१. वायूप्रदूषण
वायूप्रदूषण अनेक रोगांना कारणीभूत ठरणारे आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते प्रतीवर्षी २४ लाख लोक त्यामुळे मरतात. वाढत्या औद्योगिकीकरणामुळे मोठ्या प्रमाणात रसायने, सूक्ष्मकण, जैविक घटक हवेत मिसळतात.
२. वायूप्रदूषण मापणारे यंत्र
प्रदूषकांची हवेेतील पातळी मोजून ती हवा श्वसनास योग्य कि अयोग्य ते ठरवले जाते. यात एअर-गोचे एक एअरमीटर येते. त्यात हवेतील हानीकारक घटक मोजले जाते. त्यानंतर एल्ईडी प्रकाशतात. जेवढे एलईडी प्रकाशित होतील, तेवढ्या प्रमाणात हवा प्रदूषित समजली जाते. अल्प एल्ईडी प्रकाशित झाले, तर हवा अल्प प्रदूषित आहे, असे समजतात आणि जास्त एल्ईडी प्रकाशित झाल्यास हवा जास्त प्रदूषित आहे, असे समजले जाते.
कार्बन मोनॉक्साईडचे प्रमाण मोजण्याच्या यंत्राला कार्बन मोनॉक्साईड मीटर असे म्हटले जाते. जवळपास सर्वच जीवाश्म इंधनांच्या ज्वलनातून कार्बन डाय ऑक्साईड वायू निर्माण होतो. हा वायू वातावरणात साठून राहिल्याने त्याचा एक थरच बनून पृथ्वीचे तपमान वाढते. जेव्हा एखाद्या पदार्थाचे ऑक्सिजनमुळे होणारे ज्वलन व्यवस्थित होत नाही, तेव्हा कार्बन मोनॉक्साईड वायू सिद्ध होतो. जेव्हा आपण न्हाणीघरात बॉयलर वापरतो, त्या वेळी तो ज्वलनासाठी लागणारा ऑक्सिजन त्या खोलीतून घेतो. खोली बंदिस्त असेल, तर त्याला ज्वलनासाठी पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही. त्यामुळे कार्बन मोनॉक्साईड हा विषारी वायू सिद्ध होतो. वाहनांच्या इंधनाचे योग्य प्रकारे ज्वलन झाले नाही, तरी त्याची निर्मिती होते. हवेतील कार्बन मोनॉक्साईडपासून वाचण्यासाठी बायोमिमेटिक आणि इलेक्ट्रॉनिक अलार्म वापरले जातात. ब्लॉब डिटेक्टरमध्ये मध्यभागी असलेला रंगीत भाग कार्बन मोनॉक्साईडच्या प्रमाणात वाढ झाल्यास काळा पडतो. इलेक्ट्रॉनिक अलार्म मॉनिटर, मेटल ऑक्साईड डिटेक्टर आणि इलेक्ट्रोलिटिक डिटेक्टर असेही प्रकार यात उपलब्ध आहेत. काही डिटेक्टर्समध्ये कार्बन मोनॉक्साइडचे प्रमाण थेट आकड्यांच्या रूपात दाखवले जाते. प्रदूषण करणार्या वायूचे प्रमाण हे पार्ट्स पर मिलियन (पीपीएम्) या एककात मोजले जाते. ३५ पीपीएम्च्या वर असलेले कुठलेही प्रमाण हे धोकादायक मानले जाते. कुठल्याही शहरात जेव्हा वाहनांचे प्रमाण वाढते, त्या वेळी हवेत कार्बन मोनॉक्साइडचे प्रमाण वाढत असते.
३. बीजिंग नगरातील वायूप्रदूषण घटण्यासाठी चीनने घेतलेला निर्णय
चीनमधील बीजिंग येथे तर प्रती दिवसाला एक सहस्र मोटारींची विक्री होत असल्याने प्रदूषणाचे प्रमाण पुष्कळ वाढले होते. त्यामुळे शेवटी स्थानिक प्रशासनाला मोटारींच्या विक्रीवर नियंत्रण घालावे लागले. यावरून कार्बन मोनॉक्साइडमुळे होणार्या प्रदूषणाचे गांभीर्य लक्षात येते.
