संत त्यांच्या लिखाणातून साधना, अध्यात्म आदी विषयांच्या संदर्भात मार्गदर्शन करत असतात. संतांनी लिहिलेले विविध प्रकारचे गद्य आणि पद्य वाङ्मय सर्वपरिचित आहे. येथे प्रश्नावलीच्या माध्यमातून संतांनी साधना सांगण्याचे एक अनोखे उदाहरण दिले आहे.
श्री वासुदेवानंदसरस्वती यांनी
रचलेली प्रश्नावली आणि ती पहाण्याची पद्धत
महाराष्ट्रातील एक थोर संत श्रीमत् परमहंसपरिव्राजकाचार्य श्रीवासुदेवानंदसरस्वती टेंबेस्वामीमहाराज यांची प्रश्नावली या नावाने प्रसिद्ध असलेली एक प्रश्नावली आहे. यात एकूण २४ ओळी आहेत. त्या प्रत्येक ओळीत २४ चौकोन, असे एकूण ५७६ चौकोन आहेत. प्रत्येक चौकोनात मराठी वर्णमालेतील एक अक्षर आहे. प्रश्नावली पहाणार्याने एखादी कामना मनात ठेवून प्रश्नावलीतील कोणत्याही एका चौकोनावर बोट ठेवायचे आणि तेथे असलेल्या अक्षराची एका कागदावर नोंद करायची. त्यानंतर त्या अक्षराच्या पुढच्या चौकोनापासून आरंभ करून येणार्या १८ व्या अक्षराची कागदावर नोंद करायची. अशा प्रकारे आपण ज्या अक्षरावर सर्वप्रथम बोट ठेवले होते, तो चौकोन येईपर्यंत प्रत्येक १८ व्या अक्षराची नोंद करायची. अशा प्रकारे एकूण ३२ अक्षरांची नोंद होईल. ही अक्षरे वाचल्यास त्यांच्यापासून एक पद्यमय मराठी श्लोक सिद्ध होतो. त्यात पंचपदी करावी, कृष्णालहरी वाचावी, करुणात्रिपदी म्हणावी इत्यादी मनोकामनापूर्तीसाठी उपयुक्त असणारी साधना (उपासना) सांगितलेली असते. त्याची उदाहरणे पुढे दिली आहेत.
१. वारोनी संकटे सारी दत्त हेतु पुरा करी । श्रीमद्दत्तपुराणाते वाचावे वरचेवरी ॥
२. श्री वासुदेवा हृदयी चिंतुनी कामना करी । ती सत्य सफला होते ठेवी विश्वास अंतरी ॥
३. वाचिता सप्तके दोन समश्लोकी गुरुकथा । अलभ्य तेहि ये हाती चिंता का करशी वृथा ॥
४. दत्तकाव्य पाठकरी जरी ते भौती अंतरी । श्रीकृष्णालहरी प्रेमे वाचिता इष्ट ये करी ॥