देवद आश्रमातील साधक श्री. गोपाळ जोरी यांना पू. दत्तात्रेय देशपांडेआजोबा यांच्यासमवेत कुडाळ, कोल्हापूर आणि सांगली या जिल्ह्यांत प्रवासाला जाण्याची संधी मिळाली. चैत्र अमावास्या (६.५.२०१६) या दिवशी पू. देशपांडेआजोबांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त श्री. गोपाळ जोरी यांना त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती येथे देत आहोत.
१. पू. देशपांडेआजोबांना मराठी, हिंदी आणि कन्नड या भाषा येतात, तसेच इंग्रजी अन् संस्कृत या भाषांचाही त्यांचा अभ्यास आहे.
२. प्रेमभाव
पू. आजोबा माझ्या मनाची स्थिती जाणून घेऊन मला दृष्टीकोन देतात. एकदा मी त्यांच्या खोेलीतील प्रसाधनगृह स्वच्छ करत होतो. तेव्हा ते अल्पाहार करत होते. त्या वेळीही ते मध्येच येऊन मानसिक ताणातून बाहेर येण्यासाठी कसे प्रयत्न करावेत ?, हे मला सांगत होते. एकदा पू. देशपांडेआजोबा म्हणाले, तू दुःखी असलास, तर मीही दुःखी होतो.
३. पू. आजोबांनी त्यांना मिळणार्या निवृत्तीवेतनामधून पैसे साठवून अर्पण करण्यासाठी ठेवले असल्याने ते पैशांचा वापर स्वतःसाठी करतांना दिसत नाहीत.
४. दैनिक सनातन प्रभातचे नियमित वाचन करणे
पू. आजोबा दैनिक सनातन प्रभात पूर्ण वाचतात. ज्या दिवशी त्यांना दैनिक पूर्ण वाचणे शक्य होत नाही, तेव्हा ते दुसर्या दिवशी उरलेले दैनिक वाचतात आणि त्यानंतर नवीन दैनिक वाचतात.
५. आधुनिक वैद्यांनी विचारलेल्या प्रश्नांना समर्पक उत्तरे देणे
एकदा कोल्हापूर येथे वैद्यकीय उपचारांच्या वेळी एका आधुनिक वैद्यांनी पू. आजोबांना हिंदु राष्ट्र्र आणि साधना यांविषयी अनेक प्रश्न विचारले. तेव्हा त्यांनी त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. त्यांनी दिलेली समर्पक उत्तरे ऐकून ते आधुनिक वैद्य सकारात्मक झाले.
६. छायाचित्र काढतांनाही तोंडवळ्यावर सहजभाव असणे
एका मंदिरात दर्शनासाठी गेलो असतांना मी पू. आजोबांचे छायाचित्र काढले. तेव्हा एक गोष्ट लक्षात आली की, छायाचित्र काढण्यापूर्वी आणि नंतरही पू. आजोबांच्या तोंडवळ्यावर सहजता होती. कोणतेही कृत्रिम हावभाव नव्हते.
७. समाजातील लोकांना जवळीक वाटणे
७ अ. सभोवतालच्या प्रवाशांनी पू. आजोबांशी स्वतःहून येऊन बोलणे
रेल्वेने प्रवास करत असतांना सभोवतालचे प्रवासी पू. आजोबांकडे आकर्षिले जात असत. अनेक जण त्यांंच्या गप्पा सोडून पू. आजोबांकडे येऊन सहजतेने बोलत बसायचे.
७ आ. पू. आजोबा संत असल्याचे
ठाऊक नसतांनाही एकाने त्यांची काळजी घेणे
एका प्रवासात महाराष्ट्रातील एका प्रसिद्ध वर्तमानपत्राचे उपसंपादक श्री. नितीन पवार भेटले. त्यांनी पू. आजोबांची स्वतःहून काळजी घेतली. मला थोडी सेवा करायला मिळू दे, असे त्यांनी मला सांगितले. त्यांनी पहाटे चहा हवा का ?, असे विचारून चहा आणून दिला. त्यांना पू. देशपांडेआजोबा संत आहेत, हे ठाऊकही नव्हते.
८. पू. देशपांडेआजोबांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती
८ अ. गोरक्षनाथांच्या चरणांवर
वाहिलेला शेंदूर पू. आजोबांच्या अंगठ्यावर पडलेला दिसणे
पू. आजोबांसमवेत मी सांगली जिल्ह्यातील गोरक्षनाथांनी तप केलेल्या स्थानाचे दर्शन घ्यायला गेलो होतो. तेव्हा गोरक्षनाथांच्या चरणांवर वाहिलेला शेंदूर पू. आजोबांच्या अंगठ्यावर पडलेला दिसत होता. तो तेथे कसा आला ?, ते समजलेच नाही. त्या वेळी गोरक्षनाथ आणि पू. आजोबा एकच असल्याची अनुभूती देवाने दिली. गोरक्षनाथांना प्रार्थना करतांना पू. आजोबा म्हणाले, संतांच्या रूपाने आम्ही सनातनमध्ये आहोत.
८ आ. पू. आजोबांच्या ठिकाणी एका तेजस्वी व्यक्तीचे दर्शन होणे
एकदा सकाळी पू. आजोबांच्या खोलीत गेलो होतो. ते पलंगावर ध्यानमुद्रेत बसले होते. त्यांच्या ठिकाणी एका तेजस्वी व्यक्तीचे दर्शन झाले. बहुधा ते स्वामी स्वरूपानंद महाराज होते.
