गुरुकुलासम आश्रमांची निर्मिती !
गुुरुकूल वातावरण उपलब्ध व्हावे, यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी गुरुकुलासम आश्रमांची निर्मिती केली आहे. त्यांच्या प्रेरणेतून रामनाथी (गोवा), देवद (पनवेल), मिरज (सांगली) या ठिकाणी असलेल्या आश्रमांतून, तसेच आश्रमासम असलेल्या सेवाकेंद्रांतून शेकडो साधक पूर्णवेळ साधना करत आहेत.
साधकांच्या आध्यात्मिक उन्नतीच्या दृष्टीने केलेले कार्य
गुरुकृपायोग या शीघ्र ईश्वरप्राप्तीसाठी असलेल्या योगमार्गाचे जनक !
जिज्ञासूंना शीघ्र ईश्वरप्राप्ती करता यावी, यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी कर्म, भक्ती आणि ज्ञान या योगमार्गांचा संगम असलेला गुरुकृपायोग सांगितला. व्यक्ती तितक्या प्रकृती, तितके साधनामार्ग या सिद्धांतानुसार गुरुकृपायोगात साधना शिकवली जात असल्याने साधकाला शीघ्र आध्यात्मिक उन्नती करता येते. २०.५.२०१६ पर्यंत गुरुकृपायोगानुसार साधना केल्याने ६५ साधक संतपदी विराजमान झाले आहेत, तर ८४६ साधकांनी ६० टक्क्यांहून अधिक पातळी गाठली असून त्यांचा आध्यात्मिक प्रवास संतत्वाच्या दिशेने होत आहे. या साधनामार्गाचे विदेशातील जिज्ञासूही आचरण करत असून स्वतःचे जीवन उद्धरत आहेत.
(याविषयीची सविस्तर माहिती सनातनच्या गुरुकृपायोगानुसार साधना या ग्रंथात दिली आहे.)
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनामुळे
साधकांच्या झालेल्या आध्यात्मिक उन्नतीची लक्षणे !
१.एखादी वस्तू, घटना वा काळ यांच्या संदर्भात सूक्ष्मातून कोणती प्रक्रिया घडली, याविषयी सूक्ष्म-परीक्षण (टीप) करता येणे
२. एखाद्या विषयाचे पृथ्वीवर कुठेही उपलब्ध नसलेले ज्ञान सूक्ष्मातून (दृश्य किंवा विचार यांच्या स्वरूपात) प्राप्त होणे
३. दुसर्याची आध्यात्मिक पातळी ओळखू शकणे
४. पंचमहाभूतांची स्थूल अन् सूक्ष्म चांगली आणि वाईट लक्षणे सांगता येणे
५. चांगल्या अन् वाईट शक्तींचे परिणाम आणि प्रकटीकरण ओळखता येणे, वाईट शक्तींच्या प्रकटीकरणावर उपाय सांगता येणे
(टीप – सूक्ष्म-परीक्षण : एखादी घटना कशी घडली, याविषयी पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांचा वापर न करता मिळालेली माहिती.)
साधकांच्या साधनेकडे व्यक्तीगत लक्ष देण्यासाठी
व्यष्टी आणि समष्टी साधनेचा आढावा देण्याच्या पद्धतीची निर्मिती !
परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांच्या आध्यात्मिक उन्नतीकडे व्यक्तीगत लक्ष देण्यासाठी व्यष्टी आणि समष्टी साधनेचा आढावा देण्याची पद्धत विकसित केली. व्यष्टी साधनेचा आढावा देण्याच्या पद्धतीमुळे साधकांमध्ये स्वतःच्या चुका आणि स्वतःतील स्वभावदोष प्रांजळपणे मांडण्याइतकी निर्मळता आली, तर समष्टी साधनेचा आढावा देण्याच्या पद्धतीमुळे समाजाशी जवळीक साधण्यातील स्वतःच्या त्रुटी साधकांना समजल्या, तसेच व्यष्टी पातळीचा गोपीभाव (टीप) असलेल्या साधिकांमध्ये समष्टी भाव निर्माण होऊन त्या तरुण वयातच अनेक जिल्ह्यांचे अध्यात्मप्रसाराचे दायित्व सांभाळू लागल्या आहेत.
(टीप – गोपीभाव म्हणजे भगवान श्रीकृष्णच जीवनातील सर्वकाही असून त्याच्या सतत अनुसंधानात रहाणे. याविषयीची माहिती सनातनच्या गोपीभाव ग्रंथमालिकेत दिली आहे.)
ज्ञानशक्तीद्वारे चालू असलेले कार्य
कुठलेही कार्य होण्यासाठी इच्छाशक्ती, क्रियाशक्ती आणि ज्ञानशक्ती यांपैकी एकाची आवश्यकता असते. यांपैकी ज्ञानशक्तीद्वारे केलेले कार्य हे क्रियाशक्तीला दिशा आणि इच्छाशक्तीला प्रेरणा देत असल्याने ते श्रेष्ठ ठरते. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे कार्य हे ज्ञानशक्तीच्या आधारे चालू आहे. त्याचे संक्षिप्त स्वरूप पुढे दिले आहे.
वर्ष |
ज्ञानशक्तीचे कार्य |
अपेक्षित परिणाम |
प्रमाण
|
१९९० ते आजपर्यंत | साधकांना साधनेविषयी दृष्टीकोन देणे | १५ सहस्रांहून अधिक साधक तन-मन-धनाचा त्याग करून ईश्वरप्राप्तीसाठी साधना करत आहेत. या साधकांच्या माध्यमातून पुढे अनेकांना साधनेविषयी योग्य दृष्टीकोन मिळतील. | ३० |
१९९४ ते आजपर्यंत | अध्यात्म आणि साधना शिकवणार्या ग्रंथांचे संकलन | सहस्रो वर्षे हे ग्रंथ मानवजातीला अध्यात्म आणि साधना यांविषयी मार्गदर्शन करतील. | ५० |
१९९८ ते आजपर्यंत | राष्ट्र अन् धर्म यांच्या रक्षणाच्या कार्यासाठी विचार आणि दिशा देणे | वर्ष २०२३ पर्यंत भारतात हिंदु राष्ट्राची स्थापना होईल. | १० |
२०१३ ते आजपर्यंत | भावी भीषण काळाला तोंड देण्याची सिद्धता करण्यासाठी दिशादर्शन करणे | वर्ष २०१८ ते वर्ष २०२३ या काळात होणारे महायुद्ध आणि नैसर्गिक आपत्ती यांमध्ये सत्त्वगुणी मानवांचे रक्षण होईल. | १० |
एकूण | १०० |
ग्रंथनिर्मिती
परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी अध्यात्मशास्त्र, देवतांची उपासना, साधना, आचारधर्म, बालसंस्कार, राष्ट्ररक्षण, धर्मजागृती, ईश्वरप्राप्तीसाठी कला, आध्यात्मिक उपाय, आपत्कालीन उपचार, संमोहन उपचार इत्यादी विविध विषयांवर ग्रंथसंपदा संकलित केली आहे. त्यांनी ३०.४.२०१६ पर्यंत संकलित केलेल्या २८७ ग्रंथांच्या भारतातील मराठी, हिंदी, इंग्रजी, कन्नड, तेलुगु, तमिळ, मल्ल्याळम्, गुजराती, गुरुमुखी, ओडिया, बंगाली, आसामी या भाषांत आणि विदेशातील नेपाळी, जर्मन अन् सर्बियन या १५ भाषांत ६५ लक्ष ५ सहस्र प्रती प्रकाशित झाल्या आहेत. अद्यापही अनुमाने ४५०० ग्रंथ प्रकाशित होऊ शकतील, इतके ज्ञान त्यांच्याकडे संग्रही आहे. यासाठी त्यांनी हे सर्व विषय अनुमाने १६,००० संकेतांक घालून विभाजित आणि संग्रहित केले आहेत. (२९.५.२०१६)
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ग्रंथांची वैशिष्ट्ये
अ. अध्यात्माच्या विविध अंगांचा कार्यकारणभाव आणि त्यातील प्रत्येक कृतीविषयी का अन् कसे यांची शास्त्रीय उत्तरे !
आ. विज्ञानयुगातील वाचकांना समजेल अशा आधुनिक वैज्ञानिक भाषेतील (उदा. सारणी, टक्केवारी) ज्ञान !
इ. केवळ तात्त्विक विवेचनच नव्हे, तर काळानुसार साधना कृतीत आणण्याविषयी मार्गदर्शन !
ई. धार्मिक कृती अन् साधना यांचा व्यक्ती, वस्तू, वास्तू आणि वातावरण यांवर होणार्या चांगल्या-वाईट परिणामांच्या संदर्भातील सूक्ष्म-स्तरावरील प्रक्रिया दर्शवणारी चित्रे अन् लिखाण, तसेच वैज्ञानिक उपकरणांद्वारे केलेल्या प्रयोगांचे लिखाण यांचा अंतर्भाव !
ध्वनी-चकत्या (ऑडिओ सीडी) आणि
ध्वनीचित्र-चकत्या (व्हीसीडी) यांची निर्मिती !
दूरचित्रवाहिन्यांसाठी धर्मसत्संग मालिकांच्या ध्वनीचित्र-चकत्या (व्हीसीडी)
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली ईश्वरप्राप्तीसाठी साधना (एकूण १६५ भाग) आणि धार्मिक कृतींमागील शास्त्र (एकूण २०२ भाग) या दूरचित्रवाहिन्यांवरील धर्मसत्संगांच्या मालिका बनवण्यात आल्या. या धर्मसत्संगांच्या मालिकांचे ३ राष्ट्रीय दूरचित्रवाहिन्यांवर, तर १०० हून अधिक स्थानिक दूरचित्रवाहिन्यांवर प्रक्षेपण करण्यात आले.
सध्या त्यांच्या मार्गदर्शनाखाली हिंदु धर्म आणि संस्कृती यांतील आचार-विचारांचे महत्त्व, भारतीय भाषांचे आध्यात्मिक महत्त्व, भारतातील तीर्थक्षेत्रे, देवळे, संतांचे मठ, संतांची समाधीस्थाने, ऐतिहासिक स्थळे आदींचे माहात्म्य, तसेच आध्यात्मिक संशोधन, वाईट शक्तींच्या त्रासांवरील उपाय आदींविषयी सहस्रो ध्वनीचित्र-चकत्या (व्हीसीडी) बनवल्या जात आहेत.
साधनेसाठी उपयुक्त ध्वनी-चकत्या (ऑडिओ सीडी)
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली साधना, अध्यात्माविषयी शंकानिरसन, देवतांच्या नामजपाची योग्य पद्धत, आरती आदी विषयांवरील ध्वनी-चकत्यांचीही (ऑडिओ सीडी) निर्मिती करण्यात आली आहे.
धर्मप्रसाराशी संबंधित प्रसारसाहित्य
८ भाषांत प्रकाशित होणारे सनातन पंचांग, संस्कार वही, चित्रकला वही, धर्मशिक्षण देणारी पत्रके, धर्मशिक्षणाचे आणि राष्ट्र-धर्म जागृतीचे फलक, सनातनच्या कार्याशी संबंधित माहितीपत्रके आदी धर्मप्रसाराशी संबंधित प्रसारसाहित्यातील वैचारिक लिखाण, तसेच त्याच्या सात्त्विक सादरीकरणाच्या दृष्टीने त्यातील चित्रे अन् रंगसंगती परात्पर गुरु डॉ. आठवले स्वतः पडताळून देतात.
अध्यात्मातील अधिकारी असल्याने
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी अनुभूती येणे
जेथे दिव्यत्व असते, तेथे प्रचीती असते, या सिद्धांतानुसार परात्पर गुरु डॉ. आठवले यांची आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये त्यांच्यातील दैवीपणाची प्रचीती देतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली साधना करणारे साधकच नव्हेत, तर विविध सांप्रदायिक, हिंदुत्ववादी आणि विविध साधनामार्गांनुसार साधना करणारे संत यांनाही त्यांच्याविषयी अनुभूती येतात.
(परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयीच्या अनुभूती सनातनच्या साधकांच्या अनुभूती – भाग १ आणि साधकांच्या अनुभूती – भाग २ या ग्रंथांत दिल्या आहेत.)