हिंदूंना स्वातंत्र्यापासून आजतागायत
धर्मशिक्षण दिले गेले नाही, हे हिंदूंचे दुर्दैवच !
– प.पू. स्वामी परमानंद सरस्वती महाराज,
धर्मजागरण समिती, उपाध्यक्ष, धार जिल्हा, मध्यप्रदेश.
उज्जैन सिंहस्थ पर्व विशेष !
उज्जैन सिंहस्थ पर्वक्षेत्री सनातन संस्था
आणि हिंदु जनजागृती समिती यांचे प्रदर्शन
उज्जैन – हिंदूंना स्वातंत्र्यपासूनच धर्मशिक्षण द्यायला हवे होते; मात्र हे धर्मशिक्षण दिले गेले नाही, हे दुर्दैवी. धर्मशिक्षण नसल्याने आज हिंदु समाज आपापसांत भांडून धर्म आणि राष्ट्र यांची हानी करत आहे, असे प्रतिपादन धर्मजागरण समितीचे धार जिल्हा उपाध्यक्ष प.पू. स्वामी परमानंद सरस्वतीजी महाराज यांनी केले. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने उज्जैन सिंहस्थ पर्वक्षेत्री लावण्यात आलेल्या प्रदर्शनाला भेट देण्याच्या प्रसंगी ते बोलत होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. विनय पानवळकर यांनी त्यांना प्रदर्शनाची माहिती सांगितली, तसेच पुष्पहार आणि श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान केला.
क्षणचित्र : धार येथे संत संमेलन आयोजित करण्याचे प.पू. स्वामी परमानंद सरस्वतीजी यांचे नियोजन आहे. त्या वेळी धर्मशिक्षण फलकांचे प्रदर्शन लावण्यासाठी त्यांनी हिंदु जनजागृती समितीला आमंत्रण दिले.
सनातनच्या ग्रंथसंपदेचा अधिकाधिक
प्रचार होणे आवश्यक ! – महामंडलेश्वर श्री श्री
१००८ स्वामी शिवचैतन्यपुरीजी महाराज, वरिष्ठ आचार्य,
श्रीशंकर पीठाधीश्वर पंचायती आखाडा महानिर्वाणी, वृंदावन
हिंदु धर्मात सांगितलेल्या सर्व कृती शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक कारणांचा विचार करून सिद्ध केल्या गेल्या आहेत. आमच्या संस्कृतीत जे लिहिले आहे, तेच उच्चारले जाते. एखादा शब्द जरी पालटला, तरी अर्थ पालटतो. या उलट इंग्रजी भाषेत एक लिहिले जाते आणि उच्चारले दुसरे जाते. त्यामुळे भ्रष्टतेचे संस्कार मनावर होऊन व्यक्ती भ्रष्ट होते. हीच भ्रष्टता भारतात आणण्याचे प्रकार चालू आहेत. यापासून रक्षण होण्यासाठी लोकांना योग्य काय, याची माहिती होणे आवश्यक आहे. योग्य कृतींचे शास्त्र सनातनने प्रकाशित केलेल्या ग्रंथांत दिले आहे. या ग्रंथसंपदेचा अधिकाधिक प्रचार होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन वृंदावन येथील श्रीशंकर पीठाधीश्वर पंचायती आखाडा महानिर्वाणीचे वरिष्ठ आचार्य महामंडलेश्वर श्री श्री १००८ स्वामी शिवचैतन्यपुरीजी महाराज यांनी केले. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने उज्जैन सिंहस्थ पर्वक्षेत्री लावण्यात आलेल्या प्रदर्शनाला भेट दिल्याच्या प्रसंगी महाराज बोलत होते.
क्षणचित्र :
१. महाराजांना ग्रंथ प्रदर्शनावरील धर्मशिक्षा फलक हा ग्रंथ पुष्कळ आवडला. त्यांनी तो ग्रंथ आवर्जून देण्याची मागणी केली.
२. महाराजांचा सन्मान केल्यावर त्यांनी उपस्थित सर्व साधकांना त्यांच्या आश्रमाने प्रकाशित केलेले ग्रंथ भेट म्हणून दिले.
३. हिंदु राष्ट्राचा वटवृक्ष दर्शवणारा फ्लेक्स फलक दाखवल्यावर त्यांनी हे चित्र धर्मशास्त्राला अपेक्षित असे आहे, असे सांगितले.
सनातनच्या कार्यामुळे समाजात क्रांतीकारक
परिवर्तन होणार ! – श्री महंत स्वामी मनोहरपुरीजी महाराज,
राष्ट्रीय संरक्षक, हिंदु धर्मगुरु दशनाम गोस्वामी आखाडा, इंदूर, मध्यप्रदेश.
हिंदु संस्कृतीच्या रक्षणाचे कार्य या प्रदर्शनातून होत आहे. मागील ६७ वर्षांपासून हिंदूंना धर्मशिक्षण न दिल्याची चूक सुधारण्याचे कार्य यातून होत आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून जनजागृती व्हावी, चुकीच्या प्रथांविषयी जनता जागृत व्हावी आणि सर्वांना धर्मशिक्षण मिळावे, अशी प्रार्थना ! या प्रदर्शनाला शंकराचार्यांनीही भेट द्यावी, यासाठी मी प्रयत्न करणार, असे प्रतिपादन इंदूर येथील हिंदु धर्मगुरु दशनाम गोस्वामी आखाड्याचे राष्ट्रीय संरक्षक श्री महंत स्वामी मनोहरपुरीजी महाराज यांनी केले. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यामाने उज्जैन सिंहस्थ पर्वक्षेत्री लावण्यात आलेल्या प्रदर्शनाला भेट दिल्यानंतर ते बोलत होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्या हस्ते पुष्पहार आणि श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला, तर हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रकाश मालोंडकर यांनी त्यांना प्रदर्शनाची माहिती दिली.
राष्ट्र आणि धर्म यांविषयी बोलणार्या संतांना आतंकवादी
ठरवले जाते ! – पू. जगदीश जोशी, संस्थापक, द्वारका आश्रम, उज्जैन.
सध्याच्या काळात संतांनी राष्ट्र आणि धर्म विषयक कार्यच नव्हे, तर साधी चर्चाही केली, तरी त्यांना आतंकवादी ठरवले जात आहे. याउलट अन्य पंथांतील संत आणि त्यांच्या कुप्रथांविषयी मौन बाळगले जाते. ही स्थिती पालटायला हवी. सनातनचे आणि माझे कार्य एकच आहे. साधक तीव्र उन्हाळा असतांनाही बाहेर रस्त्यावर उभे राहून भाविकांना निमंत्रण देतात, यातून साधकांचे समर्पण लक्षात येते, असे प्रतिपादन द्वाराका आश्रमाचे संस्थापक पू. जगदीश जोशी यांनी केले. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यामाने उज्जैन सिंहस्थ पर्वक्षेत्री लावण्यात आलेल्या प्रदर्शनाला भेट दिल्याच्या प्रसंगी पू. जोशी बोलत होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्या हस्ते पुष्पहार आणि श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
क्षणचित्र : कुठेही स्वत:चा सन्मान करून न घेणारे किंवा स्वतःचे छायाचित्रही काढू न देणारे पू. जगदीश जोशी यांनी साधकांकडून सन्मान स्वीकारला आणि छायाचित्र काढण्यास होकार दिला.