१. रामेश्वरम् येथील ‘रामनाथस्वामी’ मंदिर आणि त्याचा इतिहास !
१ अ. रावण हा दशग्रंथी ब्राह्मण असल्याने त्याच्या वधामुळे श्रीरामाला ब्रह्महत्येचे पातक
लागणे आणि त्याच्या परिमार्जनासाठी श्रीराम अन् सीता यांनी वाळूचे शिवलिंग स्थापन करून त्याची पूजा करणे
‘रामस्य ईश्वरः रामेश्वरः ।’, म्हणजे ‘रामाचा ईश्वर, तो रामेश्वर.’ भगवान श्रीरामाने ज्या ईश्वराचे (शिवाचे) पूजन केले, असा भगवंत म्हणजे रामेश्वर ! रामेश्वर हे दैवत रामेश्वरम् येथील रामनाथस्वामी मंदिराची अधिष्ठात्री देवता आहे. श्रीराम हा भगवान श्रीविष्णूचा सातवा अवतार होता. लंकाधिपती रावण हा दशग्रंथी ब्राह्मण होता. त्याचा वध केल्यामुळे श्रीरामाला ब्रह्महत्येचे पातक लागले. लंकेतून सीतेला सोडवून अयोध्येला परत जातांना श्रीरामाने रामेश्वरम् येथे विश्राम घेतला. ‘ब्रह्महत्येच्या पातकाचे परिमार्जन होण्यासाठी श्रीराम आणि सीता यांनी येथे एकत्रितपणे शिवलिंग स्थापून त्याचे पूजन करावे’, असे वसिष्ठ ऋषि आणि विश्वामित्र ऋषि यांनी श्रीरामाला सांगितले. त्याप्रमाणे श्रीराम आणि सीता यांनी येथे वाळूचे शिवलिंग स्थापले अन् त्याची विधीवत पूजा केली.
१ आ. रामेश्वरम् हे १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग असणे आणि
या मंदिरात आद्य शंकराचार्यांनी पूजा केलेले ‘चंद्रमौळीश्वर’ नावाचे स्फटिक लिंग असणे
रामेश्वरम् हे १२ ज्यातिर्लिंगांपैकी एक आहे. येथे शिवाला ‘रामनाथ’ या नावाने संबोधले जाते आणि येथील देवीचे नाव ‘पर्वतवर्धिनी’ आहे. रामेश्वरम्चे पूर्वीचे नाव ‘सेतूपुरी’ किंवा ‘सेतूबंध रामेश्वरम्’ असे आहे. या मंदिरात २ सहस्र ६०० वर्षांपूर्वी आद्य शंकराचार्यांनी पूजा केलेले ‘चंद्रमौळीश्वर’ नावाचे स्फटिक लिंगही आहे. प्रत्येक दिवशी पहाटे ५ ते सकाळी ६ या वेळेत मंदिराच्या गाभार्यात या स्फटिक लिंगावर अभिषेक करण्यात येतो. या वेळी उपस्थित भक्तांना या स्फटिकाच्या शिवलिंगाचे दर्शन घेता येते.
२. प्रभु श्रीरामाच्या अस्तित्वाचे स्मरण करून
देणारा रामसेतूतील चैतन्यमय दगड आणि श्रीरामकालीन नाणे
रामसेतूचा तरंगता दगड. हा ४ किलो वजनाचा आहे, तर बाजूला
असलेले त्याच्यापेक्षा कमी वजनाचा दगड पाण्यात बुडाले आहेत.
प्रभु श्रीरामाच्या काळातील नाणे
तमिळनाडू राज्याच्या पूर्वकिनार्यावर रामेश्वरम् हे तीर्थक्षेत्र आहे. रामेश्वरम्च्या दक्षिण बाजूस ११ कि.मी. अंतरावर धनुषकोडी हे नगर (शहर) आहे. रामसेतूच्या अलीकडील भागाला धनुषकोडी (कोडी म्हणजे धनुष्याचे टोक) असे म्हणतात; कारण साडेसतरा लाख वर्षांपूर्वी रावणाच्या लंकेत (श्रीलंकेत) प्रवेश करण्यासाठी श्रीरामाने त्याच्या कोदंड धनुष्याच्या टोकाने सेतू बांधण्यासाठी हे स्थान निश्चित केले. एका रेषेत मोठे दगड असलेल्या टापूंची शृंखला रामसेतूच्या भग्नावशेषांच्या रूपात आजही आपल्याला पहायला मिळते. रामसेतू नल आणि नील यांच्या वास्तूशास्त्राचा एक अद्भुत नमुना आहे. या रामसेतूची रुंदी आणि लांबी यांचे प्रमाण एकास दहा आहे, असे सविस्तर वर्णन वाल्मीकि रामायणात आहे. प्रत्यक्ष मोजमापन केल्यानंतरही त्यांची रूंदी ३.५ कि.मी एवढी असून लांबी ३५ कि.मी एवढी आहे. या सेतूच्या निर्माणकार्याच्या वेळी चिमुकल्या खारीने उचललेल्या वाट्याची कथा आणि पाण्यावर तरंगत असणारे तेथील दगड या गोष्टी आम्हा हिंदूंच्या पिढ्यान्पिढ्यांना माहीत आहेत.