गुरुकृपायोगानुसार करावयाच्या साधनेमागील प्रमुख तत्त्वे

या लेखात आपण गुरुकृपायोगानुसार करावयाच्या साधनेतील प्रमुख तत्त्वे पाहू.

बहुतेकांना साधनेमागील तत्त्वे माहीत नसल्याने ते चुकीची साधना करण्यात आयुष्य वाया घालवतात. तसे होऊ नये; म्हणून पुढील मार्गदर्शक तत्त्वे समजून घेऊन त्यांनुसार साधना करणे आवश्यक असते. –

१. आवड आणि क्षमता यांनुसार साधना करणे,

२. अनेकातून एकात जाणे,

३. स्थुलाकडून सूक्ष्माकडे जाणे,

४. पातळीनुसार साधना,

५. वर्णानुसार साधना,

६. आश्रमानुसार साधना,

७. काळानुसार साधना,

८. सगुणापेक्षा निर्गुण श्रेष्ठ; पण साधनेसाठी निर्गुण उपासनेपेक्षा सगुण उपासना श्रेष्ठ,

९. तत्त्वानुसार साधना, आणि

१०. व्यक्तीनिष्ठा नको, तर तत्त्वनिष्ठा हवी !

तत्त्व क्र. १ : आवड आणि क्षमता यांनुसार साधना

गुरुकृपायोगानुसार साधनेचा सिद्धांत ‘व्यक्ती तितक्या प्रकृती, तितके साधनामार्ग’ याचे पालन करणे, या तत्त्वामुळे सुलभ होते. आपण जे काही करू शकतो, ते ईश्वरचरणी अर्पण करायचे, म्हणजे त्या माध्यमातून साधना करायची, असे हे तत्त्व आहे. सनातन संस्थेचा प्रत्येक साधक या तत्त्वानुसार साधना करतो, उदा. काही साधक संस्थेद्वारे प्रसिद्ध करायच्या ग्रंथांच्या लिखाणाची सेवा करतात, काही साधक देवतांची सात्त्विक चित्रे आणि मूर्ती बनवण्याची सेवा करतात, काही साधक समाजात जाऊन सत्संग-प्रवचने-बालसंस्कारवर्ग घेतात, काही साधक संस्थेच्या आश्रमांतील ‘स्वयंपाक-विभाग’, ‘स्वच्छता-विभाग’ यांमध्ये सेवा करतात. माध्यम कोणतेही असले, तरी बहुतेकांची आध्यात्मिक प्रगती होत आहे.

 

तत्त्व क्र. २ : अनेकातून एकात जाणे

ईश्वर एक आहे आणि या जगात जे आहे, ते अनेक अनेक असे आहे. या सगळ्याकडून आपल्याला एका ईश्वराकडे जायचे आहे, हे सातत्याने लक्षात ठेवले पाहिजे. हे पुढीलप्रमाणे साध्य करता येईल.

१. कुलदेवतेची उपासना

ज्या कुळाची कुलदेवता, म्हणजे कुलदेवी किंवा कुलदेव, ही आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी अत्यंत उपयुक्त आहे, अशा कुळात ईश्वराने आपल्याला जन्माला घातले आहे. कुलदेवतेच्या उपासनेचे महत्त्व याप्रमाणे आहे – ब्रह्मांडात प्रजापति, ब्रह्मा, शिव, विष्णु आणि मीनाक्षी ही पाच तत्त्वे आहेत. ही पाच तत्त्वे जर आपल्यात आली, म्हणजे ‘ब्रह्मांडी ते पिंडी’ असे झाले, तरच आपण ईश्वराशी एकरूप होतो, मोक्षाला जातो. समजा एखाद्या व्यक्तीत ‘ए’ जीवनसत्त्व अल्प (कमी) आहे आणि तो ‘बी’ जीवनसत्त्व घेत असेल, तर त्याला त्याचा काही उपयोग होत नाही. त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीत शिवतत्त्व अल्प असेल आणि तो श्रीविष्णुतत्त्वाची उपासना करत असेल, तर त्याचा काही उपयोग होत नाही. त्याचा मनुष्यजन्म वाया जातो. व्यक्तीमध्ये ए, बी, सी, डी या जीवनसत्त्वांपैकी कोणते जीवनसत्त्व आपल्यात अल्प आहे, हे डॉक्टर सांगू शकतात. पंचतत्त्वांतील कुठले तत्त्व आपल्यात अल्प आहे, ते आपल्याला संतच सांगू शकतात; पण तन, मन आणि धनाचा बराचसा त्याग केल्याविना संत जवळ करत नाहीत. ए, बी, सी, डी यांपैकी कोणते जीवनसत्त्व आपल्यात अल्प आहे, हे आपल्याला माहीत नसले, तर आपण सर्व जीवनसत्त्वे असलेले एखादे बलवर्धक (टॉनिक) घेतो. त्यामुळे आपल्या शरिरातील सर्व जीवनसत्त्वे वाढू लागतात. तसेच महत्त्व कुलदेवतेचे आहे. जेव्हा आपण कुलदेवतेची उपासना करतो, तेव्हा ब्रह्मांडात जी पाच तत्त्वे आहेत, त्यातील प्रत्येक तत्त्व वाढायला लागते. त्यामुळे आपोआपच जे तत्त्व आपल्यात अल्प आहे, ते वाढते. दुसरी गोष्ट म्हणजे अध्यात्मात आपल्या आवडी-नावडीलाही महत्त्व नाही. समजा एखाद्या व्यक्तीला क्षयरोग झाला आणि तो म्हणाला की, मला सल्फाच्या गोळ्या आवडतात, पेनिसिलीनचे इंजेक्शन आवडते म्हणून ते मी घेतो, तर त्याचा उपयोग होत नाही; कारण त्याने क्षयाचे जंतू मरत नाहीत. त्यासाठी ‘आयसोनेक्स’च घ्यावे लागते. तसेच हे आहे. ‘मला गणपति आवडतो’ किंवा ‘साईबाबा आवडतात’, अशा आवडी-नावडीचा उपयोग नाही. आवडी-नावडीच्या पुढे जाऊन शास्त्राप्रमाणे साधना केली, तरच आध्यात्मिक  उन्नती जलद होते.

२. देवघर

बहुतेकांच्या देवघरात आठ-दहा किंवा त्याहीपेक्षा अधिक देव असतात. एवढ्या देवांची मुळात आवश्यकताच नसते. देवांची संख्या न्यून करा, त्यांचे नियोजन करा. देवघरात कुलदेवता, श्री गणपति, कुलाचारानुसार असलेले बाळकृष्ण, मारुति आणि श्री अन्नपूर्णा या देवता अन् एखाद्या उच्च देवतेची उपासना करत असल्यास शिव किंवा श्री दुर्गादेवी इतकेच देव असावेत. अतिरिक्त देवतांच्या चित्रांचे आणि मूर्तींचे विसर्जन करावे अथवा ते एखाद्या देवळात द्यावे. मनुष्यप्राणी बोलतो ते सगळे शब्दातील असते. ती नादभाषा असते, तर देवांची प्रकाशभाषा असते. नादभाषेचे देवांच्या प्रकाशभाषेत आणि देवांच्या प्रकाशभाषेचे आपल्या नादभाषेत रूपांतर करण्याचे कार्य गणपति करतो; म्हणून देवघरात गणपति हवा.

३. देवळात जाणे

काही जण प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या देवतांच्या देवळांत जातात. अध्यात्मशास्त्रानुसार असे करणे अयोग्य आहे; कारण अध्यात्मात एकनिष्ठा पाहिजे. यासाठी आपल्या कुलदेवतेच्याच देवळात जावे. जर जवळपास कुलदेवतेचे देऊळ नसेल, तर मग एखाद्या देवी किंवा देवाला कुलदेवीचे किंवा कुलदेवाचे रूप समजून त्या भावाने आणि श्रद्धेने त्या एकाच देवळात जावे. ‘भाव तिथे देव’, हे तत्त्व लक्षात ठेवावे.

४. पोथीवाचन

कुलदेव किंवा कुलदेवीचीच पोथी वाचावी. ती पोथी नसली, तर कुठच्याही एका देवाची किंवा देवीची पोथी वाचावी. त्या वेळी अशी श्रद्धा अन् असा भाव असू द्यावा की, तो देव किंवा देवी हे तुमच्या कुलदेवाचे किंवा कुलदेवीचेच एक रूप आहे. काही जण म्हणतात, ‘‘मी ज्ञानेश्वरीची एवढी पारायणे केली, दासबोधाची तेवढी पारायणे केली.’’ या नुसत्या पारायणाला अर्थ नाही. संत नामदेवांनी म्हटले आहे,
– ‘एक तरी ओवी अनुभवावी’. नुसती पारायणे करण्यापेक्षा त्या ग्रंथात जे सांगितले आहे, ते आचरणात आणणे महत्त्वाचे आहे. पोथीत सहस्त्रो शब्द असतात. त्यापेक्षा एका नामजपावर यायला हवे.

५. तीर्थयात्रा

तीर्थयात्रेच्या संदर्भातही तोच नियम आहे. जिथे कुलदेव किंवा कुलदेवी आहे, केवळ तिकडेच जावे.

६. भजने म्हणणे

गावोगावी भजनी मंडळे असतात. भजनात सांगितलेले असते ‘देवाचे नाम घ्या, सत्संगाला जा, सत्सेवा करा, ईश्वरप्राप्तीसाठी काहीतरी त्याग करा, देवाविषयी तळमळ असू द्या’; परंतु ते कृतीत न आणता केवळ मोठमोठ्याने भजनेच म्हणतात. अनेक भजनांपेक्षा तुमच्या कुलदेवतेचीच भजने म्हणावीत. अर्थात चित्रपटाची (सिनेमाची) गाणी म्हणण्यापेक्षा भजने म्हणणे निश्चितच चांगले !

७. आरत्या

गणेश चतुर्थीच्या वेळी लोक अनेक आरत्या म्हणतात. गणेश चतुर्थीला श्रीगणेशतत्त्व अधिक प्रमाणात कार्यरत असते. त्यामुळे गणपतीची एकच आरती म्हणणे अधिक श्रेयस्कर असते. गणपतीची शक्ती ‘लंबोदर’ या शब्दात आहे. ‘हिरेजडित मुकुट शोभतो बरा’ हे जे गणपतीचे कौतुक आहे, वर्णन आहे, त्यात श्रीगणेशतत्त्व नाही; म्हणूनच आरती म्हणण्यापेक्षा ‘श्री गणेशाय नमः ।’, असा नामजप केला, तर निश्चितच जास्त लाभ होतो. म्हणजेच अनेक आरत्यांतून एका आरतीकडे, एका आरतीकडून एका नामाकडे, असा आपला सातत्याने प्रवास असला पाहिजे.

तत्त्व क्र. ३ : स्थुलाकडून सूक्ष्माकडे जाणे

आपण देवीच्या स्थूल मूर्तीची किंवा चित्राची पूजा करतो; पण ईश्वरतत्त्व सूक्ष्मतम आहे. तेव्हा आपण आयुष्यभर त्या स्थूल मूर्तीची पूजा करून सूक्ष्मतम तत्त्वापर्यंत कसे पोहोचणार ? म्हणून स्थूल पूजेपेक्षा मानसपूजा करावी. शरिराने देवळात किंवा तीर्थयात्रेला जाण्यापेक्षा मनाने जायचा प्रयत्न करावा. अशा प्रकारे सूक्ष्मातील साधना करायची सवय लागली, तर एक दिवस आपण सूक्ष्मतम तत्त्वापर्यंत निश्चित पोहोचू शकू. नामजपही मोठ्याने करण्यापेक्षा मनाने करण्याचा प्रयत्न करावा.

तत्त्व क्र. ४ : पातळीनुसार साधना

पातळी म्हणजे अधिकार. संत तुकाराम महाराजांनी म्हटले आहे, ‘अधिकार तैसा करू उपदेश’. आपल्याला पेलेल तितकीच साधना करायचा प्रयत्न करावा. जे पेलणार नाही, ते करू नये. आरंभीच्या स्वतःच्या पातळीनुसार टप्प्याटप्प्याने पुढीलप्रमाणे साधना करत जावे. निर्जीव गोष्टींची पातळी ० टक्के आणि मोक्ष म्हणजे १०० टक्के धरले, तर कलियुगातील सर्वसाधारण व्यक्तीची पातळी २० टक्के असते.

पातळी (टक्के) साधना
२० नाही
३० पूजा, देवळात जाणे, पोथीवाचन
४० नामस्मरण
५० सत्संग
५५ सत्सेवा आणि गुरुप्राप्ती
६० धनाचा त्याग

 

तत्त्व क्र. ५ : वर्णानुसार साधना

श्रीकृष्णांनी सांगितले आहे, ‘चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्मविभागशः ।’

– श्रीमद्भगवद्गीता, अध्याय ४, श्लोक १३.

याचा अर्थ असा – ‘मी गुणकर्मानुसार चार वर्णांची निर्मिती केली.’ ज्याची जशी साधना करण्याची क्षमता असेल किंवा ज्याला जी साधना आवश्यक असेल, त्यानुसार त्या त्या वर्णात प्रत्येक जण जन्माला येतो. स्वतःकडे जे आहे, ते ईश्वराला अर्पण करून, म्हणजे वर्णानुसार साधना करून, प्रत्येक जण वेगाने आध्यात्मिक उन्नती करू शकतो.

तत्त्व क्र. ६ : आश्रमानुसार साधना

आपण बहुतेक जण गृहस्थाश्रमी आहोत. पूर्वीचे राजे-महाराजे, ब्रह्मचर्याश्रमी राहून कोणी धर्मग्रंथांचे अध्ययन (साधना) करत असल्यास त्यांची, वानप्रस्थाश्रमींची, तसेच संन्याशांची सोय करायचे; परंतु आजकालच्या निधर्मी राज्यकर्त्याकडून अशी अपेक्षा करणेच अशक्य आहे.

तत्त्व क्र. ७ : काळानुसार साधना

काळ हा अनंत असल्याने युगाच्या भाषेतच मोजता येतो. सत्य, त्रेता, द्वापर आणि कली असे चार युगांचे एक चक्र असते. अशी चक्रे अनंत काळापासून चालत आली आहेत आणि चालत रहाणार आहेत. काळानुसार सगळेच पालटत असते. कलियुगासाठी ‘यज्ञानां जपयज्ञोऽस्मि’ असे भगवंतांनी गीतेत (१०.२५) सांगितले आहे. म्हणजे आज देवतेचा नामजप करणे, ही श्रेष्ठ साधना आहे.

 

तत्त्व क्र. ८ : सगुणापेक्षा निर्गुण श्रेष्ठ

पण साधनेसाठी निर्गुण उपासनेपेक्षा सगुण उपासना श्रेष्ठ.
‘सगुणाची उत्पत्ती निर्गुणापासून होते आणि लयही निर्गुणातच होतो. असे असल्यामुळे सगुणापेक्षा निर्गुण श्रेष्ठ असते. असे असले, तरी साधनेचा आरंभ सगुणातून करून हळूहळू निर्गुणाकडे जावे.

 

तत्त्व क्र. ९ : तत्त्वानुसार साधना

तत्त्वानुसार साधना हा सिद्धांत अद्वैतवादावर आधारलेला आहे.

१. सैद्धांतिक कार्यकारणभाव

‘तत्त्वातून उत्पत्ती आणि तत्त्वातच लय’ या सैद्धांतिक कार्यकारणभावावर हे तत्त्व आधारलेले आहे. हे तत्त्व स्वतःच ईश्वरवाचक आहे. गुरुकृपायोग हा निर्गुणवादाचा पुरस्कर्ता असल्याने त्याचा साधनारूपी कारणभाव, म्हणजेच तत्त्वस्वरूपता किंवा ईश्वरमयता प्राप्त करणे होय.

२. वाईटातून चांगल्याची प्राप्ती करून घेणे

‘तत्त्वानुसार साधना’ हा सिद्धांत मूलतत्त्वाशी संबंधित आहे, म्हणजेच ब्रह्मांडधारणेशी संबंधित आहे.
मांत्रिकांनाही गुरु करून साक्षीभावाने त्यांच्यात ईश्वरी तत्त्व शोधून त्यांचाही समष्टी कार्यासाठी उपयोग करून घेऊन त्यांना विनाशाप्रत नेणे हा उच्च मूलतत्त्ववाद आहे; कारण वाईटातून चांगल्याची प्राप्ती करण्यासाठी पूर्णतः ईश्वरावर श्रद्धा आणि त्याच्या चरणी समर्पितता असावी लागते.

३. प्रत्येक गोष्टीचे आध्यात्मिकरण

‘तत्त्वानुसार साधना’, म्हणजे प्रत्येक गोष्टीचे आध्यात्मिकरण करून प्रत्येक गोष्टीत चैतन्य शोधून त्याला कार्यरत करून त्याची प्राप्ती करणे, म्हणजेच ‘चराचरात ईश्वरी तत्त्व असल्याची अनुभूती घेणे’.

४. दिसेल ते कर्तव्य

या भावाने कृती केली असता प्रत्येक जीव निर्गुण ईश्वरवादाकडे जाऊन शाश्वत तत्त्वाची प्राप्ती करतो, म्हणजेच त्या त्या क्षणी तो कर्तव्याशी एकरूप होऊन मोक्षाचा मानकरी होतो.

तत्त्व क्र. १० : व्यक्तीनिष्ठा नको, तर तत्त्वनिष्ठा हवी !

अ. व्यक्तीनिष्ठेमुळे साधना करणारी व्यक्ती एखाद्या व्यक्तीत अडकू शकते. तत्त्वनिष्ठेमुळे असे होत नाही. साधना करतांना कोणामध्ये अडकायचे नसते; अडकायचे असते ते केवळ ईश्वरामध्ये, तरच जन्म-मृत्यूच्या चक्रातून सदासाठी मुक्त होता येते !

आ. व्यक्तीनिष्ठेमुळे संकुचितता येते, तर तत्त्वनिष्ठेमुळे तसे होत नाही, तर व्यापकत्व येते. अध्यात्मात संकुचितता नाही, तर ‘अवघे विश्वचि माझे घर’, या स्थितीपर्यंत जायचे असते.

संदर्भ : सनातन – निर्मित ग्रंथ ‘गुरुकृपायोगानुसार साधना’