रयतेचे हित जपणारी धार्मिक धोरणे राबवणारे छत्रपती शिवाजी महाराज !

हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज

shivaji_maharaj

छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे गुणांचा खजीना ! त्यांच्या गुणांचा जेवढा अभ्यास करावा, तेवढा अल्पच आहे. त्यांच्या व्यक्तीमत्वाला शालीनता आणि सुसंस्कार यांची जोड होती. स्वराज्यातील जनतेला औदार्य दाखवतांना त्यांनी कुठेच भेदाभेद केला नाही. संत-महंतांच्या मठांना इनामे दिली. ब्राह्मणांनाही त्यांनी आदराचे स्थान दिले; मात्र ते चुकल्यावर त्यांच्या विरोधात कृती करण्यास मागे-पुढे पाहिले नाही. कठोरात कठोर निर्णय घेतांना प्रसंगी मृदुपणाही दाखवला. अशांच त्यांच्या विविध पैलूंविषयी या लेखात सविस्तर उहापोह केला आहे.

लेखक : अरुण मोतीराम भंडारे

 

१. छत्रपती शिवाजी महाराजांच्या
कार्याला अनेक संत-महंतांचे आशीर्वाद !

छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्य स्थापनेच्या कार्यात अनेक संत, सत्पुरुषांचे आशीर्वाद घेतले. ते सत्पुरुष म्हणजे संत तुकाराम, समर्थ रामदासस्वामी, निश्‍चलपुरी गोसावी, जयरामस्वामी वडगावकर, परमानंदबुवा पोलादकर (शिवभारत लिहिणारे कविंद्र परमानंद) रंगनाथस्वामी निगडीकर, त्यांचे बंधू विठ्ठलस्वामी, चिंचवडचे देव, बोधलेबाबा धामणगावकर, त्रिंबक नारायण वाराणसीकर, आनंदमूर्ती ब्राह्मनाळकर, हैद्राबादचे केशस्वामी पंडित, बाबा याकूत केळशीकर आणि पाटगावचे मौनीमहाराज. या सत्पुरुषांव्यतिरिक्त महाराजांनी स्वराज्य शासनाचा एक भाग म्हणून तत्कालीन समाजव्यवस्थेचे एक अविभाज्य अंग असलेले ब्राह्मण, गोसावी यांना भूमी इनाम दिल्या. मठांना जागा दिल्या, वर्षासने (वर्षासाठी धार्मिक कार्याला दिलेले अर्थसाहाय्य) दिली, उत्पन्ने लावून दिली. सत्पुरुषांप्रमाणेच महाराज, विद्वान, ब्राह्मण, वैदिक यांचा आदर करत आपल्या राज्याभिषेकासाठी त्यांनी काशीहून गागाभट्टांना मोठ्या सन्मानाने निमंत्रित केले होते. साधूसंत, सत्पुरुष, गुणीजन; तसेच प्रसंगी दरिद्री ब्राह्मण यांचा आदरसत्कार करणे, हा महाराजांच्या व्यक्तीमत्वाचाच एक भाग होता.

 

२. धार्मिक संस्कारांमुळे लहान वयातही आलेली प्रगल्भता !

छत्रपती शिवाजी महाराज हे त्यांच्यावर झालेल्या धार्मिक संस्कारांमुळे प्रगल्भ झाले होते. त्याविषयीची गोष्ट आहे वर्ष १६३७ मधली. छत्रपती शिवाजी महाराज खेड शिवापुरात होते. शिवापुरीत महाराजांसाठी वाडा बांधण्याचे काम चालले होते. त्या वेळचा एक उल्लेख आढळतो. तो असा, ताई अत्री गावात खंडो भिकाजी देशपांडे यांच्या वाडीयात होती. तिने यैकोन हाती काठी घेऊन राजश्री राऊ बसले होते त्याजपाशी येत होती. ते दुरून राजियांनी देखताच, राजश्री बापूजी श्रीपतीजवळ होते, त्यासी पुंसू लागले, ते आम्हाकडे म्हातारी येते ती कोणी ? त्यास नानांनी उत्तर दिले, हे राघो बल्लाळ अत्रे यांची ताई अत्री. असे सांगताच ती जवळ आली आणि राजश्री रायास बोलली… जैसे आता तुम्ही नांदता, तैसे सावंत या राज्या…. त्याचे कोणी येथे… यावरी घर… ऐसे ऐकताच त्यांनी ताईस सांगितले, मातुश्री आम्ही तुमच्या जागियावर घर बांधत नाही. महाराजांचे लहान वय लक्षात घेता त्यांची वयाच्या मानाने दिसणारी प्रगल्भता, शालीनता समजायला ताई अत्री प्रसंग उपयोगी पडतो. महाराज अत्यंत शालीनतेने प्रेमळ भाषेत त्यांना मातुश्री म्हणून संबोधतात. हेे सर्व संस्कारांचे परिणाम ! जिजामाता आणि त्यांच्या दिमतीला दिलेले पुराणिक हरदास यांनी रामायण, महाभारत आदी ग्रंथांतले प्रसंग, कथा महाराजांना कथन करून त्यांना सुसंस्कारित केले होते. या संस्कारांमुळेच महाराजांची साधूसंत, ब्राह्मण, पुरोहित, पंडित, तसेच जनता यांच्याविषयीची औदार्याची कणवेची आदराची अशी बैठक सिद्ध झाली. महाराजांच्या जडणघडणीत जिजामातांचा वाटा सिंहाचा होता.

 

३. छत्रपती शिवाजी महाराजांच्या
धार्मिक धोरणांचा अभ्यास करण्यासाठी त्यांच्यावर
लिहिलेल्या बखरींचा अभ्यास करणे आवश्यक !

३ अ. कृष्णाजी अनंत सभासद यांनी
शिवचरित्र लिहिण्यामागील पार्श्‍वभूमी !

छत्रपती शिवाजी महाराजांचे धार्मिक धोरण, त्यांची साधू-संत, वैदिक ब्राह्मण गोसावी यांच्याविषयीची त्यांची भूमिका समजावून घ्यायची असेल, तर आपल्याला महाराजांचे चरित्रकार कृष्णाजी अनंत सभासद बखरीमध्ये काय म्हणतात, हे बघावे लागेल. सभासदांचे पूर्ण नाव कृष्णाजी अनंत सभासद. ते महाराजांच्या दरबारातील सल्लागार मंडळाचे एक सभासद होते. महाराजांचे समकालीन असल्यामुळे शिवचरित्रातल्या अनेक गोष्टी त्यांना ज्ञात होत्या. अर्थात सभासदाने बखरीत वर्णन केलेले घटनाक्रम, घटनांची अचूकता लक्षात घेता कृष्णाजी अनंत सभासद महाराजांकडे आग्य्राहून सुटकेनंतर कामाला आले असावेत, असा निष्कर्ष निघतो. राजाराम महाराजांसमवेत ते जिंजीला गेले होते. तेथे राजाराम महाराजांनी त्यांचे पिता थोरले महाराज म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र लिहायला सांगितले. राजाराम महाराज सभासदाला म्हणतात, तुम्ही पुरातन राज्यातील माहीतगार लोक आहात. म्हणून इस्तकदिल म्हणजे प्रारंभीपासून शिवचरित्र लिहिण्याची त्याला आज्ञा केली आहे. जिंजी येथे वर्ष १६९० मध्ये त्यांनी शिवचरित्र लिहायला प्रारंभ केला.

३ आ. देवस्थाने, ब्राह्मण, तपस्वी यांना
महाराजांच्या काळात आदराचे स्थान !

