नाशिक येथे ऑगस्ट २०१५ मध्ये पार पडलेल्या सिंहस्थपर्वात दैनिक सनातन प्रभातचे प्रतिनिधी श्री. सचिन कौलकर यांनी श्री तपोनिधी निरंजनी आखाड्याचे महंत श्री रामानंदपुरी महाराज यांच्याशी केलेल्या वार्तालापात महाराजांनी त्यांच्या आखाड्याविषयी दिलेली माहिती येथे देत आहोत.
संकलक : श्री. सचिन कौलकर
आखाड्यांचा परिचय
सिंहस्थपर्व म्हटले की, आखाडे, नागा साधू आदी एरव्ही विस्मृतीत गेलेले शब्द पुन: पुन्हा कानावर पडू लागतात. सामान्य हिंदूंना आखाडा म्हणजे काय, त्यांचे कार्य, नागा साधू म्हणजे काय, त्यांची दिनचर्या आदींविषयी बर्याचदा माहिती नसते. त्यामुळेच हे शब्द ऐकले की, जिज्ञासा जागृत होते. हे लक्षात घेऊन आम्ही आपल्याला या आखाड्यांचा परिचय करून देणार आहोत. संपूर्ण भारतात एकूण १३ आखाडे आहेत. यातील १० शैवांचे, तर ३ वैष्णवांचे आहेत. यातील काही आखाड्यांच्या प्रमुखांशी सनातन प्रभातच्या प्रतिनिधींनी केलेला वार्तालाप उज्जैन येथील सिंहस्थ पर्वाच्या निमित्ताने प्रसिद्ध करत आहोत.
१. स्थापना
श्री तपोनिधी निरंजनी आखाड्याची स्थापना संवत ९६० (वर्ष ९०४) मध्ये कच्छमधील मांडवी येथे झाली. कार्तिकस्वामी हे या आखाड्याचे इष्टदेव आहेत. निरंजनी आखाड्याचे मुख्य कार्यालय प्रयाग येथे आहे. निरंजनी आखाड्याच्या देशभरात १४० शाखा आहेत. भारतात ४ ठिकाणी भरवण्यात येणार्या कुंभमेळ्याच्या ठिकाणी हा आखाडा असतो. कुंभमेळ्याच्या कालावधीत सर्व साधू एकत्र येतात. त्यांचे निवास आणि भोजन यांची सर्व व्यवस्था आखाड्यांच्या वतीने केली जाते.
२. आखाड्याचा साधनामार्ग आणि कार्यपद्धत
श्री तपोनिधी निरंजनी आखाड्याचे देवतानायक सेनापती कार्तिकस्वामी आहेत. त्यांच्याजवळ भाला हे शस्त्र असते. आखाड्यात शैव संप्रदायानुसार साधना केली जाते. शिव ही या आखाड्याची उपास्यदेवता असून त्याद्वारे आखाड्यातील साधकांना गुरुमंत्र दिला जातो. या गुरुमंत्राचा जप करणे, हा या आखाड्याचा साधनामार्ग आहे. त्र्यंबकेश्वर येथील सिंहस्थानंतर सर्व जण हरिद्वार येथे जातात. तेथे पुढील कार्यकारिणीची बैठक होते, तसेच उज्जैन (मध्यप्रदेश) येथेही सिंहस्थ असल्याने तेथे जाऊन कोणते कार्य करायचे आहे, याचा विचार केला जातो. आमच्या आखाड्यात १६ सदस्य असतात. देशी भाषेत त्यांना पंचप्रदर्शन म्हटले जाते. कुंभमेळ्यात कोणत्या गोष्टींचा अभाव आहे, त्याचे दायित्व कोण घेऊ शकेल, त्यांची नावे काढली जातात. त्यानंतर त्या कुंभमेळ्याच्या ठिकाणी त्या पद्धतीने कार्य केले जाते. आमच्या आखाड्यात यज्ञ, भागवत कथा, कीर्तन यांचे आयोजन केले जाते आणि आखाड्याच्या वतीने सामाजिक सेवाही केल्या जातात. समाजाची सेवा करायची असेल, तर ट्रस्टची स्थापना केली जाते. नवीन साधूंना साधनेविषयी माहिती दिली जाते. मंत्र दिला जातो. त्यानंतर संस्थेच्या कार्यकारिणीत त्यांचा समावेश केला जातो. ही प्रक्रिया टप्प्याटप्प्याने राबवली जाते.
३. आखाड्यात प्रतिदिन चालणार्या सेवा
आखाड्यात प्रतिदिन पूजाअर्चा असते. प्रत्येकाला पूजा आणि आरती आलीच पाहिजे, असा नियम आहे. प्रत्येकाला विविध सेवा वाटून दिल्या जातात, उदा. आज भोजन विभागात सेवा असेल, तर तेथे जाऊन त्यांनी ती सेवा करायला हवी, अशी अपेक्षा असते. आखाड्यातील प्रत्येक सेवा करणे अनिवार्य आहे. टाळाटाळ करून चालत नाही. टाळाटाळ केली, तर संस्था कशी चालणार ? एखादा साधू रुग्णाईत झाल्यास त्याची काळजी घेण्यासाठी अन्य साधूला त्याच्या सेवेसाठी थांबवले जाते. रुग्णाईत साधूकडे दुर्लक्ष केले जात नाही.
४. नागा साधूंची वैशिष्ट्ये
श्री तपोनिधी निरंजनी आखाड्यात नागा साधू नाहीत. नागा साधू अमृत स्नान करण्यासाठी बाहेरून येतात. नागा साधू जटाधारी तपस्वी असतात. ते नेहमी साधनेत मग्न असतात. नागा साधू नेहमी भस्म लावतात. आपण विवस्त्र, नग्न असल्यामुळे समाज आपल्याला काय म्हणेल, याचा कोणताही विचार न करता ते अखंड साधनेत लीन असतात. त्यांना समाजाशी एकप्रकारे काही देणे-घेणे नसते. ते आपल्या स्थानी जाऊन तपश्चर्या करतात. ते धुनीसमोर (अग्नीसमोर) जाऊन गुरुमंत्राचा जप करतात.
हिमालय हे एकांतवासाचे ठिकाण आहे. समाजापासून दूर रहाण्यासाठी अनेक साधू हिमालयात जातात. समाजातील भक्तांचा त्रास होऊ नये, कोणी भेटू नये, साधनेत कुणाचाही व्यत्यय येऊ नये, यासाठी ते तपश्चर्या करण्यासाठी हिमालयात जातात. देशात सहस्रोंच्या संख्येने साधू आहेत. आमच्या आखाड्यातील साधूंच्या साधनेचे स्थान निश्चित ठरलेले असते.
५. आखाडे करत असलेले धर्मप्रसाराचे कार्य
सर्व आखाडे धर्मप्रसार करतात. कुंभमेळ्यात गोदावरी आणि त्र्यंबकेश्वरमधील कुशावर्त तीर्थात स्नान करणारे साधूंचे कार्य धर्मप्रसाराचे असते. भागवत, रामायण यांच्यातील कथा ऐकवणे, संस्कृती, धर्म यांच्या परंपरा आणि रूढी यांचा प्रचार करणे. धर्माचे पालन करून धर्माचरण करणे आणि धर्माने सांगितलेल्या मार्गाने भक्तांनी वाटचाल करणे यांसाठी त्यांना मार्गदर्शन करतात. भक्तांनी वाईट गोष्टींपासून दूर रहावे, याविषयी प्रबोधनही केले जाते. आखाड्यात बसून कार्याचे नियोजन केले जाते. व्यक्तीगत स्तरावर त्यांना वाटेल, तेथे जाऊनही ते धर्मप्रसार करतात. तथापि आखाड्याच्या स्तरावर भारतात कोणत्या ठिकाणी धर्मप्रसार करायचा आहे, याचे स्थान त्यांना निवडून दिले जाते. तेथे जाऊन ते धर्मप्रसार करतात. समाजाला योग्य दिशा देतात.