८ इ. पू. आजोबांच्या ठिकाणी दत्ताचे अस्तित्व जाणवणे
मला पू. आजोबांच्या ठिकाणी श्री गुरुदेव दत्ताचे अस्तित्व जाणवले. त्यानंतर एकदा ते म्हणाले, मी लहानपणापासून दत्ताची पूजा करत आलो आहे.
८ ई. पू. आजोबांनी सांगितलेले उपाय केल्यावर त्रास न्यून होणे
पू. आजोबांसमवेत कोल्हापूर येथे असतांना एका प्रसंगाचा मला मानसिक त्रास होत होता. तेव्हा त्यांनी गीतेतील ३ श्लोक माझ्याकडून पाठ करून घेतले. ते अधूनमधून म्हणण्यास सांगितले. परिणामी मला होणारा त्रास न्यून झाला.
८ उ. दोन संतांच्या मार्गदर्शनातील सूत्रे सारखीच असणे
मी सेवेनिमित्त प.पू. पांडे महाराज आणि पू. देशपांडे आजोबा यांच्याकडे नेहमी जात असतो. तेव्हा पुष्कळ वेळा दोघांच्या बोलण्यातील आणि मार्गदर्शनातील सूत्रे एकच असल्याचे लक्षात येते.
९. संतभेटीच्या वेळी आणि तीर्थक्षेत्री गेल्यावर जाणवलेली सूत्रे
९ अ. एका संतांनी पू. देशपांडेआजोबांना
जवळ घेऊन हे तर माझे बाबा आहेत, असे म्हणणे
कुडाळ येथे असतांना आम्ही एका संतांच्या मठात गेलो होतो. ते संत त्यांचे दर्शन घेणार्यांच्या पाठीवर जोरात थाप मारत होते किंवा त्यांना काठीने मारत होते. आजोबांनी संत आहेत; म्हणून त्यांच्या चरणांवर डोके ठेवून नमस्कार केला. तेव्हा मला भीती वाटत होती की, ते संत आता पू. आजोबांच्या पाठीत जोरात थाप मारतील; पण प्रत्यक्षात ते संत अकस्मात् पू. आजोबांना जवळ घेऊन हे तर माझे बाबा आहेत, असे म्हणाले.
९ आ. भूमीवर बसणे शक्य नसतांना संतांसमोर भूमीवर बसणे
१. कुडाळ येथील प.पू. गगनगिरी महाराजांचे शिष्य असलेल्या एका संतांना भेटण्याचा योग आला. प्रत्यक्षात पू. आजोबांना भूमीवर बसणे शक्य नव्हते; पण ते त्या संतांच्या भेटीच्या वेळी भूमीवर बसले होते. पू. आजोबांनी त्या संतांना वाकून नमस्कार केला आणि निघतांना गाडीत बसेपर्यंत ते हात जोडून नमस्कार करत होते.
२. सांगली जिल्ह्यातील एका मठात दर्शनासाठी गेलो होतो. तेव्हा पू. आजोबा त्या मठाधिपतींसमोर भूमीवर बसले.
९ इ. दाटीत शिरून श्री ज्योतिबाचे दर्शन घेणे
आम्ही कोल्हापूर येथे श्री ज्योतिबाच्या दर्शनाला गेलो होतो. मंदिरात पुष्कळ दाटी होती. तेथील पुष्कळ लोकांना वाईट शक्तींचा त्रास होत असल्याने ते ओरडत होते. या सर्व वातावरणात पू. आजोबांनी न घाबरता दाटीत शिरून श्री ज्योतिबाचे दर्शन घेतले.
– श्री. गोपाळ जोरी, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (४.५.२०१६)
पू. देशपांडेआजोबांनी सांगितलेले मार्गदर्शक सूत्र
आवश्यक तेवढेच बोला !
आपल्या बोलण्यात एक शब्द चुकला, तरी तेथे दोष निर्माण होतो. आपल्या अयोग्य बोलण्यामुळे अनेक दोष निर्माण होतात, उदा. अनावश्यक बोलणे, रागाने बोलणे, प्रतिक्रिया इत्यादी. यासाठी पू. आजोबा म्हणतात, आवश्यक तेवढेच बोला. एकदा ते इंग्रजीत म्हणाले, If you want to be wise, keep quiet and just smile. – श्री. गोपाळ जोरी, सनातन आश्रम, देवद, पनवेल.
पुरोगाम्यांनी सनातनला विरोध करणे,
म्हणजे मुंग्यांनी हत्तीला दाबण्यासारखे
हास्यास्पद आहे, असे पू. आजोबांनी सांगणे
पुरोगामी सनातनला विरोध करतात. त्याविषयी पू. आजोबा म्हणाले, एकदा एका झाडाखालून हत्ती चालला होता. त्या वेळी झाडावरील काही मुंग्या हत्तीच्या अंगावर उड्या मारून म्हणाल्या, दबावो साले को । या मुंग्यांप्रमाणे पुरोगामी लोक सनातनरूपी हत्तीला दाबण्याचा प्रयत्न करत आहेत; पण ते हास्यास्पद आहे.
– श्री. गोपाळ जोरी, सनातन आश्रम, देवद, पनवेल.