शिवाजी महाराजांचे साधूसंतांविषयीचे धोरण काय असावे, हे समजावून सांगतांना कृष्णाजी अनंत सभासद लिहितात, देवब्राह्मण परामर्श मुलुखात देव-देवस्थाने जागजागी होती. त्यात दिवाबत्ती, नैवेद्य अभिषेक स्थान पाहून यथायोग्य चालवणे. मुसलमानांचे पीर मशिदी त्यांचे दिवाबत्ती नैवेद्य स्थान पाहून चालवणे. वैदिक ब्राह्मण यांसी योगक्षेम, ब्राह्मण, विद्यावंत वेदशास्त्रसंपन्न ज्योतिषी, अनुष्ठानी तपस्वी, गावोगावी सत्पुरुष पाहून, त्यांचे कुटुंब पाहून अन्नवस्त्र ज्यास जे लागेल त्याप्रमाणे धान्य-द्रव्य त्यास गावचे महाली नेऊन देऊन, साल दरसाल त्यास कारकुनीनी पाठवावे. ब्राह्मणांनी ते अन्न भक्षून स्नानसंध्या करून राजियास कल्याण चिंतून सुखरूप असावे.

 

४. स्वराज्यात मुसलमानांचे धर्मग्रंथ
आणि धार्मिक स्थळे यांचा केला जात होता आदर !

इतिहास संशोधक शं.ना. जोशी, डॉ. प्र.न. देशपांडे आणि आता डॉ. अनुराधा कुलकर्णी यांनी महाराजांची अशी शिवकाळातली जवळजवळ २३६ पत्रे प्रकाशित केली आहेत. या पत्रांपैकी जवळजवळ ५१ पत्रे ही महाराजांनी वेळोवेळी संत, ब्राह्मण, गोसावी यांना इनाम दिलेली गावे, भूमी, मठ यांना दान दिलेल्या भूमी या संदर्भातली आहेत. या पत्रातली लक्ष वेधून घेणारी पत्रे म्हणजे महाराजांनी मशिदी, दर्गे यांचे तंटे, भांडणे सोडवण्याच्या संदर्भातली आढळून आलेली सात पत्रे ! स्वराज्यातल्या आपल्या मुसलमान प्रजाजनांच्या धार्मिक स्थळांची देखील महाराज काळजी करत असत. सभासदाने तर हे नमूद केलेलेच आहे. लुटीत सापडलेले कुराणाचे ग्रंथ, कुराणाच्या प्रती महाराजांनी सन्मानपूर्वक मालकांच्या हवाली केल्या किंवा त्या प्रती आपल्या सैन्यातील मुसलमान सैनिक, अधिकारी यांना भेट दिल्या. खाफीखानासारख्या मोगल इतिहासकाराने देखील महाराजांची यासंबंधात स्तुती केली आहे. इथे विषयांतर करून नमूद करावेसे वाटते की, औरंगजेबासारखा महाराजांचा शत्रू, जो महाराजांचा उल्लेख नेहमी शिवा जहन्नमी चोर असा करत असे, तो महाराजांच्या मृत्यूनंतर बोलता झाला, आपल्या हातात सापडलेल्या शत्रूंच्या स्त्रियांच्या अब्रूची कदर करणारा एक महावीर मरण पावला. मुसलमान सत्ताधिशांनी वेळोवेळी हिंदु प्रजेवर अनन्वित अत्याचार केले. देवळांची बिटंबना केली. असे असूनदेखील महाराजांनी स्वराज्यातल्या किंवा इतरही मुसलमानांविषयी प्रतिशोधाची भावना मनी ठेवली नाही. मशिदींच्या दिवाबत्तीची नेहमीच काळजी केली.

 

५. संत-महंतांचा आदर-सत्कार
करणारे छत्रपती शिवाजी महाराज !

५ अ. छत्रपतींच्या भोसले घराण्यात
आदराचे स्थान असलेले पाटगावचे मौनीबाबा !

पाटगावचे मौनीबाबा हे भोसले घराण्याचे एक आदराचे श्रद्धास्थान, छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजय मोहिमेवर जाण्याआधी मौनीबाबांचे आशीर्वाद घेतले होते. दक्षिण दिग्विजय मोहीम यशस्वी झाल्यावर महाराजांनी पाटगावच्या मौनीमहाराजांना पुराणिक, वाजंत्री लावून दिले होते. मठात उत्सव चाले त्यासाठी धान्य देण्याची व्यवस्था केली होती. महाराजांच्या नंतरच्या छत्रपतींनीदेखील पाटगावच्या मठाला देणग्या दिल्या आहेत. यातली अगदी जवळची अलीकडची नोंद म्हणजे राजर्षी शाहू छत्रपतींनी वेदोक्त प्रकरणानंतर पाटगावच्या गादीवर स्वतंत्र शंकराचार्यांची स्थापना केली ही होय ! कोल्हापूरजवळचे गारगोटी येथील मौनी विद्यापीठ ही मौनीबाबांचीच स्मृती जपणारे एक स्मारक होय.

५ आ. आळंदी, सासवड येथील समाधीस्थान
आणि सज्जनगड मठ यांना आर्थिक साहाय्य देणे

ज्ञानेश्‍वर माऊलींच्या आळंदी आणि सोपानदेवांच्या सासवड येथील समाधींना महाराजांनी वर्षासन दिले होते. पाटगावच्या मौनीमहाराजांसारखेच समर्थ रामदास हे महाराजांचे आणखी एक श्रद्धास्थान, समर्थांच्या चाफळ येथील मठाला महाराजांनी विशेष सनद दिली होती. समर्थांच्या मठांना, सज्जनगडावरच्या मंदिराला, निवासाला कुठल्याही प्रकारचा उपद्रव अधिकारी वा सैनिकांनी देऊ नये अशा सक्त आज्ञा महाराजांनी अधिकार्‍यांना दिल्या होत्या.

 

६. कर्तव्यपालनाच्या संदर्भात ब्राह्मण
आणि ब्राह्मणेतर यांना एकच निकष !

शिवकालीन समाजव्यवस्थेचा विचार केला असता महाराजांनी ब्राह्मणांना, पुरोहितांना, धर्मकृत्यांसाठी दिलेली वर्षासने, इनामे योग्य म्हणावी लागतील, अर्थात महाराजांनी अमूक एक व्यक्ती ब्राह्मण आहे म्हणून त्यांच्या कुकृत्यांकडे डोळेझाक केली नाही.

६ अ. कर्तव्यात कसुर करणार्‍या जिवाजी विनायक
याला खडे बोल सुनावणारे छत्रपती शिवाजी महाराज !

महाराजांनी प्रभावळी सुभ्याचा सुभेदार जिवाजी विनायक याला लिहिलेले पत्र; त्यात त्यांची केलेली कानउघाडणी, त्याला दिलेली जरब सर्वश्रुतच आहे. दंडा राजपुरीच्या उरावर पद्मदुर्ग किल्ला वसवून दुसरी राजापुरी निर्माण करण्याचे काम चालले होते. जिवाजी विनायक याने या कामात द्रव्य आणि ऐवज दौलतखान आणि दर्यासारंग यांना पाठवणे अपेक्षित होते. सुभेदाराने त्याच्या कर्तव्यात कुचराई केली. त्याला वाटले, मी सर्वेसर्वा ब्राह्मण. मला कोण विचारणार ? महाराजांना हे समजल्यावर त्यांनी लिहिले, एवढी हरामखोरी तुम्ही कराल…त्यावरी साहेब रिझतील काय ? हे गोष्ट घडायची तर्‍ही होय न कळे की हबशियांनी काही देऊन आपले चाकर तुम्हाला केले असतील ! त्याकरिता ऐसी बुद्धी केली असेल ! तरी देशा चाकरा ठाकठीक केले पाहिजेच ! ब्राह्मण म्हणून कोण मुलाहिजा करू पहातो ?

६ आ. जनतेची पिळवणूक करणार्‍या
देव महाराजांना वठणीवर आणणे

असेच दुसरे उदाहरण चिंचवडच्या देवांचे. चिंचवडचे देव छत्रपती शिवाजी महाराजांच्या अगदी जवळीकीतले. महाराजांनी अनेक भूमी त्यांना इनाम दिलेल्या. साहजिकच देवांना वाटले, ते महाराजांच्या ऐवजी स्वतंत्ररित्या न्यायनिवाडा करायला तर पात्र आहेत. महाराज कशाला आपल्याला बोल लावतील ? तर या सत्पुरुष देवांनी जेजुरीच्या कोळी आणि घडशी यांच्या तंट्यात विनाकारण हस्तक्षेप केला. देवांनी दोघांना कोंढाणा किल्ल्यावर कैदेत टाकले. हे करायला त्यांनी कोंढाण्याच्या किल्लेदाराला भरीला घातले. घडशी आणि कोळी यांच्यापैकी काही जण महाराजांकडे तक्रार घेऊन गेले. तक्रार ऐकून महाराज संतापले. न्याययंत्रणेतला देवांचा हस्तक्षेप, त्यांचा उद्दामपणा महाराजांना सहन झाला नाही. त्यांनी ताबडतोब देवांना पत्र लिहिले आणि फटकारले, आता तुमची बिरूदे आम्हाला द्या व आमची बिरूदे तुम्ही घ्या. कोंढाणा किल्ल्याच्या गडकर्‍याला त्यांनी खरमरीत शब्दांत विचारले, तू चाकर कोणाचा? आमचा कि देवांचा ? हेच देव रयतेकडून दान म्हणून फुकट मीठ घेत असत. लोक धर्मकार्य म्हणून देत असत. पुढे त्यांनी महाराजांकडे मिठाची सनदच मागितली, ज्यायोगे त्यांना हक्काने लोकांकडून मीठ घेता येईल. महाराजांनी हे नाकारले. छत्रपतींनी सरकारातून देवस्थानला मीठ देण्याचा आदेश दिला आणि रयतेची अडवणूक थांबवली. धान्याच्या बाबतीतही असेच घडले. एका ठरलेल्या दराने-भावाने देव रयतेकडून धान्य खरेदी करत असत.

बाजारभाव वाढले तरी देव रयतेकडून आधीच्याच भावात धान्य खरेदी करत. महाराजांनी पुन्हा हस्तक्षेप केला आणि हे थांबवले. त्यांनी सरकारातून देवस्थानाला धान्य देण्याचे आदेश दिले. देव ब्राह्मण असले, सत्पुरुष म्हणून ख्यातकीर्त असले, तरी गरीब रयतेप्रती असणारा त्यांचा उद्दामपणा, रयतेची पिळवणूक करण्याची प्रवृत्ती महाराजांनी सहन केली नाही. त्यांनी देवांना त्यांची योग्य जागा दाखवून दिली.

कर्तव्यपालन करतांना, चाकरी करतांना चूक झाल्यास ब्राह्मणांना वेगळे निकष, मापदंड नव्हते हे या पत्रावरून कळते.

६ इ. मुसलमान आक्रमणकर्त्यांची
खुशामत करणार्‍या ब्राह्मणांचे वतन काढून घेणे

मराठा पुंड वतनदारांप्रमाणेच ब्राह्मणही आपल्या अग्रहारासाठी (ब्राह्मणांचा निवास. हा बहुदा त्यांना इनाम म्हणून दिला जात असे.) स्वकीय-परकीय कुणाचीही खुषामत करत असत. स्तुतीपाठक होत. मुसलमान सत्ताधिशांचे गुणगान गाऊन आपले पोट भरणार्‍या ब्राह्मणांचे अग्रहार काढून घ्यावेत, असा सल्ला महाराजांच्या सल्लागारांनी दिला. यानुसार कराडजवळील एका ब्राह्मणाचे वतन खालसा करण्यात आले. अग्रहार काढून घेतल्यामुळे ब्राह्मणाच्या कुटुंबाला दोन वेळच्या जेवणाची भ्रांत निर्माण झाली. महाराजांना हे समजल्यानंतर त्यांनी ब्राह्मणाला वेगळी सनद दिली. या सनदेद्वारे तो वसंतगडाच्या किल्लेदाराकडून वर्षाचे तांदूळ घेऊ लागला. त्याची उपासमार टळली.

 

७. पंताजी गोपीनाथ यांचा अवमान करणार्‍या
देशमुखांना छत्रपतींनी सुनावले खडे बोल !

सच्छील, विद्वान, मुत्सदी अशा ब्राह्मणांचा महाराज नेहमीच आदर करत असत, तर गरीब-निर्धन, गांजलेल्या अशा ब्राह्मणांविषयी त्यांना कणव वाटत असे. पंताजी गोपीनाथ हे महाराजांचे अगदी निकटवर्ती. प्रतापगडाच्या अफजलखानाविरुद्धच्या लढाईत त्यांनी मुत्सद्देगिरीची कमाल केली होती. महाराजांनी त्यांना अफजलखानाकडे आपले वकील म्हणून पाठवले होते. पंताजी गोपीनाथांनी आपले सर्व चातुर्य, मुत्सद्देगिरी, हजरजबाबीपणा पणाला लावून खानाला प्रतापगडाच्या माचीवर आणले. तर अशा पंताजींबद्दल मनस्वी आदर महाराजांच्या मनात होता. त्यांनी भूमी, घर वगैरे बक्षिस म्हणून पंताजींना दिले होते. अशा पंताजी गोपीनाथांचा भोरजवळील आंबवडे (आंबोडे) गावात रायाजी देशमुख नावाच्या तरुणाने अपमान केला, त्यांच्यावर हत्यार उगारले. महाराजांना हे कळले, तेव्हा त्यांनी रायाजीला खरमरीत पत्र लिहिले. ते लिहिते झाले, पंडित माईले बहुत थोर मनुष्य आहेत. साहेबाचे मेहेरबानीत ते बहुत काही आहेत. असे असता तुम्ही लहान लोकी त्यासी बेअदबी केली. याउपरी कुल लोक तुम्ही पंडितजवळ जाऊन आपला गुन्हा त्यापासून माफ करून घेणे. असे झाले नाही, तर तुमच्या पायी बेडिया घालून गळा तोग घालून किल्ले राजगडावरी ठेवून धोंडे वाहवतील.

 

८. धर्मांतर झालेल्यांचे शुद्धीकरण करण्यासाठी
अष्टप्रधान मंडळात पंडितराव पदाची निर्मिती !

महाराजांनी अनेक क्रांतीकारक धोरणे राबवली. सक्तीने मुसलमान धर्म स्वीकारायला लावलेल्या मराठ्यांना, हिंदूंना स्वधर्मात येण्याची सोय नव्हती. महाराजांनी विद्वानांना शास्त्राधार शोधायला लावले आणि नेताजी पालकरसारख्या स्वराज्याच्या शूर सेनापतीला, ज्याला औरंगजेबाने सक्तीने बाटवून मुसलमान केले होते, स्वधर्मात परत घेतले. असेच दुसरे उदाहरण फलटणच्या बजाजी निंबाळकरांचे. ते तर महाराजांचे आप्त. त्यांचेही शुद्धीकरण महाराजांनी केले. जे जातीसमूह बलपूर्वक बाटवले गेले असतील त्यांना प्रायश्‍चित्त घेऊन परत स्वधर्मात येण्याची सोय धर्माचार्यांच्या साहाय्याने महाराजांनी करून दिली. यासाठी त्यांनी अष्टप्रधान मंडळात पंडितराव हे नवीन पद निर्माण केले.

संदर्भ : स्वातंत्र्यवीर – दिवाळी २०१५

 

९. जनता जनार्दन राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा बाणेदारपणा !

आजही काही गोष्टींचे तुम्हाला आश्चार्य वाटेल. जगात खोबर्‍याचा व्यापार होत असे. त्यात राजापूरच्या खोबर्‍याला खास महत्त्व आहे. आंतरराष्ट्रीय व्यापारपेठेतील वस्तूंची यादी पाहिल्यास त्यामध्ये ‘खोबर्‍या’च्या प्रकाराच्या यादीत ‘राजापुरी खोबरे’ असे स्वतंत्र नाव त्यात नमूद केलेले असते. म्हणजेच राजापुरी खोबर्‍याला विशेष गुण असल्याविना आज इतकी वर्षे या खोबर्‍याला आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतंत्र दर्जा मिळाला नाही. ब्रिटीश व्यापार्‍याची राजापूरला वखार होती. त्यांनी तेथील व्यापार्‍याना हाताशी धरून त्यांना पैसे चारले आणि आपल्या शेतकरी बांधवांकडून ते अत्यंत पडेल भावाने हे खोबरे विकत घेतले. तेव्हा दळणवळणाची साधने उपलब्ध नव्हती. शेतकर्‍याकडे त्यांच्या मालाला चांगला भाव मिळावा याकरता माल दुसर्‍या पेठेत पाठवण्याइतपत त्यांची आर्थिक कुवत नव्हती; म्हणून ते हतबल होते. त्यांना प्रचंड नुकसान सहन करावे लागले. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना पत्र लिहून याविषयी कळवले. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्वरित इंग्रजांकडून जो माल महाराजांच्या मुलुखात येत होता, त्यावर २०० टक्के दंडात्मक आयात शुल्क बसवले; जेणेकरून इंग्रजांच्या मालाची किंमत वाढून तो विकला जाऊ नये. या प्रकारामुळे इंग्रजांची तारांबळ उडाली. त्यांच्या मालाची विक्री अल्प झाली. त्यामुळे इंग्रजांनी छत्रपती शिवाजी महाराजांना पत्र लिहिले की, आमच्यावर दया करा, सीमाशुल्क अल्प करा. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्वरित राजपत्र पाठवले, मी शुल्क उठवण्यास एकाच अटीवर सिद्ध आहे की, तुम्ही आमच्या राजापूरच्या शेतकर्‍याचे जे नुकसान केले, ते भरपाईसह योग्य प्रकारे भरून द्या आणि ते भरून दिल्याची पोचपावती शेतकर्‍याकडून आली की, मग मी दंडात्मक शुल्क उठवीन, अन्यथा नाही. शेवट ब्रिटिशांना माघार घ्यावी लागली. दुसर्‍या दिवसापासून त्यांनी त्या व्यापार्‍याना गाठून त्यांच्याद्वारे सर्व शेतकर्‍याना त्यांचे जितके रास्त पैसे होते, त्यासह नुकसानभरपाईची रक्कम देण्यास प्रारंभ केला. त्यानंतर शेतकर्‍यानी छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांची भरपाई मिळाली असून ते समाधानी असल्याचे कळवले. त्यानंतर महाराजांनी सीमाशुल्क उठवले. छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यक्तीमत्त्व समृद्ध असणे आणि अनेक शास्त्रांचा त्यांचा अभ्यास असणे ‘छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यक्तीमत्त्व समृद्ध होते. ते स्वतः प्रतिभावंत होतेच; पण अनेक विषयांवर त्यांचा अभ्यास आणि अधिकार होता. राज्यशास्त्र, खगोलशास्त्र, कालगणना, युद्धशास्त्र, वास्तूशास्त्र (विशेषतः सैनिकी वास्तूशास्त्र), पारमार्थिक तत्त्वज्ञान, इतिहासशास्त्र, व्यवस्थापन इत्यादी शास्त्रांचा त्यांचा अभ्यास होता, याचे अनेक प्रमाणपत्र आणि पुरावे मिळतात.’

– शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे (कालनिर्णय दिनदर्शिका, डिसेंबर २००९)