सनातनच्या रामनाथी आश्रमातील स्वयंपाकघराचे दायित्व
लीलया सांभाळणार्या कु. रेखा काणकोणकर संतपदी विराजमान !
पू. (कु.) रेखाताई ठरल्या सनातनच्या ६० व्या संत

रामनाथी (गोवा), १५ एप्रिल (वार्ता.) – श्रीराम नवमी हा दिवस साक्षात प्रभु श्रीराम भूतलावर अवतरले तो दिवस. त्यामुळे आजच्या पवित्र दिनी भगवंत सनातनच्या साधकांना कोणती अमूल्य भेट देणार आहे, याची प्रत्येक साधकालाच उत्कंठा लागली होती. त्याप्रमाणे रामनाथी आश्रमातील संपूर्ण अन्नपूर्णा विभाग (स्वयंपाकघर) सांभाळत असतांनाच साधकांनाही साधनेत पुढे जाण्यास साहाय्य करणार्या आणि सतत देवाच्या अनुसंधानात राहून साधकांपुढे आदर्श ठेवणार्या कु. रेखा काणकोणकर (वय ३८ वर्षे) या संतपदी विराजमान झाल्याचे सनातनच्या पू. (सौ.) अंजली गाडगीळ यांनी घोषित केले आणि पू. (कु.) रेखाताई सनातनच्या ६० व्या संत ठरल्या.
पू. (सौ.) गाडगीळ यांनी त्यांना हार अर्पण करून अन् भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान केला अन् हा भावसोहळा अनुभवत असतांना उपस्थित सर्व साधकांच्या डोळ्यांत भावाश्रू दाटून आले. या वेळी सनातनचे वैद्य पू. विनय भावे आणि पू. (डॉ.) मुकुल गाडगीळ यांच्यासह आश्रमातील साधक उपस्थित होते. रामनवमीच्या दिनी भगवान श्रीकृष्ण आणि परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांनी सर्व साधकांना अमूल्य भेट दिल्याविषयी उपस्थित सर्व साधकांनी भावपूर्ण कृतज्ञता व्यक्त केली.
श्रीरामनवमीच्या निमित्ताने रामनाथी आश्रमात एका भावसत्संगाचे आयोजन करण्यात आले होते. येथील कलामंदिरात पार पडलेल्या या सत्संगात पू. (सौ.) अंजली गाडगीळ यांनी प्रत्यक्ष स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया जगणार्या सौ. सुप्रिया माथुर आणि कु. रेखा काणकोणकर यांच्याशी संवाद साधला. या वेळी सौ. माथुर यांनी देशभरातून स्वभावदोष निर्मूलन प्रक्रियेसाठी आलेल्या साधकांना साधनेत पुढे नेण्याचे शिवधनुष्य पेलत असतांनाच स्वत:ही कशा प्रकारे प्रक्रिया राबवली याविषयी सांगितले. हा संवादरूपी सत्संग चालू असतांनाच सौ. सुप्रिया माथुर यांनी ६२ टक्यांवरून ६४ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे सनातनच्या पू. (सौ.) गाडगीळकाकू यांनी घोषित केले. याप्रसंगी त्यांचा पू. (सौ.) गाडगीळ यांच्या हस्ते भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे सर्व साधकांच्या भोजन व्यवस्थेचे दायित्व सांभाळत असतांनाच स्वत:चीही आध्यात्मिक उन्नती साध्य करत संतपदी विराजमान होणार्या कु. रेखा काणकोणकर यांच्या साधनेमागील गूढ रहस्यही पू. (सौ.) गाडगीळकाकू यांनी सहजपणे उलगडले. यातून पू. (कु.) रेखाताई यांच्या प्रगतीमागे त्यांच्यात असलेले निरपेक्ष प्रेम आणि गुरूंचे आज्ञापालन करण्याची तळमळ आदी गुणांचे दर्शन या वेळी उपस्थितांना घडले.

पू. (कु.) रेखा काणकोणकर यांचे मनोगत
मला काही येत नाही. मी सर्व विचारून विचारून करत आले आहे. साधना करतांना कोणताही ताण घ्यायचा नाही. सर्व देव करवून घेणारच आहे.
पू. (कु.) रेखा काणकोणकर यांच्यातील प्रेमभाव दर्शवणारा प्रसंग
पू. (कु.) रेखाताई यांच्याकडे आश्रमातील स्वयंपाकघराचे महत्त्वाचे दायित्त्व आहे. त्या आश्रमात पूर्णवेळ साधना करण्यास आल्यापासून वर्षातून एकदाच घरी जातात आणि तेही फार अल्प कालावधीकरता ! एकदा त्या गणेश चतुर्थीच्या निमित्ताने घरी गेल्या होत्या, तेव्हा त्यांनी स्वत: सर्व साधकांसाठी करंज्या बनवून आणल्या होत्या.
रामनाथी आश्रमातील सर्वाधिक
फलनिष्पत्ती असणार्या अन्नपूर्णा कक्षाचे दायित्व
सांभाळणार्या कु. रेखा काणकोणकर संतपदी विराजमान !
कु. रेखा काणकोणकर (वय ३८ वर्षेे) हिने बी.कॉम.पर्यंतचे शिक्षण पूर्ण करून वयाच्या २३ व्या वर्षी पूर्णवेळ साधनेला आरंभ केला. मुळात व्यष्टी प्रकृती असूनही अखंड शिकण्याची स्थिती, सेवेची तीव्र तळमळ आणि अल्प अहं यांमुळे ती अल्पावधीत रामनाथी आश्रमातील अन्नपूर्णा कक्षाचेे दायित्व समर्थपणे सांभाळू लागली. कधी साधकांना त्यांच्यातील दोष आणि अहं यांची कठोरतेने जाणीव करून देऊन, तर कधी त्यांच्यावर मातृवत् प्रेम करून तिने सहसाधकांच्या साधनेची घडी बसवण्यासाठी तळमळीने प्रयत्न केले. आश्रमातील साधकांना प्रतिदिन वेळेत दोन्ही वेळा महाप्रसाद (जेवण) मिळावा, यासाठीची तिची तळमळ आणि उत्कृष्ट नियोजन यांमुळे गेल्या १० वर्षांत एकदाही साधकांना उशिरा महाप्रसाद मिळालेला नाही. ती १० वर्षांपूर्वी माझ्यासाठी जसे भावपूर्ण जेवण बनवायची, तसेच गेली १० वर्षे आश्रमातील साधकांसाठी बनवत आहे.
मनाची निर्मळता, प्रेमभाव, भगवंताप्रतीचा भोळा भाव आदींमुळे तिने आजच्या या शुभदिनी ७१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली असून ती सनातनच्या संतांच्या मांदियाळीतील ६० वी समष्टी संतरत्न झाली आहे. अन्नपूर्णा कक्षातील साधकांनी पू. रेखा यांचा आध्यात्मिक स्तरावर लाभ करून घेऊन स्वतःचीही उन्नती करून घ्यावी.
पू. रेखा यांची पुढील प्रगती आणखीन जलद गतीने व्हावी, अशी या रामनवमीच्या शुभदिनी प्रभु श्रीरामाच्या चरणी प्रार्थना ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले