श्रीकृष्णाने सुचवलेली साधनेच्या संदर्भातील सूत्रे आणि भावावस्थेत रहाण्याचे टप्पे

१. ओढ : देव पाहिजे असेल, तर आपल्यात देवाविषयीची ओढ निर्माण करावी लागते. त्या ओढीचा आनंद वेगळाच असतो.

२. तळमळ : ओढ निर्माण झाली की, मला देव पाहिजे, ही तळमळ वाढते आणि मग आपण हळूहळू देवाशी बोलायला लागतो.

३. देवाशी बोलणे : नंतर देवाशी बोलण्यातून आनंद मिळू लागतो. तो आनंद मिळावा; म्हणून आपले त्याच्याशी सतत बोलणेही चालू होते.

४. देवाला हाका मारणे : नंतर आपल्याला वाटू लागते, हा आनंद आता सदैव मिळायला हवा आणि त्यासाठी आपण देवाला हाका मारू लागतो.

५. सतत भावावस्थेत राहून सेवा करणे : नंतर आपल्याला जाणीव होते, देवाविना आपल्याला कोणीच नाही. तेव्हा आपण क्षणाक्षणाला त्याला हाक मारून तो समवेत असल्याचा आनंद घेऊ लागतो आणि सतत भावावस्थेत राहून सेवा करू लागतो.

६. देवाच्या सान्निध्यात असल्याचा भाव ठेवून दोषांविरुद्धची प्रक्रिया राबवणे : आपल्याला दोषांविरुद्ध प्रक्रिया राबवायची असेल, तर ‘देवाच्या सान्निध्यात आहे’, असा भाव ठेवून प्रयत्न करायला हवेत. त्या प्रसंगात देव आपल्याला साहाय्य करत असतो. देव माझ्यासमवेत आहे, हा मनात भाव असेल, तर तोच माझ्याकडून प्रयत्न करवून घेणार, याची मनाला जाणीव असते.

– कु. तृप्ती गावडे (२८.३.२०१२)

सतत भावावस्था

Gopi_bhav_2-scr

गोपींचे श्रीकृष्णावर एवढे प्रेम होते की, त्या प्रत्येक क्षणी त्याचेच स्मरण करत होत्या. त्यांच्या मनात सर्वत्र श्रीकृष्ण व्यापलेला होता. त्या सूक्ष्मातून, म्हणजेच मनाने सदैव त्याच्याच सेवेत होत्या. त्यामुळे त्यांना स्वतःची शुद्ध हरपायला होत असे. त्यांना श्रीकृष्णाविषयीचा भाव वाढवण्यासाठी काही प्रयत्न करावे लागले नाहीत. त्यांना केवळ जागेपणी, म्हणजे जागृतावस्थेतच नव्हे, तर झोपेत, म्हणजे सुुषुप्तीत (गाढ झोपेत) आणि तुर्यावस्थेतही (कुंडलिनी जागृत होऊन मूलाधारापासून निघून सहस्रारात पोहोचून तेथे स्थिर होते, त्या अवस्थेत) सतत श्रीकृष्णाचे स्मरण होत असे. हे स्मरण म्हणजे केवळ स्मरण नसून प्रत्येक क्षणी श्रीकृष्णाला मारलेली हाक असायची. गोपींच्या प्रेमात त्यांच्या सर्व देहांचा सहभाग होता. त्यांच्या मनात श्रीकृष्णाविषयीचा भाव काही क्षण, काही घंटे किंवा काही दिवस न रहाता तो सततच असायचा. जशी श्‍वास घेण्याची क्रिया आपोआप होते, तसे त्यांच्याकडून श्रीकृष्णाचे स्मरण आपोआप होत होते. त्या भावाच्या टप्प्याला असल्यामुळे फार अल्प काळ जीवदशेत वावरायच्या. भावावस्थेमुळे त्यांना चैतन्य आणि आनंद सतत अनुभवता येत होता.

श्रीकृष्णाने सुचवलेली साधनेच्या संदर्भातील सूत्रे

१. देवाने आपल्याला पुष्कळ शिकवले आहे. आपण नेहमी म्हणतो, ‘देव माझ्यासाठी अमुक अमुक करतो; पण मी देवासाठी काय करतो ?’, याकडेही आपण लक्ष ठेवायला हवे.

२. आपण म्हणतो, ‘मला काही जमत नाही.’ (स्वतःला काहीच जमत नसते.) ‘आपल्याला जमायला पाहिजे’, असे वाटत असेल, तर देवाची साथ घ्यायला पाहिजे.

३. एखाद्या प्रसंगात स्थिर रहाता आले नाही, तर आपण देवाला प्रार्थना करतो का ?

४. एखादा प्रयत्न देवाने सुचवला, तर देवाचरणी कृतज्ञ राहून तो प्रयत्न तळमळीने करतो का ?

५. देवाची क्षमा मागून लगेच चूक सुधारणे म्हणजे खर्‍या अर्थाने देवाची क्षमा मागणे असणे : आपल्याकडून चूक झाली, तर आपण देवाची क्षमा मागतो; पण चूक सुधारण्यासाठी प्रयत्न करत नाही. आपल्याकडून चूक होते, तेव्हा देवाची क्षमा मागून चूक लगेच सुधारायला पाहिजे, तरच ते खर्‍या अर्थाने देवाची क्षमा मागणे होते.

प्रत्येक सेवेला कृष्णाशी जोडण्याचे महत्त्व

 

१. सेवेला कृष्णाशी जोडणे

आपल्याला आपली प्रत्येक सेवा कृष्णाशी जोडता आली पाहिजे. आपण जे काही करतो, ते ईश्‍वराच्या नियोजनानुसार आणि त्याच्या इच्छेनुसार घडत असते; म्हणून आपण करत असलेली प्रत्येक सेवा कृष्णाशी जोडली पाहिजे.

२. धारिका पडताळणे

धारिका पडताळत असतांना ‘देवाने मला ही धारिका पडताळण्याची संधी दिली’, असा विचार हवा. सेवा भावपूर्ण, परिपूर्ण, तसेच प्रार्थना आणि नामजप करत करणे, म्हणजे ती कृष्णाशी जोडणे होय.

३. आवडीचा पदार्थ खाणे

आपल्याला अतिशय आवडणारा पदार्थ आपण अधिक खातो. त्यापेक्षा ‘मला तो पदार्थ जितका आवडतो, तितकाच इतरांनाही आवडतो आणि त्यांनाही तो मिळायला पाहिजे’, असा विचार करणे, म्हणजे खाण्याची कृती कृष्णाशी जोडणे.

४. कपडे धुणे

कपडे धुतांना पाणी भरपूर उपलब्ध असल्यास ‘देवाने मला पुष्कळ पाणी दिले आहे, तरी ते मला काटकसरीने वापरायचे आहे’, असा विचार करायचा आणि ‘देवा, तुझ्यामुळे हे झाले, तुझ्यामुळे घडले’, असे म्हणून प्रत्येक कृती श्रीकृष्णाशी जोडायची.

अशा प्रकारे प्रत्येक कृती श्रीकृष्णाशी जोडल्यामुळे कुठेही मनाचा सहभाग होत नाही, तसेच बुद्धीचा अडथळाही येत नाही; कारण तिथे ती कृती आपण देवाला अर्पण करत असतो.

– कु. तृप्ती गावडे

समष्टी साधना

krushna_kshama_uma_550

अ. एखादी चूक किंवा अपप्रकार घडला, तर क्षमा मागून लगेच सुधारणा करणे
आ. मिळालेल्या सेवेसाठी कृतज्ञ राहून देवाला शरण जाणे
इ. सतत शिकण्याच्या स्थितीत राहून स्वतः शिकलेले इतरांना शिकवणे
ई. सतत समष्टी कार्याची ओढ असणे

व्यष्टी साधना

Gopi_trupti-500

अ. मला श्रीकृष्ण पाहिजे आणि मला तो मिळवायचा आहे, असा भाव सतत मनात ठेवणे
आ. श्रीकृष्णाचा विचार सतत मनात येऊन आणि त्याची जाणीव होऊन प्रयत्न करणे
इ. स्वतःचे देहभान विसरून या देहात श्रीकृष्णच आहे, असा भाव ठेवणे
ई. सांगितलेले प्रयत्न कोणतेही स्पष्टीकरण न देता तत्परतेने करणे

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात