संपादकीय
सध्या महाराष्ट्रावर दुष्काळाचे न भूतो न भविष्यति संकट ओढावले आहे. अनेक शहरांमध्ये एक दिवसआड पाणीपुरवठा केला जात असून लातूरसारख्या शहरांमध्ये तर १५ दिवसांनी एकदा पाणीपुरवठा केला जात आहे. अनेक धरणांमधील जलसाठाही आटला असून केवळ जूनपर्यंत पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक असल्याची भयावह स्थिती ओढवली आहे. ओस पडलेल्या विहिरी, आटलेले भूजल साठे, पावसाची हुलकावणी यांमुळे सर्वसामान्यांचे जिणे अक्षरश: अवघड झाले आहे. ही परिस्थिती अशीच राहिली आणि पावसाने यंदाही ओढ दिली, तर पाण्यासाठी तिसरे महायुद्ध भडकेल, हे भाकित नाकारण्याचे धारिष्ट्य कुणी करणार नाही.
सुदैवाने म्हणा किंवा दुर्दैवाने पाणीटंचाईच्या झळा शहरी आणि ग्रामीण मध्यमवर्गियांनी काही प्रमाणात तरी अनुभवल्या असल्याने नागरिकांमध्ये थोडीशी जागृती निश्चितच झाली आहे; पण अर्थातच् ती पुरेशी नाही. या जाणीवेला कृतीची जोड देणार्यांची संख्या नगण्य आहे. पाणीबाणी संदर्भात एरव्ही चर्चा करणारे घरी मात्र पाण्याचा विशेष पुनर्वापर करतांना आढळत नाहीत. नळ सर्रास चालू ठेवून भांडी घासणे, हे त्याचे प्रातिनिधिक उदाहरण. हे उदाहरण बहुसंख्य घरांमध्ये प्रतिदिन घडतांना दिसून येते. नळ चालू-बंद करण्याचे कष्ट न घेतल्याने अशा प्रकारे होणारा पाण्याचा एकूण अपव्यय पहिला, तर त्याचे प्रमाण प्रतीमास लक्षावधी लिटरच्या घरात जाईल.
आधीच टंचाई, त्यात प्रदूषित पाणी
पाण्याचा अपव्यय करण्याच्या जोडीला नदी, ओढे, तलाव यांमधील पाणी नित्यनेमाने अतीप्रदूषित करणे, कथित विकासाच्या नावाखाली नैसर्गिक प्रवाह आखूड करणे, प्रदूषण करणार्यांवर कठोर कारवाई करण्यास टाळाटाळ करणे, अशा वृत्तीमुळेही शुद्ध, निर्मळ आणि खळाळते पाणी दिसणे दुर्मिळ झाले आहे. एका बाजूला जलप्रदूषणावर राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय चर्चासत्रे झडतांना दिसतात, तर दुसरीकडे पाणी वाचवण्याच्या उपायांच्या अंमलबजावणीच्या नावाने मात्र कमालीचे असमाधानकारक चित्र दिसते. तसे नसते, तर लक्षावधी लिटर प्रदूषित पाणी बिनदिक्कतपणे नद्यांमध्ये सोडणार्यांवर कारवाई करण्यास अधिकार्यांचे हात आखडले नसते. आधीच टंचाई आणि त्यात प्रदूषित पाण्याची समस्या, हे दुहेरी जीवघेणे संकट असूनही शासकीय, प्रशासकीय आणि सामाजिक स्तरावर म्हणावी तेवढी जागरूकता दिसू नये, हे अधिक चिंतनीय आहे.
प्राचीन जलव्यवस्थापन
उज्ज्वल परंपरांचा वारसा सांगणार्या आपल्याकडे पूर्वीच्या काळी जलव्यवस्थापनही प्रगत होते. सुमारे ४ सहस्र वर्षांपूर्वी पाणी साठवणे, पाण्याची वाहतूक करणे, पाण्याचा निचरा करणे, सांडपाण्याची विल्हेवाट लावणे आदी प्रक्रिया होत असत. हडप्पा आणि मोहेंजोदडो येथील नगरांच्या अवशेषांमधून ही गोष्ट समोर आली आहे. साधारणपणे ४ लाख गावांमध्ये मिळून पूर्वी १२ लाखांपेक्षाही अधिक तलाव, विहिरी, कुंड आदी असल्याची नोंद मोगल आणि इंग्रज यांच्या लिखित दस्तऐवजांत सापडते; म्हणजेच सरासरी एका गावात किमान ३ जलसाठे होते. आज मात्र साधारणपणे ५ लाख गावांमध्ये मिळून साडेतीन लाख जलसाठे शिल्लक आहेत आणि तेही दुरवस्थेत. त्यामुळेच आपल्या प्राचीन प्रगत जलव्यवस्थापन शास्त्राचाही आधार घेऊन आणि संशोधन करून काही ठोस उपाययोजना आखणे आवश्यक आहे. हॉटेलांमध्ये कमी पाणी देण्याच्या जोडीला अन्न आणि पाणी वाया घालवणार्यांकडून अतिरिक्त शुल्क आकारणे, प्रत्येक शालेय विद्यार्थ्याला किमान एक झाड लावणे आणि जोपासणे बंधनकारक करणे, अशांसारखे सोपे उपाय योजता येतील. आवश्यकता आहे, ती निसर्गाप्रती संवेदनशील राहून सोप्या उपायांची कठोर अंमलबजावणी करण्याची !
हिंदु संस्कृतीतील पाण्याचे महत्त्व
कलशपूजन, गंगाआरती यांसारख्या प्रथांमधून हिंदु संस्कृतीने पाण्याला देवता मानण्याचा संस्कार केला आहे आणि पाण्याची पंचमहाभूतांपैकी एक घटक म्हणूनही गणना केली आहे. निसर्गाची पूजा करण्यास आपल्याला सूचित केले असतांनाही आपण त्याच्या बरोबर उलट वागून विकासाच्या नावाखाली वर्षानुवर्षे निसर्गाला ओरबाडत आहोत. अशाने जलदेवतेचा प्रकोप झाल्यास त्यात चूक कुणाची ?
नैसर्गिक, नव्हे मानवनिर्मित आपत्ती
पाऊस न पडणे, अवेळी पाऊस पडणे, काही भागांमध्ये अतीवृष्टी होणे, या केवळ नैसर्गिक आपत्ती आहेत, अशा भ्रमात रहाण्याचे अज्ञान आपण दाखवू नये. उगीचच काहीतरी घडणे, हे निसर्गाच्या तत्त्वातच बसत नाही. त्यामुळे अचानक गेल्या काही वर्षांमध्ये दुष्काळ पडू लागला आहे, निसर्गचक्र बिघडले आहे, या चर्चांच्या पलीकडे जाऊन त्यामागील कारणे आपल्याला शोधावी लागतील. या कारणांमध्ये पर्यावरणाच्या र्हासाच्या जोडीला नीतीमूल्ये, संस्कृती यांची नाळ तोडून होणारे उच्छृंखल वर्तन हेही महत्त्वाचे कारण आहे. अर्थात् याला कुणी बुद्धीप्रामाण्यवादी आक्षेप घेऊन त्याचा आणि याचा काय संबंध ? असा बालीश वाद घालण्याचा प्रयत्न करतीलही. अशांना इतके दिवस अनेक गोष्टी अधर्माने आणि निसर्गाच्या विरोधात केल्याने होणारे परिणाम पाहिले, आता आनंदाने किंवा सक्ती म्हणून धर्माने आणि निसर्गनियमाने वागून पहा, असे सांगावे; पण पर्यावरणरक्षणाच्या जोडीला संस्कृती आणि धर्म रक्षणाचे कार्य सोडू नये. उलट पर्यावरणवाद्यांनीही त्यांच्या कक्षा रूंदावून लोकांना धर्माचरण करण्याचे आवाहन करावे. धर्मो रक्षति रक्षितः या उक्तीप्रमाणे जो धर्माचे रक्षण करतो, त्याचे रक्षण धर्म, म्हणजे ईश्वर करीलच, याची निश्चिती बाळगावी !