भगवद्भक्ती हा जीवनाचा पाया आहे. भक्तीविना जीवन नीरस आहे. या भवसागरातून तरून जायचे असेल, तर भगवंताचा हात धरल्यावाचून तरणोपाय नाही. जीवनातील कोणतेही कार्य करतांना त्यात भगवंताला स्थान नसेल, तर ते आपल्याला जन्म-मृत्यूच्या फेर्यांत अडकवते; म्हणूनच समर्थ रामदासस्वामींनी म्हटले आहे –
सामर्थ्य आहे चळवळेचें । जो जो करील तयाचें ॥
परंतु येथें भगवंताचें । अधिष्ठान पाहिजे ॥ – दासबोध, दशक २०, समास ४, ओवी २६
याचा अर्थ असा की, कुठलेही कार्य किंवा चळवळ यांना भगवंताचे अधिष्ठान असल्याविना ती यशस्वी होत नाहीत.
सनातन संस्थेचे कार्य समाजाला साधना सांगणे, म्हणजे अध्यात्मसार करणे हे आहे. सनातनचे साधक स्वतःसाठी साधना करतात, म्हणजे व्यष्टी साधना करतात, तसेच समाजात अध्यात्मसार करणे, ही समष्टी साधनाही करतात.
नीती आणि धर्म यांच्या अभावामुळे समाजाची सध्याची खालावलेली स्थिती पहाता समाजाला केवळ साधना सांगणे पुरेसे नाही, तर समाजरचना सुसंस्कारित आणि धर्माधिष्ठित करणे आवश्यक आहे. त्यासाठी धर्माची पुनर्स्थापना करून ईश्वराधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना करणे आवश्यक आहे. त्यामुळे सध्या सनातनचे साधक समष्टी साधनेच्या अंतर्गत हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे ध्येय ठेवून यत्नरत आहेत. हे ध्येय साध्य करायचे असेल, तर या कार्यासाठी भगवंताचे अधिष्ठान हवे आणि त्याही पुढे जाऊन साधकांमध्ये भगवद्भक्तीचा भक्कम पाया हवा.
धर्मसंस्थापनेच्या सेवेमध्ये सनातनचे साधक जगद्गुरु श्रीकृष्णाला आदर्श मानतात. धर्मसंकटाच्या वेळी साधक जेव्हा आर्ततेने प्रार्थना करतात, तेव्हा श्रीकृष्ण धावून येतो आणि ते संकट दूर करतो, अशी त्यांना अनुभूती येते. श्रीकृष्णाने द्वापरयुगात त्याची भक्ती करणार्या गोपींमाणेच या कलियुगातही भक्तीचा सार करण्यासाठी सनातन संस्थेला गोपी-साधिका दिल्या आहेत. द्वापरयुगातील गोपींप्रमाणे कलियुगातील या गोपींच्याही ध्यानीमनी केवळ श्रीकृष्णच आहे. त्याच्याच प्राप्तीचा त्यांना ध्यास आहे. श्रीकृष्णाला स्मरून त्या सर्व कृती करतात. सर्वकाही श्रीकृष्णामुळेच होत आहे आणि तोच करत आहे, अशी त्यांची दृढ श्रद्धा आहे. या भक्तीमुळे त्यांची प्रतिभा जागृत झाली आहे. खरेतर बहुतेक गोपींचे केवळ शालेय शिक्षणच झाले आहे; पण तरीही त्या ज्ञान आणि भक्ती या दोन्ही मार्गांतील साधकांप्रमाणे स्वयंस्फूर्तीने लिखाण करू शकतात; तसेच साधकांना व्यष्टी साधनेसाठी सोप्या भाषेत मार्गदर्शनही करू शकतात.
गोपीभावातील या साधिकांनी अन्य साधकांसाठी भावसत्संग घेतले. त्यामध्ये त्यांनी साधकांना केलेले मार्गदर्शन टंकलिखित करून ठेवले आहे. साधना, अहं न्यून करणे, भाववृद्धी आणि समष्टी साधना या विषयांवर वेळोवेळी स्फुरलेले विचार त्यांनी लिहून ठेवले आहेत. हे सर्व लिखाण साधकांसाठी मार्गदर्शक असल्याने ते या ग्रंथरूपाने संकलित केले आहे.
भक्तीच्या संदर्भातील ग्रंथांमध्ये गोपींविषयीची माहिती आहे; पण त्यांना प्रत्यक्ष अनुभवत असल्यास त्यांची विविध वैशिष्ट्ये काय आहेत ? त्या बोलतात कशा ? त्यांची प्रत्येक कृती कशी असते ? त्या श्रीकृष्णाच्या अनुसंधानात कशा रहातात ? इत्यादी माहिती जाणून घेता येते. ही माहिती अनुभवजन्य असल्याने तिचे आकलन सहजतेने होते आणि आपल्याला त्याप्रमाणे अनुकरण करून ते कृतीत उतरवणे शक्य होते.
सनातनच्या रामनाथी आश्रमातील साधकांना गोपीभावातील साधिकांना अनुभवण्याचे भाग्य प.पू. डॉक्टरांच्या कृपेनेच लाभले; कारण त्यांनीच गोपीभावातील साधिकांना ओळखले. त्यांनी नुसती गोपींची ओळख करून दिली असे नव्हे, तर त्यांना साधनेच्या पुढील टप्प्यांचे मार्गदर्शन करून घडवले. त्यांच्या गुणांना पैलू पाडून त्यांना उजळवले. त्यांची गुणवैशिष्ट्ये साधकांना दाखवून दिली. एवढेच नव्हे, तर गोपीभाव स्वतःत कसा निर्माण करायचा ? याची शिकवण साधकांना मिळावी, यासाठी गोपींना भावसत्संगही घेण्यास सांगितले. गोपींची गुणवैशिष्ट्ये सर्वत्रच्या साधकांना, तसेच समाजालाही कळावीत आणि गोपींच्या संदर्भातील ही अमूल्य माहिती चिरंतन टिकून तिचा अखिल मानवजातीसाठी उपयोग होत रहावा, यासाठी प.पू. डॉक्टरांनी ती संकलित करून ग्रंथस्वरूपात सादर केली आहे. सर्वांचे कल्याण व्हावे, या उद्देशाने सर्व कृती करणे, हेच प.पू. डॉक्टरांसारख्या परात्पर गुरूंचे महत्त्व आहे.
या ग्रंथातून गोपीभावातील साधिकांचा कृष्णाप्रती भाव कसा आहे ?, हे लक्षात येईल. त्यांची प्रत्येक कृती कृष्णभावाने भरलेली आहे. गोपींच्या कृतीच्या आरंभी कृष्ण असतो, कृतीमध्ये कृष्ण असतो आणि कृतीनंतरही कृष्ण असतो, तसेच त्यांची प्रत्येक कृती कृष्णासाठीच असते. प्रत्येक कृती आणि प्रत्येक विचार सुचणे कृष्णकृपेनेच शक्य होत आहे, हाच गोपींचा भाव असल्याने त्यांची प्रत्येक कृती अन् प्रत्येक विचार कृष्णाला समर्पित असतो. त्या स्वतःमध्येही कृष्णाला पहातात आणि दुसर्यांमध्येही कृष्णाला पहातात. कृष्णाविना त्यांना दुसरा विचारच सुचत नाही. एक क्षणही कृष्णाविना गेला, तरी त्यांना पुष्कळ हळहळ वाटते. त्यांचा प.पू. डॉक्टरांप्रती उत्कट भाव आहेच; पण त्यांच्यामध्येही त्या कृष्णच पहातात. गोपींना कृष्णाशी एकरूप व्हायचे आहे. या कलियुगात गोपींचे असे वर्णन वाचून कदाचित् एखाद्याला ती अतिशयोक्ती वाटेल; पण हे वर्णन सत्य आहे. (ग्रंथातील) लिखाण वाचतांना आपली भावजागृती होईल आणि हेच या माहितीच्या सत्यतेचे प्रमाण आहे. कृष्णाप्रती असा भाव असल्यावर कृष्णाची कृपा या गोपींवर का नाही होणार आणि तो गोपींची पावलोपावली काळजी का नाही घेणार ?
साधक आणि जिज्ञासू यांना आवाहन आहे की, आपणही गोपी जशा भाव ठेवतात, तसा भाव ठेवून श्रीकृष्णाला अनुभवा अन् त्याचा कृपाशीर्वाद मिळवून जीवनाचे सार्थक करून घ्या.
ईश्वराने कृष्णभक्तीचा प्रसार करण्यासाठी सनातन संस्थेला द्वापरयुगातील गोपींप्रमाणे या कलियुगात गोपी दिल्या. रत्नपारख्याला हिर्याच्या खाणीतून मिळवलेल्या मातीतून हिरे शोधून काढावे लागतात, त्याप्रमाणे प.पू. डॉक्टरांनी सनातनच्या साधकांतून ईश्वराने दिलेल्या गोपीभावातील साधिकांना शोधून काढले. हिर्याच्या खाणीतून हिरे जरी मिळवले, तरी त्यांना पैलू पाडावे लागतात. तेव्हाच ते चमकू लागतात, म्हणजे तेजस्वी बनतात आणि मग त्यांना मोल येते. प.पू. डॉक्टरांनी ईश्वराने दिलेल्या गोपींना प्रसंगानुरूप मार्गदर्शन केले. ते त्यांनी गोपींच्या गुणांना पैलू पाडण्यासारखेच आहे ! त्यांनी केलेले हे मार्गदर्शन म्हणजेच त्यांनी गोपींना दिलेली शिकवण. गोपींनी ती त्या त्या वेळी लिहून ठेवली. या लेखमालेत गोपींना मिळालेली शिकवण वाचल्यास लक्षात येईल की, प.पू. डॉक्टरांनी गोपींना व्यष्टी साधनेमध्ये परिपूर्ण बनवण्यासाठी साधनेचे वेगवेगळे पैलू शिकवले, उदा. व्यवस्थितपणा, चुकांविषयीचे दृष्टीकोन, अहं त्यागणे, नामजपाद्वारे देवाशी अनुसंधान ठेवणे, दुसर्यांकडून सातत्याने शिकणे, ईश्वरेच्छेने वागणे इत्यादी. गोपींनी गुरूंप्रतीच्या भावामुळे गुरूंच्या देहात, म्हणजे सगुणात अडकू नये; म्हणून त्यांना सातत्याने श्रीकृष्णामुळे झाले, श्रीकृष्णाने केले, श्रीकृष्णाने शिकवले, असे म्हणायला शिकवून आणि श्रीकृष्णाप्रती भाव निर्माण करून श्रीकृष्णाकडे, म्हणजे निर्गुणाकडे जायला शिकवले. प.पू. डॉक्टरांनी गोपींना केवळ व्यष्टी साधना न शिकवता समष्टी साधनेचे, म्हणजे समाजाला सात्त्विक बनवण्यासाठी समाजात जाऊन अध्यात्मप्रसार करण्याच्या साधनेचे महत्त्व त्यांच्या मनावर बिंबवले. एवढेच नव्हे, तर त्यांना त्या साधनेसाठी सिद्धही केले. अशा प्रकारे व्यष्टी आणि समष्टी या दोन्ही साधना शिकवून गोपींचा साधनेतील प्रवास परिपूर्णत्वाकडे नेला.
प.पू. डॉक्टरांनी गोपींना केव्हा काय शिकवायचे ? हे काही ठरवून केलेले नाही; पण त्यांनी शिकवलेल्या सर्व सूत्रांचे संकलन केल्यावर लक्षात आले की, त्यांनी दिलेली शिकवण ही एखाद्याला साधनेच्या अंगाने घडवण्यासाठी, म्हणजेच ईश्वरप्राप्तीसाठी किती परिपूर्ण आहे ! प.पू. डॉक्टर परात्पर गुरु असल्याने त्यांची शिकवण, म्हणजेच ईश्वराची शिकवण आणि ती परिपूर्ण असणारच ! हेच गुरूंचे महत्त्व आहे.
प.पू. डॉक्टरांनी गोपींना दिलेल्या शिकवणीप्रमाणे श्रीकृष्णकृपेने गोपींची समष्टी साधना चालू झाली आहे आणि त्या दायित्व घेऊन सेवा करू लागल्या आहेत. हेच प.पू. डॉक्टरांच्या शिकवणीचे फलित आहे. या शिकवणीचा लाभ श्रीकृष्णकृपेने इतर साधक, तसेच जिज्ञासू यांनाही होवो आणि जिज्ञासू साधक बनून त्यांच्याकडून हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी समष्टी सेवाही घडो, ही श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना !
– (पू.) डॉ. मुकुल माधव गाडगीळ
आदर्श भक्तीभावाचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे गोपी !
‘गोपी म्हणजे सूक्ष्म-देहाने कृष्णतत्त्वाशी पूर्णतः एकरूप झाल्याचे एकमेव उदाहरण होय.
तदर्पिताखिलाचारता तद्विस्मरणे परमव्याकुलतेति ।
– नारदभक्तिसूत्र, अध्याय १, सूत्र १९
अर्थ : दिवसभरातील सर्व क्रियाकलाप, आचारादी सर्व ईश्वरार्पित बुद्धीने, म्हणजे ‘त्याच्यासाठीच, त्याच्या प्राप्तीसाठीच करतो’, अशी बुद्धी, भावना असणे आणि त्याचे विस्मरण झाले असता अत्यंत व्याकुळ किंवा दुःखी होणे, हे भक्तीचे एक द्योतक आहे.
