गोपीभाव आणि कृष्णभाव

gopi_Samidha_Pratiksha-scr
१. गोपीभाव

गोपीभाव म्हणजे श्रीकृष्णभेटीची तळमळ अथवा श्रीकृष्णभेटीतील आर्तता.

२. कृष्णभाव

कृष्णभाव म्हणजे केवळ निखळ आनंद. कलियुगात या दोन्ही गोष्टी अत्यंत दुर्मिळ झाल्या आहेत.

३. द्वापरयुगाचा महिमा (भक्तीरसाने ओथंबलेले युग)

द्वापरयुगात मात्र सर्व वातावरणच गोपीभावाने भारून गेलेले असायचे. येथील प्रत्येक झाड-वेल, नभांगण, भूतलअंगण, गोप-गोपींची हृदये, गायी-वासरे, नद्या-जल सर्वकाही श्रीकृष्णभेटीतील भक्तीने ओथंबलेले असायचे. तेव्हा वातावरण श्रद्धा, भाव आणि भक्ती यांच्या त्रिवेणी संगमाने व्याप्त होते.

३ अ. श्रद्धा, भाव आणि भक्ती यांचे महत्त्व : भावाने देवाचा आशीर्वाद मिळतो, तर श्रद्धेने प्रत्यक्ष देवच भेटतो.

३ आ. प्रत्येक युगाचा युगधर्म निराळा असतो. द्वापरयुगाचा युगधर्मच भक्ती हा होता.

४. गोपींचे महत्त्व आणि त्यांच्या अंगीभूत गुणांचे विवरण

४ अ. मूर्तीमंत चैतन्यरसता

गोपी म्हणजे श्रीकृष्णभेटीतील मूर्तीमंत चैतन्यरसता, तर प्रत्यक्ष श्रीकृष्ण म्हणजे ईश्‍वराचे पूर्णस्वरूप ब्रह्मत्व.

४ आ. भक्तीरसाने ओथंबलेली द्वैतातील प्रत्यक्ष सगुण शक्ती

गोपी म्हणजे श्रीकृष्णस्वरूप भक्तीरसाने ओथंबलेली द्वैतातील प्रत्यक्ष सगुण शक्ती आहे.

४ इ. श्रीकृष्णस्वरूपाची साकारता

गोपी म्हणजे श्रीकृष्णस्वरूपाची तन्मयजन्य साकारता आहे.

४ ई. श्रीकृष्णरूपी चैतन्याची तरल धारा

गोपी एक श्रीकृष्णरूपी चैतन्याची तरल धारा आहे. तसेच ती श्रीकृष्णतत्त्वाची निखळ, निर्झर पारदर्शकता आहे.

४ उ. श्रीकृष्णाच्या हालचालीतील लवचिकता

ती श्रीकृष्णाच्या हालचालीतील लवचिकताही आहे, तसेच ती श्रीकृष्णतत्त्वरूपी ऊर्जेची गतीमानताही आहे.

४ ऊ. गोपीमन हे ईश्‍वराच्या सर्वश्रेष्ठ
अशा अंगीभूत कार्यपैलूंनी भारलेले असणे

आर्तता, व्याकुळता, तरलता, स्पष्टता, सहजता, मोहकता, सुंदरता, समरसता, एकरूपता, अखंडता, अशा सर्व गुणांनी व्याप्त असलेले गोपीमन हे ईश्‍वराच्या सर्वश्रेष्ठ अंगीभूत कार्यपैलूंनी भारलेले आहे.

४ ए. गोपींचे सर्वस्व म्हणजे श्रीकृष्ण !

गोपी म्हणजे श्रीकृष्णाचे सर्वस्व आहे, तर श्रीकृष्ण हा गोपींचे सर्वस्व आहे.

४ ऐ. गोपीभाव आणि कृष्णभाव या
दोहोंना सर्वव्यापकता या गुणाने जोडलेले असणे

गोपीभाव आणि कृष्णभाव या दोहोंना सर्वव्यापकता या गुणाने जोडलेले आहे. अशा प्रकारे या दोन भावांमध्येही अद्वैत तत्त्वच आहे.

४ ओ. गोपीभावाची अनुभूती आली, तरच
श्रीकृष्णभेटीची खरी आस आणि आर्तता यांची अनुभूती येऊ शकणे

श्रीकृष्णतत्त्वाच्या सर्वविध गुणांची अष्टपैलूत्वाने साकारलेली व्याप्ती पहायची असेल, तर गोपीभाव अनुभवायला हवा, तरच श्रीकृष्णभेटीची खरी आस, आर्तता यांची अनुभूती येऊ शकते.

४ औ. भक्तीरसातील माधुर्यता म्हणजे
गोपी, तर माधुर्यतेतील सहजता म्हणजे श्रीकृष्णभाव.

४ अं. श्रीकृष्णभक्तीतील प्रेमरसमय उत्कटता, म्हणजे गोपीभाव.

५. श्रीकृष्णभक्तीचे बीज अनेक
संतांनी भारतभूमीत पेरण्याची धुरा वहाणे

५ अ. भगवत् भक्तीची धुरा खांद्यावर
वहाण्यासाठी अनेक संतांनी भारतभूमीत जन्म घेणे

कलियुगात जरी तमोगुणापायी सर्वत्र अधर्म माजला असला, तरी भगवत्भक्तीची धुरा खांद्यावर वाहण्यासाठी अनेक संतांनी या मातीत जन्म घेतला आणि भक्तीचा अजोड महिमा सार्‍या विश्‍वाला शिकवला. यात वारकरीजन आघाडीवर होते.

५ आ. अनेक संतांनी आपल्या वाणीतून भागवतातील भक्तीधर्माचा प्रसार करणे

भागवतातील भक्तीधर्माची पताका अनेक संतांनी आपल्या भावरसपूर्ण ओजस्वी वाणीने सर्वत्र फडकवली.

५ इ. श्रीकृष्णगीताच्या आळवण्यातून सर्वत्र भावाचे बीज पेरण्यास प्रारंभ होणे

श्रीकृष्णगीतातून आळवल्या जाणार्‍या भावपूर्ण पदांतून याच भक्तीरसात न्हाऊन निघालेल्या भक्तांनीही मग सर्वत्र भाव-भक्तीचे बीज पेरण्यास प्रारंभ केला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात