गुरुकृपायोगाची निर्मिती करून अखिल मानवजातीवर कृपेचा वर्षाव करणारे एकमेवाद्वितीय प.पू. डॉक्टर !

१. गुरुकृपायोग आणि प.पू. डॉक्टर म्हणजे रमणीयतेची मूर्ती !

चरित्र ग्रंथ लिहितांना मला वाटले, मला गुरुकृपायोग समजला. आज त्यातले नवीन पैलू माझ्या लक्षात आले; म्हणूनच आरंभापासून गुरुकृपायोग आनंददायी झाला आहे. मला निश्‍चिती आहे की, काही दिवसांनी अजूनही नवीन पैलू माझ्या लक्षात येतील. म्हणूनच मी गुरुकृपायोगाला रमणीय म्हटले आहे. महाकवी माघ यांनी रमणीयतेची व्याख्या केली आहे.

क्षणे क्षणे यन्नवताम् उपैति तदेव रूपं रमणीयतायाः ॥

अर्थ : ज्यात प्रत्येक क्षणी नाविन्याची अनुभूती येते, तेच रमणीयतेचे रूप आहे.

प.पू. डॉक्टरांचा प्रत्येक विचार, कृती आणि बोलणे इत्यादींत प्रतिदिन नाविन्य आढळते. त्यांच्या त्याच बोलण्यातही काहीतरी नाविन्य असतेच; म्हणून प.पू. डॉक्टर हे रमणीयतेची मूर्तीच आहेत, असे म्हणता येईल.

– शिशुपालवध, सर्ग ४, श्‍लोक १७

– (पू.) डॉ. वसंत बाळाजी आठवले (अप्पाकाका), चेंबूर, मुंबई.

 

२. प.पू. डॉक्टरांनी नवीन योगमार्ग गुरुकृपायोग सांगणे

लाखो वर्षांपासून, वेद काळापासून ईश्‍वरप्राप्ती आणि मोक्षप्राप्ती हे साधनामार्ग ठराविक चाकोरीतूनच जात होते, उदा. कर्मयोग, भक्तीयोग, ज्ञानयोग, ध्यानयोग, हठयोग इत्यादी. गीतेत याचे सारभूत वर्णन आहे; परंतु महर्षी व्यास, आद्य शंकराचार्य यांनी त्या मार्गांत भर टाकली. त्यांच्यावर उत्कृष्ट भाष्य करून लोकांना त्यांचा मतितार्थ समजावून सांगितला; पण नवीन साधना मार्ग शोधून काढला नाही. प.पू. डॉक्टरांनी प्रचलित योगमार्गांपासून निराळा असलेला गुरुकृपायोग सांगितला. नवीन योगमार्गाची निर्मिती हे कार्य अवतारच करू शकतो.

 

३. इतर योगमार्ग आणि गुरुकृपायोग यांची वैशिष्ट्ये

३ अ. व्यष्टी साधना

३ अ १. इतर संत : प्रचलित साधनामार्गांत सांगितल्याप्रमाणे बहुतेक संत आपले शिष्य आणि भक्त यांना नामजप, भजन, प्राणायाम, आसने, ध्यान-धारणा, पोथी-वाचन, काही स्तोत्रे आणि आरत्या म्हणणे इत्यादी ठराविक साच्यातील साधना सांगतात. तसेच काही दानधर्मही करण्यास सांगतात.

 

३ अ २. गुरुकृपायोग : यात ईश्‍वरप्राप्तीसाठी ईश्‍वरात असलेले दैवी गुण आपल्यात आणायचे आणि आपल्यात असलेली आसुरी संपदा, म्हणजेच स्वभावदोष अन् अहं यांचे निर्मूलन करायचे, ही प्रमुख व्यष्टी साधना आहे. त्यासाठी सतत आपल्या मनाकडे लक्ष द्यावे लागते.

३ आ. समष्टी साधना

३ आ १. इतर योगमार्ग : ही संकल्पनाच इतर योगमार्गांत नाही.

३ आ २. गुरुकृपायोग : समष्टी साधनेला ७० टक्के महत्त्व आहे. या अंतर्गत हिंदु राष्ट्राची स्थापना, हिंदु धर्म स्थापना आणि हिंदु संस्कृतीची जपणूक अन् वृद्धी ही प्रमुख उद्दीष्टे आहेत.

 

४. गुरुकृपायोगांतर्गत सेवा

गुरुकृपायोगांतर्गत सेवा आपण नेहमीच्या ज्या कृती करतो, त्यांना आध्यात्मिक वळण द्यायचे, उदा. जे लेखा-विभागात सेवा करतात, ज्यांना जमाखर्चाची माहिती आहे, त्यांनी सनातनच्या लेखा-ची सेवा करायची. भेद इतकाच की, आपण पैसे मिळवण्यासाठी नोकरी-धंदा करतो. साधक झाल्यावर तीच नोकरी सेवा म्हणून करायची; पण त्या वेळी सेवेतील वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे असायला हवीत.

अ. सेवा परिपूर्ण, कुशलतेने आणि आनंदाने करणे

आ. सेवेत एकही चूक आढळता कामा नये.

इ. गुर्वाज्ञा म्हणून करायची कोणतीही सेवा निःस्वार्थपणे, आसक्ती न ठेवता आणि कर्तेपणा न ठेवता करणे

४ अ. काम आणि सेवा यांतील भेद

कार्यालयात लेखा विभागात करतांना कामाचा कंटाळा येतो. कार्यालयातून कधी घरी येतो, असे वाटते. अधिक वेळ काम केल्यास त्याचा भत्ता मिळतो; म्हणून काम करतात. तेच काम सेवा म्हणून केल्यास आनंद मिळू लागतो. काम टाळण्यापेक्षा किती वेळ अधिक सेवा करू ?, असे वाटते.

४ आ. प्रत्येक कृती करतांना आनंद
मिळवणे, हे व्यष्टी आणि समष्टी साधनेत अंतर्भूत असणे

आपल्या प्रत्येक कृतीचे आध्यात्मिकीकरण करून प्रत्येक कृती करतांना आनंद मिळवणे, ही साधना व्यष्टी आणि समष्टी साधनेत अंतर्भूत होते. गुरुकृपा हि केवलं शिष्यपरममङ्गलम् ।म्हणजे केवळ गुरुकृपाच शिष्याचे परममंगल, परमहित, म्हणजे मोक्षप्राप्ती, ईश्‍वरप्राप्ती करून देऊ शकते.

 

५. गुरुकृपायोगात इतर योगमार्गांप्रमाणे गुरुमंत्र नसणे

गुरुकृपायोगात इतर योगमार्गांप्रमाणे गुरुमंत्र नसणे काही संप्रदायांत गुरुमंत्राचे जास्त स्तोम माजवलेले आहे. प.पू. डॉक्टरांनी कोणालाही गुरुमंत्र दिलेला नाही, तरीही साधकांची विहंगम मार्गाने आध्यात्मिक प्रगती होऊन आतापर्यंत सनातनचे १२२ साधक संत झाले आहेत. (ऑगस्ट २०२२ पर्यंत) अर्थात् योग्य गुरूंकडून गुरुमंत्र मिळाल्यास अवश्य घ्यावा.

 

६. गुरुकृपा संपादन करणे

गुरुकृपायोग हा सर्व योगांचा मेरूमणी असणे गुरुकृपायोग ज्याला कळला आणि वळला, तो सुटला. गुरुकृपायोग हा सर्व योगांचा मेरूमणी आहे. जितके गुरुकृपायोगावर चिंतन आणि मनन करावे, तितके त्याचे अंतरंग उलगडत जाते. गुरुकृपायोग हा यो बुद्धेः परतस्तु सः । म्हणजे बुद्धीच्या पलीकडील स्तरावरील असल्यामुळे ज्यांनी आपल्या विश्‍वबुद्धीने गुरुकृपायोग निर्माण केला, ते परात्पर गुरुच गुरुकृपायोगाला पूर्णत्वाने जाणू शकतात.

– (पू.) डॉ. वसंत बाळाजी आठवले (अप्पाकाका), चेंबूर, मुंबई.

(माघ कृष्ण पक्ष सप्तमी, कलियुग वर्ष ५११४ (४.३.२०१३))