श्रीकृष्णाप्रतीची उत्कट भावावस्था अनुभवणार्या गोपी !
‘गोपींचे श्रीकृष्णावर एवढे प्रेम होते की, त्या प्रत्येक क्षणी त्याचेच स्मरण करायच्या. त्यांच्या मनात सर्वत्र श्रीकृष्ण व्यापलेला होता. त्या मनाने सदैव त्याच्याच सेवेत होत्या. त्यामुळे स्वतःची शुद्धही हरपायच्या. त्यांना श्रीकृष्णाप्रती भाव वाढवण्यासाठी प्रयत्न करावेच लागले नाहीत. केवळ जागेपणी, म्हणजे जागृतावस्थेतच नव्हे, तर झोपेतही श्रीकृष्णाचे स्मरण होत असे. हे स्मरण म्हणजे प्रत्येक क्षणी श्रीकृष्णाला मारलेली हाक असायची. त्यांच्या मनात श्रीकृष्णाप्रतीचा भाव काही क्षण, काही घंटे किंवा काही दिवस न रहाता तो सततच असायचा.
श्वास घेण्याच्या प्रक्रियेप्रमाणे त्यांच्याकडून श्रीकृष्णाचे स्मरण आपोआप व्हायचे. त्या भावाच्या टप्प्याला असल्याने अल्प काळ जीवदशेत वावरायच्या. भावावस्थेमुळे त्यांना चैतन्य आणि आनंद सतत अनुभवता येत होता.’
भक्तीरसाने अन् गोपीभावाने ओथंबलेले युग असलेल्या द्वापरयुगाचा महिमा !
श्रीकृष्णाच्या भेटीसाठी आतुर असणारे सजीव आणि निर्जीव !
द्वापरयुगात वातावरण गोपीभावाने भारून गेलेले असायचे. येथील प्रत्येक झाडे-वेली, नभांगण, भूतलअंगण, गोप-गोपींची हृदये, गायी-वासरे, नद्या-जल सर्वकाही श्रीकृष्णभेटीतील भक्तीने ओथंबलेले असायचे. वातावरण श्रद्धा, भाव आणि भक्ती यांच्या त्रिवेणी संगमाने व्याप्त होते. भावाने देवाचा आशीर्वाद मिळतो, तर श्रद्धेने प्रत्यक्ष देवच भेटतो. प्रत्येक युगाचा युगधर्म निराळा असतो. द्वापरयुगाचा युगधर्मच हा होता.
‘श्रीकृष्णच सर्वस्व’ असणार्या गोपींचे भाववर्णन !
१. मूर्तीमंत चैतन्यरसता : गोपी म्हणजे श्रीकृष्णभेटीतील मूर्तीमंत चैतन्यरसता, तर प्रत्यक्ष श्रीकृष्ण म्हणजे ईश्वराचे पूर्णस्वरूप ब्रह्मत्व.
२. गोपी म्हणजे श्रीकृष्णस्वरूप भक्तीरसाने ओथंबलेली द्वैतातील प्रत्यक्ष सगुण शक्ती आहे.
३. गोपीमन हे ईश्वराच्या सर्वश्रेष्ठ अंगीभूत कार्यपैलूंनी भारलेले असणे : आर्तता, व्याकुळता, तरलता, स्पष्टता, सहजता, मोहकता, सुंदरता, समरसता, एकरूपता, अखंडता अशा गुणांनी व्याप्त असलेले गोपीमन हे ईश्वराच्या सर्वश्रेष्ठ अंगीभूत कार्यपैलूंनी भारलेले आहे.
४. गोपीभाव आणि कृष्णभाव यांना सर्वव्यापकता’ या गुणाने जोडलेले आहे. अशा प्रकारे या दोन भावांमध्येही अद्वैत तत्त्वच आहे.
५. श्रीकृष्णतत्त्वाच्या सर्वविध गुणांची अष्टपैलूत्वाने साकारलेली व्याप्ती पहायची असेल, तर गोपीभाव अनुभवायला हवा, तरच श्रीकृष्णभेटीची खरी आस, आर्तता यांची अनुभूती येऊ शकते.
६. श्रीकृष्णभक्तीतील प्रेमरसमय उत्कटता, म्हणजे गोपीभाव.
– एक विद्वान (सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ या ‘एक विद्वान’ या नावाने भाष्य करतात.)