स्वामी विवेकानंद यांच्याविषयी घडलेला एक प्रसंग येथे देत आहे. स्वामी विवेकानंद हे धर्मप्रसारासाठी, म्हणजेच सनातन हिंदु धर्माचे तेज विदेशात पसरवण्यासाठी सर्व धर्म परिषदेच्या निमित्ताने भारताचे प्रतिनिधी म्हणून शिकागो (अमेरिका) येथे गेले होते. तेव्हा त्यांनी त्या धर्मपरिषदेत श्रोत्यांची मने जिंकून तेथे न भूतो न भविष्यति ! असा विलक्षण प्रभाव निर्माण केला. त्यामुळेे सनातन हिंदु धर्माचे श्रेष्ठत्व पाश्चात्त्यांसमोर प्रभावीपणे आणि समर्थपणे ठसले. त्या वेळी स्वामी विवेकानंदांना तेथील अनेक संस्थांच्या वतीने व्याख्यानांसाठी निमंत्रणे मिळू लागली. त्यात त्यांनी ज्ञानयोग, भक्तीयोग, कर्मयोग, राजयोग हे विषय प्रभावीपणे मांडले. सर्व श्रोतृवृंद अगदी मंत्रमुग्ध होऊन आणि देहभान हरपून त्यांच्या निरूपणाचा आस्वाद घेत असायचा. या प्रासादिक निरूपणाच्या वलयातून श्रोते जेव्हा भानावर यायचे, तेव्हा त्यांच्यामध्ये पुढील विषय ऐकून घेण्यासंबंधी तीव्र उत्कंठा जागृत होत असे.
एकदा अशाच एका कार्यक्रमाच्या समारोपानंतर उत्कंठित झालेल्या श्रोत्यांनी स्वामी विवेकानंद यांना घेराव घातला आणि तीव्र जिज्ञासेपोटी ते त्यांना प्रश्न विचारू लागले, हे महन् तपस्वी, स्वामी ! आपण हे अलौकिक ज्ञान कुठल्या शाळेत अथवा महाविद्यालयात संपादन केले ? कृपा करून आम्हाला यासंबंधी विस्ताराने सांगाल का ? त्यावर स्वामी विवेकानंद उत्तरले, अवश्य. हे अमूल्य असे ज्ञान मला केवळ माझ्या गुरुदेवांकडूनच प्राप्त झाले आहे. तेव्हा श्रोतृवृंदांनी अधीरतेने प्रश्न विचारला, आपले गुरु कोण आहेत ? स्वामी विवेकानंदांनी सांगितले, तुमची जर यासंबंधी ऐकण्याची तीव्र जिज्ञासा असेल, तर आम्ही अवश्य सांगू.
त्याच दिवशी स्वामी विवेकानंदांच्या विशेष प्रवचनाचे आयोजन केले गेले. प्रवचनाच्या विषयाचे नाव होते, माझे गुरुदेव त्या संबंधी वर्तमानपत्रातून पुष्कळ प्रसिद्धी केली गेली. त्यामुळे कुतुहलापोटी हे व्याख्यान ऐकण्यासाठी अफाट असा जनसागररूपी श्रोतृसमुदाय उपस्थित होता. तो जनसागर व्याख्यात्यांच्या मुखातून बाहेर पडणारी मुक्ताफळे झेलण्यास फार उत्कंठित झाला होता. व्याख्यानाच्या नियोजित वेळी स्वामी विवेकानंद संबोधन करायला जेव्हा व्यासपिठावरील आसंदीवरून उठून उभे राहिले, तेव्हा एकदम नीरव शांतता निर्माण झाली. ते सद्गुरूंसंबंधी बोलण्यासाठी उभे राहिल्यावर उपस्थित असलेल्या अफाट जनसागररूपी श्रोतृवृंदांकडे पाहून त्यांच्या मनात सद्गुरूंविषयी कृतज्ञतेचा भाव दाटून आला. जेव्हा त्यांनी बोलण्यास प्रारंभ केला, तेव्हा त्यांच्या मुखातून पहिले वाक्य बाहेर पडले, ते म्हणजे माझे गुरुदेव! हे वाक्य अतिशय सद्गदित अशा अंतःकरणाने म्हणजे भावाने ओतप्रोत असलेल्या अवस्थेमध्येे त्यांच्याकडून उच्चारले गेले होते.
शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्याच्याशी संबंधित शक्ती या नियमानुसार त्यांनी भावपूर्ण उच्चारलेल्या वाक्यामुळे त्यांच्या डोळ्यांसमोर साक्षात गुरूंचे सगुण रूप उभे राहिले. निर्गुण गुरुतत्त्वाचा हा सगुण रूपातील साक्षात्कार त्यांना केवळ त्यांच्यामधील जागृत आणि कार्यरत असलेल्या भावशक्तीमुळेच घेता येऊ शकला. सद्गुरूंचे सगुण रूप साक्षात डोळ्यांसमोर उभे राहिल्याचे त्यांनी अनुभवल्यामुळे त्यांचा कंठ दाटून आला. डोळ्यांतून घळाघळा अश्रूधारा वाहू लागल्या आणि अंग रोमांचित होऊन थरथर कापू लागले. त्यामुळे त्यांना १० मिनिटे काही बोलवतच नव्हते. त्यांची ही अवस्था पाहून श्रोते अगदी आश्चर्यचकित झाले. श्रोत्यांच्या आश्चर्यचकित होण्यामागील कार्यकारणभाव अगदी सोपा होता. शरिराला मार लागणे, फार दुखापत होणे किंवा आई-वडील, जवळचे नातेवाईक यांचा मृत्यू यांविना त्यांनी डोळ्यांमधून अश्रूप्रवाह वाहिल्याचे यापूर्वी कधीच पाहिले नव्हते. त्यामुळे ते सर्व जण अगदी वेड्यासारखे स्वामी विवेकानंद यांच्याकडे पाहू लागले.
एखादा कुशल वक्ता ज्याप्रमाणे आपल्या वक्तृत्वाने श्रोत्यांच्या अंतःकरणात निरनिराळे रस (श्रुंगार, हास्य, कारूण्य, रौद्र इत्यादी) उत्पन्न करून श्रोत्यांना तन्मय करून सोडतो, त्याचप्रमाणे स्वामी विवेकानंद यांनीही उपस्थित श्रोत्यांना काहीही न बोलता आपल्या भावाशी अगदी तन्मय करून सोडले होते.
गुरोर्मौनं तु व्याख्यानं शिष्यस्तु छिन्नसंशयः ।
अर्थ : गुरूंनी शिष्याला केवळ मौनात शिकविले आणि शिष्याने ते केवळ मौनातच ग्रहण केले.
या प्रसंगावरून स्वामी विवेकानंद यांच्यामध्ये त्यांचे सद्गुरु श्रीरामकृष्ण परमहंस यांच्याविषयी किती अपार भावशक्ती जागृत होती, हे लक्षात येते. त्यामुळे ते पटकन प्रसंगानुरूप भावाच्या स्तरावर पोहोचू शकले.
थोड्या वेळाने स्वामी विवेकानंद भावाच्या पातळीवरून बुद्धीच्या पातळीला येऊन म्हणाले, आध्यात्मिक उन्नतीच्या दिशेने मार्गक्रमण हे केवळ ग्रंथांच्या साहाय्याने होणे कदापीही शक्य नाही. एका जीवात्म्याला जी चालना मिळवावी लागते, ती केवळ दुसर्या जीवात्म्याकडूनच मिळते. संपूर्ण जन्मभर जरी तुम्ही ग्रंथांचा अभ्यास केलात, तर काय होईल ? तुमची बुद्धी जागृत होईल; परंतु शेवटी तुमच्या असे लक्षात येईल की, आध्यात्मिक उन्नतीची एक पायरीही तुम्ही चढलेला नाहीत.
आध्यात्मिक उन्नती करू इच्छिणार्या जिवांनी हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की, शिष्याच्या जीवनात गुरूंचे महत्त्व किती अनन्यसाधारण असते, हे केवळ शिष्य बनल्याविना अनुभवता येणे अशक्य आहे. गुरु शिष्याच्या जीवनात ज्ञानरूपी तेज प्रक्षेपित करून अज्ञानरूपी अंधःकार नाहीसा करतात. त्याला जीवन-मरणाच्या फेर्यांतून मुक्त करून त्याचेे जीवन कृतार्थ करतात.
बौद्धिक स्तरावर गुरु अनुभवता येणे, हे अशक्य आहे. साधना करून गुरुप्राप्ती होणे आणि गुरूंच्या कृपाशीर्वादाखाली जीवनयात्रा अनुभवता येणे, यासाठी प्रत्येक जिवाला साधना करून गुरुप्राप्ती करवून घेणे, हीच एक अनिवार्य अन् अत्यावश्यक अशी गोष्ट असतेे. आजच्या या प्रबोधनरूपी सत्संगात मला हेच आवर्जून सांगावेसे वाटते.
– श्री. धनंजय राजहंस, सनातन आश्रम, देवद, पनवेल.