६. धर्मावरील आघात दूर करण्याचा प्रयत्न
समाजात जेव्हा धर्मांतर, गोहत्या अशा धर्माच्या विरोधातील गोष्टी समोर येतात, तेव्हा सर्व आखाडे एकत्र येऊन त्या विषयावर चर्चा करतात आणि अशा समस्या दूर करण्याचा प्रयत्न केला जातो. आजही आखाडे अधर्माच्या विरोधात लढून धर्माचा प्रचार करत आहेत. कांची कामकोटी पिठाच्या शंकराचार्यांवर खोटे आरोप करून त्यांना कारागृहात ठेवले होते. त्या वेळी सर्व आखाड्यांतील महंत देहली येथे गेले होते. आमच्यासह विहिंपचे पदाधिकारी होते. कांची कामकोटी पिठाधीश्वरांवर करण्यात आलेले आरोप मागे घेण्याविषयी आम्ही तेथील शासनाशी चर्चा केली. शासनाने आमची भूमिका मान्य केली होती.
७. भोंदू साधूंविषयी भूमिका
भोंदू साधूंची समस्या प्राचीन काळापसून आहे. रामायणात रावणाने साधूचा वेश परिधान करून सीतेचे अपहरण केले होते. त्यानंतर रामायण घडले. भोंदू साधू निदर्शनास आल्यानंतर आम्ही त्याला विरोध करतो, तसेच अशा भोंदू साधूंना कारागृहात पाठवून देतो. आम्ही विरोध केल्यानंतर समाजात तशी व्यवस्था सिद्ध होते. भोंदू साधूचा वेश घालून एखादा साधू झाला, तरी समाज त्यांना स्वीकारत नाही.
८. आखाड्यांतील समन्वय
नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथील एकूण १३ आखाड्यांतील सदस्य समन्वय समितीत असतात. प्रत्येक आखाड्यातील सदस्य बैठकीला येतात. विषयांवर विचारप्रक्रिया होऊन निर्णय घेतले जातात. जो निर्णय होईल, त्याची माहिती आखाड्यात जाऊन तेथील इतर साधूंना सांगितली जाते. प्रत्येक आखाड्याची कार्यक्रम सूची (अजेंडा) मात्र ठरलेली असते.
९. कुठलाही संप्रदाय आखाड्याशी जोडला जाऊ शकतो !
नाथ आणि वारकरी संप्रदाय त्यांच्या पद्धतीनुसार धर्मप्रसार करत असतात. शैवांची धर्मप्रसार करण्याची पद्धत वेगळी असते. सर्व एकत्र येऊन धर्मप्रसार करू शकत नाहीत, तर ते निर्णय ऐकू शकतात. कुठलाही संप्रदाय आखाड्याशी जोडला जाऊ शकतो, उदा. वारकरी संप्रदायाला वाटले, तर ते आमच्याशी चर्चा करून आखाड्यातील कार्यात सहभागी होऊ शकतात. त्या वेळी आम्हाला वाटले, यांना साहाय्य आणि सहकार्य केले पाहिजे, तर ते आम्ही करतो. इतर संप्रदायांच्या संदर्भातही अशीच पद्धत असते.
१०. चुकीचा व्यवहार केल्यास दंड करण्याची पद्धत
आखाड्यात दंड करण्याची पद्धत आहे. काही वेळा तात्पुरते किंवा काही वेळा कायमचे आखाड्यातून काढले जाते. एखाद्या पक्षात नेता चुकला वा त्याने चुकीचे कार्य केले, तर त्याला ५ वर्षे पक्षाच्या कामकाजात भाग घेता येत नाही, तसे आखाड्यातही असते. आखाड्यात एखाद्या साधूने चुकीचे कार्य केल्यास प्रथम त्याला निलंबित केले जाते. त्यानंतर थोड्या दिवसांनी पुन्हा साधूंना आखाड्यात घेतले जाते. या वेळी त्यांच्यात खरोखर सुधारणा झालेली आहे का, हे पाहून त्यांना आखाड्यात ठेवायचे कि नाही, हे ठरवले जाते. सुधारणा झालीच नसेल, तर आखाड्यातून कायमचे काढून टाकले जाते. आखाड्यात कसेही वागून चुका करणार्या साधूंची गय केली जात नाही आणि असे आखाड्यात चालणारही नाही. अशी व्यवस्था सहस्रावधी वर्षांपासून चालू आहे.