रणांगणावर क्षात्रवृत्ती जागृत होऊन लढण्यासाठी स्फूर्ती मिळावी, यासाठी गर्जावयाच्या जय हरहर या शब्दाचा अपभ्रंश, म्हणजे जोहार हा शब्द. देव, देश आणि धर्म यांच्यावर संकट आले असता, त्यांच्या रक्षणासाठी युद्धसज्ज होतांना मागचे सर्व पाश सोडून जाण्याच्या निकराच्या प्रसंगी उच्चारावयाचा हा महामंत्रच आहे. शत्रूकडून स्त्रियांची विटंबना होऊ नये, यासाठी सर्व लहान-थोर स्त्रियांनी पेटत्या अग्नीत उडी टाकून आत्मसमर्पण करायचे आणि पुरुषांनी युद्धात निकराने लढायचे, अशी राजपुतान्यातील गौरवशाली परंपरा म्हणजे जोहार.
१. पहिला जोहार (ख्रिस्ताब्द १३०३)
अल्लाउद्दीन खिलजीने चितोडचा राणा भीमसिंह याची राणी पद्मिनी हिच्या सौंदर्याचे वर्णन ऐकून तिच्या अभिलाषेेने प्रचंड सैन्यानिशी चितोडवर स्वारी केली. भीमसिंहाला जयाची निश्चिती वाटेना. तेव्हा सर्व योद्ध्यांनी आपल्या स्त्रिया, सुना, मुली यांना अग्नी पेटवून दिला. त्या अग्नीत पद्मिनीसह सहस्त्रो स्त्रियांनी उड्या टाकून प्राणार्पण केले. नंतर पुरुषांनी प्राणपणाने लढूून आत्मसमर्पण केले. चितोड येथे झालेला हा पहिला जोहार.
२. दुसरा जोहार (ख्रिस्ताब्द १५३३)
गुजरातचा सुलतान बहादूर याने फार मोठे सैन्य जमवून चितोडवर स्वारी केली. त्या वेळी मेवाडचा राणासंग याचा पुत्र विक्रमाजित गादीवर होता. सर्व रजपूत विक्रमाजितच्या साहाय्याला धावले; परंतु निभाव लागेना. शेवटी विक्रमाजितची आई (राणासंगाची पत्नी) जवाहिरबाई हिने स्वतः लढाऊ वेष धारण केला आणि ती रणांगणावर उतरली. या संग्रामात ती धारातीर्थी पडली. हे समजताच जयाची आशा नसल्याचे पाहून ज्वालाग्राही पदार्थाची मोठी आग पेटवून त्यांत १३ सहस्र स्त्रियांनी जोहार करून आत्मबलीदान केले. नंतर सर्व रजपूत योद्ध्यांनी युद्धात आत्मसमर्पण केले.
३. तिसरा जोहार (ख्रिस्ताब्द १५६८)
देहलीत अकबर बादशहाची सत्ता असतांना चितोडवर उदेसिंग राजा राज्य करत होता. अकबराने प्रचंड मोठ्या सैन्यानिशी चितोडवर स्वारी केली. त्या वेळी आपले सैन्य आणि बळ अल्प पडत असल्याचे लक्षात आल्यावर ८ सहस्र रजपूत वीर केसरी पोशाख चढवून अकबराच्या सेनासागरावर प्राणपणाने तुटून पडले. या युद्धात सर्व रजपूत मृत्यूमुखी पडले. अकबराने चितोड नगरात शिरून ३० सहस्र लोकांची कत्तल केली. राजस्त्रिया आणि मुली यांच्यासह सतराशे स्त्रियांचीही त्याने कत्तल केली. कुणालाही जिवंत ठेवले नाही. अकबराने युद्धात वीरमरण आलेल्या रजपूत विरांची जानवी सैन्याकडून गोळा केली. त्यांचे वजन ७४॥ मण (२९८० किलो) भरले. सर्व राजस्थान हळहळला. त्या दिवसापासून आजपर्यंत रजपूत लोक आणि सराफ आपले महत्त्वाचे कागद, हुंड्या यांच्यावर ७४॥ ही संख्या लिहितात. ही संख्या सतत स्मरणात राहिल्याने आपला स्वाभिमान सतत जागा रहावा, हा यामागचा उद्देश आहे. या आकड्यास आज चितोड मार्याको पाप असे म्हणतात.
या युद्धाच्या वेळी अकबराने स्वतः ऐकलेले रजपूत स्त्रियांचे शब्द आपल्या रोजनिशीत जसेच्या तसे लिहिले आहेत. तो लिहितो, त्या चितोड स्वारीत प्रत्येक माता आपल्या मुलाला म्हणत होती, मुलांनो, चितोडच्या बचावाकरता आपला निर्वंश झाला, तरी चालेल; परंतु लढण्याची शिकस्त करा.
४. इतर असंख्य जोहार
या तीन जोहारांची इतिहासात नोंद असली, तरी असे असंख्य जोहार झाले असून असंख्य वीरमाता, वीरभगिनी, वीरकन्या आणि वीरपत्नी यांनी हिंदु धर्माच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. भारताच्या गौरवाची पताका फडकत ठेवणार्या या वीरांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम !
– प्रा. सु.ग. शेवडे (भारतीय संस्कृती)