– श्री. राजेंद्र येवलेकर (दैनिक लोकसत्ता, १३.४.२०११)
४. वायूप्रदूषणाची भीषणता
४ अ. वाहनांमधून विद्युतनिर्मिती करणार्या केंद्रांमधूनही काजळीचे सूक्ष्म कण बाहेर पडतात. हवा प्रदूषित करतात. हवेमधील काजळीच्या सूक्ष्म कणांच्या दीर्घकाळ संपर्कामध्ये आल्यास फुफ्फुसाचा कर्करोग आणि हृदयाचे अन्य विकारसुद्धा जडण्याची शक्यता असते. – श्रीराम सिधये, दैनिक महाराष्ट्र टाइम्स, मार्च २००२
४ आ. वाहनांमुळे होणारा प्रदूषणाचा प्रश्न तर जगभर भेडसावतच आहे आणि त्याचा सजीव अन् निर्जीव या दोहोंवर परिणाम होत आहे. कोलकाता येथे प्रदूषणामुळे भर दुपारी संध्याकाळ झाल्यासारखे वातावरण असते आणि तासा-दोन तासांत कपडे मळतात.
४ इ. थायलंडची राजधानी असलेल्या बँकॉक शहरात वाहनांच्या प्रचंड संख्येमुळे गंभीर वायूप्रदूषण झाले आहे. येथील मोठ्या रस्त्यांना लागून असलेल्या प्राथमिक शाळांतील मुलांच्या हिरड्यात आणि लघवीत शिसे साठलेले आढळून आले.
(दैनिक पुढारी, ३.६.१९९९)
४ ई. एक प्राध्यापक मित्र सांगत होते, न्यूयॉर्क, टोकीयो, लंडन अशा मोठ्या शहराची हवा, विलक्षण विषारी बनली आहे. माणूस सहन करू शकेल, यापेक्षा तीन पटींनी अधिक विष वातावरणात आहे, तरीही माणूस जगतो. इतके विष अंगवळणी पडले आहे. सवयीने वळण पडले आहे, विष पचवण्याची त्याची क्षमता वाढली आहे. मुंबईच्या हवेतही दोनपट विष नक्कीच आहे.
– गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (घनगर्जित, मार्च २००८)
४ उ. पेट्रोल आणि डिझेल यांच्या वापरामुळे वायू विषाक्त होणे : तुम्ही गाड्या चालवता ? पेट्रोल आणि डिझेल यांच्या वापरामुळे वायू किती विषाक्त करता ? वास्तविक हे विष कालवणारे हात तोडून टाकले पाहिजेत, असे नाही का आपणाला वाटत ?
– गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (घनगर्जित, जुलै २००९)
५. जागतिक वायूप्रदूषण
५ अ. कारणे, होणारे रोग आणि भयावह जीवितहानी !
५ अ.१. जगात भारत आणि चीन या देशांवर वायूप्रदूषणाचा सर्वाधिक परिणाम होणे
जगात प्रत्येक ८ वा मृत्यू हा वायूप्रदूषणामुळे होत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार संपूर्ण जगात एका दशकात घरात आणि बाहेर प्रदूषणामुळे होणार्या मृत्यूंचे प्रमाण ४ पट वाढले. प्रतिवर्षी प्रदूषणामुळे ८० लक्ष लोकांचे मृत्यू होत आहेत. जगात वायूप्रदूषणाचा सर्वाधिक परिणाम झालेल्या देशांमध्ये भारत आणि चीन यांचा समावेश आहे.
५ अ.२. वर्ष २००० च्या तुलनेत वायू प्रदूषणामध्ये ६ पट वाढ होणे
एंबियन्ट एअर पोल्यूशनच्या अहवालात ९१ देशांतील १ सहस्र ६०० शहरांचा आढावा देण्यात आला आहे. त्यामध्ये वर्ष २००० च्या तुलनेत वायू प्रदूषणामध्ये ६ पट वाढ झाली आहे.
