समर्थभक्त पू. मोहनबुवा रामदासी यांंनी केलेले मार्गदर्शन आणि सनातन संस्थेची वर्णिलेली महती !

MohanbuaRamadasi
पू. मोहनबुवा रामदासी

पनवेल परिसरात समर्थ रामदासस्वामी यांच्या चरणपादुकांचा दर्शन सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यासमवेत आलेल्या समर्थभक्त पू. मोहनबुवा रामदासी यांना २७.१.२०१६ या दिवशी सकाळी उठल्यावर प्रेरणा झाली की, देवद, पनवेल येथील सनातन आश्रमाला भेट द्यावी. त्यानुसार आश्रमात आल्यावर त्यांनी पुढील मार्गदर्शन केले.

 

१. सनातनच्या आश्रमांतील देव, देश आणि
धर्म यांचे प्रत्यक्ष कार्य पाहून मला आनंद होत आहे !

       परमेश्‍वरकृपेने आश्रमात येण्याचा योग आला आहे. समर्थांच्या वचनानुसार आश्रमातील साधक मंडळी प्रत्यक्ष कृती करून आध्यात्मिक जीवन जगत असल्याने मला नेहमीप्रमाणेच आनंद झाला. रामनाथीसह सनातनच्या अनेक आश्रमांत मी जाऊन आलो. त्या त्या वेळी मला अशी अनुभूती आली, याचा मला विशेष करून अधिक आनंद होतो. देव, देश आणि धर्म यांचे येथे प्रत्यक्ष कार्य पाहून मला आनंद होतो.

 

२. हिंदु धर्मावरील आघात रोखण्यासाठी
साधनेच्या बळावर स्वतःच प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे !

      अनंत काळापासून केवळ हिंदु धर्मावर आघात चालू आहेत. हे पालटायचे असेल, तर समर्थांचे पुढील वचन आठवते.

जो दुसर्‍यावरी विश्‍वासला । त्याचा कार्यभाग बुडाला ।
जो आपणचि कष्टत गेला । तोचि भला । – दासबोध, दशक १९, समास ९, श्‍लोक १६

      जर परिस्थिती पालटायची असेल, तर आपल्याला स्वतःलाच काहीतरी प्रयत्न करावे लागतील. दुसरा काहीतरी करील, असे जो म्हणत बसेल, त्याच्या पदरी निराशा येईल. त्यासाठी आत्मशक्ती, आत्मबल आणि आत्मतेज यांची आवश्यकता आहे. ती शक्ती मिळवण्यासाठी आपण साधना करत असतो.

 

३. प्रत्येकाने साधनेने आणि
उपासनेने आत्मशक्ती वृद्धींगत करावी !

सामर्थ्य आहे चळवळेचें । जो जो करील तयाचें ।
परंतु येथें भगवंताचें । अधिष्ठान पाहिजे ॥ – दासबोध, दशक २०, समास ४, ओवी २६

      या समर्थांच्या वचनानुसार ईश्‍वरी अधिष्ठान अंतःकरणात लाभून आत्मशक्तीचे चाललेले कार्य आपल्याला अनुभवावे लागते. एकाग्र चित्ताने हे अनुभवणे हाच खरा परमार्थ आहे. आत्मशक्तीचे कार्य दिसत नाही किंवा पहाता येत नाही. याविषयी सांगताही येत नाही; परंतु दैनंदिन जीवनातील प्रत्येक अनुभूती ही आपल्याला केवळ आत्मशक्तीमुळेच येते. ती आत्मशक्ती प्रत्येकाजवळ असून साधनेने आणि उपासनेने ती जतन करून वृद्धींगत करावी लागते.

 

४. योग्य उपासना केल्यास साधकाला त्यातून आनंद मिळतो !

      जसे आपण बाजारातून आणलेली ताजी फुले देवाला वाहिली, तर प्रसन्नता वाटते; मात्र कशीही ठेवलेली आणि शिळी झालेली फुले वाहिली, तर अयोग्य होईल. ताजी फुले वाहिली, तर आनंद होईल. तोच आनंद योग्य उपासना करतांना साधकाला होतो. हा आनंदच साधकाचा प्राण आहे. त्या आनंदासाठी आपण कार्य करत असतो.

 

५. गुरुनिष्ठा ठेवून समाजात जाऊन कार्य केले पाहिजे !

       बाहेरच्या परिस्थितीला थोपवणे, थांबवणे किंवा पालटणे शक्य नाही. समर्थांच्या वचनानुसार मी कर्ता ऐसें म्हणसी । तेणें तूं कष्टी होसी ॥ राम कार्य करणारच आहे. त्यासाठी आपण साधना, उपासना म्हणून प्रयत्न करायला पाहिजेत. म्हणजेच केल्याने होत आहे रे, आधी केलेचि पाहिजे ॥ गुरुनिष्ठा ठेवून समाजात जाऊन कार्य केले पाहिजे.

 

६. सनातन संस्था आहे; म्हणून धर्म जिवंत आहे !

      समाजाच्या कल्याणासाठी ईश्‍वराने सनातन संस्थेच्या माध्यमातून एक मोठे आध्यात्मिक क्षेत्र निर्माण केले आहे. सनातन संस्था आहे; म्हणून धर्म जिवंत आहे. उपासकांची उपासना, सामाजिक कार्यकर्त्यांचे समाजकार्य, राजकारण्यांचे राजकीय कार्य हे सगळे समाजातील साधकांचे साधन आहे. ते केवळ आणि केवळ साधनेच्या, उपासनेच्या बैठकीवर चाललेले आहे. त्यानुसार आपण कार्य करत आहात. त्यासाठी मी आश्रमातील कार्याला, आश्रमातील साधकांना समर्थ रामदासस्वामींच्या अंतःकरणपूर्वक शुभेच्छा देतो. आश्रमातील साधकांसाठी समर्थांच्या पादुका आश्रमात घेऊन येतो.

॥ जय जय रघुवीर समर्थ ॥

– श्री. शिवाजी वटकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (६.२.२०१६)

 

देवद आश्रमात झालेल्या समर्थ रामदासस्वामी यांच्या
पादुकापूजन आणि दर्शन सोहळ्याच्या वेळी जाणवलेली सूत्रे

       २.२.२०१६ या दिवशी समर्थ रामदासस्वामी यांच्या पादुकांचे पूजन आणि दर्शन सोहळा देवद आश्रमात पार पडला.

१. चरणपादुकांच्या रूपात प्रत्यक्ष रामदासस्वामीच राष्ट्र आणि धर्म कार्यासाठी चैतन्यशक्ती देण्यास आले आहेत, असा आश्रमातील साधकांचा भाव होता.

२. पू. मोहनबुवा रामदासी यांच्या मार्गदर्शनातून आम्हाला समर्थ रामदासस्वामी साधना आणि धर्मकार्यासाठी प्रोत्साहन देत आहेत, असे वाटले.

      हा कृपाप्रसाद देणार्‍या समर्थ रामदासस्वामी आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता व्यक्त करतो.

– श्री. शिवाजी वटकर (६.२.२०१६)