविधांगी होती. असे प्रतिभावंत गुरु आणि जिज्ञासू शिष्य यांची प्रश्‍नोत्तरे श्रवण करतांना ज्ञानाचे भांडार सर्वांना खुले होई; म्हणूनच शिक्षण संपल्यावर स्नातकांना आशीर्वाद देतांना गुरु म्हणत, तुला पुष्कळ विद्यार्थी मिळोत. हा नुसता पोकळ आशीर्वाद नव्हता, तर आश्रमाबाहेर जाणारा स्नातक स्वतः विद्यादानाचे व्रत चालवण्याइतका समर्थ झाल्यासच तसा आशीर्वाद गुरु देत असत.

 

४. गुरुकुलात पात्रतेनुसार शिष्यांना शिक्षण !

विविध आश्रमांत प्रवेश देतांना गुरु त्या शिष्यांची पात्रता पाहूनच प्रवेश देत असत. वैदिक काळात शिक्षण देण्याचे काम करणार्‍यांनी आपला विशिष्ट वर्ग बनवून तो व्यवसाय आपल्याकडे राखून घेतला, असे म्हणणे करंटेपणाचे लक्षण आहे. त्या काळी मिळणारे शिक्षण विनामूल्य असल्याने शिक्षणातून आर्थिक लाभाची कोणतीही अपेक्षा बाळगलेली नसायची. याउलट अनेक पराक्रमी आणि धनवान राजे, सरदार आश्रमाला स्वतःहून अर्थसाहाय्य करत. खरेतर विद्याग्रहण केल्यानंतर शिष्यद्वारा गुरूंना मिळणारी गुरुदक्षिणा, हेच काय ते गुरूंना मिळणारे धन होते. गुरुदक्षिणा दिलीच पाहिजे, अशी सक्ती नव्हती वा तसा ठरावही नव्हता. असा ठराव करणार्‍या गुरूंची सर्व धर्मग्रंथांतून निंदाच केली आहे; म्हणूनच कवी कालिदास एके ठिकाणी म्हणतात, 

यस्यागमः केवल जीविकायै तं ज्ञानपव्यं वणिजं वदन्ति।

ज्याच्या विद्येचा उपयोग केवळ पोट भरण्यास्तव आहे, तो ब्राह्मण नसून ज्ञानाचे दुकान घालणारा वाणी आहे !

 

५. गुुरुकुलात सर्व वर्णांना समान आदर !

सद्वर्तनी आणि ज्या विषयात शिकावयास आला असेल, तेथे बुद्धीची गती असलेला विद्यार्थी कोणीही असला, तरी त्याला नाकारता येत नसे. वेदाविना इतर सर्व विद्याही त्रैवर्णिकांच्या बाहेरच्या समाजालाही शिकवण्यात येत असत. केवळ त्रैवर्णिकांविषयी विशेष प्रेम आणि इतरांविषयी द्वेष, अशी भावना मुळीच नव्हती. वेद हे मंत्र असल्यामुळे त्यांच्या उच्चारणाच्या शास्त्राशी मनुष्याचे जीवित, कल्पना आणि विश्‍व यांचा संबंध असल्याची श्रद्धा होती. काटेकोर ध्वनीशास्त्राशी ज्यांचा संबंध नाही, अशा सर्व विद्या सर्वांना शिकवण्यात येत. एकदा विद्यार्थी आश्रमात आल्यावर तो सद्वर्तनी आणि शीलसंपन्न आहे कि नाही, हे पहाण्यास्तव एक वर्षभर त्याच्या विविध कसोट्या घेत असत. कूर्मपुराण असे म्हणते,

संवत्सरोषिते शिष्ये गुरुर्ज्ञानमनिर्दिशन् ।
हरते दुष्कृतं तस्य शिष्यस्य वसतो गुरुः ॥

एक वर्षभर शिष्य घरी राहिल्यावरही जर गुरु त्याला शिकवणार नसतील, तर शिष्याचे सर्व पाप गुरूंना लागते. स्मृतीकौस्तुभात असे वचन आहे, विद्यार्थ्यांना तत्परतेने न शिकवल्यामुळे गुरूंना आम्रवृक्षाच्या जन्मास जावे लागते.

असे असले, तरी अध्यापकाला माध्यान्हकाळी पोटात काही घालावेच लागते; म्हणून शास्त्रकारांनी शिष्यांच्याही अंतःकरणात कृतज्ञतेचा भाव निर्माण करण्यास्तव गुरुदक्षिणेचा विचार मांडला आहे. अर्थात ही गुरुदक्षिणा शिक्षण पूर्ण झाल्याविना देऊ नये, असेच वचन आढळते. अशा शिष्याला वाटेल तेवढे अर्थसाहाय्य करणारा समाजही त्या वेळी होता. महाभारतात तर असा प्रसंग आहे की, उत्तंक नावाच्या नडलेल्या (गरजू) शिष्याला गुरुदक्षिणेस्तव एका राजाने आपल्या राणीची सुवर्ण कुंडले काढून दिली.

 

६. शिष्याचे संपूर्ण जीवन घडवणे, हे आद्यकर्तव्य असलेले गुरु !

आश्रमात असलेल्या शिष्यांची त्यांच्या माता-पित्यापेक्षा गुरु जास्त काळजी घेत. शिष्यही गुरूंवर सर्वांत अधिक प्रेम करत. केवळ विद्या दिली म्हणजे संपले, असे नसून शिष्याचे संपूर्ण जीवन घडवणे, हे गुरूंचे आद्यकर्तव्य मानत. गुरुगृहात असतांना स्वतःची सामाजिक योग्यता बाजूला सारून शिष्य सर्व कामे करत. भगवान श्रीकृष्ण हे सांदिपनी गुरूंंच्या आश्रमात पडतील ती सर्व कामे केल्याचे वर्णन आढळते. गोपथ ब्राह्मण ग्रंथात गुरुगृही हौसेने काम करतांना अंगातून घामाच्या धारा चाललेल्या शिष्याचे उद्बोधक वर्णन आढळते. शिष्याला अशी कामे सांगतांना त्याच्या अभ्यासाची हेळसांड होणार नाही, अशा पद्धतीने ती सांगावी, असा संकेत होता. अशी कामे करतांना जर शिष्याला मृत्यू आला, तर गुरूंना कठोरतम प्रायश्‍चित्त घ्यावे लागे. शिष्य जर आश्रमाच्या अनुशासनाबाहेर जाऊ लागला, तर त्याला थंड पाण्याच्या स्नानाची, उपवासाची, गुरुगृह त्यागाची गुरु शिक्षा देत. जर तो फारच अनावर झाला, तर गुरूंनी त्याला वेताच्या छडीने त्याच्या पाठीवर मारावयास आडकाठी नव्हती, असे वर्णन मनु आणि गौतम यांनी केले आहे. अशा शिक्षा देतांना रंक वा राजपुत्र असा भेदभाव केला जात नसे. बौद्धजातक कथेत वाराणसीच्या राजपुत्राची चोरीची सवय जावी; म्हणून गुरूंनी त्याला असंख्य छड्या मारून कठोर शिक्षा केल्याचा उल्लेख आहे. धर्मसूत्र आणि मनुस्मृति वाङ्मयावरून असे दिसते की, वैदिक काळातील ऋषीही न्यायनिष्ठूर होते.

 

७. विद्यामंदिरांवर राजसत्तेचे नव्हे,
तर विद्वान आणि तपस्वी यांचेच पूर्ण नियंत्रण !

वाङ्मय शिक्षणासह वेगवेगळी अन्य शास्त्रे आणि व्यवसाय यांचे शिक्षण त्या काळी देण्यात येत असे. वेद वाङ्मयातील उल्लेखावरून हे सिद्ध होते. वेदविद्या, छंदशास्त्र, इतिहास, पुराणे, नाराशंसी गाथा, याज्ञिक कर्मे, भूमिती, ज्योतिष, सैनिकी शिक्षण, गायन, कला, गूढ विद्या, सुरकी, गवंडी काम, धनुर्विद्या, रथकर्म, गरुडविद्या, अश्‍व-सारथ्य, लोहारकी, खनिज विद्या, सर्पविद्या, वैद्यक यांसारख्या विषयांचे अध्यापन त्या काळी होते. सध्याच्या काळात पुस्तकी ज्ञानासह व्यावसायिक शिक्षणाची जोड देण्याचा प्रयत्न चालू आहे. त्याचे मूळ वैदिक शिक्षणपद्धतीतच सापडते. अनेक शिक्षण आयोगांनी अशा प्रकारची सूचना केली, तरीही त्याचे काटेकोर कार्यपालन न झाल्याने आजचा विद्यार्थी केवळ परीक्षार्थी झाला आहे. पदवीचे शिक्षण घेऊन स्नातक बाहेरच्या व्यवहारी जगात स्वतःच्या पायावर उभा राहू शकत नाही, असे होऊ नये; म्हणूनच वैदिक काळात पुस्तकी ज्ञानासह व्यावसायिक शिक्षण देण्यात येत असे. पूर्वीच्या शिक्षणपद्धतीतील सर्वांत महत्त्वाची गोष्ट अशी की, विद्यामंदिर राजसत्तेचे दास नसून विद्वान आणि तपस्वी हेच त्यांचे सर्वश्रेष्ठ नियंत्रक होते. सध्याप्रमाणे ज्यांचा शिक्षणक्षेत्राशी काडीमात्र संबंध नाही, असे अधिकारी आणि मंत्री त्यांची कजाग सासूसारखी वागणूक यांपासून शिक्षण पूर्णपणे अलिप्त होते. राजांनीसुद्धा आश्रमात विनयाने आणि सभ्यपणानेच प्रवेश केला पाहिजे, असा दंडक होता. एका श्रेष्ठ राष्ट्राची घडण वैदिक शिक्षणपद्धत घडवू शकली, याचे कारण ती राजसत्तेची कधीच दास नव्हती, तर याउलट राजसत्तेवर ऋषींचेच पूर्ण नियंत्रण होतेे.

