पंचदशनाम जुना आखाड्याच्या पेशवाईचे सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याकडून स्वागत !

उज्जैन सिंहस्थपर्व

USK_Peshwai_05-Apr-2016_20
पेशवाईचे शंखनादाद्वारे स्वागत करतांना सनातनचे साधक

 

USK_Peshwai_05-Apr-2016_19
पेशवाईतील सहभागी संतांना ओवाळतांना सनातनच्या साधिका

 

USK_Peshwai_05-Apr-2016_4
संतांच्या स्वागतासाठी सनातनच्या वतीने लावण्यात आलेले स्वागताचे फलक

         उज्जैन, ६ एप्रिल (श्री. निषाद देशमुख) – येथे होणार्‍या सिंहस्थपर्वानिमित्त ५ एप्रिल या दिवशी पंचदशनाम जुना आखाड्याच्या (दत्त आखाड्याच्या) वतीने नीलगंगा ते रामघाट मार्गावरून पेशवाई (मिरवणूक) काढण्यात आली होती. या पेशवाईत जुना आखाड्याचे प.पू. अवधेशानंद गिरीजी महाराज, श्रीमहंत देव्या गिरी, गोल्डन बाबा, महामंडलेश्‍वर पायलट बाबा, महामंडलेश्‍वर स्वामी कपिलपुरी महाराज, महामंडलेश्‍वर श्री श्री श्री १००८ स्वामी राजराजेश्‍वरानंद गिरी महाराज आणि श्रीकाशीसुमेरू पीठाधीश्‍वर जगद्गुरु शंकराचार्य अनंत विभूषित स्वामी नरेंद्रानंद सरस्वती महाराज अन् इतर अनेक संतांची वंदनीय उपस्थिती होती. स्थानिक भाविक, विविध समाज, तसेच सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याकडून पेशवाईचे स्वागत, आणि औक्षण करण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांची वंदनीय उपस्थिती होती. सनातन आणि समिती यांनी पेशवाईच्या स्वागतासाठी उज्जैन शहरातील महत्त्वाचे मार्ग असलेल्या चामुण्डा माता चौक ते देवास गेट परिसरात ठिकठिकाणी हार्दिक स्वागताचे कापडी फलक लावले होते, तर काही ठिकाणी साधक साधू-संतांच्या स्वागतासाठी हातात कापडी फलक घेऊन उभे होते, पेशवाईत येणार्‍या संतांची आरती ओवाळून पूजन करण्यात आले आणि संतांच्या आगमनाच्या वेळी शंखनाद अन् पुष्पवृष्टीही करण्यात आली. पेशवाईत सहभागी अनेक संतांनी आवर्जून लक्ष देऊन साधकांवर पुष्पवृष्टी करून, हार देऊन आणि प्रसाद देऊन आशीर्वाद दिले. साधकांना पाहून संत स्मित हास्य करून प्रतिसाद द्यायचे.

क्षणचित्रे

१. सनातनने लावलेले कापडी फलक अनेकांचे लक्ष वेधून घेणारे होते. अनेकांनी आवर्जून फलकांची छायाचित्रे काढली.

२. अनेक वयस्कर साधक हातात कापडी फलक घेऊन उभे होते. त्या वेळी अनेक तरुण त्यांना फलक लावण्यात साहाय्य करत होते. तसेच कापडी फलक धरणार्‍या साधकांना लोक स्वत:हून पाणी आणून देत होते.

३. पोलीस भाविकांना मागे हटवत होते; परंतु फलक धरलेल्या साधकांना त्यांनी काहीच सांगितले नाही किंवा मागे सरकवले नाही.

४. एका साधूने सनातन संस्थेचे फलक पाहून सांगितले की, सनातन पंचांगची अ‍ॅण्ड्रॉईड आवृत्ती माझ्या भ्रषमणभाषमध्ये डाउनलोड केलेली आहे. प्रतिदिन मी ती पहातो. त्यामुळे मला प्रतिदिन सनातनची आठवण होते.

५. प.पू. अवधेशानंद गिरीजी महाराज यांचे आशीर्वाद घेण्यासाठी अनेक भाविक सनातनने लावलेल्या फलकासमोर येऊन थांबले होते. महाराजांना नमस्कार केल्यावर त्यांनी सनातनच्या फलकाकडे बोट करून मी आणि फलक एकच आहे आणि एकत्रित आहे, असे खूणेने सर्वांना सांगितले. त्यानंतर साधकांकडे पाहूनही त्यांनी आनंद व्यक्त केला.

अनुभूती

१. अर्धा किलोमीटरच्या परिसरात फलक लावण्यात आले होते. फलक लावल्यानंतर तेथील सर्व वातावरणात पालट होऊन चांगले वाटत असल्याचे साधकांना जाणवत होते.

२. फलक हातात धरून ग्रामदेवता श्री महाकालेश्‍वर देवाला प्रार्थना केल्यावर साधकांना शक्ती प्राप्त होत होती, तसेच उत्साह जाणवत होता.

३. मला मधुमेहाचा त्रास आहे. मला मधे-मधे भूक लागल्यावर खावे लागते आणि लघवीला जावे लागते; पण ५ घंटे फलक धरण्याची सेवा करत असतांना वरील दोन्ही त्रास झाले नाहीत. – श्री. अप्पासाहेब आनंदा सांगोलकर, पंढरपूर, जिल्हा सोलापूर.

४. आम्ही कापडी फलक बांधत असतांना तो व्यवस्थित लागला नव्हता. त्यामुळे भाविक सांगत होते की, आम्हाला फलक वाचता येत नाही, तो सरळ करा. तेवढ्यात एक व्यक्ती तार घेऊन आली आणि तिने फलक वर बांधून दिला. – डॉ. बाबूराव लक्ष्मण कडूकर, गडहिंग्लज, कोल्हापूर.

५. एक दत्त उपासक संतांचे औक्षण केल्यावर त्यांनी साधकांवर पुष्पवृष्टी केली. त्या वेळी एकदम देवतांचे अस्तित्व जाणवून वेगळा सुगंध आला. – सौ. स्मिता कुलकर्णी, उज्जैन, मध्यप्रदेश

     (भाव तेथे देव या उक्तीप्रमाणे या साधकांना आणि कार्यकर्त्यांना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक)