मनाने सूक्ष्मातील जाणणे म्हणजे
अंतर्मनातील संस्कार केंद्रांचा हस्तक्षेप होऊ न देता
रिक्त मनाने सूक्ष्म स्पंदने जाणणे, म्हणजेच मनाच्या पलीकडील जाणणे
सूक्ष्मातील जाणणे म्हणजे पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील जाणणे. यांतील पंचज्ञानेंद्रियांच्या पलीकडील जाणणे, म्हणजे एखाद्या वस्तूचे रंग, रूप इत्यादी बाह्य गुणधर्म न बघता सूक्ष्मातील गुणधर्म जाणणे. त्यापुढे मनाने मनाच्या पलीकडील जाणणे म्हणजे काय ?, असा प्रश्न माझ्या मनाला पडला; कारण आपण एखाद्या गोष्टीचे सूक्ष्म-परीक्षण करतांना मनाला काय जाणवते ?, हे बघतो. त्याचे उत्तर देवाने पुढीलप्रमाणे दिले.
आपल्या मनामध्ये (अंतर्मनात) वासना केंद्र, आवड-नावड केंद्र, स्वभाव केंद्र इत्यादी संस्कार केंद्रे असतात. त्या केंद्रांमधून आपल्या मनामध्ये विचारतरंग उमटत असतात. जेव्हा आपण एखादी वस्तू बघतो, तेव्हाही आपल्या मनामध्ये आपल्या संस्कार केंद्रांनुरूप विचारतरंग मनात उमटतात, उदा. ती वस्तू आपल्याला आवडणारी असेल, तर ती आपल्याला चांगली असल्याचे वाटते. एखाद्या वस्तूविषयी आपल्या मनामध्ये पूर्वग्रह असतात. ती वस्तू बघितल्यावर त्या अनुरूपही आपल्या मनामध्ये विचार येतात. त्यामुळे एखाद्या वस्तूचे सूक्ष्मातील परीक्षण करायचे असेल, तर आपल्याला आपल्या मनात येणार्या या विचारांना बाजूला सारून निरपेक्षपणे किंवा साक्षीभावाने त्या वस्तूकडे बघावे लागते. यासाठी आपल्या मनातील संस्कार केंद्रांना पडद्याआड ठेवावे लागते. त्यांचा हस्तक्षेप होऊन चालत नाही. असे करणे म्हणजे मनाच्या पलीकडील जाणणे. यासाठी आपल्याला डोळे बंद करून आपले मन एकाग्र करावे लागते; कारण समोरच्या दृश्यामुळेही मनात विचार येतात. एखाद्याने ५ मिनिटे नामजप केल्यावर त्याचे मन रिक्त होते. तो त्या वस्तूशी एकरूप होऊ शकतो आणि मग त्याला मनाद्वारे त्या वस्तूची सूक्ष्मातील स्पंदने जाणता येतात.
त्यामुळे मनातील संस्कार केंद्रे जेवढी अल्प, तेवढी सूक्ष्मातील स्पंदने जाणण्याची क्षमता अधिक असते. साधनेद्वारे आपल्याला आपल्या मनातील संस्कार केंद्रे अल्प करता येतात, म्हणजेच मनोलय करता येतो. स्वभावदोष-निर्मूलन, अहं-निर्मूलन, नामजप, सत्संग, सेवा, त्याग, प्रीती आणि भावजागृती या अष्टांग साधनेचे हे महत्त्व आहे. संतांचा मनोलय झालेला असल्याने त्यांना मन एकाग्र करायची आवश्यकता नसते. त्यांना एखाद्या वस्तूचे सूक्ष्म-परीक्षण लगेचच करता येते, तसेच त्यांना डोळे उघडे ठेवूनही एखाद्या वस्तूविषयी तत्काळ सूक्ष्मातील कळते.
– (पू.) डॉ. मुकुल गाडगीळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१५.६.२०१६)