अखिल भारतीय श्री पंच दिगंबर अनी आखाडा !

kumbh-akhada

सर्वाधिक उप-आखाडे आणि सर्वाधिक खालसे असलेला
सर्वांत मोठा आखाडा : अखिल भारतीय श्री पंच दिगंबर अनी आखाडा !

Ramkishor_Shastriji_Maharaj_Clr
महंत रामकिशोरशास्त्रीजी महाराज

श्री पंच दिगंबर अनी आखाडा हा भारतातील सर्व म्हणजे १३ आखाड्यांचा राजा मानला जातो. सर्वाधिक उप-आखाडे आणि सर्वाधिक खालसे यांचा समावेश असलेला हा आखाडा सर्वांत मोठा आखाडा आहे. नाशिक येथे ऑगस्ट २०१५ मध्ये पार पडलेल्या सिंहस्थपर्वात दैनिक सनातनचे प्रतिनिधी श्री. नीलेश कुलकर्णी यांनी अखिल भारतीय श्री पंच दिगंबर अनी आखाड्याचे महंत रामकिशोरशास्त्रीजी महाराज यांची मुलाखत घेतली. या वेळी महंत रामकिशोर शास्त्रीजी महाराज यांनी दिलेली अमूल्य माहिती त्यांच्याच शब्दांत येथे देत आहोत.

संकलक : श्री. नीलेश कुलकर्णी, पुणे

 

आखाड्यांचा परिचय

सिंहस्थपर्व म्हटले की, आखाडे, नागा साधू आदी एरव्ही विस्मृतीत गेलेले शब्द पुन: पुन्हा कानावर पडू लागतात. सामान्य हिंदूंना आखाडा म्हणजे काय, त्यांचे कार्य, नागा साधू म्हणजे काय, त्यांची दिनचर्या आदींविषयी बर्‍याचदा माहिती नसते. त्यामुळेच हे शब्द ऐकले की, जिज्ञासा जागृत होते. हे लक्षात घेऊन आम्ही आपल्याला या आखाड्यांचा परिचय करून देणार आहोत. संपूर्ण भारतात एकूण १३ आखाडे आहेत. यातील १० शैवांचे, तर ३ वैष्णवांचे आहेत. यातील काही आखाड्यांच्या प्रमुखांशी सनातन प्रभातच्या प्रतिनिधींनी केलेला वार्तालाप उज्जैन येथील सिंहस्थ पर्वाच्या निमित्ताने प्रसिद्ध करत आहोत.

 

१. अनी आखाड्यांविषयी सर्वसाधारण माहिती

१ अ. अखिल भारतीय श्री पंच दिगंबर अनी आखाडा, अखिल भारतीय श्री पंच निर्वाणी अनी आखाडा आणि अखिल भारतीय श्री पंच निर्मोही अनी आखाडा हे तीन वैष्णवांचे आखाडे आहेत.

१ आ. श्री पंच रामजी दिगंबर आखाडा आणि श्री पंच शामजी दिगंबर आखाडा हे दोन्ही आखाडे मिळून अखिल भारतीय श्री पंच दिगंबर अनी आखाडा होतो. (हे दोन्ही अखिल भारतीय श्री पंच दिगंबर अनी आखाड्यांचे उप-आखाडे असून त्यांना गाव असे म्हणतात.)

१ इ. अखिल भारतीय श्री पंच निर्वाणी अनी आखाड्याच्या अंतर्गत ७ उप-आखाडे असून त्यांना गाव असे म्हणतात.

१ ई. अखिल भारतीय श्री पंच निर्मोही अनी आखाड्याच्या अंतर्गत ९ उप-आखाडे असून त्यांनाही गाव असे म्हणतात.

 

२. आखाड्यांच्या नावामागील अर्थ

या तिन्ही आखाड्यांत पंचायती व्यवस्थेची प्रधानता असल्याने (म्हणजेच लोकतंत्र व्यवस्था असल्याने) त्यांच्या नावांना श्री पंच असे म्हटले जाते. पंच परमेश्‍वरासमान मानला जातो. तिन्ही आखाड्यांचे जे निशाण असतात, त्यावर अनी (भाल्याचा टोकदार भाग) लावलेला असतो. हे निशाण जेथे लावले जाते, तेथे अनी आखाडा वसतो.

 

३. अनी आखाड्यांत वैष्णव संप्रदायांचा समावेश असणे,
तर श्री संप्रदाय आखाडा हे चार संप्रदायांचे संघटन !

वारकरी हे वैष्णव आहेत, तसेच वारकरी संप्रदाय हा प्रथमपासूनच वैष्णव संप्रदायाशी जोडला गेला आहे. वारकरी संप्रदायाचे ७ खालसे असून ते सर्व अखिल भारतीय श्री पंच निर्मोही अनी आखाड्याच्या अंतर्गत येतात. श्री संप्रदाय आखाडा हा ४ संप्रदायांचे संघटन आहे. या चारही संप्रदायांचे संत त्या आखाड्याचे नियम अन् परंपरा स्वीकारून एकत्रित आखाड्यात रहातात.

 

४. चतु:संप्रदाय खालशातील संप्रदाय आणि त्यांचे महंत

अ. श्री संप्रदाय (म्हणजेच रामानंद संप्रदाय) – महंत लालबिहारीदास बर्फानी दादा

आ. गोडिया संप्रदाय (म्हणजेच माध्व संप्रदाय) – महंत फुलडोलजी

इ. निंबार्क संप्रदाय – महंत रासबिहारीदासजी

ई. वल्लभ संप्रदाय – महंत रामलखनदासजी

या ४ संप्रदायांनाच चतु:संप्रदाय खालसा असे म्हणतात. हे सर्व वैष्णव असून त्यांचे सिद्धांत एक आहेत. ते एक संघटन आहे. या चारही संप्रदायांचे अध्यक्ष हा श्री संप्रदायाचाच (म्हणजेच रामानंद संप्रदाय) असतो. वैष्णव आखाड्यांत तुळशीची प्रधानता असते, तर शैव आखाड्यांत रुद्राक्षाची प्रधानता असते. सर्व साधूंचा एकमेकांशी संबंध हा केवळ त्यांच्या कपाळावरील टिळा आणि कंठी यांमुळे असतो. यावरून तो साधू आहे, हे ओळखायचे असते.

 

५. तिन्ही अनी आखाड्यांची उपासनापद्धत

तिन्ही अनी आखाड्यांची उपासनापद्धत वेगवेगळी आहे. तथापि या तिन्ही आखाड्यांत तुळशीची प्रधानता असल्याने, तसेच प्रभु श्रीराम आणि भगवान श्रीकृष्ण यांना मानणारे असल्याने त्यांची उपासना केली जाते.

 

६. साधूंच्या राहणीमानामागील शास्त्र

साधूंच्या राहणीमानाविषयी २ संकेत आहेत. एकतर जटा, दाढी, मिशा काहीच ठेवू नका वा सर्व ठेवा. आखाड्यांचे वा साधूंचे सिद्धांत हेच त्यांचे नियम असतात आणि ते सर्व जण पाळतात. त्यानुसारच ते वागतात. प्रत्येकाची एक नियमावली वा परंपरा असते. ते त्याचे आचरण करत असतात.

 

७. शैव आणि वैष्णव आखाड्यांतील सर्व साधूंना साधूच संबोधले जाणे

हे सर्व वेगवेगळे संप्रदाय आहेत. या सर्वांचे सिद्धांत आणि इष्ट देवताही निरनिराळ्या आहेत, तरी या सर्वांना साधूच म्हणतात.

 

८. हिमालयातील साधू

गिरी, कंदरा, गुफा अशा कुठल्याही ठिकाणी राहून संत तपश्‍चर्या करतात. काही जण स्वत:च्या तपोबळावर अदृश्यही असतात. फार भाग्यशाली असणार्‍यालाच अशा साधूंचे दर्शन होते. ज्याचा जसा भाव असतो, तसे त्याला या साधूंचे दर्शन होते.

 

९. नागा साधू म्हणजे काय ?

अंगावर कुठलेही कपडे घालत नाहीत, ते म्हणजे नागा साधू, असा समाजात चुकीचा समज झाला आहे. नागा याचा अर्थ नागानां नगादी राजा असा आहे; म्हणजे पर्वतांचा वा पहाडांचा राजा. पहाडांचा राजा हिमालय आहे. हिमालय जसा स्थिर, धीर, गंभीर आणि अडीग आहे (म्हणजे हिमालयाला कुणीही हलवू शकत नाही वा विचलितही करू शकत नाही), त्याप्रमाणेच नागा साधूला कुणीही त्याच्या धर्मापासून, त्याच्या कर्मापासून वा त्याच्या संप्रदायापासून विचलित करू शकत नाही. नागा साधू त्यांच्या सिद्धांतावर अडीग असतात. एकवेळ काही प्रसंगांत अन्य साधू जरा विचलित होतील; पण नागा साधू अत्यंत कट्टर असतात. ते कधीही विचलित होत नाहीत. जे विचलित होतात, ते खरे नागा साधू नसतात. नागा साधू कधीही कोणत्याही प्रलोभनात अडकत नाहीत. स्वत:च्या सिद्धांतांचे रक्षण आणि धर्माचे रक्षण यांसाठी जे जे काही करावे लागेल, ते नागा साधू करतात.

 

१०. आखाडे करत असलेला धर्मप्रसार आणि धर्मजागृती

जर धर्मच नसेल, तर राष्ट्र कसे राहील ? धर्म नसेल, तर त्या देशाचे संचालन (कारभार) कधीही नीट चालू शकत नाही, लोक कधीही सुखी होऊ शकत नाहीत, तसेच त्यांचा कधी विकासही होऊ शकत नाही. धर्माविना सर्व सुने आहे. ही अनादि परंपरा चालत आलेली असून ती पुढेही कायम राहील. सत्य, द्वापर, त्रेता आदी कुठल्याही युगात धर्माचीच प्रधानता कायम राहिली आहे. भगवान श्रीराम क्षत्रिय होते. ते राज्य करत होते; मात्र ऋषि-मुनींकडून सल्ला घेऊन त्यांच्या आज्ञेनेच राज्यकारभार करत होते. भगवान श्रीकृष्णाच्याही काळात असेच होते. वसिष्ठ ऋषि, विश्‍वामित्र ऋषि, दुर्वास ऋषि, याज्ञवल्क्य ऋषि, व्यास महर्षि या सर्वांनाच विचारूनच त्या त्या काळातील राजे राज्यकारभार करत होते. साधूंचा मान ठेवला जात होता. जो देश धर्माची कास धरत नाही, त्या देशातील नागरिकांचे जीवन पशूवत असते. ते कदापि सुखी नसतात.

आखाड्यांमध्ये सध्या प्रवचन, कीर्तन, पाठ, यज्ञ आदी हे सर्व चालूच असून यांद्वारे धर्मजागृतीसाठीच केले जात आहे. प्रवचन, कीर्तन, पाठ, यज्ञ आदी होण्यासाठीच कुंभमेळा भरवला जातो. या विश्‍वात शांती कशी प्रस्थापित होईल, देशात सुख-शांती कशी नांदेल, देशाचा विकास कसा होईल, देश समृद्ध कसा होईल, असाच सर्व संप्रदायांचा विचार असतो.

 

११. आखाड्यांचे धर्मरक्षणाचे कार्य

आखाड्यांची स्थापना वर्ष १६००-१७०० मध्ये धर्मरक्षणासाठीच झाली आहे. त्या काळात देश दास्यत्वात होता. त्या काळात विदेशींनी आपल्यावर अनन्वित अत्याचार केले. आपली श्रद्धास्थाने पाडण्यात आली, मठ-मंदिरे उद्ध्वस्त करण्यात आली, आया-बहिणींवर बलात्कार केले. धर्मग्रंथ जाळले गेले, त्यांना अशुद्ध करण्यात आले. धर्मग्रंथांतील आणि शास्त्रांतील खरा मजकूर पुसून टाकून खोटा मजकूर घुसडण्यात आला. यदा यदा ही धर्मस्य… या गीतेतील श्‍लोकाप्रमाणे जेव्हा जेव्हा धर्माची हानी होते, त्या त्या वेळेला धर्मरक्षणार्थ भगवान कुठल्या ना कुठल्या रूपात अवतार घेतातच. त्यानुसारच यापूर्वी जगद्गुरु शंकराचार्य यांच्यासह शैव आणि वैष्णव संप्रदायांनीही धर्माचे रक्षण केले आहे. शंकराचार्यांनीही धर्माचे रक्षण केले. सर्व अवतार सनातनी असून त्यांनी सर्वांना एका सूत्रात संघटित ठेवले आहे. याच काळात आखाड्यांची स्थापना झाली. सर्व आखाड्यांनी मोगलांच्या अत्याचारांचा एकसंधपणे प्रतिकार करून धर्माचे रक्षण केले आहे. त्या काळी अनेक राजा-महाराजा साधू बनले.

 

१२. कुंभमेळ्यानंतरचे साधूंचे जीवन आणि उपासना

कुंभमेळा संपल्यानंतर सर्व साधू आपापल्या भागात निघून जातात. प्रत्येक साधूची उपासना अन् साधना असते. ते ती करतात. त्याद्वारे त्यांना ऊर्जा, तसेच शक्ती मिळते. त्यांची साधना हा दिखाऊपणा नसतो. ते नामजप, ध्यान, योगक्रिया आदी करतात. नामजपाने तेज वाढते. नामजप केल्यास त्याचा लाभ होतो.

कुंभमेळ्याच्या आरंभीपासून जे ३३ कोटी देवी-देवता आलेले असतात, तेही निघून जातात. यंदा नाशिकच्या सिंहस्थात ३३ कोटी देवी-देवता हे पावसाच्या रूपात आले होते. सिंहस्थाच्या एका मासाच्या काळात म्हणजे ध्वजारोहणापासून तुम्हाला नाशिक आणि त्र्यंबकेश्‍वर येथे श्री छटा अनुभवयास मिळेल. तिसरी पर्वणी संपताच (नाशिक सिंहस्थात तिसरी पर्वणी १८ सप्टेंबर २०१५ या दिवशी होती), म्हणजे त्या दिवशीच्या सूर्यास्तानंतर ही छटा लुप्त होते. त्यानंतर सर्व देवी-देवता, साधू-संत, महंत आदी सर्व जण आपापल्या स्थळी (उदा. जंगल, पर्वत, झोपडी आदी ठिकाणी) निघून जातात. तिसर्‍या पर्वणीच्या दिवशी सूर्यास्तानंतर सिंहस्थातील चैतन्यही नाहीसे होते.

 

१३. सिंहस्थ किंवा कुंभमेळा कधी येतो ?

नाशिकच्या सिंहस्थ पर्वानंतर ८ मासांत उज्जैनचे सिंहस्थपर्व येते. नाशिक, उज्जैन, हरिद्वार आणि प्रयाग येथे प्रती १२ वर्षांनंतर, तर प्रयाग येथे ६ वर्षांनंतर अर्धकुंभ भरतो; म्हणजे प्रत्येक २ वर्षांनंतर तिसर्‍या वर्षी कुठे ना कुठे कुंभमेळा भरतो. उज्जैन येथील सिंहस्थ हेच एकमेव असे आहे की, जे नाशिक येथील सिंहस्थानंतर ८ मासांनी येते.

 

१४. साधू आणि आखाडे यांचा अपप्रचार
करणार्‍या प्रसारमाध्यमांच्या संदर्भात आखाड्यांची भूमिका

आखाड्यांची भूमिका अत्यंत स्पष्ट असते. ते कधीही प्रसारमाध्यमांच्या कचाट्यात सापडत नाहीत. आखाडे अविचल असतात. साधू प्रथम नागा साधू झाल्यानंतर त्यांची आखाड्यांमध्ये भरती होते. नागा साधू तर अविचल आणि अडीग असतात.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात