संगणकीय खेळ (व्हिडिओ गेम्स) – व्यक्ती आणि समाज यांचा नाश करणारे गोड विष !

संगणकीय खेळ (व्हिडिओ गेम्स) खेळतांना
व्यक्तीवर होणारा सूक्ष्मातील परिणाम दर्शवणारे सूक्ष्मचित्र

सध्या उन्हाळी सुट्टी चालू असल्याने अनेक मुले संगणकीय खेळ (व्हिडिओ गेम) खेळण्यातच आपला वेळ घालवतात. ती घंटोन्घंटे त्यातच रमलेली असतात. हे खेळ खेळतांना त्यांना ना आजूबाजूचे भान असते, ना जेवणाखाण्याचे भान असते. ती त्या खेळात जणू आकंठ बुडालेली असतात. अशा प्रकारे या खेळांच्या आहारी गेलेल्या मुलांना आणि त्यांच्या पालकांना या खेळांचे सूक्ष्मातील दुष्परिणाम समजावेत, या हेतूने वरील सूक्ष्म चित्र प्रसिद्ध करण्यात आले आहे.

 

१. संगणकीय खेळांची ओळख होऊन ते खेळण्याची
इच्छा निर्माण होणे आणि आईने लहानपणी ते खेळू न दिल्याने
स्वतंत्रपणे राहून महाविद्यालयीन शिक्षण घेतांना खेळण्याची सुप्त इच्छा पूर्ण होणे

श्री. देयान ग्लेश्‍चिच

मी १० वर्षांचा असतांना एका मित्राच्या घरी संगणकीय खेळ (व्हिडिओ गेम) प्रथमच पाहिला आणि खेळलोही. तेव्हापासून मला संगणकीय खेळ खेळण्याची प्रबळ इच्छा निर्माण झाली. त्यामुळे आई-वडिलांनी माझ्यासाठी एक संगणक घ्यावा, जेणेकरून मला संगणकीय खेळ खेळता येतील, या अपेक्षेत मी असायचो. सुदैवाने माझ्या आईला योग्य आणि अयोग्य याची जाण असल्याने तिने मला खेळण्यासाठी संगणक कधीच घेतला नाही; मात्र संगणकीय खेळ खेळण्याची माझी सुप्त इच्छा तशीच राहिली. मी १८ वर्षांचा झालो, तेव्हा स्वतंत्रपणे राहून महाविद्यालयीन शिक्षण घेत होतो. त्या वेळी मला मिळणारा सर्व मोकळा वेळ मी संगणकीय खेळ खेळण्यात घालवत असे.

 

२. संगणकीय खेळाचे व्यसन लागल्याने जेवणासाठीही
न उठता सलग १५ – १६ घंटे खेळणे आणि नंतर त्या खेळामुळे
पत्नीकडेही दुर्लक्ष केल्यामुळे वैवाहिक जीवनात समस्या निर्माण होणे

पुढील काही वर्षांत या खेळाची सवय वाढतच गेली आणि मोकळ्या वेळात मी सतत ते खेळत असे. त्या खेळांचे मला व्यसन लागले आणि त्यामुळे माझ्या आयुष्यात एक मोठी समस्या निर्माण झाली. काही वेळा आठवड्याच्या शेवटी असणारी सुट्टी मी पूर्णपणे खेळण्यात घालवत असे आणि काही वेळा सलग १५ – १६ घंटे मी खेळत असे. त्या वेळी मी जेवणासाठीही उठत नसे. थोडी चॉकलेट्स खाऊन आणि दूध पिऊन माझे खेळणे चालू ठेवत असे. कामाच्या दिवशीही मी खेळत असे. रात्री अगदी थोडा वेळ झोपत असे किंवा काही वेळा तर मी रात्रभर खेळून सकाळी थकलेला असतांनाही तसाच कामावर जात असे. मी माझ्या पत्नीकडेही दुर्लक्ष करत असल्यामुळे माझ्या वैवाहिक जीवनात अनेक समस्या निर्माण झाल्या. पत्नीला वेळ देण्याऐवजी संगणकीय खेळ खेळणे मी अधिक पसंत करत असे.

 

३. संगणकीय खेळ सोडण्याचाप्रयत्न करूनही ते न
सुटणेे, सतत खेळत राहिल्यामुळे अधूनमधून निराशेच्या अवस्थेत
रहाणे  आणि वास्तव स्वीकारणे अवघड होऊन लोकांपासून अलिप्त होणे

हा खेळ सोडण्याचा मी पुष्कळ प्रयत्न केला. त्या खेळाच्या माझ्याकडे असलेल्या सर्व ध्वनी-चित्रचकत्या (सीडीज) मी फेकून देत असे आणि संगणकातील खेळही पुसून टाकत असेे; परंतु थोड्याच वेळात मी दुकानात जाऊन या खेळांच्या आणखी ध्वनी-चित्रचकत्या विकत आणत असे. यात माझे पुष्कळ पैसे वाया जात असत. संगणकीय खेळ सतत खेळत राहिल्यामुळे अधूनमधून मला निराशेच्या अवस्थेतून जावे लागत असे. मला आयुष्य निरस वाटून वास्तव स्वीकारणे अवघड झाले होते. बर्‍याचदा हे खेळ हेच वास्तव आहे, असे मला वाटत असल्याने मी खेळाच्या जगतात रहात असे. त्यामुळे मी लोकांपासून अलिप्त झालो.

 

४. साधनेला आरंभ केल्यानंतर संगणकीय खेळ
खेळण्याची इच्छा उणावून ते २ सप्ताहातून केवळ एकदा २ घंटे खेळणे

वयाच्या २१ व्या वर्षी मी साधना करण्यास आरंभ केला.आरंभीच्या काळात संगणकीय खेळ हा माझ्या साधनेतील मोठा अडथळा होता; मात्र साधनेत माझी प्रगती होत गेल्यावर मला आतून शुद्ध आणि अधिक सुखद जाणवू लागले. त्यामुळे माझी संगणकीय खेळ खेळण्याची इच्छा उणावत गेली. प्रतिदिन संगणकीय खेळ खेळण्याऐवजी मी सप्ताहात काही वेळा खेळत असे. नंतर सप्ताहात २ वेळाच खेळत होतो आणि त्यानंतर २ सप्ताहातून केवळ एकदा मी खेळत होतो, तसेच खेळ खेळण्याचा कालावधी १० घंट्यांवरून थेट २ घंट्यांवर आला.

गेल्या २ वर्षांत माझी संगणकीय खेळ खेळण्याची इच्छा पुष्कळच अल्प झाली आहे. आता काही सप्ताहापर्यंत किंवा काही मासांपर्यंत (महिन्यांपर्यंत) मी संगणकीय खेळ खेळत नाही. काही ठराविक वेळाच संगणकीय खेळ खेळण्याची इच्छा वाढल्याने मी तो खेळत असे; परंतु हे काही दिवसांपर्यंतच टिकून नंतर माझे खेळणे थांबत असे.

 

५. संगणकीय खेळ खेळणे अल्प झाल्यामुळे
आयुष्यात दुःख निर्माण करणार्‍या एका मोठ्या ओझ्यापासून
मुक्तता झाल्याने हलके वाटणे आणि निराशेच्या अवस्थाही नाहीशा होणे

एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला आध्यात्मिक (वाईट शक्तींचा) त्रास आहे. माझा आध्यात्मिक त्रास वाढला की, माझी संगणकीय खेळ खेळण्याची इच्छा सक्रिय होत असे. प्रत्यक्षात ती इच्छा माझी नसून ती माझ्या मनात रुजवण्यात आली आहे आणि वाईट शक्ती ती वाढवत आहेत, असे मला वाटत असे. माझे खेळणे न्यून झाल्यामुळे मला मिळालेला मोकळा वेळ मी साधनेसाठी अधिकाधिक वापरू लागलो. त्यामुळे मला आतून पुष्कळ आनंद जाणवू लागला. माझ्या आयुष्यात दुःख निर्माण करणार्‍या एका मोठ्या ओझ्यापासून माझी मुक्तता झाली असल्यामुळे मला पुष्कळ हलके वाटले. माझ्या निराशेच्या अवस्था नाहीशा झाल्या आहेत. मी वास्तवात रहाण्याचे सुख उपभोगत असून जीवनाची योग्यता ओळखली आहे.

 

६. संगणकीय खेळाच्या व्यसनावर कायमस्वरूपी मात
करण्याची इच्छा निर्माण झाल्याने देवाला प्रार्थना करणे आणि
त्या वेळी खेळांच्या दुष्परिणामांच्या संदर्भात सूक्ष्मातून दृश्य दिसणे

सप्टेंबर २०१४ मध्ये माझा वाईट शक्तींचा त्रास वाढला. त्यामुळे माझ्या मनात परत संगणकीय खेळ खेळण्याची इच्छा वाढल्याने मी २ दिवस ते खेळलो. त्या वेळी मला ते मनापासून खेळायचे नव्हते; मात्र मी स्वतःवर नियंत्रण ठेवू शकत नव्हतो. या समस्येवर कायमस्वरूपी मात करण्याची इच्छा आतून निर्माण झाली. त्यामुळे मी देवाला संगणकीय खेळाचा स्वतःवर होणार्‍या परिणामांची तीव्रता मला समजू दे, अशी प्रार्थना केली. त्यानंतर काही मिनिटांतच मला त्यासंदर्भात आतूनच समजू लागले आणि संगणकीय खेळांमधून कोणत्या प्रकारची शक्ती (स्पंदने) प्रक्षेपित होते, तसेच खेळणार्‍याचे शरीर अन् मन ती शक्ती कशी शोषून घेते, ते मला सूक्ष्मातून दिसू लागले. याव्यतिरिक्त त्याक्षणी देवाने माझ्या मनातील संगणकीय खेळ खेळण्याचा संस्कारच न्यून केला आहे, असे मला आतून जाणवले. तेव्हापासून मला ते खेळ आवडेनासे झाले.

६ अ. सूक्ष्मातून दिसलेल्या दृश्याचे विवरण

६ अ १. संगणकीय खेळ खेळतांना मायावी आणि आकर्षण शक्ती संगणकाभोवती प्रक्षेपित होणे : यामुळे व्यक्तीला ते खेळ खेळण्याचे आकर्षण होते आणि त्यातून सुख मिळत असल्याचा तिला भास होतो.

६ अ २. काळी आणि हिरवी त्रासदायक शक्ती वातावरणात अन् खेळणार्‍या व्यक्तीकडे प्रक्षेपित होणे

६ अ ३. काळी आणि हिरवी त्रासदायक शक्ती संगणकाच्या ध्वनीक्षेपकांतून (स्पीकर्समधून) ध्वनीच्या रूपात प्रक्षेपित होणे

६ अ ४. व्यक्तीचे कान आणि मन यांत साठलेल्या काळ्या शक्तीच्या ढगांमुळे तिला काही न सुचणे आणि ती वास्तवापासून दूर जाणे

६ अ ५. काळी आणि हिरवी त्रासदायक शक्ती खेळणार्‍याच्या डोळ्यांत जमा होणे : यामुळे तिला खेळण्यासाठी ऊर्जा मिळते आणि ती वास्तवापासून रोखली जाते.

६ अ ६. संगणकातून प्रक्षेपित होणारी हिरवी त्रासदायक शक्ती व्यक्तीच्या हातांत आणि डोळ्यांत जाऊन तिला ते खेळण्यास ऊर्जा मिळणे

६ अ ७. व्यक्तीचे डोके आणि मन यांभोवती काळी त्रासदायक शक्ती निर्माण होणे : ही त्रासदायक शक्ती व्यक्तीच्या माध्यमातून सूक्ष्मातून वातावरणात पसरते.

६ अ ८. व्यक्तीच्या अहंमध्ये काळी त्रासदायक शक्ती जमा होणे : यामुळे व्यक्तीचा अहं वाढतो.

६ अ ९. व्यक्तीच्या डोक्याभोवती असणार्‍या मायावी शक्तीमुळे तिला मायावी आनंद मिळणे

६ अ १०. व्यक्तीच्या हृदयस्थानी असणार्‍या मायावी शक्तीमुळे तिची खेळण्याची इच्छा वाढणे

६ अ ११. मज्जातंतूंच्या जाळ्यात साठलेल्या मायावी आणि काळ्या त्रासदायक शक्तीमुळे संगणकीय खेळ खेळण्याची आवड वाढणे

 

७. संगणकीय खेळ निरुपद्रवी वाटत असले, तरी प्रत्यक्षात
ते अपायकारक असणे आणि त्यामुळे लोकांमधील स्वभावदोष अन् अहं वाढणे

गेल्या काही वर्षांपासून संगणकीय खेळ पुष्कळ लोकप्रिय झाले आहेत. १५ वर्षांपूर्वी फार अल्प लोक संगणकीय खेळ खेळत होते; परंतु अलीकडे लहान-मोठे यांसह बहुसंख्य लोकांसाठी हे खेळ म्हणजे वेळ घालवण्याचे (मनोरंजनाचे) साधन बनले आहे. एवढेच नव्हे, तर २ – ३ वर्षांची लहान मुलेही संगणकीय खेळ खेळत असतात. आपल्या सभोवताली पाहिल्यास कुणी ना कुणीतरी स्वतःच्या भ्रमणभाषवर संगणकीय खेळ खेळतांना दिसतोच. संगणकीय खेळ निरुपद्रवी वाटत असले, तरी प्रत्यक्षात ते अपायकारक आहेत. ते सूक्ष्मातून हळूहळू दुःखाकडे नेतात; कारण हे खेळ लोकांमधील स्वभावदोष आणि अहं वाढवतात.

७ अ. स्वभावदोष आणि अहं वाढण्याची प्रक्रिया

७ अ १. गर्व वाढणे : काही खेळांमधे ठराविक गुण मिळवायचे असतात. ते पूर्ण केल्यावर लोकांना त्याचा गर्व होतो. त्या गुणांची संख्या इतर लोकांनी पहावी, यासाठी ते प्रसिद्ध करतात किंवा त्यांच्या मित्रांना दाखवण्यासाठी फेसबुक प्रोफाईलवर ठेवतात. त्यामुळे व्यक्तीचा गर्व वाढतो.

७ अ २. बहिर्मुखता वाढणे : या मायावी जगात सतत रहाणे, अंतर्निरीक्षण न करणे, तसेच शांत स्थितीत न रहाणे आणि स्वतःमध्ये सुधारणा करण्याकडे लक्ष न देणे, यांमुळे व्यक्तीची बहिर्मुुखता वाढते.

७ अ ३. राग आणि आक्रमकता वाढणे : फर्स्ट पर्सन शूटर हा खेळ किंवा तत्सम मारामार्‍यांचे खेळ खेळल्यामुळे राग आणि आक्रमकता यांचे मनातील केंद्र वा संस्कार वाढतात.अनेक खेळाडू असलेल्या खेळांमध्ये खेळाडू एकमेकांना टोमणे मारतात किंवा दुसर्‍याचे मन दुखावेल, असे बोलतात. त्यामुळेही रागाचे केंद्र अधिक वाढते.

७ अ ४. स्वार्थीपणा वाढणे : या खेळांमधे ध्येय साध्य करण्यासाठी खेळाडू क्वचितच एकमेकांना साहाय्य करतात. बहुतेक खेळांमध्ये एकमेकांशी स्पर्धाच केली जाते. या खेळात एकमेकांवर आक्रमण करणे, एकमेकांच्या गोष्टी चोरणे, असे होत असल्यामुळे स्वार्थीपणाचा संस्कार बळावतो. काही वेळा एक गट म्हणून काही खेळाडू एकत्र खेळतात; मात्र ते दुसर्‍या गटातील खेळाडूंवर आक्रमण करतात. त्यामुळे स्वार्थीपणा तसाच टिकून रहातो.

७ अ ५. लोभीपणा आणि मायेतील गोष्टी यांची आसक्ती वाढणे : पैसा मिळवणे, मोठी घरे बांधणे किंवा शेतजमीन मोठी करणे इत्यादी बहुतांश खेळातील ध्येय असते. त्यामुळे मनातील लोभाचा संस्कार वाढतो आणि मायेतील वस्तूंची आसक्तीही वाढते.

 

८. संगणकीय खेळ चवीला गोड असणार्‍या एखाद्या
विषाप्रमाणे असून अंतिमतः त्या विषाने शरिराचा नाश करणे

कोणत्याही दोषातील वाढ ही दुःखाला कारणीभूत ठरते. दोषांमुळे व्यक्ती इतरांपासून दुरावते किंवा इतरांना आवडेनाशी होते, उदा. स्वार्थी व्यक्ती कुणालाही आवडत नाही. व्यक्ती तिच्यातील दोषानुसार वागत असेल, तर त्याचे पर्यवसान इतर व्यक्तींना दुखावण्यात होते, उदा. रागीट व्यक्ती एखादा दुखावेल, असे बोलते. त्यामुळे हे खेळ क्षणिक सुख देत असले किंवा ताण हलका करत असल्याचे वाटले, तरी कालांतराने ते आपल्याला दुःखाकडेच नेतात. हे एखाद्या चवीला गोड असणार्‍या विषाप्रमाणे असून, अंतिमतः ते विष शरिराचा नाशच करते.

 

९. लोकांना सत्यापासून दूर नेऊन मायावी स्थितीत
गुंतवून ठेवण्यासाठी वाईट शक्तींनी संगणकीय खेळांची निर्मिती करणे

ज्याच्यातून एवढ्या मोठ्या प्रमाणात त्रासदायक शक्ती प्रक्षेपित होते, तसेच व्यक्ती आणि समाज यांची हानी होण्यासाठी जी कार्यरत असते, त्याची निर्मिती चांगल्यापासून होणे शक्यच नाही.

लोकांना सत्य आणि जन्माच्या खर्‍या उद्देशापासून दूर नेऊन त्यांना मायावी स्थितीत गुंतवून ठेवण्यासाठी वाईट शक्तींनीच त्याची निर्मिती केली आहे.

 

१०. हसरे आसुरी तोंडवळे ही खेळ
सिद्ध करणार्‍या स्टुडिओची सूचक चिन्हे असणे
आणि समाजाला फसवून इच्छित परिणाम घडवून आणल्याने
वाईट शक्ती हसून काळाची लक्षणे सूचित करत असल्याची जाणीव होणे

     बर्‍याच खेळांच्या शेवटी तेे खेळ सिद्ध करणार्‍या स्टुडिओची सूचक चिन्हे (लोगो) असतात. बहुतांश स्टुडिओची सूचक चिन्हे एखाद्या भुताचे किंवा आसुरी तोंडवळ्याचे असलेले पाहून मला आश्‍चर्य वाटले. हे आसुरी तोंडवळे हसरे असतात. काही स्टुडिओंची नावेही आसुरी असतात. वाईट शक्ती त्यांच्यातील गर्व आणि उद्धटपणा यांमुळे समाजाला फसवून इच्छित परिणाम घडवून आणल्याने हसून काळाची (वाईट) लक्षणे सूचित करत आहेत, याची मला जाणीव झाली.

– श्री. देयान ग्लेश्‍चिच, युरोप (१०.१.२०१४)

सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला सूक्ष्म-परीक्षण म्हणतात. – संकलक

सूक्ष्म-ज्ञानाविषयीचे चित्र : काही साधकांना एखाद्या विषयासंबंधी जे जाणवते आणि अंतर्दृष्टीने जे दिसते, त्यासंबंधी त्यांनी कागदावर रेखाटलेल्या चित्राला सूक्ष्म-ज्ञानाविषयीचे चित्र असे म्हणतात.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात