प.पू. डॉक्टरांच्या अनुसंधानात राहणा-या अाणि
७१ टक्के आध्यात्मिक स्तर गाठलेल्या कै. देवकी वासू परबआजी !
कै. देवकी वासू परबआजी (पेडणे, गोवा) यांचे २२.३.२०१६ या दिवशी दुपारी ३ वाजता निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ८५ वर्षे होते. त्यांच्या निधनानंतरचा १२ वा दिवस २.४.२०१६ या दिवशी आहे. यानिमित्त त्यांच्या नातवाला त्यांच्याविषयी जाणवलली सूत्रे येथे देत आहे.
१. प.पू. डॉक्टरांना भेटण्याची
तीव्र इच्छा असल्याने ते आजीला सूक्ष्मातून भेटणे
काही दिवसांपूर्वी आजीला प.पू. डॉक्टरांना भेटण्याची तीव्र इच्छा झाली होती; पण काही कारणास्तव त्यांची भेट होऊ शकली नाही. १५.३.२०१६ या दिवशी आजी एकटी असतांना पुरे पुरे, असे म्हणाली. तिला त्याविषयी विचारल्यावर ती म्हणाली, प.पू. डॉक्टर मला शेव-चिवडा भरवत होते. मला चावता येत नाही; म्हणून मी पुरे पुरे, असे म्हटले. नंतर ती म्हणाली, प.पू. डॉक्टरांनी घाबरू नकोस, असे सांगितले आहे. आजीच्या तळमळीमुळे प.पू. डॉक्टर आजीला सूक्ष्मातून भेटले असावे असे वाटले.
२. मृत्यूची पूर्वसूचना मिळणे
१७.२.२०१६ या दिवशी आजी फारच रुग्णाईत झाली आणि अंथरुणाला खिळून राहिली. तेव्हा तिने सांगितले, मला आता प.पू. डॉक्टरांना भेटायला आश्रमात जाता येणार नाही. तेच विमान घेऊन येतील आणि आम्हा दोघींना (आजी आणि तिच्या सेवेत असलेली त्यांची मुलगी सौ. जयंती नारूलकर) द्वारकेला घेऊन जातील. आजीच्या तोंडून द्वारका हा शब्द आम्ही प्रथमच ऐकला. तेव्हा तिला मृत्यूची पूर्वसूचना मिळाली असेल, असे वाटले. आजीच्या मृत्यूच्या आदल्या दिवशी आजी जनलोकात जाईल, असे वाटत होते. त्यानंतर तिचा आजार वाढत गेला. (आजीला कर्करोग होता आणि तो पूर्ण शरिरात अन् मेंदूमध्ये पसरला होता) २२.३.२०१६ या दिवशी दुपारी ३ वाजता तिचे निधन झाले आणि वसुदेवाची देवकी द्वारकेला गेली.
३. ईश्वरानेच आजीला प्रसाद पाठवणे
मृत्यूच्या आदल्या दिवशी आजी बांबोळी येथील रुग्णालयात होती. तेव्हा तेथे कु. प्रियांका स्वामी आल्या होत्या. त्यांनी दिलेला प्रसाद आजीने ग्रहण केला. तेव्हा ईश्वरानेच आजीला प्रसाद द्यायचे नियोजन केले, असे वाटले.
४. असह्य वेदना होत असूनही तोंडवळ्यावर त्रास न दिसणे
देहत्यागापूर्वी काही दिवसांपासून आजी सतत प.पू. डॉक्टरांना हाका मारत होती. तिला असह्य वेदना होऊन ती सतत तळमळत होती, तरीही तिच्या तोंडवळ्यावर त्रास दिसत नव्हता कि डोळ्यांत अश्रू नव्हते.
५. मृत्यूसमयी दत्तगुरूंचा नामजप करत असल्याचे वाटणे
मृत्यूच्या दिवशी आजी शुद्धीवर नव्हती. तिच्या तोंडून सतत द हे अक्षर येत होते. त्या वेळी ती दत्तगुरूंचा नामजप करत आहे, असे वाटले.
६. सतत वेदना होत असतांना प.पू. डॉक्टरांनी
सांगितल्याप्रमाणे हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी प्रार्थना करणे
फेब्रुवारी २०१५ मध्येे प.पू. डॉक्टरांनी आजीला हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी प्रार्थना करायला सांगितले होते. आजीला सतत वेदना होत असतांना आणि दिवसभरात काही वेळ शुद्धीवर नसतांनाही तिने प्रार्थना करण्याचा प्रयत्न केला.
७. इतरांवर निरपेक्ष आणि भरभरून प्रेम करणे
आजीने इतरांवर सतत निरपेक्ष आणि भरभरून प्रेम केले. ईश्वरावर दृढ श्रद्धा ठेवली.
८. आजी संत झाल्याविषयीची पूर्वसूचना मिळणे
आजीच्या मृत्यूनंतर तिचे देहप्रारब्ध संपले आणि तिने ७० ते ७१ टक्के अध्यात्मिक स्तर गाठला, असा विचार माझ्या मनात आला. (योग्य आहे. ७१ टक्के आध्यात्मिक स्तर गाठून आजींनी संतपद गाठले आहे. – (प.पू.) डॉ. आठवले)
आजी म्हणजे निरपेक्ष प्रीतीचे मूर्तीमंत रूप होते. आजीचे देहावसान झाल्यावर आमच्या घरातील देवच देवाघरी गेला, असे वाटले. अशा देवस्वरूप आजीचा सहवास मला जन्मापासून मिळाला, यासाठी मी ईश्वरचरणी कृतज्ञ आहे.
– श्री. अक्षय बाजी परब (आजींचा नातू), पेडणे, गोवा.