 

८. कालातीत आणि हितकारी वैदिक शिक्षणपद्धत !

वैदिक शिक्षणपद्धतीचे हे स्वरूप पाहिल्यावर काळाच्या प्रभावामुळे जी काही स्थित्यंतरे घडून आली, ती सोडून दिली, तर काळालाही पुरून उरणारी आणि प्रत्येक कालखंडात हितकारी ठरू शकणारी शिक्षणपद्धत म्हणजे वैदिक शिक्षणपद्धत होय; परंतु गेल्या शे-दीडशे वर्षांच्या पारतंत्र्यामुळे आणि या काळात झालेल्या संस्कारांमुळे भारताच्या बौद्धिक क्षेत्रात पाश्‍चात्त्यांंची वैचारिक दास्यता निर्माण झाली. 

या दास्यतेमुळे राष्ट्र जीवनाच्या विविध क्षेत्रांवर जे काही परिणाम घडून आले, त्यातील सर्वांत भयंकर परिणाम म्हणजे भारतीय शिक्षणपद्धत, ही पाश्‍चात्त्य शिक्षणपद्धतीचे अनुकरण करत आहे. त्या पद्धतीतील दोषच आपल्या शिक्षणपद्धतीत प्रभावाने दिसतात. त्यापेक्षा असे म्हणता येईल की, त्यांच्या दोषांचेच आपण वाटेकरी झालो आणि त्यांच्या गुणांशी आपला फारसा संबंधही आला नाही. त्यामुळे त्यात आध्यात्मिक दृष्टीकोनांचा पूर्ण अभाव, विलक्षण ध्येयशून्यता, शिक्षण आणि मंदिरे राजसत्तेचे दास बनणे, शिक्षणाला व्यापारी स्वरूप प्राप्त होणे, तसेच शिक्षकांचा उच्च भाव नष्ट होऊन द्रव्य देणार्‍यांची सेवा करणारा एक नोकरवर्ग सिद्ध होत आहे.

 

९. श्रेष्ठ संस्कार देणारी वैदिक शिक्षणपद्धत !

वैदिक शिक्षणाच्या श्रेष्ठ संस्काराच्या भट्टीतूनच राष्ट्र जीवनाचा योग्य घटक म्हणून सिद्ध झालेल्या विद्यार्थ्याला समाज जीवनात सोडतांना वैदिक आचार्य उपदेश करत, त्याचे स्मरण झाल्याविना रहाणार नाही. आचार्य सांगत, नेहमी खरे बोल, आपले कर्तव्य ओळखून धर्माप्रमाणे वाग, शिकलेली विद्या प्रमत्तपणे विसरू नकोस, प्रजारूपी सूत्र तोडण्यास तू कारणीभूत होऊ नकोस, धर्माकडे दुर्लक्ष करू नकोस, आपल्या कल्याणमार्गापासून ढळू नकोस, मातृपरायण हो, पितृपरायण हो, आचार्यपरायण हो, अतिथीपरायण हो, धर्माने सांगितलेली देवकार्ये आणि पितृकार्ये विसरू नकोस, वाईट गोष्टींचे अनुकरण करू नकोस, धर्म अन् ईश्‍वर यांची भीती बाळगून त्यांच्यावर अतिक्रमण होणार नाही, अशा पद्धतीने वागत जा. श्रेष्ठ आणि गुरुतुल्य गोष्टींचे अनुकरण कर, जीवनात सर्वार्थाने यशस्वी हो, दान देतांना श्रद्धेने दे, द्यावयाचे ते विनयाने समर्पण कर, ज्ञानपूर्वक दान कर.

– श्री. प्र.दी. कुलकर्णी. (केसरी गर्जने, १ नोव्हेंबर ९२/२)