सेंटर फॉर डिसिज् डायनॅमिक्स इकोनॉमिक्स अॅण्ड पॉलिसीच्या अहवालानुसार वर्ष २०५० पर्यंत भारतात प्रतिजैविक प्रतिरोध अर्थात् अॅन्टीबायोटिक्स रेझिस्टन्स (Antibiotics resistance) मुळे ३० कोटी लोक मृत्यूमुखी पडलेले असतील ! भारतात प्रतिवर्षी सुमारे ६० सहस्र लहान मुले अॅन्टीबायोटिक्स रेझिस्टन्समुळे मृत्यूमुखी पडतात.
१. अॅन्टीबायोटिक्स रेझिस्टन्स म्हणजे काय ?
अॅन्टीबायोटिक्स किंवा प्रतिजैविके म्हणजे बॅक्टेरियावर दिली जाणारी औषधे. आपला जीव वाचवणे, ही प्रत्येक सजिवाची धडपड असते. याच प्रयत्नांचा भाग म्हणून बॅक्टेरिया हे स्वतःला या अॅन्टीबायोटिक्स पासून सुरक्षित बनवणारे पालट स्वतःच्या रचनेत घडवून आणतात आणि काही काळातच ही औषधे निष्प्रभ ठरू लागतात.
२. अॅन्टीबायोटिक्स रेझिस्टन्स का होतो ?
याची कारणे बरीच आहेत; मात्र शब्दमर्यादा लक्षात घेता आपण या अहवालात मांडलेली सर्वांत प्रमुख ३ कारणे पाहूया.
अ. आधुनिक शास्त्राच्या मते बहुतांशी व्हायरसमुळे होणार्या सर्दी-खोकला यांसारख्या विकारांवरदेखील सर्रास अॅन्टीबायोटिक्स घेण्यास अनेक डॉक्टर सांगतात. ही पद्धत चूक आहे, असे आधुनिक वैद्यकातील तज्ञच सांगतात. व्हायरसमुळे झालेल्या विकारावर बॅक्टेरियावरील उपचार म्हणजे आग रामेश्वरी अन् बंब सोमेश्वरी, अशी गत आहे. झटपट आराम मिळवण्याच्या नादात इतके लक्ष कोण देणार ? या सूत्रावर US FDA ने त्यांच्या संकेतस्थळावर सविस्तर माहिती दिली आहे.
आ. अॅन्टीबायोटिक्सचा वापर कुणाही डॉक्टरला न दाखवता स्वतःच्या बुद्धीने करणे.
इ. अॅन्टीबायोटिक्स टोचलेल्या प्राण्यांच्या मांसाचे आणि दुधाचे सेवन करणे.
३. यावर उपाय काय ?
अ. शक्य तितक्या प्रमाणात शाकाहारी रहा. त्यातही सेंद्रीय (ऑरगॅनिक) फळ-भाज्यांवर भर द्या. जर्सी गायीचे पिशवीबंद दूध घेण्याऐवजी देशी गायींचे दूध प्या. देशी गायींना बहुतांशी अॅन्टीबायोटिक्स द्यावीच लागत नसल्याने त्यांच्या दुधात त्याचा अंश येण्याचा संबंधच नसतो.
आ. स्वतःच स्वतःचे डॉक्टर बनू नका. कोणतेही वैद्यकशास्त्र असो, स्वयं उपचार हे घातकच ठरते.
इ. आजारी पडलात, तर सर्वप्रथम शुद्ध आयुर्वेदीय उपचार देणार्या वैद्यांकडे जा. आयुर्वेदापाठोपाठ होमिओपॅथीचा आधारदेखील घेतला जाऊ शकतो. विशेषतः लहान मुलांना आजकाल सर्दी, खोकला, ताप, जुलाब आदींवर अॅन्टीबायोटिक्स देण्याची फॅशन निघाली आहे. त्यामुळे दीर्घकाळाची हानी होत असल्याचे ठळकपणे समोर येत आहे.
४. वेळीच आयुर्वेदाचे साहाय्य घ्या !
अॅन्टीबायोटिक्स हे आपल्या औषधींच्या भात्यातील शेवटचे शस्त्र म्हणून आणि अगदी नाईलाज झाला, तरच वापरण्याची गोष्ट आहे. डास मारायला थेट अणूबॉम्बचा वापर करूया, असा विचार आपण करू का ? तसेच इथेही आहे. आयुर्वेदाचे साहाय्य वेळेत घेतल्यास हे अखेरचे शस्त्र इतक्या लहानसहान गोष्टीकरता वापरावेच लागणार नाही. एकंदरीतच अॅन्टीबायोटिक्स रेझिस्टन्सच्या यक्षप्रश्नावर उत्तर नाही, तरी मार्ग सापडेल.
– वैद्य परिक्षित शेवडे, (एम्डी, आयुर्वेद), डोंबिवली
(लेखक आयुर्वेदतज्ञ, लेखक तथा व्याख्याते आहेत.)