पाहुण्यांना पहिल्या भेटीपासूनच निरपेक्ष प्रेम देऊन त्यांना
आश्रमभेटीची ओढ लावणारा रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रम !
सात्त्विकता आणि चैतन्य यांची अनुभूती देणारा आणि
विश्वदीप असलेला रामनाथी, गोवा येथील सनातनचा आश्रम
परात्पर गुरु डॉ. आठवले (प.पू. डॉक्टर) यांच्या कृपेमुळे मला रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमात रहाण्याचे भाग्य प्राप्त झाले. ज्यांनी आश्रम पाहिला नाही, त्यांना आश्रमाविषयी थोडीशी तरी कल्पना यावी, या उद्देशाने केलेले हे स्वल्प लिखाण, म्हणजे गुरुचरणी अर्पिलेले कृतज्ञतापुष्पच आहे. देवा, तू याचा स्वीकार करशील ना !
१. रामनाथी आश्रमात पाहुण्यांचे प्रेम द्यावे
अन् प्रेम घ्यावे । प्रेम निरपेक्ष असावे ॥ अशा प्रकारे स्वागत होणे
श्रीकृष्णाविना असे प्रेम कोण करू शकतो ? कुणी येणार असे कळवले की, त्यांना आणायला स्थानकावर गाडी पाठवली जाते. त्यांच्यासाठी खोली, खोलीतील कपाटातील कप्पा, तसेच रात्री येणार असल्यास अंथरूण-पांघरूण अशी सर्व सिद्धता केलेली असते !
आश्रमात प्रवेश करताच हसून स्वागत होते. न सांगताच सामान उचलून खोलीत न्यायला साहाय्य केले जाते. साधक हे इतक्या प्रेमाने, सहजतेने आणि शीघ्र गतीने करतात की, येणारा बघतच रहातो ! काही विचारावे लागत नाही कि मागावे लागत नाही.
कलियुगात एवढे प्रेम मिळत आहे, हे पाहून येणारे पाहुणे भारावून आश्चर्यचकित होऊन जातात आणि अरे, एवढे प्रेम ! कृतार्थ झालो ! धन्य झालो !, असे म्हणतात. हे प्रेम सर्वांना प.पू डॉक्टरांनी कृतीतून शिकवले आहे. प्रेम द्यावे अन् प्रेम घ्यावे । प्रेम निरपेक्ष असावे ॥
२. आश्रमात सात्त्विकता, चैतन्य आणि
निरपेक्ष प्रेम यांमुळे ताणविरहित आनंदाचा अनुभव येणे
पाहुण्यांना प्रथम आश्रम दाखवण्यात येतो. विविध सेवा आणि त्यातील बारकावे शिकवले जातात. निवासाची खोली आणि आश्रम स्तरावरील नियम लक्षात आणून दिले जातात. आश्रमातील सात्त्विकता, चैतन्य आणि प्रीती (निरपेक्ष प्रेम) यांमुळे आपण आश्रमात ताणविरहित आनंद अनुभवतो. आश्रमातील सेवांच्या नियोजनामुळे आपली सेवेतील एकाग्रता आणि क्षमता वाढल्याचे लक्षात येते. सत्संगात सेवांमधील चुका आणि गुरुसेवा यांचा आढावा घेतला जातो अन् त्यांतून शिकण्यातील आनंद कसा अनुभवायचा, तेही शिकवले जाते.
३. जगात कुठेच न मिळणारे निरपेक्ष भक्तीप्रेम
आश्रमात अनोळखी व्यक्तीलाही भरभरून मिळणे आणि
हे अनमोल प्रीतीचे क्षण पाहुण्यांच्या हृदयात सततचे घर करून रहाणे
कुणाचा तरी (पाहुण्या साधिकेचा) वाढदिवस येतो. त्या वेळी त्या साधिकेला नऊवारी नेसवणे, तिला आपले दागिने घालण्यास देणे, तिचे औक्षण करणे, तिच्या गुणवैशिष्ट्यांवरून कविता करणे, तिला शुभेच्छापत्र देणे, त्या आनंददायी क्षणांची भ्रमणभाषवर (मोबाईलवर) छायाचित्रे काढणे, तिला चॉकलेट किंवा खाऊ देणे या सार्या गोष्टी अगदी १५ ते २० मिनिटांत आनंद आणि उत्साहपूर्ण वातावरणात होऊन जातात. या प्रसंगी ज्येष्ठ व्यक्ती वाढदिवस असणार्याला शुभेच्छापत्र देते. जीवनातील नवीन वर्षाचे ध्येय त्या वेळी सर्व जण आवर्जून विचारतात अन् त्यातून साधनेतील ध्येयपूर्तीची आठवण करून दिली जाते. मग गोड पदार्थाने प्रीतीभोजन होते. हे विश्वकुटुंब आहे. इथे आजी-आजोबा, आई-बाबा, ताई-दादा, काका-काकू, मामा-मामी अशी सारीच नाती आहेत. सर्व जण शुभेच्छा देत असतात. अनोळखी व्यक्तीवरही या प्रीतीचा वर्षाव इतका होतो की, हे अनमोल प्रीतीचे क्षण पाहुण्यांच्याही हृदयात सततचे घर करून रहातात. जगात कुठेच असे न मिळणारे निरपेक्ष भक्तीप्रेम इथे ओतप्रोत भरभरून मिळते. या ओढीनेच जगभरचे असंख्य लोक पुनःपुन्हा आश्रमात येतात.
