आर्क्टिक समुद्रातील बर्फ नष्ट होणार ! – केंब्रिज विद्यापिठातील वैज्ञानिकाचा दावा

विज्ञानाच्या कथित प्रगतीचे आणि
लाभाचे हे दुष्परिणाम पृथ्वीला विनाशाकडेच नेत आहेत,
हे पुरोगाम्यांना आणि आधुनिकतावाद्यांना लक्षात येईल तो सुदिन !

ग्लोबल वॉर्मिंगचा दुष्परिणाम !

snow_melt_1_Clr
आर्क्टिक समुद्रातील वितळत चाललेला बर्फ

नवी देहली – आर्क्टिक समुद्रातील बर्फ यावर्षी किंवा पुढील वर्षी नष्ट होईल, असा दावा लंडन येथील केंब्रिज विद्यापिठातील पोलस ओशन फिजिक्स ग्रुपचे प्रमुख प्रा. पीटर वॅडहॅम्स या वैज्ञानिकाने केला आहे. त्यांनी ४ वर्षांपूर्वीच हे भाकित केले होते, असे त्यांनी म्हटले आहे.

१. यूएस् नॅशनल स्नो अँड आइस डाटा सेंटर या संस्थेच्या माहितीनुसार १ जून २०१६ च्या अखेरपर्यंत आर्क्टिकमध्ये १ कोटी ११ लक्ष चौरस किलोमीटर सागरी बर्फ होता. गेली ३० वर्षे तो सरासरी १ कोटी २७ लक्ष चौरस किलोमीटर असायचा. हा फरक १६ लक्ष चौरस किलोमीटरचा असून तो भाग ब्रिटनच्या ६ पट इतका क्षेत्रफळाने आहे.

२. प्रा. पीटर वॅडहॅम्स यांच्या मते सप्टेंबर अखेर १० लाख चौरस किलोमीटर भागातील बर्फ वितळलेले असेल. बर्फ पूर्ण नष्ट झाला नाही, तरी तो अल्प असण्याचे हे आणखी एक विक्रमी वर्ष असेल. तो ३४ लक्ष चौरस किलोमीटरपेक्षा अल्प असेल.

३. आर्क्टिक आणि उत्तर ध्रुवाचा मधला भाग बर्फमुक्त असेल. बाकीचा बर्फ हा आर्क्टिक क्षेत्राच्या आसपास असलेल्या आणि कॅनडाच्या उत्तर किनार्‍यावरील बेटांवर अडकून राहील. यापूर्वी १ लाख ते १ लाख २० सहस्र वर्षांपूर्वी आर्क्टिक बर्फमुक्त झाला होता, असेही वॅडहॅम्स म्हणाले.

४. ध्रुवीय प्रदेशातील तापमानात वाढ होत आहे. हवामानातील टोकाचे परिणाम बॉम्ब सायक्लॉनच्या रूपात दिसतात. अमेरिकेत वादळे आणि पूर आले. ब्रिटनमध्ये पूर आले. रशियाच्या उत्तर किनार्‍यावर पाण्यावरचे बर्फ नष्ट झाले त्यामुळे सागरी जल तापत गेले.

५. वैज्ञानिकांच्या मते मिथेन वायू गोठलेल्या भागातून बुडबुड्याच्या रूपात दिसला आहे.

६. नेचर या नियतकालिकात प्रा. पीटर वॅडहॅम्स आणि इतरांनी म्हटले आहे की, ५ वर्षांत ०.६ अंश सेल्सियस तापमानवाढ होऊ शकते आणि ते फार धोकादायक आहे. अल्प बर्फ म्हणजे सूर्याची अधिक ऊर्जा पृथ्वी शोषून घेईल. बर्फ नष्ट होईल, तेव्हा सगळी स्थिती पालटेल. आर्क्टिकमधील बर्फ सप्टेंबरमध्ये अल्प असते आणि नंतर हिवाळ्यात ते पुन्हा साठते.

७. हवामानतज्ञ डॉ. पीटर ग्लेक यांनी सांगितले की, प्रा. पीटर वॅडहॅम्स यांचे भाकित खरे ठरेल कि नाही, हे मी सांगू शकत नाही; पण जर ते खरे ठरले नाही, तर हवामान पालटाच्या संदर्भातील विरोधकांची वैज्ञानिकांवरील टीका वाढेल.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात