१. वयोवस्थेनुसार करण्यात येणार्या शांती आणि त्यांच्या देवता
वयोवस्थेनुसार विविध शांतीकर्मे चालू करण्यास शास्त्रात सांगितलेले आहे. मानवी आयुर्मान सामान्यतः शंभर वर्षांचे आणि वेदोक्त आयुर्मान एकशेवीस वर्षांचे कल्पून अर्धे आयुष्य संपत येताच शांतिकर्म चालू करावयास सांगितलेले आहे. प्रत्येक शांतीसाठी विविध देवता असून त्यांची नावे भिन्न आहेत.
२. वयोवस्थेनुसार शांतीकर्म केव्हा करावे ?
जन्मतिथीप्रमाणे ती ती वयोवस्था प्राप्त होण्यापूर्वी शांती होणे आवश्यक आहे, उदाहरणार्थ, एकोणपन्नासावे वर्ष पूर्ण होताच वैष्णवीशांती व्हावी; पण काही वेळा अडचणीमुळे उक्तकाली शांती करणे शक्य न झाल्यास नंतरही करता येते. अशा वेळी तो अतिक्रांत काल समजावा. ठराविक शांतिकाल उलटल्यानंतरही सुमारे तीन वर्षापर्यंत अतिक्रांत काल समजण्यात येतो.
३. वयोवस्थेनुसार शांतीमध्ये कोणते विधी करावेत ?
वयोवस्थेनुसार शांतीमध्ये देवतापूजन आणि हवन यांव्यतिरिक्त वर्धापनदिनाप्रमाणे तीळगूळ आणि दूध यांच्या मिश्रणाचे प्राशन, नारीनीराजन (सुवासिनींनी ओवाळणे), अभिषेक, विविध सूक्तांचे पठण इत्यादि विधी करावेत. विविध सूक्तांमध्ये सप्तचिरंजीवप्रार्थना, ब्रह्मणस्पतिसूक्त, श्रीसूक्त, पुरुषसूक्त, रुद्र (किंवा रुद्रसूक्त), शांतिसूक्त, इतिवाइतिसूक्त, अग्निमीळेसूक्त, समुद्रज्येष्ठासूक्त, परंमृत्योसूक्त, पवमानसूक्त इत्यादी सूक्ते यशाशक्ती, यथावकाश पठण करावीत.
४. वयोवस्थेनुसार विधीयुक्त शांती करणे
आर्थिकदृष्ट्या अशक्य असल्यास काय करावे ?
ज्या वेळी विधीयुक्त सर्व शांती करणे आर्थिकदृष्ट्या अशक्य असेल, त्या वेळी मृत्युंजय महारथी, ऐंद्री इत्यादी पंचवर्षीय शांती न करता महत्त्वाच्या दशवर्षीय (वैष्णवी, उग्ररथ, भैमरथी, सहस्रचंद्रदर्शन) इत्यादी शांती अवश्य कराव्यात. तेही शक्य न झाल्यास त्या त्या वाढदिवशी वर्धापन विधी, भोजन, दान या न्यूनतम गोष्टी तरी कराव्यात.
५. तुलाविधी करावयाचा असल्यास कसा करावा ?
वयोवस्था शांतीच्या दिवशी दानात्मक तुलाविधी करण्याचा प्रघात आहे. तुलाविधी हा आपापल्या ऐपतीनुसार करावा. गहू, डाळ, तांदूळ, साखर, कपडे, फळे, नारळ इत्यादी पदार्थ तुलाविधीसाठी वापरले जातात.
तुला करण्यापूर्वी प्रथम मम इहजन्मनि धर्मार्थकामरूप-पुरुषार्थसिद्धिद्वारा विकारनाश-मन:शान्ति-चित्ततुष्टि-ईशभक्ति-प्राप्त्यर्थ्यं जन्मान्तरे च स्वर्लोकपूर्वकम् अपवर्गसिद्ध्यर्थं श्रीपरमेश्वरप्रीत्यर्थ…..(तुलेचे नाव घ्यावे, उदा. धान्य, वस्त्र, फल) तुलां करिष्ये । म्हणजे मला या जन्मात धर्म, अर्थ आणि काम यांच्या रूपाने पुरुषार्थ प्राप्त झाल्याने माझ्या विकारांचा नाश व्हावा, मनाला शांती लाभावी, चित्त संतुष्ट व्हावे आणि भगवंताची भक्ती करण्याची मला प्रेरणा मिळावी, तसेच हा देह ठेवल्यावर स्वर्गलोक प्राप्त होऊन पुढे मोक्षप्राप्ती व्हावी, यांसाठी परमेश्वराची माझ्यावर कृपा असावी; म्हणून मी ही (तुलेचे नाव) तुला करत आहे, असा संकल्प करून प्रथम गणेशपूजन करावे. नंतर दक्षिणोत्तर तुलेचे (तागडीचे) पूजन करून तिला माला अर्पण कराव्यात. तुलेची पारडी समान आहेत, अशी सर्वांसमक्ष निश्चिती झाल्यावर मग व्यक्तीला तुलेच्या दक्षिणेकडील पारड्यात बसून उत्तरेकडील पारडे भरू द्यावे. दोन्ही पारडी समान झाल्यावर प्रथम व्यक्तीचे पारडे भूमीवर ठेवून द्यावे. व्यक्ती खाली उतरल्यावर दुसर्या पारड्यातील द्रव्य खाली उतरून घ्यावे.
(संदर्भग्रंथ : शास्त्र असे सांगते ! – वेदवाणी प्रकाशन)
– सौ. प्राजक्ता जोशी, ज्योतिष फलित विशारद, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१९.५.२०१६)