संत ज्ञानेश्वरांच्या नंतर सुमारे २५० वर्षांनी संत एकनाथांचा जन्म झाला. अतिशय प्रतिकूल परिस्थिती होती. यवनांचे राज्य होते. याच दरम्यान विजयनगरचे हिंदु साम्राज्य बुडाले होते. स्वधर्म, स्वराष्ट्र, स्वराज्य यांविषयी सर्वत्र अज्ञानाचे वातावरण होते. कर्मकांड, कर्मठपणा यांवर अधिक भर होता. भर दिवसा स्त्रिया बाटवल्या जात होत्या. धर्मावर अत्याचार होत होता. अशा बिकट समयी नाथांनी समाज सुधारण्यासाठी जगदंबेला साद घातली. बये दार उघड असे म्हणत नाथांनी भारूड, जोगवा, गवळणी, गोंधळ यांच्या साहाय्याने जनजागृती केली. संत एकनाथ हे संतकवी होते. रंजन आणि प्रबोधन करत अध:पतित समाजाला त्यांनी सन्मार्गावर आणले, महाराष्ट्राचा पुरुषार्थ जागवला. एका जनार्दनी ही त्यांची नाममुद्रा आहे. फाल्गुन कृष्ण पक्ष षष्ठी, शके १५२१ (वर्ष १५९९) या दिवशी संत एकनाथांनी देह ठेवला आणि ते अनंतात विलिन झाले.
अनेक रचना, अभंग, गवळणी असे स्फुट लेखन एकनाथांनी केले. एकनाथी भागवत हा त्यांचा ग्रंथ लोकप्रिय आहे. हे अतिशय प्रासादिक (व्यासकृत) काव्य आहे. नाथांनी लिहिलेल्या भावार्थ रामायणाच्या सुमारे ४० सहस्र ओव्या आहेत. त्यांचे रुक्मिणीस्वयंवर अत्यंत लोकप्रिय आहे. नाथांची दत्ताची आरतीही (त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाणा) प्रसिद्ध आहे. जातीभेद दूर करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले.
.
संत एकनाथ महाराजांच्या वाड्यात
श्रीखंड्याच्या रूपात साक्षात पांडुरंगाने
पाणी भरलेला रांजण आणि पांडुरंगानेच गंध उगाळलेली सहाण
काळ रुळतो चरणी ।
देवा घरी वाहे पाणी ॥ १ ॥
ज्यांचे अनुग्रहे करून ।
झालो पतित पावन ॥ २ ॥ – श्री संत निळोबाराय
द्वारकेचि मूर्ती एकनाथा घरी । पाणी वाहे हरि कावडीने ॥ १ ॥
श्रीखंड्या चंदन उगाळूनि करी । वस्त्र गंगातिरी धूत असे ॥ २ ॥
सेवेसी तत्पर उभा ठायी ठायी । देवपूजेसमयी तिष्ठतसे ॥ ३ ॥
निळा म्हणे देव रावे ज्याचे घरी । दत्तचौपदार करितसे ॥ ४ ॥ – श्री संत निळोबाराय
थोर संत एकनाथ महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम !
संत एकनाथ महाराज यांचे समाधीमंदिर
सकल संतांचा हा राजा । स्वामी एकनाथ माझा ॥ १ ॥
ज्यांचे घेताचि दर्शन । पुन्हा नाही जन्म मरण ॥ २ ॥
ज्यांचे वाचिता भागवत । प्राणी होय जीवन मुक्त ॥ ३ ॥
निळा म्हणे लीन व्हावे । शरण एकनाथा जावे ॥ ४ ॥ – श्री संत निळोबाराय
पैठण येथील संत एकनाथ महाराजांच्या वाड्यातील देवघर
आणिका दैवता नेघे माझे चित्त ।
गोड गाता गीत विठोबाचें ॥ ३ ॥
भ्रमर मकरंदा मधाशी ती माशी ।
तैसें या देवासी मन माझे ॥ – संत भानुदास महाराज
श्रीकृष्णदयार्णव महाराज यांच्यापुढे
प्रकटलेली अष्टभुजा स्वयंभू श्रीकृष्णमूर्ती
चतुर्भुज मूर्ति लावण्य रुपडें ।
पाहतां आवडे जीवा बहु ॥ १ ॥
वैजयंती माळा किरीट कुंडले ।
भूषण मिरवलें मकराकार ॥ २ ॥ – संत भानुदास महाराज
संत एकनाथ महाराजांच्या पूजेतील
श्री विजयी पांडुरंगाच्या मूर्तीला पंचामृत स्नान
उन्मनीं समाधीं नाठवे मानसी ।
पहातां विठोबासीं सुख बहु ॥ १ ॥
आनंदाआनंद अवघा परमानंद ।
आनंदाचा कंद विठोबा दिसे ॥ २ ॥ – संत भानुदास महाराज
देखतांचि रूप विटेवरी गोजिरें ।
पाहतां साजिरें चरणकमळ ॥ १ ॥
पाहतां पाहतां दृष्टी धाये जेणें ।
वैकुंठीचें पेणें सहज हातीं ॥ २ ॥ – संत भानुदास महाराज
तुमचे चरणी राहो मन । करा हे दान कृपेचे ॥
नामी तुमचे रंगो वाचा । अंगी प्रेमाचा आविर्भाव ॥
हृदयी राहो तुमची मूर्ती । वाचे कीर्ती पोवाडे ॥
निळा म्हणे ठेवा ठायी । जीवभाव पायी आपुलिये ॥ – संत निळोबाराय महाराज