५ आ. प्रदूषण वाढण्याची कारणे
५ आ.१. कोळसा वापरून वीजनिर्मिती करणे
५ आ.२. खासगी चारचाकी वाहनांवर अवलंबून असणे
५ आ.३. भवनांमध्ये (घरांमध्ये) ऊर्जेचा मोठ्या प्रमाणात वापर होणे
५ इ. प्रदूषणामुळे होणारे रोग
५ इ.१. श्वसन आणि हृदय यांच्याशी संबंधित रोग होणे
५ इ.२. फुफ्फुसाचा कर्करोग होणे
५ इ.३. तणावामध्ये वाढ होणे
५ इ.४. वायूप्रदूषणामुळे अॅलर्जी होणे
५ इ.५. लहान मुलांमध्ये कर्करोगाचा धोका उद्भवणे
५ इ.६. लहान मुलांची स्मरणशक्ती आणि बौद्धिक पातळी घटणे
५ ई. भारतात देहली हे सर्वाधिक प्रदूषित शहर असणे आणि जगातील २० सर्वाधिक
प्रदूषित शहरांमध्ये भारतातील १३ शहरांचा समावेश असणे
देहली हे सर्वाधिक प्रदूषित शहर आहे. २० सर्वाधिक प्रदूषित शहरांमधील १३ शहरे भारतातील आहेत. वर्ष १९५२ मध्ये लंडन शहर सलग ५ दिवस रासायनिक धुराने वेढले होते. त्या वेळी ४ सहस्र जणांचे मृत्यू झाले. चीनमध्ये वायू प्रदूषणामुळे प्रत्येक वर्षी ५ लक्ष लोकांचे मृत्यू होतात. शंघाय शहरात ३० प्रतिशत शासकीय वाहनांवर बंदी घालण्यात आली आहे.
५ उ. जगात सर्वांत स्वच्छ देश असलेल्या स्वीडनने कार्बन कर लावून पर्यावरण वाचवणे
जगातील सर्वांत स्वच्छ देश असलेल्या स्वीडनने कार्बन कर लावून केवळ पर्यावरण वाचवले नाही, तर आपली आर्थिक स्थितीही सुधारून घेतली.
(संदर्भ : मासिक आर्य नीति, जुलै २०१५)
६. वायूप्रदूषणामुळे होणारी अपरिमित हानी !
६ अ. शारीरिकदृष्ट्या
६ अ.१. फटाके फोडले जातात, तेव्हा त्यातून मोठ्या प्रमाणात विषारी धूरही होत असतो. त्यामुळे दिवाळीच्या दिवसांत दम्याच्या रुग्णांत वाढ होते.
६ अ.२. फटाक्यांमुळे वातावरणात पसरणारा विषारी वायू सर्वच नागरिकांच्या आरोग्याला हानीकारक असतो.
६ आ. पर्यावरणदृष्ट्या
६ आ.१. फटाक्यांमुळे केवळ पैशांचा अपव्यय होतो, असे नाही, तर पुष्कळ प्रमाणात कचरा, धूळ आणि धूर या अनिष्टकारक गोष्टी विनाकारण निर्माण होतात.
६ इ. आर्थिकदृष्ट्या
६ इ.१. कोट्यवधींच्या रुपयांच्या फटाक्यांचा धूर हवेत सोडणे अयोग्य ! : एकट्या महाराष्ट्रात दिवाळीत १२ कोटी रुपयांचे फटाके वाजवले जातात, हा आकडा ख्रिस्ताब्द १९९९ चा आहे. आजची फटाक्यांची उलाढाल सहजच १०० कोटी रुपयांहून अधिक आणि भारतभरातील सहस्रो कोटी रुपये असेल ! दिवाळीच्या सणाचा आनंद साजरा करण्यासाठी कोट्यवधींच्या रुपयांच्या फटाक्यांचा धूर हवेत सोडणे, हे उचित आहे का ?
६ इ.२. फटाके उडवणे म्हणजे दिवाळीत स्वतःचे आर्थिक दिवाळे काढणे : खरी दिवाळी फटाके विकणार्यांची असते; कारण पाच रुपयांचा फटाका विव्रेता वीस रुपयांना विकत असतो. तरीही पाच-पाच, दहा- दहा सहस्र रुपयांचे फटाके उडवणारे लोक आपल्याकडे अल्प नसतात. खरी दिवाळी त्यांचीच असते, बाकीच्यांचे म्हणजेच दुष्परिणाम सहन करण्यार्यांचे दिवाळी दिवाळे काढून जाते.
६ ई. मानसिकदृष्ट्या
६ ई.१. फटाक्यांमुळे लहान मुलांमध्ये निर्माण होणारी विकृती ! : दारात भिकार्याच्या झोळीत एखादी करंजी टाकण्यापेक्षा त्याच्या पायाजवळ अॅटमबाँब फोडून त्याला पळवून लावण्यात सध्याची लहान मुले धन्यता मानतात. फटाक्यांनी निर्माण केलेली ही विकृती आहे.
हे सर्व दुष्परिणाम पाहिले, तर फटाके न उडवणेच श्रेयस्कर !