४. आश्रमात प्रत्येक साधक गुरुसेवा
म्हणून आनंदाने आणि अतिशय प्रेमाने सर्वतोपरी सेवा
करत असल्याने आश्रमात प्रारब्धभोग भोगतांनाही आनंदच मिळणे
इथे सद्गुणांचे स्वागत, तर अहं अन् स्वभावदोष यांचे सततच निर्मूलन असते. प्रत्येक जण आपापल्या परीने साहाय्यच करतो; पण इथे कुणी आजारी असेल, तर त्यांना पथ्याचे जेवण देणे, महाप्रसादाचे ताट घासणे, कपडे धुणे आदी सेवा गुरुसेवा म्हणून आनंदाने करतात. त्याचप्रमाणे इथले साधक ध्वनीक्षेपकावर वा भ्रमणभाषवर नामजप लावणे, सात्त्विक अत्तर, कापूर, उदबत्ती आदींद्वारे आध्यात्मिक उपाय करणे, आजोबा-आजींना चिकित्सालयातून आणलेले औषध घ्यायची आठवण करून देणे अशी सर्वतोपरी परिपूर्ण सेवा साधना म्हणून अतिशय प्रेमाने करतात. देवही त्यांना सर्वतोपरी साहाय्य करतो. त्यामुळे इथे प्रारब्धभोग भोगतांनाही आनंदच मिळतो.
५. आश्रमातून पाहुणे निघतांना प्रेमाने ओथंबलेल्या
स्थितीत साधक देतात असा आगळा-वेगळा निरोप !
आश्रमातील ४ दिवसांच्या वास्तव्यानंतर सौ. विजया काळेआजी (वय ७९ वर्षे) (आताच्या पू.काळे आजी) आणि त्यांचे पती (८८ वर्षे), भाऊ (वय ९० वर्षे), मुलगी आणि नात असे कुटुंबीय पुण्याला घरी निघाले. आजी चारचाकी गाडीत बसल्या. तेव्हा सर्व वयोगटाचे साधक त्यांचा निरोप घ्यायला जमले.
आजी, प्यायचे पाणी घेतले का ? काही साहित्य राहिले नाही ना ! घरी पोहोचला की, दूरभाष करा. आजी, पुन्हा लवकर या हं ! प्रेमाने ओथंबलेल्या या शब्दांना आजीही तेवढ्याच उत्कटतेने प्रतिसाद देत होत्या. लहान मुली पटकन् वाकून नमस्कार करत होत्या.
आजी, प्रसाद घेतला ना ! आजोबा, प्रकृतीची काळजी घ्या बरं का !, शिवांजली (आजींची नात) शाळेला सुट्टी पडली की, यायचे !
काही जण नमस्काराच्या मुद्रेत, तर काही जण हात हलवत अच्छा करत होते.
सर्वांनी प.पू. भक्तराज महाराज की जय ! असा भावपूर्ण जयघोष केला. कृष्णाय वासुदेवाय… हा श्लोक चालू झाला आणि मंडळी निघाली, तरी सार्यांचे हात अच्छा करण्याच्या उद्देशाने हलतच होते, अगदी चारचाकी गाडी दिसेनाशी होईपर्यंत !
आजी आणि त्यांचे कुटुंबीय यांच्या तोंडवळ्यांवरचा भाव, निरोप देणार्या साधकांचा भाव, तसेच आनंद, उत्साह आणि निर्मळ प्रेम यांनी सर्वांचे काठोकाठ भरलेले डोळे ! केवळ ५ ते १० मिनिटांचा हा निरोप; पण प्रीतीच्या सप्तसिंधूंना भरती आली होती ! (पुणे येथील श्रीमती विजया काळेआजी त्यांच्या पतीचे देहावसान होण्यापूर्वी कुटुंबियांसमवेत रामनाथी (गोवा) येथे आश्रमदर्शनासाठी आल्या होत्या, त्या वेळी घडलेला प्रसंग येथे शब्दबद्ध केला आहे. – संकलक)
देवा, हे प्रेम कसे ? हा सारा सोहळा मी अनुभवत होते. देवांचा राजा असलेल्या इंद्रालाही ज्याचा हेवा वाटावा, असे प्रेम ! हे प्रेम रामनाथीच्या गोकुळातील आहे. हे श्रीकृष्णाचे, श्रीकृष्णाच्या समष्टी रूपाचे प्रेम आहे. असे निरपेक्ष प्रेम मिळणे, हे परमभाग्यच आहे. येथे येणार्याला प्रत्येकालाच ते मिळत असते. खरेतर ते अनुभवण्यासाठीच रामनाथीच्या सनातन गोकुळात यायचे असते.
६. रामनाथीच्या प्रीतीच्या सुगंधाने
सारे जीव आकर्षित होणे आणि त्यांनी
आपल्या घराला रामनाथी आश्रम बनवण्याचे
ध्येय ठेवून पुन्हा येण्यासाठी आश्रमाचा निरोप घेणे
घरी असतांना एकमेकांचे हेवे-दावे आणि द्वेष-मत्सर करणारे, तसेच घरी एक पाहुणा आल्यावरही चिडचिड करणारे आम्ही साधक इथे आश्रमात आल्यावर मात्र प्रेमाने वागू शकतो, बोलू शकतो, राहू शकतो, ते केवळ प.पू. डॉक्टराच्या कृपेमुळेच ! हे सारे त्यांनीच स्वतःच्या कृतीतून साधकांवर बिंबवले आहे. हे देवाचे देणे, सोन्याच्या ताटाला मोत्यांचे दाणे यावेत, तसे हे पीक रामनाथीच्या आश्रमात पुष्कळ येते, ते केवळ गुरुकृपेने ! इथल्या प्रीतीच्या सुगंधाने सारे जीव आकर्षित होतात. इथल्या चैतन्याने अतिशय प्रभावित होतात आणि आनंदाचा मध चाखून तृप्त होतात अन् आपल्या घराला रामनाथी आश्रम बनवण्याचे ध्येय ठेवून पुन्हा येण्यासाठी आश्रमाचा निरोप घेतात !
हे लिहूनपण समाधान झाले नाही; म्हणून तेव्हा देवाने कवितेच्या ओळी सुचवल्या.
७. विश्वाचा हा विश्वदीप, जगी होईल ख्यातनाम !
गोव्याच्या पुण्यभूमीत, आहे एक सनातन आश्रम ।
परम पूज्यांच्या (टीप १) संकल्पाला, प.पू. बाबांचे (टीप २) आशीर्वचन ॥
विश्वाचा हा विश्वदीप, जगी होईल ख्यातनाम ।
वसुधैव कुटुंबकम् हेच याचे तत्त्वज्ञान ॥ १ ॥
रामनाथीचा हा सनातन आश्रम । जे आहे हिंदु राष्ट्राचे उगमस्थान ॥
जिथे अवतरला प्रत्यक्ष श्रीकृष्ण भगवान । करावया हिंदु धर्माचे अभ्युत्थान ॥ २ ॥
रामनाथीचा हा सनातन आश्रम । आहे महाविष्णूचे धाम ।
काय त्याचे करावे वर्णन । शेषनागही खाली घाली मान (टीप ३) ॥ ३ ॥
रामनाथीचा हा आश्रम । अवघे चैतन्य, चैतन्य ॥
जिथे माता लक्ष्मी चेपते । श्रीविष्णूचे दिव्य चरण ॥ ४ ॥
भूवरीचे नंदनवन । गोकुळचे वृंदावन ॥
संतांचे निवासस्थान । विश्वाचे मोक्षधाम ॥ ५ ॥
जगताचे तीर्थस्थान । त्याचे घ्यावया दर्शन, लोक येती दूरदुरून ॥
प.पू. डॉक्टरांचे निवासस्थान । ते पाहून होती धन्य धन्य ॥ ६ ॥
टीप १ – परात्पर गुरु डॉ. आठवले
टीप २ – परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे गुरु प.पू. भक्तराज महाराज
टीप ३ – रामनाथी येथील सनातन आश्रम हा महाविष्णूचे धाम आहे आणि महाविष्णू ज्याच्यावर पहुडला आहे, त्या शेषनागानेही या विष्णुधामाचे वर्णन करतांना थकून मान खाली घातली, तरी या विष्णुधामाचे वर्णन पूर्ण झाले नाही, असे या पंक्तीतून व्यक्त होत आहे.
८. शब्दातीत अशा रामनाथी येथील सनातन
आश्रमाचे वर्णन शब्दांत करणे अशक्यच असल्याचे लक्षात येणे
हे लिहूनही माझे समाधान झाले नाही. तेव्हा हा विषय अनुभूतीचा आहे; कारण शब्दातीत, म्हणजे शब्दांपलीकडचे वर्णन शब्दांत करणे अशक्यच असते, हे माझ्या लक्षात आले.
प.पू. डॉक्टर, तुमच्या आश्रमाचे वर्णन (अनुभूती देऊन) केवळ तुम्हीच करू शकता, अन्य कोणीच नाही, हे मला कळले आहे आणि देवा, मी तुला शरण आले आहे !
– गुरुचरणी शरणागत, सौ. शालिनी मराठे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (५.६.२०१५)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात